पत्रास कारण की

March 7, 2019

लेखन

arvind jagapat patra

पत्रास कारण की

पत्रास कारण की

पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं की किती आनंद व्हायचा.लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजार्यांना पत्र लिहून द्यायचो. आता चला हवा येऊ द्या मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू म्हणून सुरुवात झाली होती. पण हळू हळू चला हवा येऊ द्या मध्ये सारखं पत्र लिहायचाआग्रह होऊ लागला. खूप लोक सांगायचे आम्ही पत्रांची पण वाट पाहतो. सागर कारंडेच्या आवाजात पत्र ऐकताना एक वेगळाच अनुभव असतो.सागर कारंडेने माझ्या शब्दांना वेगळ्याच विश्वात नेलं. तो माझ्या शब्दांचा आवाज झाला. डॉक्टर निलेश साबळे आणि चला हवा येऊ द्या मालिकेमुळे या पत्रांना खूप मोठी ओळख मिळाली. इथे मला माझ्या पत्रांविषयी नाही सांगायचं. पत्र या आपल्या आयुष्यातल्या हळव्या कप्प्यात
डोकवायचंय. पत्रं हृदयातल्याहळव्या कप्प्यासारखी असतात. अजूनही कुणी पत्रं पाठवलं की खूप छान वाटतं. सुंदर अक्षरवाल्यामाणसांचा केवढा अभिमान असायचा.आता लोक हस्ताक्षराकडे लक्ष देतील असं वाटत नाही. मेल वाचून खुपदा माहिती कळते. मनाचा अंदाज येत नाही. अक्षर वाचून यायचा. तुम्ही कधी अनुभवलंय की नाही माहित नाही पण पत्र लिहिताना अख्ख घर असायचं सोबत. प्रत्येकाचा आशीर्वाद, नमस्कार आणी दंडवतलिहावा लागायचा. खुर्चीत बसलेले आजोबा, स्वयपाकघरात असलेली आई, देवघरासमोर असलेली आजी, ऑफिसचं काम करणारे बाबा असेसगळे पत्र लिहिताना किंवा वाचताना सोबत असायचे. जप करता करता थांबून आजी सांगायची की माझ्यासाठी तपकीर आणायला सांग. किंवारात्री झोपताना थंड दूध पीत जा अशी सूचना तरी लिहायला सांगायची. तुम्हाला आठवतंय असा मेल कधी तुम्ही लिहिलाय? सगळ्यांनी मिळून. कधीकधी तंत्रज्ञान बल्बसमोर रॉकेल लावून लटकवलेल्या कागदासारखं वाटतं. किड्यांसारखं आपण सगळे झेप घेतो त्या कागदाच्या दिशेनेआणि नष्ट करतोय अस्तित्व. अशी भीती वाटते. तंत्रज्ञान शाप आहे असं नाही. पण कृत्रिमता आपल्याला तेवढ हळूवार करत नाही.अस्वस्थ करत नाही. मेसेजचा रिंग टोन पत्र येण्याआधीची हुरहूर निर्माण करू शकत नाही. मेलचं नोटिफिकेशन पोस्टमन काकांना आपल्याघराकडे येताना बघून जी भावना निर्माण व्हायची ती निर्माण नाही करू शकत.
हवा येऊ द्या मध्ये सचिन तेंडुलकर आला होता. पत्र वाचन झाल्यावर तो आठवण सांगायलालागला. त्याचे वडील पोस्टमन घरी आल्यावर कशी विचारपूस करायचे, त्यांना पाणी द्यायचे. एवढीआपुलकी असायची. नातं असायचं. आपल्या सुख दुख्खात साथीदार होता तो. जग बदलत चाललय.जुन्या गोष्टी उगाळत बसणं चूक असतं. पण काळासोबत तंत्रज्ञान बदलणं ठीक आहे. माणसंबदलायचं काय कारण आहे? भावनांमध्ये बदल होण्याचं काय कारण आहे? आपण कुरिअरवाल्याशीकिती तटस्थपणे वागतो. एकूणच विचारपूस बंद झालीय. खूप ठिकाणी चौकशी करणारी माणसंगावंढळ वाटतात लोकांना. किंवा शेजारी बसलेल्या माणसाला एखादा प्रश्न जास्त विचारला तर तोत्याला त्याच्या प्रायव्हसीवर हल्ला वाटतो. आपण खूप वेगाने बदल घडताना पाहतोय. एक रुपयाटाकून बोलायचे पीसीओ केवढे लोकप्रिय होते. ते लाल डबे सगळ्या दुकानात दिसायचे. ती वेळ संपतआल्यावर वाजणारी रिंग किती अस्वस्थ करायची. बऱ्याचदा नाणी संपलेली असायची आणि खूपकाही बोलायचं असायचं. त्यावेळी उरलेल्या काही सेकंदात जे काही महत्वाचं बोलण्याची घाईअसायची ती धमाल होती. आणि गम्मत म्हणजे दोन्ही बाजूच्या माणसांना आपलं सांगायचं असायचं. त्यावेळी उरलेल्या काही सेकंदात जे काही महत्वाचं बोलण्याची घाई असायची ती धमाल होती.आणि मग फक्त गोंधळ होऊन फोन कट व्हायचा. खूप लोक कॉईनलादोरा लावून बोलायचे असं म्हणतात. कधी पाहिलं नाही पण अशा खूप गमती पीसीओच्या बाबतीत होत्या. एखाद्याचा फोन खूप लांबला मागे रांगेत उभे राहणारे लोक कसे वैतागायचे ते दृश्यही बघण्यासारखं असायचं. मग एसटीडीचे दिवस. बूथ असायचा. आणि त्या बूथमध्येसंध्याकाळनंतर गर्दी सुरु व्हायची. प्रत्येकाची ठरलेली वेळ. खूप लोकांना अत्यंत खाजगी बोलायचं असायचं. सुरुवातील त्या काचेच्या बूथमध्येसंभाषण अगदी हळू हळू सुरु असायचं. पण बिलचा आकडा आणि बोलणाऱ्याचा आवाज कधी वाढायचा हे कळायचं नाही. बाहेर वाट पाहणाऱ्याप्रत्येकाला ते खाजगी बोलणं माहित झालेलं असायचं. अगदी चाळीसारखी भावना. सगळ्यांना सगळं माहित. आज खूप मुला मुलींना विश्वासबसणार नाही पण होस्टेल मध्ये एकच फोन असायचा. घरून फोन यायचे. मुलं किंवा मुली फोनच्या आसपास घुटमळत असायचे. किंवा जोफोन उचलेल तो जोरात आवाज द्यायचा. रूम नंबर ३० फोन आलाय. आणि धावत पायऱ्या उतरत फोन गाठायची धावपळ. आई वडलांचे तेच तेप्रश्न. पण महत्वाचं असायचं त्यांचा आवाज ऐकणं. त्यात चोरून एकमेकांना फोन करणारे प्रियकर प्रेयसी असले की तो पण फोन कितीतरी वेळएंगेज असायचा. बाकीचे लोक अक्षरशः आरडा ओरडा सुरु करायचे. हे सगळं आठवण्याचं कारण बोलणं किती महाग होतं. आपल्या मनातलंएकमेकांना सांगणं किती मौल्यवान होतं.
संवाद ही आपली संस्कृती होती. आता माणसं खाजगी होत चाललीत. मी आणि माझा मोबाईल हे विश्व होत चाललय. बरं मोबाईलमधून ज्याजगाशी संवाद साधायचाय ते कृत्रिम आहे. सोशल मिडीयावर निषेध नोंदवला म्हणजे आपली जवाबदारी संपली असं लोकांना वाटतं. गावातलामाणूस गेला की गाव गोळा व्हायचं. शहरात सोसायटी गोळा व्हायची. आजआर आय पीम्हणून विषय संपतो. कुणी म्हणेल की अंत्यविधीलाजाणं गरजेचं असतं का? त्याने काही मदत होते का? त्या माणसाला होत नसेल. पण आपली आपल्याला खूप मोठी मदत होते. हे जग नश्वर आहे हेलक्षात यायला. माणसं जमिनीवर असायला हे खूप मोठं कारण होतं. आपण वर काहीच घेऊन जाणार नाही हे असं दोन चार महिन्यात समोरासमोर बघता यायचं. अंत्यविधीच्या निमित्ताने. माणसं एकमेकांशी चांगलं वागायला भीती हे सुद्धा खूप मोठं कारण असतं. कशाची तरी भीतीअसली की माणसाच्या वागण्यावर नियंत्रण असतं. आज आपली भीतीच कमी होत चाललीय. आपल्याला गावात राहायचंय, सोसायटीत राहायचंय,चाळीत राहायचंय असं म्हणून एकमेकांशी खूप प्रेमाने वागायची माणसं. पण आता सगळे इमर्जन्सी नंबर मोबाईलवर आलेत म्हणून की काय पणमाणसं एकमेकांना फार विचारत नाहीत. असो.

पत्रांचं एक आणखी विशेष असतं. कधीकाळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप रडलेला असता ती पत्र काही काळाने पुन्हा वाचली की हसू येऊशकतं. कधीकाळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप हसला होता ती पत्र वाचून कालांतराने भाऊक व्हायला होतं. पत्रं वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावनाबनून जातात. प्रेमपत्रांची तर गोष्टच वेगळी. प्रेम ही जगातली सगळ्यात गूढ गोष्ट आहे. ती जेवढी हवी हवीशी आहे तेवढीच गूढ आहे. केवळ पत्रांचीवाट बघत कित्येक जोडप्यांना वर्षानुवर्ष वाट बघताना पाहिलंय. अविवाहित राहिलेलं पाहिलय. कित्येक सैनिकांच्या बायकांना केवळ पत्रांच्याआशेवर जगण्याचं बळ मिळालेलं पाहिलंय. कित्येक समस्या केवळ वर्तमानपत्रात वारंवार पत्र लिहिणाऱ्या माणसांमुळे सुटलेल्या पाहिल्यात.कित्येक प्रेमकथा केवळ पत्रातल्या भाषेवर खुश होऊन सुरु झाल्यात. पत्राने अनेक गोंधळ घातलेत. पण पत्राने जेवढी भावनिक आंदोलनं निर्माणकेलीत मना मनात तेवढी खरी आंदोलनं झालेली नसतील. पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. पत्र शेवटच्या घटका मोजणाऱ्यामाणसांची आशा होती. पत्र जगण्याचं बळ होतं. गावाहून आलेलं आई बापाचं पत्र होस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक रात्री उपाशी पोटीकाढण्याच बळ देणारं असायचं. पोरगा शहरात मन लावून अभ्यास करतोय हे पत्रात वाचून घरच्यांना शेतात दुप्पट राबायला बळ यायचं. घरातडांबून ठेवलेल्या मुलीला प्रियकराचे शब्द विद्रोहाचं बळ देणारे असायचे. कित्येक चळवळी मोठ्या करण्यात पत्रांचा वाटा आहे. क्रांतीची सुरुवातआहेत पत्रं. शांतीचं कारण आहेत पत्रं. पत्रं आपण एकटे असताना छातीशी ठेवून हळूवार होऊ शकतो. बाकी काही नसतं एवढ्या जवळ घेण्यासारखं.मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतो. पण गदगदून हलवू शकतं ते पत्र. हां मोबाईलचं बिल अंगावर काटा आणू शकतं. पण पत्रातलं एकवाक्य सुद्धा अंगावर शहारा आणू शकतं.

पत्र खरंतर खाजगी गोष्ट असते. एकट्याने वाचण्याची. एकट्याने लिहिण्याची. पण लोकांच्या प्रतिसादामुळे पत्रं जाहीरपणे वाचली गेली. ऐकलीगेली. टीव्हीवर सहसा पुस्तकातल्या गोष्टी असतात. टीव्हीवरच्या गोष्टीचं पुस्तक होणं आपल्याकडे दुर्मिळ आहे. हा योग पत्रावरील प्रेमामुळे जुळून आला. वाचता वाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कुणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल. आपलं लिखाण नेमक्यापत्त्यावर पोचलय याचं मला समाधान होईल. धन्यवाद!

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *