कोरोनाची बातमी ऐकली आणि सुनीलला आपल्या चुलत भावाची आठवण झाली
कोरोनाची बातमी ऐकली आणि सुनीलला आपल्या चुलत भावाची आठवण झाली. त्याचा चुलत भाऊ अजित पुण्यात राहतो. दोघंही एकाच वयाचे. कॉलेजला सोबत होते. अजित आयटीत गेला. सुनीलला क्लास वन अधिकारी व्हायचं होतं. पण बाप वारला आणि सुनील गावाला गेला तो परत पुण्यात आला नाही. आठ दहा वर्ष झाले त्या गोष्टीला. सुनील आणि अजित दोघांचं लग्न झालं. मुलं झाले. सुनील अजितला नेहमी फोन करायचा. पण अजितकडे वेळच नसायचा बोलायला. ऑफिसचं काम, प्रमोशनचं राजकारण, नवे मित्र, कुटुंब. त्यात सुनील फोनवर नेहमी शेतीबद्दल बोलायचा. पाउस पडला नाही, पिकाला भाव नाही. या गोष्टी ऐकून अजित थकला होता. अजितला वाटायचं आपण काय करू शकतो? पाच सहा वर्षा आधी गावी जायचा सुनील वर्षात दोनदा. जत्रेत सुनीलला हजार दोन हजार रुपये द्यायचा. तेवढीच चुलत भावाला मदत केल्याची भावना. पण गेले काही वर्षं गावी जाणंच होत नाही. सुट्टी मिळणार असली की बायको पोरं फॉरेनला जायचा बेत करून ठेवतात. उन्हाळ्यात सुनील आसपासच्या गावात लग्नाला हजेरी लावत असतो. अजित परदेशात असतो. सुनीलने आधी कुटुंबाचा whatsapp ग्रुप बनवला होता. पण अजित त्यातून बाहेर पडला. त्याला गावातल्या राजकारणात रस नव्हता. नातेवाइकांच्या वादात पडायचं नव्हतं. कधीतरी सुनील नातेवाईकाच्या लग्नाचे, शेताचे फोटो पाठवतो. तेवढीच काय ती बातमी अजितला माहित असते. पाच सहा वर्षापूर्वी गावात मलेरियाची साथ आली होती. अजितने सुनीलला निरोप पाठवला होता. आठवडाभर पुण्यात येतोय. अजित मी पुण्यात नाही म्हणाला होता. असं खोटं बोलताना त्याला जीवावर आलं होतं. पण नाईलाज होता. बायको ऐकत नव्हती. मुलं लहान होती. दुसरा पर्याय नव्हता.
आज अजितला हे सगळं आठवत होतं. कारण आज पाच सहा वर्षानंतर अजित गावी चालला होता. कुटुंबाला घेऊन. आधी बायको म्हणायची गावाकडं toilet नाही. मी येणार नाही. अजित एकटाच जायचा. मग सरकारी योजनेतून संडास बांधला. बायको आली एकदा. पण अजितला ते परवडलं नाही. बायको प्रत्येक नातेवाइकाच्या घरी पाणी प्यायला नकार द्यायची. खायला नाही म्हणायची. एकदा चुलत्याच्या घरी बायकोला ठसका लागला बोलता बोलता. पण बायको पाणी प्यायला तयार नव्हती. सुनीलने पळत जाऊन हॉटेलवरून पाण्याची बाटली आणली. अजितलाच खूप अवघडल्यासारखं झालं. अजित त्यादिवशी बळेच सुनीलला सांगत बसला. स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. उकळून घेतलं पाहिजे. सुनील म्हणाला गावाला आता फिल्टरचं पाणी विकत मिळतं. बोअरच पाणी उरलय कुठं? अजितला माहीतच नव्हतं की गावात पण आता पाणी विकत घेतात खूप लोक. तरीही अजित गावी येत राहिला. वर्षात एक दोनदा. बाकी काही नाही पण जत्रा त्याला चुकवावी वाटायची नाही. त्याच काळात शेतातला साखर आंबा उतरवला जायचा. आपल्या अंगावर लहानपणी किती ठिकाणी कैरीचा चिक उतला होता ह्या आठवणी काढत अजित, सुनील आणि बाकी चुलत भाऊ आंबा वाटून घ्यायचे. ते पोतंभर आंबे घेऊन पुण्याला येताना अजितला आपण करोडपती आहोत असं वाटायचं. गावाकडची शेती विकून वीस लाखाची कॅश पुण्याला नेली होती. तेंव्हासुद्धा सुनीलला एवढ श्रीमंत असल्यासारखं वाटलं नव्हतं. पण एक वर्ष आंबा उतरवण चालू होतं. अजितची बायको आणि मुलं बसलेले होते शेतात. अचानक अजितच्या मुलाने हातात साप धरलेला दिसला अजितच्या बायकोला. तिची दातखीळच बसली. सुनीलने धावत जाऊन साप धरला. अजितचा मुलगा हसत होता. पण सगळे घाबरलेले बघून तो सुद्धा जोरात रडायला लागला. त्या दिवशी रात्री आंबे न घेताच अजित कुटुंबासोबत पुण्याला गेला तो पुन्हा कधी गावी न येण्यासाठी. सुनीलने खूप प्रयत्न केला. पण अजित गावी आला नाही. एकटाही नाही. आजी गेली तेंव्हाही नाही.
कार वेगात धावत होती. आता एक छोटा घाट ओलांडला की गाव लागणार होतं. पाच सहा वर्षानंतर गाव बघायला अजित आतुर होता. रस्त्यावर वाहन दिसत नव्हतं. कोरोनामुळे वातावरण गंभीर होतं. पण गावाजवळचा रस्ता पण एवढा शांत असेल असं वाटलं नव्हतं. येताना आपल्या बायकोला आणी मुलांना तिच्या माहेरी सोडून आला होता अजित. सासऱ्याच घर आधीच छोटं. त्यामुळे बायकोने पण त्याला तिथे थांबायचा फार आग्रह केला नाही. खरतर अजित बायका मुलांसोबतच येणार होता गावी. पण बायकोने नकार दिला. यावेळी तरी बायकोने ऐकायला हवं होतं हा विचार करत अजित गावाजवळ पोचला. पण समोर जे दिसत होतं ते भयंकर होतं. गावाचा रस्ता बंद केलेला होता. बाभळीच्या मोठ मोठ्या फांद्या. एक जुनं खोड टाकून गावात जायचा रस्ता बंद केला होता लोकांनी. अजित कारमधून उतरला. इकडे तिकडे बघू लागला. पण आसपास माणूस दिसत नव्हता. अजित सकाळपासून सुनीलला फोन लावत होता. पण त्याचा फोन बंद होता. गावातले बाकी कुणाचे नंबर पण नव्हते. आपल्या family ग्रुपमधून उगाच एक्झिट झालो असं वाटलं अजितला. कार तशीच ठेवून अजित गावाच्या दिशेने निघाला तर पुढे एक बांबू लावून ठेवला होता. तिथे एक अनोळखी माणूस बसलेला दिसला. अजित त्याच्या जवळ गेला. म्हणाला मी याच गावचा आहे. तो माणूस म्हणजे प्रताप. प्रताप अजितला ओळखत होता. पण गावात येऊ द्यायला तयार नव्हता.
अजित संतापला. नीट बोलून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर आरडा ओरडा करायला लागला. माझी आई गावातच आहे म्हणाला. गेल्या काही वर्षात आईच जायची वर्षात चार दोन दिवस अजितकडे. तिला करमायचं नाही. परत यायची. अजित थांबायचा आग्रह करायचा. पण आईला नाही दम निघायचा पुण्यात. अजित भांडायचा. काय पडलय गावात म्हणायचा. इथ पुण्यात एवढी मंदिरं आहेत म्हणायचा. पण आई म्हणायची मंदिरं लई हायेत. पण देवच गवसत नाही पुण्यात. आपल्या गावातल्यावानी पांडुरंग कुठच नाही बघ. अजित काय बोलणार? आताही त्याला आईला भेटायचं होतं. फोनवर मी येतोय म्हणाला होता. पण गावात ही भलतीच पद्धत सुरु झाली होती. प्रताप आणि त्याचा आरडा ओरडा ऐकून जयंत धावत आला. जयंत प्रतापला म्हणाला, ग्रामसभेत काय ठरलय? कुणी कुणाच्या नातेवाइकाशी डोकं लावायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपल्या नात्यातल्या लोकांची समजूत काढायची. मग असं ठरलं की सुनीलला बोलवून आणायचं. प्रताप अजितच्या चुलत भावाला सुनीलला बोलवायला गेला. जयंत तिथे शांत उभा राहिला. रागावलेला अजित म्हणाला ही काय पद्धत सुरु केलीय? आता गावातल्या माणसानी माणुसकी सोडली का? जयंत काहीच बोलला नाही. अजितला अजूनच राग आला. संकटात आपले माणसं विसरले का? हीच का आपल्या गावाची रीत? अरे गावातल्या माणसांनी गावातल्या माणसासाठी कामी नाही यायचं तर काय फायदा? पण जयंत एका शब्दाने बोलला नाही. थोड्या वेळाने अजितच्या लक्षात आलं जयंतच्या कानात हेडफोन आहे. ब्ल्यूटूथ वाला. जयंत गाणे ऐकतोय. अजितला खूप राग आला होता पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
अजित आरडा ओरडा करत होता. सुनील आला. सुनील त्याला शांतपणे सांगत होता. गावाची बैठक झाली. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पुण्या मुंबईतून येणाऱ्या लोकांना गावात येऊ द्यायचं नाही असा ठराव झालाय. अजित भडकला. आपल्याच गावात यायला आपल्याला बंदी हे कुणाला सहन होणार. पण सुनील त्याला शांतपणे सांगत होता. ज्यांना गावात यायचंय त्यांनी डॉक्टरकडून आपल्याला काही झालं नाही असं प्रमाणपत्र घेऊन यायचं. अजितला हा अपमान वाटला. तरी पर्याय नाही असं लक्षात आल्यावर अजित म्हणाला माझ्यावर विश्वास नाही का? आपल्या सख्ख्या चुलत भावावर विश्वास नाही तुझा सुनील? पण सुनील काही बोलू शकत नव्हता. निर्णय गाव घेणार होतं. अजित सुनीललाच दोष देत होता. दुसऱ्या कुणाला बोलणार? नशीब सुनील येताना पाण्याची बाटली घेऊन आला. दोघे शेजारी असलेल्या बाभळीखाली बसले. अजितने कंटाळून सुनीलला विचारलं किती वेळ बसायचं असं? कधी गावात येऊ देणार मला? सुनील म्हणाला मी मेसेज केलाय सरपंचाला. येईल थोड्या वेळात. बघू त्याला विनंती करून. अजितने रागात उठून बाभळीला लाथ घातली.
अजित रागात बोलला, एवढा वेळ का लागतोय त्याला? काय पंतप्रधान समजतो का काय स्वतःला सरपंच ?
अजित शांत बसून राहिला.
सुनील म्हणाला , आधी तू पुण्याहून यायचा, भालेरावचा दिप्या मुंबईहून यायचा त गावात सगळे भेटायला यायचे. तुझी कार घरापाशी नेता यावी म्हणून लोकं आपल्या दारातल्या गटारावर फळ्या टाकायचे. आणि आज…?
अजित उन्हाच्या झळा बघत बोलला, वेळ बदलली की माणसं बदलतात. आधी वाटायचं गावातले माणसं नाही बदलणार. पण सगळे सारखेच. ह्याच्यापेक्षा शहरातले माणसं बरे. अडचणीत धाऊन तरी येतात.
सुनील जरा रागात म्हणाला, जर शहरात एवढे अडचणीला धावून येतात तर एवढा धावतपळत गावात कशाला आला? रहायचं होतं ना शहरातच.
अजित काहीच बोलू शकला नाही. त्याला आपलं चुकलं असं वाटलं म्हणून नाही. ही वेळ असे फालतू विषय काढायची नाही असं वाटलं म्हणून.
सुनील न राहवून म्हणाला, स्वच्छ हवा पाहिजे, हुरडा पाहिजे, गावरान तूप पाहिजे की तुम्हाला गावाची आठवण येते. बाकी गावात काय चाललय काही देणं घेणं नाही. तुरीला भाव नव्हता, सोयाबीनची वाट लागली, गारपीट झाली, दुष्काळ पडला तेंव्हा आला कधी? मागच्या वर्षी तुझ्या घरी आलो होतो. कापसाला भाव नाही म्हणून सांगत होतो. तर तुझा पोरगा म्हणाला काका तुम्ही ओएलएक्स वर का नाही कापूस विकत? तिथे सगळ्या गोष्टी विकतात. तुझ्या पोराला हसलो आपण. पण त्यानी विचार तरी केला आमचा. काहीतरी आयडिया तरी दिली त्याच्या बालबुद्धीला सुचली तशी. पण तुम्ही आयडिया देणं सोडा. ऐकून पण घेत नाही. परवा काय टाकलं तू फेसबुकवर? गावातल्या लोकांनी पालखी काढली तर तू लिहिलं, हे गाव कधीच सुधारणार नाही. पाच सहा वर्षात कधी गावाबद्दल एक ओळ लिहिली नाही. परवा पण लिहायचं कारण काय तर तुला गावाकड यायचं होतं. कुटुंबाला आणायचा विचार होता. म्हणून गावाची एवढी काळजी. आणी भाषा काय तर हे गाव कधीच सुधारणार नाही.
अजित त्याला थांबवून म्हणाला, एवढ्या बातम्या चालू आहेत. सगळ्या जगात राडा झालाय. तरी तुम्हाला पालखी काढायची कशी सुचली? काय बोलणार दुसरं तुम्हाला?
सुनील त्याला सांगू लागला, बातम्या कधी बघितल्या तू टीव्हीवर? फक्त पुणे आणी मुंबई शिवाय दुसरा विषय होता का काही? कसं कळणार गावातल्या लोकांना की हे संकट आपल्यावर पण आहे. येऊन जाऊन मुंबई बंद करणार. पुणे बंद करणार. मुंबईत असं झालं. पुण्यात दोन सापडले. अरे पण लाखेवाडीचं काय? लाखेवाडीत शेतकरी लटकून घेतो झाडाला तरी टीव्हीवाले बातमी देत नाहीत. मग आम्हाला काय कळणार? काढली आम्ही पालखी.
अजित तेवढ्याच रागात बोलला, पण तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांचं काही काम आहे का नाही? तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे का नाही? का फक्त मुंबई पुण्याच्या लोकांना नाव ठेवायचं काम करता फक्त?
सुनील म्हणाला, अजित आम्ही कधी मुंबई पुण्याला नाव ठेवत नाही. रोज शेतात राबतो ते आपल्या पुढच्या पिढीला इथून बाहेर पडता यावं म्हणून. आपल्या बापानी पण हेच स्वप्न पाहिलं. मी पण पाहतो. आता कुणी आपला पोरगा शेतकरी व्हावा हा विचार करत नाही. कोण आपल्या लेकराच्या वाईटाचा विचार करणार?
अजितला मुद्दा सुचला. ताडकन म्हणाला, म्हणजे तुम्हाला पण मुंबई पुण्यालाच जायचंय ना. मग कशाला अशी अडवणूक करता आमची? उद्या कोण मदत करणार तुम्हाला शहरात यायला? असे वागला तर कोण कशाला विचारणार तुम्हाला?
सुनील हसून बोलला, अजित तू असं बोलायला लागला जसं काय आतापर्यंत गावातले दहा बारा पोरं पुण्यात कामालाच लावले तू. अरे तुमच्यापेक्षा ते उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानवाले लोक बरे. एक आला की दहा लोक घेऊन येतो तिकडून. पायावर उभा करतो सगळ्यांना.
अजित त्याला थांबवत म्हणाला, आपण असच भांडत बसायचंय का इथं? त्या सरपंचाला फोन लाव. भूक लागलीय मला.
सुनील म्हणाला, दहा मिनिट कळ काढ. येईल तो. बाहेरून गावात येणारा तू पहिलाच माणूसयस. जरा विचार करत असतील लोक.
अजित रागवला. पण थोडा घाबरलासुद्धा. म्हणाला, सुनील जर त्यांनी मला गावात येऊ द्यायचं नाही असं ठरवलं तर?
सुनील काहीच बोलला नाही.
अजित म्हणाला, मला परत जावं लागेल हे मला माहितीय. पण अशावेळी तू काय करशील? एक भाऊ म्हणून. शेवटी सख्खा चुलत भाऊ आहेस तू माझा.
सुनील म्हणाला, आता अचानक तुला भावकी आठवायला लागली? अजित तू जेंव्हा इन्स्टाग्रामवर इटिंग पिज्झा विथ family असा फोटो टाकतो तेंव्हा भावकी का आठवत नाही. तू फेसबुकवर बायकोसोबत फ्रांसच्या आयफेल tower चा फोटो टाकतो तेंव्हा नाही आठवत भावकी? आज एकटा पडल्यावर भावकी आठवली?
अजित चिडून बोलला, सुनील ह्या सगळ्या गोष्टी मी कष्टाने कमवल्या. आणी ऑफिसच्या टूर मध्ये फक्त कुटुंबाला नेता येतं. गावाला नाही.
सुनील हसून म्हणाला, गावाला यायचं पण नाही. तू जेंव्हा सुट्टीवर जातो तेंव्हा शेतात खूप कामं असतात बाबा. फक्त एवढच म्हणायचंय की नेमका अडचणीत का गाव आठवतो? आनंदात का नाही?
अजित पण तेवढ्याच त्वेषात बोलला, तुला तरी कधी आनंदात मी आठवलो? तुझ्या पोराचा स्कॉलरशिपमध्ये दुसरा नंबर आला. तू सांगितलं मला? हायवेत जमीन गेली म्हणून तुला मागच्या वर्षी वीस लाख रुपये भेटले. तू सांगितलं मला?
सुनीलला आजपर्यंत वाटायचं अजितला गावातल काहीच माहित नाही. पण अजितला सगळ्या गोष्टी माहित होत्या. सुनीलला हा विचार आला नाही की आपण खरच या गोष्टी अजितला सांगायला पाहिजे होत्या. पण पुन्हा वाद सुरु झाले. शहर चांगलं का गाव हा विषय न संपणाररा असतो. दोन्हीकडे माणसंच असतात. दोन्हीकडे काही चांगली आणि काही वाईट माणसं असतात. खरतर पूर्णपणे चांगली माणसं जगात कुठेच नसतात. प्रत्येकात काही ना काही खोड असतेच. आणि अगदी नीच माणसात पण काही ना काही चांगुलपणा असतोच. पण भांडायला उठले की लोक सरसकट नाव ठेऊ लागतात. माणसं एकमेकांना गुणवत्ता प्रमाणपत्र वाटत असतात. गाव आणि शहर बदनाम होत असतं. गावाला नाव ठेवणारी किंवा शहराला नाव ठेवणारी माणसं खरतर आपल्या देशालाच नाव ठेवत असतात. पण त्यांना कळतही नाही. पण माणसं मग केलेली मदत पण काढू लागतात.
अजित आधीच चिडला होता. आता टोकालाच गेला. म्हणाला, आजपर्यंत सात आठ हजार तरी दिले असतील तुला येताजाता. पण कधी हिशोब विचारला नाही. लक्षात पण ठेवलं नाही. आणी तू मला गावात येऊ देत नाहीस. ही उपकाराची जाणीव.
सुनील म्हणाला, लक्षात ठेवलं नसतं तर सात आठ हजारचा आकडा तोंडात आला असता का?
अजित पुन्हा काहीतरी बोलणार एवढ्यात पुन्हा सुनील म्हणाला, अजित मी तुला गावात यायला बंदी केली नाही. हा गावाचा निर्णय आहे. आणी गावात राहायचं तर मला गावाच्या विरोधात जाता येणार नाही.
अजित म्हणाला , पण गावतल्या लोकांना समजून तरी सांगू शकतोस ना. का त्यांना पण माझ्या उपकाराची जाणीव नाही? पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत भाग घेतला दोन वर्षापूर्वी. पैसे गोळा करत होते तेंव्हा माझ्याकडेच आले ना. दोन हजार रुपये दिले ते विसरले? पाच सहा वर्षात यात्रेत आलो नाही. पण पंचवीस किलो तुपाचे पैसे देतो ना दरवर्षी. ते विसरला का गाव? का आम्ही फक्त पैसे द्यायलाच?
सुनील काही बोलला नाही. त्याला दुरून सरपंच आणि दोन चार लोक येताना दिसले. अजितच्या जीवात जीव आला. कारण सरपंच जवळ आल्यावर त्याला रामराम म्हणाला. पण नंतर जे घडलं ते हैराण करणारं होतं. सरपंचाच्यासोबत जे दोन लोक होते त्यांनी सोबत आणलेल्या घागरीतलं पाणी ओतलं अजितच्या अंगावर. कसलातरी फवारा मारला. अजित जोरजोरात ओरडत होता. पण कुणी काही ऐकलं नाही. सरपंचाने टॉवेल दिला. अजित म्हणाला गाडीतले कपडे दे मला सुनील. पण सुनील जागचा हलला नाही. सरपंचाने सोबत आहेर आणला होता. गावाने ठरवलं होतं गावात येणाऱ्या प्रत्येकाला बाहेरच आंघोळ घालायची. त्याला नवे कपडे द्यायचे गावाकडून आणि तपासणी होईपर्यंत त्याला पंचायतीच्या ऑफिसमध्ये रहायला लावायचं.
अजित चीडचीड करत ऑफिसमध्ये आला. पण त्याच्या लक्षात आलं व्यवस्था एकदम उत्तम आहे. टीव्ही आहे. मिनरल वाटर आहे. खाण्याची व्यवस्था आहे. अजित थोडा शांत झाला. सरपंच आणी सुनीलच होते तिथे. अजित म्हणाला हे सगळं करायची काय गरज होती? राग मानू नका. पण गावाची पण काळजी घ्यायचीय आणि तुमची पण. मुंबई पुण्याला सरकार बंद करून टाकतं. टोल नाक्यावर अडवता येतात लोकं. गावात टोल नाके नसतात. म्हणून रस्ते आमचे आम्हीच अडवले. रागवू नका. पण गावाची काळजी करावीच लागणार ना. गावोगाव पोलीस नाही येऊ शकणार. म्हणून थोडे कठोर झालो आमचे आम्ही. पण शहरात कुणाच्या सोसायटीत जाताना, ऑफिसात जाताना रोजच चौकशी होती ना तुमची. आता तर तपासणी करतात. मग आपल्या गावात थोडी तपासणी झाली तर एवढा काय अपमान वाटून घ्यायचा? सरपंच बोलत होता. अजित शांत होता. सरपंचानेच थोड्या वेळाने विचारलं, आहेर आवडला का?
अजितला आहेर मनापासून आवडला होता. तो हसून सरपंचाला म्हणाला सुद्धा, गावाने दिलेला हा आहेर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यातली खोच सरपंचाला कळली नाही. पण सुनीलच्या लक्षात आलं. सुनीलही हसला. साथीच्या काळात कुणी आहेर करेल हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं त्याला. सरपंच गेल्यावर अजित आणी सुनील खूप वेळ गप्पा मारत बसले. अजितला जाणीव झाली की आपण समजतो तसं नाही. गावात शहराची ओढ आहे. शहरात गावाची ओढ आहे. गावाला वाटतं शहर जास्त मजेत आहे. शहराला वाटतं गाव जास्त मजेत आहे. शहरातले काही लोक शेतात कॉंग्रेस गवत दिसलं तरी म्हणतात काय ब्युटीफुल आहे. एकदम ग्रीन. गावातल्या लोकांना कोंडवाड्या सारखी ट्रेन म्हणजे विकास वाटतो. दोघांना जाणवलं सुखात कुणीच नाही. धावपळ आहे. थांबून विचार केला पाहिजे. पहिल्यांदा दोघा भावांना वेळ मिळाला होता. खूप वेळ. गरजेचा वेळ. दोघांना पुन्हा एकमेकांना समजून घेण्याचा वेळ. हा वेळ गाव आणि शहराला एकमेकांना समजून घेण्यासाठी घालवायचा होता. दोघं भाऊ खूप वर्षानंतर एवढे बोलले. संध्याकाळ झाल्यावर अजित म्हणाला, तुझ्यासाठी लंडनहून आणलेली स्कॉच आणायची होती. विसरलो. सुनील म्हणाला, असू दे. तुला मटन खायचंय हे सांग. अजित म्हणाला, हे सांगायला पाहिजे का? मी आलोय आणी तू बोकड कापणार नाही असं कधी झालय का?
अजितला ढव्हारा आवडायचा. अख्खा बोकड एकत्र शिजवल्यावर येणारी चव गावाशिवाय कुठेच भेटत नाही हे तो सगळ्यांना सांगायचा. सुनील तयारीला जाऊ लागला. अजितने नेहमीप्रमाणे विचारलं, पैसे आहेत ना? नाहीतर मी देतो. सुनील म्हणाला जमिनीचे आलेत ना. तुला तर माहितीय. अजित शांत बसला. तिथे कामाला असलेल्या बाळूला मसाल्याची तयारी करायला सांगून सुनील निघून गेला. अजित आईला भेटून आला. परत आल्यावर अजितने चहा पीत पीत बाळूकडून माहिती काढली. दरवेळी आपण आलो की सुनीलला बोकडाच्या जेवणाचा दोन हजारापेक्षा जास्तच खर्च आला होता. आणि अजितसाठी सुनीलने वीस पंचवीस वेळा तरी बोकडाच्या जेवणाचा बेत केला होता. म्हणजे पन्नास हजार तर सहज खर्च. आणि आपण सुनीलला सात आठ हजार रुपयांची मदत केली म्हणून ऐकवत होतो. अजितला लाज वाटली. अस्वस्थ वाटू लागलं. खरतर सुनीलच्याही मनात आलं होतं हा हिशोब काढायचं. पण खाण काढू नये म्हणतात म्हणून शांत बसला होता. हिशोब असला की खातं होऊ शकतं. नातं नाही. अचानक काळ्या मसाल्याचा भाजल्याचा वास येऊ लागला. अजित भान हरपला.
अजितच्या बायकोने त्याचा इन्स्टाग्रामवर फोटो बघितला. अजित आणी सुनील होते फोटोत. at माय व्हिलेज. फॉर डिनर काळ्या मसाल्यातलं मटन विथ माय ब्रो! असं लिहिलेला. बायकोने मेसेज केला. काळजी घ्या.
अजित आणि सुनीलने जेवायला घेतलं. कलेजी ताटात आली. चाप आले. आता पळीत पायाची नळी आली. ती नळी फोडून त्यातलं मांस ओढायचं. एकीकडून फुंकायचं. दाताने चावायचं. जेवणातला सगळ्यात भारी कार्यक्रम असायचा तो. अजित आणि सुनीलने एकमेकांकडे बघितलं. त्यांचं सगळं लहानपण, कॉलेजचे दिवस ती नळी आपल्याला मिळावी म्हणून भांडण्यात गेले होते. एकवेळ इस्टेट देईन पण हड्डी तंगडी नाही असं म्हणायचे दोघे. आज पुन्हा एकदा मस्त भांडायचा मूड होता. गाव आणि शहर हे काय भांडायचे विषय आहेत का? दुधावरची साय, पाडाचा अंबा, सीताफळाची आढी, कोंबडीचं तंगडं, विहिरीत तळ गाठायला टाकलेला पैसा हे भांडायचे विषय होते. जे ह्या मूल्यवान गोष्टीसाठी भांडले त्यांना जगातले बाकी सगळे भांडण शुल्लक वाटतात. आताही मस्त भांडण करून हसत हसत अजित आणी सुनील झोपी गेले. अजितला स्वप्न पडलं. खरच जर गावाने येऊ दिलं नसतं तर? अजितने बघितलं. सुनील गाढ झोपलाय. अजितने फोन चेक केला. बायकोचा पुन्हा मेसेज आला होता. अजितला आपलीच लाज वाटली. बायकोला घेऊन दोन चार दिवसाच्या वर गावी थांबलोच नाही. तिला बिचारीला काय माहित आपलं गाव खरं कसं आहे. अजितने बायकोचा मेसेज वाचला. तिने लिहिलं होतं. काळजी घ्या. जरा गावतल्या लोकांपासून दूर रहा. अजितने रिप्लाय केला. आजपर्यंत दूर होतो. आता राहणार नाही. दोघा भावांना लक्षात आलं होतं ही गाव आणि शहराची गोष्ट नाही. भावांची गोष्ट आहे.
अरविंद जगताप.
0 Comments