पुर्णतः शुद्धीवर असताना
पुर्णतः शुद्धीवर असताना
लिहीत आहे आज मी
मृत्युपत्र माझे!
मरुन जाईन मी जेव्हा
झडती घ्या माझ्या खोलीची
प्रत्येक गोष्ट तपासा–
देऊन टाका माझी स्वप्न
त्या सगळ्या बायकांना
ज्या स्वयंपाकघरापासून बेडरुमपर्यंत
आणि बेडरुम ते किचनच्या धावपळीत
वर्षांअगोदर विसरल्या आहेत स्वप्न बघणं
वाटुन टाका माझं खळखळतं हास्य
वृद्धाश्रमातील त्या म्हाताऱ्यांमध्ये
राहातात ज्यांची मुलं
अमेरीकेतील झगमगत्या शहरांमध्ये!
टेबलवर बघा माझ्या
काही रंग पडलेले असतील
देऊन टाका सगळे रंग
त्या सैनिकांच्या विधवांना
शहीद झाले जे
सीमेवर लढतांना !
मिजास माझी, मस्ती माझी
भरुन टाका त्यांच्या नसानसांत
झुकलेले आहेत खांदे ज्यांचे
दप्तराच्या भरभक्कम ओझ्यानं!
अश्रू माझे देऊन टाका
सगळ्या कवी लोकांना
प्रत्येक थेंबातून जन्मेल नवी कविता
माझं वचन आहे
माझी गाढ झोप नि भुक
देऊन टाका ‘अंबानी’ आणि ‘मित्तल’ला
बिच्चारे निवांत झोपू शकत नाहीत आणि
सुखानं खाऊही शकत नाहीत!
माझा मान, माझी अब्रू
त्या वेश्येचं नाव आहे
विकते जी आपलं शरीर
मुलीला शिकवण्यासाठी!
या देशातील एकेका तरुणाला
पकडून टोचा ‘इंजेक्शन’
माझ्या आक्रोशाचं
याची गरज पडेल त्यांना
क्रांतीच्या दिवशी!
माझा वेडेपणा
हिस्स्याला आहे
त्या सूफीच्या
निघाला आहे जो सर्वस्व सोडून
ईश्वराच्या शोधात
आता शिल्लक
माझी इर्षा
माझा लोभ
माझा राग
माझा खोटेपणा
माझं दूःख
तर
असं करा,
यांना माझ्यासोबतच टाका जाळून!!
<strong>मुळ कविता</strong> – बाबुषा कोहली
<strong>अनुवाद</strong> – डॉ. पृथ्वीराज तौर
0 Comments