कलियुग आले देवा हे भारी कृष्णाची हंडी कंसाच्या दारी
खरतर कलियुग वगैरे भ्रम असतो माणसाचा. प्रत्येकाला आधीचा काळ चांगला आणि आता जे चालू आहे ते वाईट असं वाटत असतं. नव्या पिढीला काही कळत नाही ही नेहमीची तक्रार असते. पण इंजेक्शन आणि लसीवरून राजकारण होतांना बघून आजकाल या सगळ्याच गोष्टी पटायला लागतील असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळात एकीकडे ज्यांच्या घरात पेशंट आहे ती माणसं बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, औषध मिळत नाही म्हणून झगडताहेत. आणि दुसरीकडे सोशल मिडीयावर लोक आपला नेता चांगला का त्यांचा या गोष्टीवर भांडताहेत. या अशा फालतू वाद घालणाऱ्या लोकांमध्ये दुर्दैवाने तरुणांची संख्या जास्त आहे. आपण कोणत्या काळात कोणत्या विषयावर भांडतोय याचासुद्धा भान राहिलेलं नाही. हे असे फालतू वाद घालायची सवय राजकारण्याना असते. कारण त्यांना आपले दोष, आपल्या चुका, आपले गैरकारभार लपवायचे असतात. एखाद्या साथीने हजारो माणसांचा जीव खर्ची पडला तरी त्यांना आपली खुर्ची जास्त प्यारी असते. अशा लोकांच्या वादात आपण का पडतोय?
आमचा एक मित्र आहे. कोरोनाच्या काळात आजवर त्याने पन्नास एक लोकांना दवाखान्यात बेड मिळवून दिले असतील, प्लाझ्मा मिळवून दिला असेल. पण यातल्या असंख्य लोकांनी बरे झाल्यावर त्या मित्राचे आभार न मानता कुठल्यातरी नेत्याचे आभार मानले. त्या नेत्याने यांचा फोन उचलायचे पण कष्ट घेतलेले नसतात. किती लोकांना त्यांच्या नेत्यांची ओळख कामी आली या काळात? खरतर ओळखीची वेळच यायला नको. तेवढी आरोग्यव्यवस्था सक्षम असायला पाहिजे. पण जेवढे पैसे राजकीय इव्हेंटमध्ये खर्च केले जातात तेवढे आरोग्यव्यवस्थेवर खर्च केले जात नाहीत. जेवढे पैसे निवडणुकीत प्रचारावर खर्च केले जातात तेवढे पैसे औषधांसाठी खर्च केले जात नाहीत. एरव्ही राजकीय नेता म्हणजे लग्न आणि अंत्ययात्रेला हमखास जाणारा माणूस. पण कोरोनाच्या काळात कुठलाच नेता अंत्ययात्रेला दिसणार नाही. चमचे म्हणतील परवानगी नसते. मग प्रचारसभेला कशी परवानगी असते? मोर्चे काढायला, पत्रकार परिषद घ्यायला काही अडचण नसते. जनतेला आपल्या दुख्खात, संकटात सहभागी असणारा नेता हवा असतो. फक्त आनंदात नाही. पण आपल्याला गृहीत धरण्याची सवय आपणच लावतो नेत्यांना. निवडणुकीत ते एकमेकांवर घाणेरड्या भाषेत टीका करत असतात. आपण त्यात सहभागी होतो. माणसं गोळा करायला ते बिनकामाचे कार्यक्रम घेत असतात. कधी गल्लीतल्या कानठळ्या बसवणाऱ्या क्रिकेट स्पर्धा, कधी बाईक rally, मिरवणुका. यातून कुणी घडत नसतं. पिढी घडवायची, आदर्श घालून द्यायचा तर किती कोरोना झालेल्या नेत्यांनी प्लाझ्मा दिलाय याचा हिशोब घेतला पाहिजे. किती नेत्यांच्या दारातल्या महागड्या गाड्या पेशंटला दवाखान्यात पोचवायला कामी येतात हे बघितलं पाहिजे. आपण ज्या सरकारमध्ये आहोत किंवा होतो त्या सरकारच्या दवाखान्यात आपल्याला भरती व्हावे वाटत नसेल तर चूक कुणाची आहे? या नेत्यांना सरकारी दवाखान्याची भीती वाटते किंवा विश्वास वाटत नाही. म्हणजे स्वतःच स्वतःच्या भोंगळ कारभाराची कबुली दिल्यासारखं आहे. यापलीकडे वाईट गोष्ट आहे ती म्हणजे यांना एवढ्या भयंकर रोगराईच्या काळात राजकारण सुचतय. आज नेत्यांनीच काय पण जनतेने पण यांनी अमुक केलं पाहिजे त्यांनी तमुक केलं पाहिजे असं म्हणण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपल्याला प्रत्येकाला स्वतःची जवाबदारी उचलायची आहे. जवळच्या, दूरच्या कुठल्यातरी माणसाला मदत करायची आहे. पण ते सोडून या काळातही हे नेते भांडत बसलेत. भांडणं लावत बसलेत.
राजकारण्यांना लोकांमध्ये चढाओढ लावण्याची सवय असते. गरज असते. म्हणून दहीहंडीसारख्या स्पर्धा गेल्या काही वर्षात लोकप्रिय झाल्या. खरतर दोन तीन थराची हंडी आणि त्यानिमित्ताने होणारी गाणी असा साधा सोपा सण होता. पण आपल्या नेतृत्वाच्या हव्यासापायी या दहीहंडीचा बाजार मांडला गेला. थरांची चढाओढ निर्माण केली गेली. दहीहंडीत उंच थरावरून पडलेले कितीतरी तरुण आजही बसल्या जागेवरून उठू शकत नाहीत, कायमचे बेडवर पडून आहेत. कितीतरी तरुणांचा मृत्यू झालाय. पण त्याची कुणाला काही पडलेली नसते. दरवर्षी तोच जीवघेणा खेळ असतो. एका अतिशय साध्या सणाचा बाजार केवळ नेत्यांच्या अट्टाहासाने झालाय. माणसाच्या जीवाची पर्वा नसण्याचा पुरावा आणखी काय पाहिजे? आपल्या समर्थकांची गर्दी गोळा करायची आणि बिचाऱ्या डोळ्यात मोठ मोठी स्वप्न असणार्या तरुणांच्या जीवाशी खेळायचं. खरतर या तरुणांनी सातव्या थरावर जावं का आठव्या हा मुद्दा नसला पाहिजे. या तरुणांनी नौकरीत मोठ मोठ्या पदावर जावं हा आग्रह असला पाहिजे. त्यासाठी मदत केली पाहिजे. पण परिस्थिती काय तर आठव्या थरावर जायला शेकडो चमचे घेऊन नेते प्रोत्साहन देत असतात. लोक गोविंदाच्या अंगावर पाणी टाकत असतात. पण खरतर लोकांनी या राजकारण्याच्या असल्या जीवघेण्या स्पर्धेवर पाणी फिरवलं पाहिजे. खूप लोकांना तर हा सणाला विरोध वाटतो. हे सगळं राजकारणी आपल्या चमच्यांच्या तोंडून वदवून घेत असतात. पण हे सणांच विकृतीकरण आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही.
कृष्णाच्या नावाने दहीहंडी साजरी केली जाते. कृष्ण कोण होता? दही दूध चोरणारा? कृष्ण भगवद्गीता सांगणारा होता. त्याच्या गीतेचा अभ्यास करून त्यातल्या आजच्या काळाशी सुसंगत आणि विसंगत गोष्टीवर चर्चा होऊ शकते. कृष्ण मुत्सद्दी होता. त्याचा तो गुण घेतला पाहिजे. कृष्णाचा मुत्सद्दीपणा समजून घेतला तर आपण कुठल्या पुढाऱ्याच्या मागे फिरणार नाही. त्याच्यासाठी आपल्याच लोकांशी शत्रुत्व घेणार नाही. कृष्णाने युद्धात सगळ्या नीती वापरल्या. आपण सामान्य माणूस म्हणून आपल्याला कृष्ण फार वेगळा वाटत नाही. कारण वेळ आल्यावर काही तडजोडी कराव्या लागतात. कृष्णानेही केल्या होत्या हे सहज समजून घेता येतं. पेंद्याच्या गोष्टीतून खूप काही शिकता येतं. पण तो कृष्ण आपल्याला समजून घ्यायचाच नाही. आपल्याला नंतर लोकांच मनोरंजन करण्यासाठी जो कृष्ण रंगवला गेला तो आजही महत्वाचा वाटतो. त्यामुळे आपण कृष्ण गवळणींची वाट अडवतो वगैरे गोष्टीत रमून जातो. मग महाभारतातल्या युद्धाचा नेता आपल्या लक्षात येत नाही. आपण आपोआप वाटमारीच्या गोष्टीत अडकतो. वाटमारी करणारे नेते समजू लागतो.
लहानपणची दहीहंडी आठवू लागते. शांतपणे पाणी खेळणारी मित्रमंडळी. ते व्यापारीकरणात बदलून गेलं. अवधूत गुप्तेच्या कान्हा चित्रपटासाठी गाणं लिहिताना ओळी सुचल्या होत्या..
कलियुग आले देवा हे भारी
कृष्णाची हंडी कंसाच्या दारी
Photo © Abhay Kanvinde
0 Comments