एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायची फार संधी मिळत नाही.
एखाद्या राजकीय नेत्याचं कौतुक करायची फार संधी मिळत नाही. पण ज्याप्रकारे तुम्ही आणी तुमचं सरकार गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटात संयमाने आणि गांभीर्याने काम करताय हे बघून लिहावं वाटलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आपलं विशेष कौतुक वाटतय सगळ्या जनतेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून परवा जनतेने पाच वाजेपर्यंत एवढा कडकडीत कर्फ्यू पाळला की कौतुकाने देशाची दृष्ट काढावी की काय असा विचार मनात आला. मग पाच वाजले आणि पहिले पाढे पंचावन्न सुरु झाले. असो. तुम्ही टप्प्या टप्प्याने नियमांची अंमलबजावणी करताय. तुम्ही खूप शांतपणे आणि साधेपणाने बोलता. एखादा राजकीय नेता एवढ्या साधेपणाने वागतोय हे कौतुकास्पद वाटतं म्हणजे साधेपणा किती दुर्मिळ झालय बघा. एरव्ही सूचना किंवा माहिती देताना एक बनेलपणा, अरेरावी किंवा आपल्यालाच खूप कळत असल्याचा अविर्भाव नेत्यांच्या चेहऱ्यावर असतो. तो सरकारला शंभर दिवस पूर्ण होऊनही तुमच्या चेहऱ्यावर दिसला नाही ही पण एक कमाल आहे. हे सगळं मुख्यमंत्री आपला माणूस आहे असं वाटायला लावतं. म्हणूनच काही गोष्टी हक्काने सांगाव्या वाटतात.
आपल्या देशात माणसं बेरोजगार राहू शकतात. पण घरात बसून राहू शकत नाहीत. नौकरी नसलेली माणसं बेरोजगार मानतो आपण. भले ही मंडळी सतत शेजार पाजारच्या किंवा कॉलनी, गावच्या मदतीला येत असली तरी. नौकरी नाही असे खूप लोक आहेत. पण काम नाही म्हणणारा शोधून सापडणार नाही. खूप तरुण मोठ्या मनाने लोकांच्या घरचे कामं फुकट करत असतात. आणि काही लोक लोकांचे घरं विकण्याचे किंवा भाड्याने देण्याचे काम करत असतात. असंख्य इस्टेट एजंट, प्लॉटिंगवाले आहेत आपल्याकडे. फक्त गेल्या काही वर्षात विकलं काहीच जात नाही. बरेच लोक एकमेकांना व्यवहार करण्यासाठी नाही तर मार्केट किती डाऊन आहे ही चर्चा करायलाच भेटतात. पण मिटिंग होते. थोडक्यात सक्तीने घरात बसणं ही खूप अवघड गोष्ट आहे. विशेषतः तरुण मंडळीने. या तरुणांच्या मदतीने किंवा राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी अशा तरुणांच्या मदतीने शिस्तबद्धपणे संकटात अडकलेल्या लोकांना काय मदत करता येईल याचा विचार व्हायला हवा. आपल्याकडे लोकांना खूप काही करायचं असतं, इतरांच्या मदतीला धावून जायचं असतं. पण नेमकं काय करावं कळत नाही. तुम्ही विचार करा आजवरच्या कुठल्याही नैसर्गिक किंवा इतर संकटात शिवसेनेचे सगळे नेते नाही पण शाखेतले सगळे तरुण नेहमी मदतीला पुढे असतात. त्या तरुणांना आजही आपण समाजासाठी काही करावं असं वाटत असेल ना. इतरही पक्षाचे, संस्थांचे, एनजीओचे तरुण आपण अशा परिस्थितीत काय करू शकतो हा विचार करत असतील. आरोग्यसेवेसाठीच नाही तर आज स्वतःच्या गावी न जाता आल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेले अनेक लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक, फुटपाथवर राहणारे कुटुंब, पाण्यासाठी फिरणारे पक्षी, रस्त्यावरचे प्राणी यांच्यासाठी खूप काम करायची गरज आहे. माणसांची गरज आहे. अशी खूप माणसं आहेत ज्यांचं हातावर पोट आहे. असे खूप लोक आहेत ज्यांना रक्ताची गरज आहे. डायलिसीसची गरज आहे. या लोकांना मदत आवश्यक आहे. सगळीकडे डॉक्टर आणि पोलीस पुरेसे नाहीत. शेतकरी पुन्हा संकटात आहे. कित्येकांना आपला माल पोचवता येणार नाही. भाजीपाला असून तो विकता येणार नाही. अशा लोकांसाठी काम करणारे प्रशिक्षित तरुण तरुणी याच नाही प्रत्येक संकटात असणे गरजेचे आहे.
संकट सांगून येत नाही. आजचही तसच आहे. उद्या किती पेशंट वाढतील हे सांगता येत नाही. वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करेलच. पण जर वेळ आली तर आपल्या आरोग्यसेवेवर खूप मोठा ताण पडणार आहे. आपणही विचार केलाच असेल. करत असाल. पण गेले काही दिवस घराबाहेर पडण्यासाठी धडपडणारे तरुण बघून वाटलं की ही उर्जा विनाकारण घरात कोंडली जातेय. देशासमोर संकट असताना कुठल्या तरुणाला असं पडून रहावं वाटेल? परिसर स्वच्छता असेल, औषध फवारणी असेल, औषध वाटप असेल किंवा सरकारच्या दृष्टीने सध्या जी कुठली तातडीची गरज असेल. कितीतरी भागात औषध फवारणीचा विषयच नाही. ऑनलाईन व्यवसाय करणारे संकटात गैरफायदा घेताहेत. अशावेळी असंख्य तरुणांना तातडीने प्रशिक्षण देऊन कामाची संधी देता येईल. ज्या लोकांना सक्तीने लोकांमध्ये मिसळायची मनाई करण्यात आली आहे अशा लोकांवर नजर ठेवण्याचं काम पण महत्वाच आहे. असे लोक घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यायला लोक पाहिजेत. तरुणांना आवाहन करून ज्यांची इच्छा आहे त्यांना या कामात सहभागी करून घेता येईल.
आपल्याकडच्या तरुणांची काम करण्याची इच्छा आहे ही आशावादी गोष्ट आहे. खूप लोक किमान रक्तदान तरी करायला मिळायला पाहिजे असा आदर्श विचार करताहेत. छोट्या गटा गटाने असे आरोग्यसेवक, रक्तदाते, प्राण्यांचे आश्रयदाते आपल्याला तयार करता येतील. जे तरुणांना वाटतं ते आपणास सांगण्याचा हा प्रयत्न. महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारला केवळ पाठींबाच नाहीतर सक्रीय मदत करायला लोक तयार आहेत. यावेळी गरज पडू नये. पण इथून पुढे कधीही गरज पडली तरी अशी तरुणांची फौज तयार असावी. प्रचारात एखाद्याला निवडून द्यायला हजारो तरुण तहान भूक विसरून फिरत असतात. कुणाचा जीव वाचवायला, संकटात मदत करायला तर नक्कीच धावून येतील. राजकीय नेत्यांना तरुण नेहमी प्रचारासाठी, ट्रोल करायला, मोटरसायकल rally काढायलाच कामी येतात असं वाटतं. कारण कुणाचा तरी बदला घ्यायचा, कुणाची तरी बदनामी करायची, विरोधकांना शिव्या द्यायच्या अशीच कामं बहुतेक वेळा तरुणांना दिली जातात. तुम्ही हे चित्र बदलून दाखवाल अशी आशा आहे. कारण याआधी विक्रमी रक्तदान तुम्ही यशस्वी करून दाखवलय. महाराष्ट्र सरकार नेहमी या देशाला दिशा देणाऱ्या योजना बनवत आलय. एमआयडीसी असो किंवा रोजगार हमी योजना. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्र सरकारने सुरु केल्यात. मग देशाने अनुकरण केलं. या संकटाच्या निमित्ताने कधीही धावून येणारी जात, धर्म, पक्ष अशी बंधन नसणारी एक मोठी तरुणांची फळी उभी करता येईल. तुम्ही गरज पडेल तेंव्हा नक्की हाक द्या. सध्यातरी घरात बसून सरकारला सहकार्य करणे चालू आहे. या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू. पण देश संकटात असताना तरुण पिढीला हतबल होऊन बघत राहण्याची वेळ पुन्हा कधी येऊ नये.
अर्थात असं नाही की कुणीच काही करत नाही. खूप लोक गरजूंना डबे पुरवताहेत. खूप लोक बेघर लोकांना आश्रय देताहेत. पाळीव प्राण्यांना जपताहेत. पण हे सगळं छोट्या प्रमाणात आणि चोरून लपून का करायचं? प्रत्येक पक्षाचे वार्डा वार्डात पोलिंग एजंट आहेत. घरोघर प्रचाराचे पत्रक वाटणारे आहेत. मग लोकांना घरपोच मदत करायला सरकारचीच यंत्रणा का नाही? घरातून लोकांना बाहेर काढून मतदान करायला लावणाऱ्या तरुणांना पक्ष पैसे देतात. घरपोच मदत पोचवणाऱ्या तरुणांना लोक पैसे देतील. पण अशी यंत्रणा असायला नको का? आधी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवायला तरुण नेमले होते. पैसे देऊन. सरकारची मदत पोचवायला असं का होत नाही? उद्धवजी, यावेळी तुम्ही महाराष्ट्र सरकारची पण अशी तरुण फळी निर्माण कराल अशी अपेक्षा आहे. कारण तरुणांमध्ये आपण कुठल्या पक्षाचे आहोत या भावनेपेक्षा आपण आपल्या राज्याचे आहोत, देशाचे आहोत ही भावना जास्त महत्वाची आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
आपला
अरविंद जगताप.
0 Comments