नववर्ष कविता
नववर्ष कविता
कुस बदलावी तशी बदलतात वर्षं
जांभई सारखा सुरु होतो दिवस
लाखो बकरे आणि कोंबड्यांची पुण्यतिथी
असते एकतीस डिसेंबरला
तरीही एक जानेवारीला कोंबडा आरवतो कसा?
मागच्या वर्षी रस्त्यावर पडला होता
या वर्षी नवरा घरी येऊन पडला
या सुखात असतात कित्येक बायका.
एक जानेवारीचा सूर्य वाट चुकल्यासारखा
माणसं शोधत असतो पहाटे पहाटे
कचरेवाल्यांचा आनंद गगनात मावत नाही
बाटल्यांचा ढीग बघून.
लालभडक डोळे दिसतात सगळीकडे
असं वाटतं जनतेच्या डोळ्यात आग आहे
पब्लिकच्या मनात राग आहे
या वर्षी नक्की लोक पेटून उठतील
सारं काही बदलेल.
पण खरंतर कॅलेंडर शिवाय काहीच बदलत नाही
आणि हो…
हे नववर्षा
पुढचे काही दिवस २०१७ च्या ऐवजी आम्ही
२०१६ च लिहिणार आहोत चुकून.
रागवू नकोस
आम्ही सहजा सहजी बदलत नाही
आणि बदल स्वीकारतही नाही.
तरीही तुझं स्वागत आहे.
ज्यांच्या जाण्याची तारीख ठाऊक असते
त्या पाहुण्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो.
– अरविंद जगताप
0 Comments