लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो.
लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो. कुठलीही गोष्ट घडली की त्याची कथा होऊ शकते का असा विचार येत असेल तर अवघड आहे. म्हणजे सीमेवर जवान शहीद झाला की आपल्याला जर लगेच कविता सुचत असेल तर काहीतरी चुकतंय. चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपण अस्वस्थ होतो तोपर्यंत आपण माणसात आहोत असं समजायचं. खरंतर आपण जेवढं कमी लिहू आणि जास्त वाचू तेवढं आपल्यासाठी आणि समाजासाठी चांगलं असतं. पोपटराव पवारांचं समृध्द हिवरेबाजार बघितल्यावर किती सरपंचाना स्वतःच्या नावापुढे कार्यसम्राट असं लावावं वाटेल? साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे, चिं वि जोशी, नेमाडे वाचल्यावर आपण कशाला कागद काळे करायचे असं वाटू लागतं. हे न लिहिणं खूप महत्वाचं असतं. जो जेवढा कमी लिहितो तो तेवढा बरा लेखक असतो. मुळात लेखकासारखं जगता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी लिहिलं, मुक्ताबाईंनी लिहिलं. निवृत्तीनाथांनी नाही लिहिलं. पण त्यांचं जगणं किती महत्वाचं आहे. आपण ज्ञानेश्वरांना माउली म्हणतो. आणि या माउलीची माउली झाले होते निवृत्तीनाथ. शिवाजी महाराजांच्या छायेत वाढलेल्या संभाजी महाराजांचं आयुष्य लेखकाचं होतं. संभाजी महाराजांना दीर्घायुष्य लिहिलं असतं तर त्यांनी नक्कीच इतिहासातली समृध्द पानं लिहून ठेवली असती. पण दुर्दैवाने इतिहास घडवणारया माणसांना इतिहास लिहायला सहसा वेळ मिळत नाही. मग आपण इंग्रजांच्या आणि मुघलांच्या कागदपत्रात आपला इतिहास शोधू लागतो. आपल्या माणसांना त्यांच्या नजरेने बघू लागतो. लोकांच्या चष्म्यातून आपण इतिहासाकडे तर पाहतोच. पण वर्तमानाकडे पण विदेशी चष्म्यातून पाहण्याची आपल्याला सवय लागलीय. बोफोर्स असो किंवा राफेल, विदेशातली वर्तमानपत्रं काय म्हणतात याला आपल्यादृष्टीने जास्त महत्व आहे. आणी हे घडलंय याला जवाबदार आहे ती सगळ्या पक्षांनी गमावलेली विश्वासार्हता. म्हणून आज सामान्य माणसापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो कोणता झेंडा घेऊ हाती?
झेंड्यांची गर्दी आहे. पण झेंड्याच्या आड जे चेहरे आहेत ते खरंच त्या झेंड्याशी प्रामाणिक आहेत का? कोणता नेता कधी कुठला झेंडा खांद्यावर घेऊन मत मागायला येईल हे आपण सांगू शकतो का? आयुष्यभर एकाच विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलेली माणसं आता किती उरलीत? लोकल बदलावी तेवढ्या घाईत नेते पक्ष बदलतात. या सगळ्याचा परिणाम दिसतो तो तरुणाईवर. गाव असो किंवा शहर, चौका चौकात तरुणांचे टोळके दिसतात. रोजगाराची चिंता, राहणीमानावर वाढत चाललेला खर्च, लग्नाचा प्रश्न. असंख्य समस्या आहेत. मुलींना शेती करणाऱ्या मुलांशी लग्न करायचं नाही. अर्थात त्यात त्यांची चूक नाही. रोज शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पिकाला भाव नाही अशा बातम्या वाचल्यावर त्या तरी कशा तयार होणार? पण हा प्रश्न समृध्द शेतकऱ्यांच्या मुलांना पण भेडसावतोय. विकास म्हणजे फक्त शहर. गावात योजना, उद्योग न्यायचेच नाहीत अशी शपथ घेतल्यासारखे नेते वागले. वागतात. या कृषिप्रधान देशात ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न एवढा गंभीर व्हावा आणि कुणी साधी त्याची दखल पण घेऊ नये हे भयंकर आहे. तरुणांना गेली कित्येक वर्षं वडापाव विकण्याचा पर्याय दिला जातो ही क्रूर थट्टा आहे. केवळ लग्न जमवण्यासाठी कित्येक मुलं शहरात येऊन स्थायिक होतात. मुलीच्या घरच्यांची अट असते नौकरी पाहिजे. या नौकरीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यासाठी शेती विकली जाते. शेती नष्ट करण्याचं हे षड्यंत्र होत चाललय. पाणी आहे, उस आहे, द्राक्ष आहे पण लग्न करायला मुलगी भेटत नाही. तरुणांचं म्हणणं आहे की मुलींना असं वाटतं की शेतात काम करावं लागेल. पण आमच्या घरातल्या स्त्रिया काय दिवसभर शेतात राबत नाहीत. चांगलं घर आहे, टीव्ही आहे, महिन्या पंधरा दिवसाला आम्ही मॉलमध्ये जातो. पण लोकांची मानसिकता अशी झालीय की मुलगी गावात द्यायची नाही. या भयंकर समस्येत मुलांपुढे एकच पर्याय आहे शहरात येणे. गावाकडे शेतात गडी जेवढ्या पैशात राबतोय तेवढ्या पैशात पोरं पुण्या मुंबईत काम करतात. कारण काय तर गावाकडे राहून लग्न होत नाही. कित्येक सरपंच, तलाठी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य शहरात राहतात. गावाकडे ये जा करतात. मुंबई पुण्यात राहून पैसा कमवलेले लोक निवडणुकीत उभं राहण्यासाठी फक्त गावी येतात. एम पी एस सी च्या नावाखाली पुण्यात हजारो पोरं विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून येतात आणि कायमचे पुण्यात थांबतात. गावाकडे जाण्यात स्वारस्य उरत नाही. स्पर्धा परीक्षेला शेतीपेक्षा जास्त कष्ट करतात पोरं. दिवस रात्र एक करतात. कारण आपल्या राज्यात ती एकच परीक्षा आहे जी त्या मुलाच्या कुटुंबाचं जगणं बदलू शकते. ती एकच परीक्षा आहे जी सहज लग्न जमवू शकते. ती एकच परीक्षा आहे जी चार पिढ्यांचं कल्याण करू शकते. बाकी आय टी आहे. पण त्यात ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला सहज शिरता येत नाही. आयटीचा सगळा मलिदा संपल्यावर ग्रामीण भागात त्याचे कोर्सेस आले. रयत सारख्या काही संस्थांचा अपवाद सोडला तर शिक्षणसंस्थांची अवस्था काय आहे? गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा जो बाजार आहे त्यात मुलं ना धड इंग्रजी शिकतात ना त्यांना मराठी येतं. नेत्यांनी जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा बिघडवून टाकली. शिक्षकांच्या बदल्या, खिचडी आणि खाऊचं राजकारण यात जिल्हा परिषद शाळांचं प्रचंड नुकसान झालं. तरीही या शाळाच आहेत ज्या बरं शिक्षण देतात. या शाळेत कित्येक असे शिक्षक आहेत ज्यांच्यामुळे ग्रामीण भागातली मुलं चमकदार कामगिरी करू शकतात. पण त्यांचं प्रमाण खूप कमी आहे.
शिक्षणाची अशी तऱ्हा, सुविधांचा अभाव आणि लग्नाचा ज्वलंत प्रश्न. या गोष्टीकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचं लक्ष नाही. शेतकरी समस्येवर बोलणारे अचानक कुठेतरी नेते होतात, पद मिळवतात आणि शांत होतात. त्यांची परिस्थिती बदलते. आज असे कितीतरी नेते आपल्याला दिसतील जे एकेकाळी शेतकऱ्यासाठी सभेत आरडा ओरडा करायचे, रडायचे, रास्ता रोको करायचे. आज ते बिळात लपून बसल्यासारखे बसलेत. शेतकरी अजूनही रस्त्यावर आहे. दरवेळी नवा माणूस शेतकऱ्याच्या नावाने रडतो. मोठा होतो. त्याचं भलं होतं. शेतकऱ्याच्या रडण्याला किंमत नाही. शेतकऱ्यांच्या नावाने रडण्याला खूप किंमत आहे. अशी सगळ्या नेतृत्वाकडून फसवणूक चालू असते. आता गावात सगळे झेंडे घरावर आणि बाईकवर लावून झालेत. कुठलाच झेंडा कामी आला नाही अशी भावना निर्माण झालीय. सुरुवातीच्या काळात राज्यकर्त्यांचं बरं होतं. कार्यकर्त्याच्या घरचे त्याला सांभाळून घ्यायचे. एक वाया गेला असं समजून चालायचे. काही करत नसला तरी घरची शेती आहे म्हणून त्याचं लग्न व्हायचं. एकत्र कुटुंबात त्याच्या लेकरा बाळांची आबाळ व्हायची नाही. कार्यकर्ता तसाच कुणाच्या तरी सतरंज्या उचलत म्हातारा व्हायचा आणि शेवटी घरातल्या बाजेवर पडून पडून शेवटचा श्वास घ्यायचा. आता तशी परिस्थिती नाही. एकत्र कुटुंब राहिलं नाही. वाटण्या होऊन होऊन सगळे आता अल्पभूधारक होत आलेत. त्यात एका घरात चार पाच पक्षाचे लोक झालेत. त्यामुळे कुणा एकाला सांभाळून घ्यायची परिस्थिती राहिली नाही. सगळ्यात अवघड म्हणजे शेती आहे म्हणून लग्न होत नाही. आता बऱ्या घरचा कार्यकर्ता मिळणे अवघड आहे. बेरोजगार तरुणांची फौज किती दिवस जमा करणार? आधीचे कार्यकर्ते लेकरं बाळ मोठे झाल्यावर भानावर यायचे. स्वतःच्या भविष्याचा विचार करायचे. आताच्या कार्यकर्त्याला भविष्यच उरलं नाही. त्याला लग्न करायचं असलं तर आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मुलाचा बाप काय करतो हे बघून लग्न जमवायची पद्धत आता राहिली नाही. मुलाच्या बापाला ल्ग्नानंतर घरात ठेवायचं का नाही हा निर्णय नंतर होणार आहे. आधी मुलगा काय करतो हे महत्वाचं. त्याचा flat आहे का? कार आहे का? बँक balance आहे का? या झाल्या अपेक्षा. मुळात या अपेक्षेला उतरणारी मुलं किती आहेत? मुलींची संख्या कमी आहे हे एक नेहमीचं कारण आहे. ते योग्य आहे. पण आई बाप देतील त्या घरात मुकाट्याने जायचं हा विचार करणाऱ्या मुलींची संख्या कमी झालीय हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे चांगलंच झालंय. मुली योग्य विचार करताहेत. पण मुलांची चूक काय आहे? आपल्या नेतृत्वाने आपल्याला कायम दुष्काळग्रस्त ठेवलं, पाण्याचं नियोजन केलं नाही, सिंचनाची कामं केली नाही, पिकाला भाव मिळेल यासाठी कधीच काही केलं नाही हा या तरुण पिढीचा दोष आहे का? त्यांच्या बाप जाद्यानी नेत्यांवर, पक्षावर विश्वास ठेवला, नवीन नेते दिले, पक्ष निवडून दिले. पण त्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. कुणाच्याही मागे गेलो तरी आपल्या नशिबी फरफट आहेच याची आता खात्री झालीय. आता नेत्यांना पण सहजासहजी निष्ठावान कार्यकर्ते मिळणार नाहीत. कारण नेतेच निष्ठावान राहिले नाहीत.
अशी परिस्थिती बघत होतो. विचार करत होतो. तेंव्हा अवधूत गुप्तेने गाणं लिहायला सांगितलं. कार्यकर्त्यावर. आपोआप ओळी सुचल्या.
जगण्याच्या वारीत सुचेना वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती
शब्द सहज येत गेले. जणू पाठ असल्यासारखे. आपल्याच माणसांची कैफियत होती. खरंतर आपलीच.
उजळावा दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचाऱ्या जळती वाती
अशी किती माणसं पाहिली जी कुठल्यातरी दिव्याला प्रकाशात आणायला वातीसारखी जळत गेली आयुष्यभर. शेवटी विठ्ठलालाच प्रश्न विचारावा वाटला.
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?
0 Comments