प्रिय
मी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना? हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो. आणि सिनेमाबद्दल मात्र आपण आक्रमक होतो. चुकीच्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे. पण ज्या गोष्टीला विरोध करायचा ती गोष्ट काय आहे हे किमान समजून घ्यायला पाहिजे. खरतर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना आपण सुरुवातीला विरोध केला. पण आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आता विश्वास बसणार नाही लोकांचा पण पहिली रेल्वे आली तेंव्हा खूप विरोध केला होता लोकांनी. आपोआप धावणारी ती रेल्वे बघून कुणीतरी करणी केलीय, जादूटोणा केलाय असं वाटलं काही लोकांना. पहिला सिनेमा बघताना पण असंच झालं. त्या सिनेमातली रेल्वे धावू लागली तसं लोकांना वाटलं ती आपल्या अंगावर येणार. लोक घाबरून थियेटरमधून बाहेर पळून गेले. आता सिनेमा आपलं आयुष्य झालाय.
खूप गोष्टी आहेत ज्यांना आपण विनाकारण विरोध केला होता. इंग्रज असताना प्लेगची साथ आली होती देशात. प्लेग बरा करणारी लस टोचायची सक्ती करत होते इंग्रज. पण लोकांनी विरोध केला. आम्ही असलं औषध घेणार नाही म्हणून. अगदी पोलिओचा डोस घ्यायला पण लोक घाबरत होते. सरकारचा निषेध करत होते. आता रांग लावतात डोस घ्यायला. तुम्हाला एक गंमत सांगतो, सुरुवातीला लोकांना साबण वापरायची सवय नव्हती. आंघोळीला साबण वापरा हे सांगायला साबण बनवणाऱ्या कंपन्याना खूप अवघड गेलं. त्यांना माणसं पाठवावी लागायची. आज सेल्स रिप्रेझेंटेटिव फिरतात तसे कंपनीचे लोक फिरायचे. लोकांना गोळा करायचे. लोक जमले की मग कंपनीचे लोक सगळ्यांसमोर साबण लावून आंघोळ करायचे. लोकांना विश्वास बसायचा की अंगाला साबण लावल्याने काही त्रास होत नाही. मग हळू हळू लोकांनी साबण वापरायला सुरुवात केली. पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्याला पण लोकांनी वेड्यात काढलं होतं आधी. हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच की बदल स्वीकारणं जगाला नेहमीच जड गेलं. आपल्यालाही. पण या नादात आपल्या खूप गोष्टी राहून जातात.
तरुणपणी बायकोसोबत एकदा डान्स करायला पाहिजे होता हे म्हातारपणी सुचून काय उपयोग? काश्मीरमध्ये नवऱ्याला बर्फाचा गोळा फेकून मारला पाहिजे होता असं घरी आल्यावर वाटून काय उपयोग. फ्रीजमधला बर्फ फेकून मारण्यात काश्मीरची गम्मत नाही ना. असं काही मनात राहू नये. म्हणून वेळोवेळी मनाचं ऐकलेलं चांगलं असतं. परवा एकजण सांगत होता त्याने तमाशाच पाहिला नाही कधी. का नाही पाहिला तर म्हणाला तमाशा वाईट असतो असं ऐकून होतो. डोळ्याने पाहून ठरवायचं ना. स्वतःच्या डोळ्याने न पाहता, स्वतःच्या कानाने न ऐकता एखादी गोष्ट वाईट कशी काय ठरवू शकतो आपण? चांगलं वाईट आपल्याला ठरवता आलं पाहिजे.
सध्या न्यूडची चर्चा चालू आहे. न्यूड नावाचा सिनेमा. खरंतर सगळी गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. पण एवढच सांगतो ही आम्ही सगळ्या चित्रकारांनी डोळ्याने पाहिलेली मूर्तिमंत वेदना आहे. आमच्या चित्रकलेच्या शिक्षणात आमची सगळ्यात मोठी शिक्षक असलेली व्यक्ती. जी न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जाते. कदाचित वर्गात फक्त आम्ही चित्र शिकत असू. रंगसंगती शिकत असू. शिकलो खूप पण चित्रात समजतिच्यामुळे आली. जात पात धर्म लिंगभेद या पलीकडे माणूस म्हणून माणसाकडे कसं पहावं हे तिने शिकवलं. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना न्यूड पेंटिंग काढण्यासाठी मॉडेल म्हणून बसून राहणारी ती. खरतर पोटासाठी खूप धावपळ करणारी माणसं सुखी वाटू लागतात अशावेळी. पोटासाठी असं तोंड बंद ठेवून एकाच जागी पुतळ्यासारखं बसणं खूप अवघड असतं. जगण्यासाठी असं काही करावं लागत असेल याची खूप लोकांना कल्पना पण नसेल. एक चित्रकार म्हणून मला मात्र तिच्याबद्दल नेहमीच आदर आहे. चित्रकारांशिवाय तिचं शरीर कुणी पाहू शकत नाही. अगदी सिनेमाच्या प्रेक्षकांना पण दिसणार नाही. शिकण्यासाठीच्या गोष्टी आणि विकण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात. भले जग तिला कलावंत म्हणत नसेल पण तिने कलेची जेवढी सेवा केलीय तिला तोड नाही. चित्रकलेच्या भाषेत ती न्यूड आहे. पण माणूस म्हणून ती खूप गूढ आहे. लोक जगण्यासाठी किती लाज सोडून वागतात आपण पाहतो. पण ती आजवरच्या कुठल्याही चित्रात कुठल्याही वस्त्राशिवाय एवढी शालीन आणि सुसंस्कृत कशी दिसते हा प्रश्न पडतो. म्हणूनच अश्लीलता देहात नसते नजरेत असते असं म्हणतात ते चुकीचं वाटत नाही.
समजा तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेला आणी एका मुलीने दार उघडलं. तिच्या अंगावर कपडेच नाहीत. तर तुम्ही काय कराल? लोक या प्रश्नावर खूप विचार करतात. उत्तर देत नाहीत. पण उत्तर खूप सोपं आहे. आपण त्या मुलीला म्हणायचं, ए छकुली. चल कपडे घालून ये. नाहीतर आव्वा करतील सगळे. एवढ सोपं आहे. अशी एखादी लहान मुलगीच असेल असा विचार यायला वेळ लागतो. गाडी भलतीकडे जाते. पण गोष्टी खूप सहज असतात. आपण थोडं मोठं होऊन विचार करू लागलो की अशा गोष्टी खूप सहज छोट्या वाटू लागतात. फक्त माणूस म्हणून विचार करायची गरज आहे.
शेवटी एखादी गोष्ट पहायची की नाही हे आपलं आपण ठरवायचं असतं. पण एखाद्या गोष्टीकडे कसं पहायचं ते आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे.
– अरविंद जगताप.
0 Comments