• ओळख
  • लेखन
  • पत्र
  • कविता
  • अल्बम
  • सिनेमा / पुस्तक
  • गाठभेट
  • ओळख
  • लेखन
  • पत्र
  • कविता
  • अल्बम
  • सिनेमा / पुस्तक
  • आवडलेलं
  • गाठभेट

प्रिय दिसले सर

  • प्रिय दिसले सर

    प्रकाशनाची तारीख 28-Jan-2021
    प्रकाशनाची तारीख 28-Jan-2021

                        पत्रास कारण की ...शिक्षणासाठी तुम्ही केलेल्या कामाबद्दल जागतिक पुरस्कार मिळाला. मनापासून अभिनंदन सर. मी एक जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढे वाद, एवढा भ्रष्टाचार असूनही आपला देश कशाच्या बळावर टिकून आहे? असा प्रश्न लोकांना पडतो. त्याचं उत्तर आहे तुमच्यासारखे प्रामाणिक शिक्षक. मुलं खिचडीसाठी नाही तुमच्यासारख्या शिक्षकासाठी शाळेत येतात. पण हेच अजून बऱ्याच मोठमोठ्या लोकांना कळत नाही. म्हणून मुलांच्या शिक्षणापेक्षा खिचडीवर जास्त चर्चा आणि खर्च होतो. मी अजून लहान आहे. मला कळत नाहीत खूप गोष्टी. म्हणून मी या विषयावर लिहिणार नाही. मला तुम्हाला वेगळच सांगायचंय. मी परीक्षेबद्दल पण बोलणार नाही. मी रोज पेपरमध्ये वाचतो. सरकारचीच वेळोवेळी परीक्षा चालू असते. कधी वेळ मिळाला तर होईल आमची पण परीक्षा. मी तो विचार करत नाही. खरं सांगायचं तर मी माझ्या भविष्याचा विचारच करत नाही. मी विचार करतो माझ्या वडलांच्या भविष्याचा. खरच.

                        सर माझे वडील एकदम चांगले आहेत. पण लहानपणापासून मी कधी त्यांना हसताना बघितलं नाही. सगळ्या जगाची चिंता असल्यासारखा चेहरा असतो त्यांचा. मी त्यांना कधी निवांत झोपल्याचं पण बघितलं नाही. माझे वडील आमच्या शेजारी राहणाऱ्या रम्याच्या बापासारखे दारू पिणारे असते तरी काही वाटलं नसतं. रम्याचा बाप पिऊन झोपतो तरी. पण माझे वडील झोपतच नाहीत. सगळ्या गावाला अभिमान होता माझे वडील कधी दारू पिणाऱ्या सोबत बसत नाहीत, बारमध्ये जात नाहीत. पण दारूला कधी न शिवलेले माझे वडील काही वर्षापासून धाब्यावर वेटर म्हणून काम करतात. रोज रात्री. गिर्हाईकांना दारू द्यायला. आजी म्हणते माझे वडील शिकले नसते तर काही वाटलं नसतं. पण माझे वडील एमए बीएड झालेत. पीएचडी केलीय त्यांनी. काय फायदा झाला? गावात त्यांना सगळे डॉक्टर म्हणून चिडवतात. धाब्यावर ओळखीचे लोक गमतीने दारू ऐवजी डॉक्टर औषध आणा लवकर म्हणतात.

                        गुरुजी, आम्हाला शाळेत शिकवतात. कोणतच काम वाईट नसतं. पण जेंव्हा पीएचडी करून पण तुम्हाला धाब्यावर वेटरचं काम करावं लागतं ना तेंव्हा खूप वाईट वाटतं. मी रोज माझ्या वडलांच्या डोळ्यात ते दुखः बघतो. दारू पिणाऱ्या माणसापेक्षा माझ्या वडलांचे डोळे लाल होतात. दारू पिणारा माणूस बळजबरी ह्याला त्याला बोलून मोकळा होता. पण माझे वडील त्यांचं दुखः कुणालाच सांगू शकत नाहीत. सांगणार कसं? माझा काका पण डीएड करून घरीच बसलाय. वडलांच्या बीएड साठी आणी काकाच्या डीएड साठी आजोबांनी शेती विकली. आजीनी सोनं गहाण ठेवलं. आणि आता माझ्या काकाला कुणी पोरगीच देत नाही. आज ना उद्या नौकरी लागेल ह्या आशेवर वडलांचं लग्न तरी झालं. म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहू शकतोय.

                        माझ्या वडलांनी पण खूप पत्र लिहिले. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री. सगळ्यांना पत्र लिहिले. पण काही फरक पडला नाही. उत्तर सुद्धा आलं नाही. शिक्षक भरती झालीच नाही. पण मला वाईट कशाचं वाटतं सांगू? अजूनपण माझे वडील एका विनाअनुदानित कॉलेजमध्ये शिकवतात. आमच्या वर्गातले काही पोरं शाळेत जेवढ्या पैशाचे चॉकलेट खातात तेवढे पैसे पण माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारात भेटत नाहीत. माझा काका चार वर्ष एका शाळेवर जवळपास फुकट काम करतोय. गुरुजी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कॉलेजमध्ये माझ्या वडलांच्या हाताखाली शिकलेले पोरं कमवायला लागले. धाब्यावर खायला प्यायला येतात. त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्व्हिस देतात. वर्गात नीट शिकत नाही म्हणून माझ्या वडलांनी शिक्षा केलेले पोरं एका बैठकीत हजार रुपये बिल करतात. कधी कधी मला वाटतं ते पोरं माझ्या वडलानाच एवढ शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करतील. आपल्या विद्यार्थ्यांनी बिल देताना दिलेली टीप माझ्या वडलाना खूप काही शिकवून जात असणार.

                        गुरुजी शिक्षणाचा पश्चाताप वाटायची वेळ कुणावर येऊ नये. पण आजोबा म्हणतात कुत्र्याच्या छत्र्यासारखे डीएड बीएड कॉलेज निघाले होते. हे कॉलेज कुणाचे होते हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांनी हाताला काम द्यायला पाहिजे होतं त्यांनी लाखो पोरं बेरोजगार करून टाकले. लाखो रुपये डोनेशन घेऊन. आज त्यातले बरेच कॉलेज गायब झाले. पण डीएड बीएड झालेल्या लोकांनी काय करायचं? त्यांना कसं गायब होता येईल? एकीकड गणित विज्ञान शिकवायला शिक्षक नाही असं सरकारच म्हणतय. आणी दुसरीकडे शिक्षक भरतीचं नाव काढत नाही. वशिला नसल्यामुळे प्राध्यापक व्हायचं स्वप्नं बघणारे पोरं शिपायाच्या पदासाठी अर्ज करायला लागले. गुरुजी ही वेळ कुणी आणली? प्राध्यापक व्हायला किती पैसे मोजावे लागतात हे काय लपून राहीलय का? पन्नास पन्नास लाख रुपये भरून प्राध्यापक झालेला माणूस विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे धडे देताना किती कॉमेडी दिसत असेल. जाऊद्या. तुमच्याशी बोलावं वाटलं. तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात म्हणून. लहान तोंडी मोठा घास झाला. पण खरच माझ्यासारख्या शाळेतल्या मुलाला कळतय ते नेत्यांना का कळत नसेल हो गुरुजी?

                        माझ्यापुरतं सांगतो. गुरुजी तुम्हीच मला सांगा, आयुष्याचं एवढ वाटोळ होऊनही माझे वडील मला अभ्यास कर म्हणतात तेंव्हा मला किती त्रास होत असेल. मी शिक्षणमंत्र्याला विनंती करतो.... मला नापास करा.....शप्पथ सांगतो...वडलांच्या टेन्शनमुळे मी अभ्यास करत नाही...मला माझा प्राध्यापक बाप बेरोजगार होऊन घरात बसलेला असताना बाकीच्या शिक्षकाने कितीही चांगल शिकवलं तरी पटणार नाही.....आणि शिकून आपल्या बापाची अशी अवस्था झालेली असल्यावर मला शिकण्यात काय इंटरेस्ट वाटणार? गुरुजी, तुम्ही आपल्या शिक्षकांचं नाव जगात मोठं केलय. पण अजून खूप शिक्षक, प्राध्यापक गुणवत्ता असूनही फक्त संधी नाही म्हणून बेरोजगार आहेत. जिथे शिक्षकांचे असे हाल होत असतील तिथल्या शिक्षणाचे काय हाल होतील ? तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री, राज्यपाल तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते. म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं. कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न तरी कसे सुटतील.

                        तुम्ही शिक्षणासाठी क्यूआर कोड वर काम केलं. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावरही एखादा कोड बनवा. हे कोडं सुटलं पाहिजे.

    चूकभूल द्यावीघ्यावी.

    तुमचाच....

comments

Pravin Gosavi

Sundar

Vishwajit Lad

पत्र लिखाण करणाऱ्या व्यक्तीने वास्तव मांडलेलं आहे, परंतु समाज आणि शिक्षण व्यवस्था या नाण्याच्या दोन बाजू आहेत,शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी घ्यायचे असते, यावर सर्व समाज घटकांची सहमती असेल असे नाही.राहता राहिला प्रश्न जो सर्वश्री डीसले गुरूजींना उद्देशून लिहण्याचा, त्यांनी त्यांची योग्यता त्यांचा कामातून सिद्ध केलेली आहे, असे अनेक शिक्षक विशेष करून, ग्रामीण व आदिवासी बहुल भागात आहेत की जे त्यांच्या परीने उपक्रम विद्यार्थ्यांनपर्यंत पोहचवता. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारात होतो, परंतु शिक्षण व्यवस्थेत विशेष करून शिक्षकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे, इयत्ता ४ वर्गात दाखल झालेल्या 20 ते 25 टक्के मुलांना दुसरी इयत्ता मधील पुस्तक मराठी भाषेतील आकलनासह वाचता येत नाही, गणिताच्या बेरीज वजाबाकी च्या क्रीया येत नाहीत, संख्या ओळखता येत नाहीत, याला जबाबदार कोण, शासन, समाज, पालक की शिकवणारा शिक्षक? हे सर्व आपण आजूबाजूला पाहू शकतो.

Sunil Kharad

सर,मी पण ५ वर्ष बिनपगारी शिकवलं . M.Sc.(Chem) विद्यापिठाचा लेखी परीक्षेचा टाॅपर होतो. नोकरीसाठी भरायला पैसे नव्हते म्हणुन दमण,सिल्वासा येथे कंपनीत केमिस्ट म्हणुन दोन वर्ष काम केल.नंतर येऊन शिकवणी घेतली व पैसे जमा झाल्यावर नोकरीला लागलो तेही बिनपगारी विनाअनुदानित शाळेवर .आपण माझ्या आठवणी जागृृृत केल्या,अतिशय सत्य परिस्थिती मांडली आजही काही विनाअनुदानित शिक्षक चहा विकतात कोणी आणखी वेगळा व्यवसाय करतात.आपले खुप खुप धन्यवाद

pravin shelke

"अजून खूप शिक्षक, प्राध्यापक गुणवत्ता असूनही फक्त संधी नाही म्हणून बेरोजगार आहेत" ही बाब ही खूप महत्त्वाची आहे, मला आठवत 2010 मध्ये शेवटची शिक्षक भरती झालेली त्यानंतर शिक्षक भरती शासनाने बंद केली मग ती zp शाळेची असो वा अनुदानित संस्थांची, त्यानंतर 2013 पासून tet शिक्षक पात्रता परीक्षा लागू केली, tet परीक्षा पास असाल तरच शिक्षक बनता येईल अशा सक्त सूचना असताना आणि शिक्षक भरतीवर बंदी असताना देखील काही भ्रष्ट संस्थाचालकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिक्षक पात्रता परीक्षा पास नसलेल्या लोकांना पैशाच्या जोरावर नियुक्त्या दिल्या. आता आपणच सांगा पैशाअभावी खऱ्या पात्रता धारकाला नोकरी कशी उपलब्ध होईल?? सध्याची डिसेंबर 2017 पासून सुरू असलेली शिक्षक भरती 2021 सूरु झालं तरी अजून पूर्णत्वास नाही सांगा कशी मिळेल संधी ??

Ravindradada Dongardeo

विदारक वास्तव

Sonali Chavan

अगदी खरंय सर... वास्तविकता अतिशय उत्तमरित्या शब्दबद्ध केलीत..

suryakant chikane

सर खुप सुंदर लिखा न आहे, वास्तव मांडलं आहे

LiTtLe KiDs ! Play Fun

आगदी वास्तव मांडले आहे सर , ही परिस्थिती बदलायला हवी,गावोगाव आनेक डिसले गुरुजी आहेत ते सध्या, शेतात,हॉटेलात,पेट्रोल पंपावर, खाजगी शाळेत वेठबिगार प्रमाणे काम करत आहेत. याला शासनाचे धोरण जबाबदार आहे.

LiTtLe KiDs ! Play Fun

आगदी वास्तव मांडले आहे सर , ही परिस्थिती बदलायला हवी,गावोगाव आनेक डिसले गुरुजी आहेत ते सध्या, शेतात,हॉटेलात,पेट्रोल पंपावर, खाजगी शाळेत वेठबिगार प्रमाणे काम करत आहेत. याला शासनाचे धोरण जबाबदार आहे.

पुस्तकासाठी संपर्क

  • 'पत्रास कारण की' आणि 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' घरपोच मिळवा.
  • "गोष्ट छोटी डोंगरा ऐवढी" येत आहे पाचवी आवृत्ती

अल्बम

नुकतेच काही सुचलेले

  • प्रिय पंकजाताई, रोहितदादा, सुजयदादा

    16-Dec-2020
  • देवालाही चष्मा आहे का?

    22-Mar-2021
  • नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

    01-Jan-2017
  • ऑलम्पिक मेडल

    16-Aug-2016

आमच्याशी संपर्क साधा

  • @arvindj3

    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • Youtube

    @2020 - All Right Reserved. Designed and Developed by arvindjagtap.com


    Back To Top
    • Home
    • About me
    • Privacy Policy
    • Contact Me

    Popular Posts

    • 1

      Memories from Last Summer

      June 7, 2017
    • 2

      Visit Orange Garden

      June 3, 2017
    • 3

      Explore Vancouver Mountain

      June 1, 2017
    • 4

      Hipster Outfit for Autumn

      May 29, 2017
    • 5

      Run into the Wood

      June 27, 2017
    @2020 - All Right Reserved. Designed and Developed by PenciDesign