गाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाही
गाय आणि बैलामध्ये एवढा भेदभाव का आहे हेच कळत नाही. गाईचा विषय आला की लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. गोमाता म्हणून अरेरावी करतात. एका फोटोत मी एक हौद बघितला होता. त्यावर लिहिलं होतं या हौदातलं पाणी गाईसाठी आहे. इतर प्राण्यांनी तोंड घालू नये. आपण शेतकरी घरातली माणसं असल्यामुळे आपल्याला सगळ्या जनावरांचा लहानपणापासून लळा असतो. बैलांना आपण रुमाल्या काजळ्या सुलतान्या सारखी नावं ठेवलेली असतात. गाईची आणि म्हशीची पण नावं होती. पोळा शहरात लोकांना माहित असतो पण बैलाचे लाड रोज असायचे. बैलापुढ ठेवलेल्या टोपल्यातली पेंड सहज स्वतःच्या तोंडात टाकणारी माणसं आठवतात. आज कुणाचा विश्वास बसणार नाही. रोज एखादी भाकर आवडत्या गाईसाठी किंवा बैलासाठी ठेवायचे लेकरं. आज हे सगळं आठवण्याच कारण म्हणजे बैलांच्या जीवघेण्या शर्यती.
बाहेर खूप देशांमध्ये कामगार असो किंवा स्वच्छता कर्मचारी त्यांना आदर दिला जातो. ड्रायव्हरला सुद्धा सन्मानाने वागवलं जातं. खूप कष्ट करणाऱ्याला बैल म्हणत नाहीत. अंगमेहनतीची कामं करणाऱ्याला बैलबुद्धी म्हणून हिणवत नाहीत. आपण मात्र एवढे नीच आहोत की आळशी माणसांना बैला म्हणून हाक मारतो. सगळ्यात जास्त कष्टकरी प्राण्याच्या नावाने आळशी माणसाला हाक मारणे हा किती मोठा अपमान आहे. गावाकडे सुद्धा लोक बायकोच्या पुढे पुढे करणाऱ्या माणसाला बैल म्हणतात. लाचार माणसाला नंदीबैल म्हणतात. पण नंदीबैल कधी पाउस पडेल म्हणून मान हलवतो का? त्याला कळत का? तो बिचारा वाद्याला दाद देतो. तुमच्या वाजवण्याला दाद देतो. आता तुम्ही ठरवून घेतलं की नंदीबैल पाउस पडेल का? तर हो म्हणाला यात त्याची काय चूक आहे? तुम्ही त्यावेळी नंदीबैलाला मी मूर्ख आहे का? असं विचारलं तरी तो मान डोलवणार. मग?
बैलाची गोष्ट आठवली. राजाभाऊच्या बैलाची गोष्ट. साठ सत्तर हजार रुपये कर्ज काढून बैल घेतला. लाड केले. कष्ट करवून घेतले. एक दिवस नकळत शेजारच्या शेतात कुंपण बनवायचं काम चालू होतं तारेचं. राजाभाऊच्या बैलाने तार गिळून घेतली. तडफडू लागला. राजाभाऊनी टेम्पो केला भाड्यानी. पाच हजार दिले. दवाखान्यात न्यायच्या आधीच बैलानी शेवटचा निरोप घेतला. जाणकार लोकांनी सांगितलं कशाला दवाखान्यात नेता. खेळ खलास झाला. टेम्पो वाला म्हणाला तीन हजार द्या. चला वापस. बैल आणून पुन्हा गायरानात पुरून टाकला. बैल गेला तरी घरचा माणूस गेल्यासारखं गावातले लोक येऊन भेटतात अजूनही. येणाऱ्या जाणाऱ्याच्या गळ्यात पडून राजाभाऊ रडायचा. दुखः हलकं व्हायचं नाव घेत नव्हतं. घरचे लोक सोबत कर्जाची आठवण सुद्धा काढायचे. अचानक एक नातेवाईक म्हणाला, एवढी काय काळजी करायची. बैलाची नुकसान भरपाई देतं सरकार. एक वाक्य त्या सुतकी वातावरणात जादूची कांडी फिरवून गेलं. दुखात असला तरी राजभाऊला थोडा तरी दिलासा मिळाला. दुखः विसरायची ताकद नसली तरी दुखः हलकं करायची ताकद असते नुकसानभरपाईत.
राजाभाऊ दोन शहाण्या लोकांना घेऊन तहसीलला गेला. दोनचार सरकारी कार्यालयात खेट्या मारल्यावर त्याच्या लक्षात आलं की नुकसानभरपाई मिळते हे जसं आपल्याला कुणी सांगितलं नव्हतं तसं नुकसानभरपाई मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे पण सांगितलं नव्हतं. ज्या संभानी राजाभाऊला नुकसानभरपाईबद्दल सांगितलं होतं तो पण आता राजाभाऊच्या प्रश्नांनी वैतागला होता. त्याला मनोमन असं वाटत होतं की सरकारने फक्त नुकसानभरपाई मिळते हेच लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे असं नाही. नुकसानभरपाई मिळवायला किती जोडे झिझवावे लागतात त्याच्या पण जाहिराती केल्या पाहिजेत. कुणा कुणाचे खिशे भरले पाहिजेत हे सरकारनेच एकदा जाहीर केलं तर लोकांची सोय होईल. कारण पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. माणसाला अंदाज नसतो. अचानक अधिकाऱ्यासोबत चपराशी पण पैसे घेतो हे त्याला कळत. मग त्याला पैसे कमी पडतात. पुन्हा गावाकड जाऊन पैसे आणाव लागतात. त्याच्यापेक्षा सरकारने कुणा कुणाला पैसे द्याव लागतात हे पण सांगायला पाहिजे. पण असं होऊ शकत नाही. हा कारभार लपून छपून. राजाभाऊचा नुकसानभरपाई मिळवायचा प्रवास सुरु झाला. मग त्याला सरकारी लोकांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्ती असली तरच नुकसानभरपाई मिळेल. राजाभाऊ निघाला. निराश होऊन. पण एका कारकुनाने त्याला पकडलं. सांगितलं जर बैलाचा पोस्ट मोर्टेम रिपोर्ट आणला की बैल नैसर्गिक आपत्तीत मिळाला तर मी नुकसान भरपाई मिळवून देतो. राजाभाऊ म्हणाला असं कसं जमणार? बैल तार खाऊन मेला. तुमच्या नियमात बसत नाही. साला आमचा बैल मरायला तुम्ही वीज पडायची वाट पहा. पूर यायची वाट पहा. पूर आल्यावर माणूस बैलाची नुकसानभरपाई मागायला येईलं का तुमच्याकड? त्याच्या अख्या जिंदगीची वाट लागणार नाही का? कारकून म्हणाला भाषण देऊ नका. सरकारी दवाखान्यात जा. थोडे पैसे द्या. पाहिजे तसा रिपोर्ट भेटल. संभा पण म्हणाला हे होऊ शकत. राजाभाऊला वाटलं एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
दवाखान्यात रिपोर्ट साठी विचारपूस सुरु झाली. बैल घेऊन यावा लागणार असं सांगण्यात आलं. पुन्हा राजाभाऊ गावी गेला. आता बैल वास मारायला लागला होता. टेम्पो वाला दहा हजार घेऊन तयार झाला. बैल टेम्पोत टाकायला पाच देशी दारूच्या बाटल्या द्याव लागल्या. प्रवास सुरु झाला. गमजा नाकाला बांधून प्रवास सुरु झाला. वाटेत गोरक्षक मंडळी भेटली. त्यांना हा बैल आहे हे सांगायला अर्धा तास गेला. कशीबशी गाडी दवाखान्यात गेली. आधी कम्पाउंडरनी गाडी दवाखान्याच्या लांब उभी करायला लावली. सगळ्यांनी बैलानी तार खाल्लीच कशी हे विचारायला सुरुवात केली. राजाभाऊ खजील होत गेला. सासऱ्याच्या दहाव्याला गेलो होतो म्हणाला. खरं होतं ते. पण एकाने जुन्या बाईकला दिवसात चौथ्यांदा फडकं मारताना विचारलं बैलापेक्षा सासऱ्याचा दहावा महत्वाचा आहे का? राजाभाऊ काय बोलणार? शेवटी संध्याकाळ होता होता विषय पैशावर आला. कम्पाउंडर दोन हजार मागत होता. डॉक्टरचे पंधरा हजार फिक्स होते. पण पैसे मिळणार किती? ते खरेदी केलेल्या किमतीच्या प्रमाणात. म्हणजे पुन्हा ते प्रमाणपत्र. एवढे पैसे आणायचे कुठून?
राजाभाऊ आणि संभा विचार करायला लागले. काय करायचं? पण विचार करायला वेळ मिळाला नाही. ते थांबले होते तिथे एक भुर्जीची गाडी लागली संध्याकाळी. त्यांनी टेम्पो सकट हकलून दिलं वास येतो म्हणून. टेम्पो दूर नेऊन थांबवला. विचार करण्यात वेळ जात होता. सुचत काही नव्हतं. लोक जिथे जातील तिथे वास येतो म्हणून हकलत होते. डॉक्टर साहेबाना भेटून विनंती करायचा विचार आला. पण डॉक्टर साहेबांच्या बंगल्या बाहेर दोन तास वाट पाहिली. ते आले नाही. शेवटी एका ओळखीच्या पक्षाच्या आमदारांकडे गेले. रात्री आमदारसाहेब भेटले योगायोगाने. थाटात फोन लावला. कारण निवडणूक जवळ आली होती. डॉक्टर म्हणाला दोन दिवसात भेटतो. दोन दिवसानी यायला सांगा. शनिवार रविवार आला होता. डॉक्टर गावी गेला होता.
राजाभाऊ सकट टेम्पो परत गावी गेला. आता गावापासून दूर जागा बघावी लागली. बैल जपून ठेवावा लागणार होता. कारण पोस्ट मोर्टेम रिपोर्ट आवश्यक होता. दोन दिवस गेले कसेबसे. पुन्हा जायची वेळ आली. टेम्पो वाल्याला दोन दिवसाचं भाडं आलं. चांगले पैसे मिळाले. त्याला जाऊ नको म्हणायचं तर तेवढे पैसे देणार कोण? दोन दिवस थांबून जावून ठरलं. पुन्हा दोन दिवसांनी डॉक्टरला फोन केला. संभा म्हणाला डॉक्टरला फोन करून जाऊ. डॉक्टरनी फोन उचलला नाही. पुन्हा कम्पाउंडरनी फोन उचलला. डॉक्टर साहेबाची बदली झालीय. दोनच दिवस आहेत दवाखान्यात. आता रेट वीस हजार झालाय. पटकन येऊन जा. नाहीतर नवीन डॉक्टर नाटक करणार. राजाभाऊ वैतागला. पण दुसरा काही पर्याय नव्हता. टेम्पो केला. पुन्हा दोन दोन फडके तोंडाला लावून प्रवास झाला. बैल दवाखान्यासमोर हजर. बैलाचा आता सांगाडा झाला होता जवळ जवळ. पैसे वाढले होते. राजाभाऊ खचला होता. तरी खर्च एवढा झाला होता की पैसे चारण्याशिवाय पर्याय नव्हता.
बैल शहराच्या बाहेर रानात लपवून ठेवला. ओळखी पाळखीच्या लोकांकडे राजाभाऊ चकरा मारू लागला. नातेवाईकात फोना फोनी झाली. राजाभाऊ आला की काय कारण सांगायचं ठरून गेलं. कावळे आता बैलाच्या सांगाड्याभोवती शेकडोने गोळा व्हायला लागले. राजाभाऊला मात्र आपल्या नात्यातला माणूस भेटेना झाला. तरी संभाने सांगितलं एकदा. सांगाड्याचं पोस्टमोर्टेम होत नाही. पण महिना झाला त्या गोष्टीला. राजाभाऊ वेड्यासारखा फिरत असतो. पैसे गोळा करत. बैल गेला. आता राजाभाऊ जाईल एखाद दिवशी म्हणून वाईट वाटतं. आपण काही केलं पाहिजे. नाही का?
0 Comments