आजही आपण स्वतःला तरुण समजत असलो तरी आता सरकारने कागदोपत्री ज्येष्ठ नागरिक करून टाकलय.
आजही आपण स्वतःला तरुण समजत असलो तरी आता सरकारने कागदोपत्री ज्येष्ठ नागरिक करून टाकलय. खुपदा आपल्या आपल्यात आपण एकेरी हाक मारतो तेंव्हा वय कमी झाल्यासारखं वाटतं. पण गार्डनमध्ये खेळणारी पोरं आजोबा म्हणायला लागली हे विसरता येणार नाही. तुम्हाला आठवतय कितीतरी वर्षापूर्वी पहिल्यांदा एखाद्या मुलाने तुम्हाला काका म्हणून हाक मारली असेल. तुम्हाला धक्का बसला असेल. काका? आपण काका दिसतो का? काकू दिसतो का? वय शहराच्या लोकसंख्येसारखं वाढत असतं. नकळत. वारंवार ट्राफिक जाम झाल्यावर जशी लोकसंख्या वाढलीय हे जाणवू लागतं. तसं काहीसं आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्यावर वयाची जाणीव होऊ लागते. पण तक्रारीचा पाढा सुरु व्हायच्या आत वयाचा हिशोब जमला पाहिजे. वय वाढलय हे सहजपणे स्वीकारलं की वयाचा त्रास होत नाही. डोळ्यांना कमी दिसू लागतं. खरतर यात वाईट काहीच नाही. उलट आपण हे मान्य केलं पाहिजे की आपण आता कुठे बारकाईने बघायला लागलोय सगळ्या गोष्टी. पण आपण डोळ्यांना कमी दिसतय हेच कबूल केलं नाही तर बारकाईने बघणार कसे?
केस वाढतात, उंची वाढते, चष्म्याचा नंबर वाढतो. पण यात आपण फार काही करू शकत नाही. बऱ्याचदा या गोष्टी आपोआप होतात. पण वय आपोआप वाढत नाही. आपण नेटाने, शिस्तीत जगत असतो म्हणून वय वाढत असतं. आपण फक्त उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले नसतात. आपण चटकेही सोसलेले असतात आणि पावसात भिजलेलोही असतो. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कुणालातरी सांगायच्या असतात. प्रत्येक माणूस एक गोष्ट असतो. कुणी कथा असतो कुणी कादंबरी असतो. फक्त ती नीट सांगता आली पाहिजे. तिकडे कोण कुठला साउथमधला एक म्हातारा माणूस आहे. त्याचं नाव रजनीकांत आहे. तो त्याच्या सिनेमात काय बोलतो हे सुद्धा लोकांना कळत नाही. भाषा वेगळी आहे म्हणून. पण लोकांना त्याला ऐकायचं असतं. कितीतरी वय झालेली माणसं अध्यात्मावर बोलत असतात. ते सुद्धा लोकांना ऐकायचं असतं. तिकडे परराज्यातले एक आजोबा किंवा आणखी एक आजी आपल्या शेतात स्वयंपाक करते. त्याचे व्हिडीओ युट्यूबवर असतात. करोडो लोक ते व्हिडीओ आवडीने बघतात. म्हणजे तरुणांना असं वेगळं काही सांगणारे लोक हवे आहेत.
आपल्यातल्या खूप लोकांना जुने दिवस आठवतात ते नव्या काळाशी तुलना करताना. बाप आणि मुलगा मित्रासारखे वागतात ही गोष्ट खटकायचं काहीच कारण नाही. सुनेला लाडू चांगले वळता येत नाहीत हे मान्य. पण आपण सून फक्त लाडू वळण्यासाठी आणलीय का? मान्य आहे आपण सगळे अशा विचाराचे नाही. आता जग बदललय. पण आपल्या आसपास अशा विचारांचा एखादा माणूस दिसला की त्रास होतो. आता हेच बघा, सून मोबाईलवर लाईट बिल भरते ही चांगली गोष्ट आहे. नव्या पिढीसोबत नव्या गोष्टी शिकाव्या लागतील आपल्याला. कारण या आधुनिक जगाने आपल्याला म्हातारपणीही विद्यार्थीच ठेवलय. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उपकार आहेत. रोज नवे शोध लागताहेत. रोज नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. एखाद्या मॉलमध्ये गेल्यावर त्या आपोआप सरकणाऱ्या पायऱ्यावर उभं रहायची भीती वाटत होती. आपल्या मुलाने हात धरून विश्वास दिला की तुम्ही हे करू शकता. स्मार्टफोन वापरताच येणार नाही असं वाटत होतं. नातवाने शिकवलं. आपल्या आजी आजोबाना नवीन काही शिकायला मिळत नव्हतं. त्यांना आपण काय शिकवणार होतो? पण आता गोष्टी झपाट्याने बदलल्यात. गावातला नातू आजोबाला कौतुकाने फोनवर मोटर चालू करून देतो शेतातली. आता गावातले आजोबा पण जास्त पावसाळे पाहिल्याचा अभिमान बाळगत नाहीत. कारण नात फोनवर बघून पंजाबमध्ये गव्हाला काय भाव आहे ते सांगत असते. अशा असंख्य गोष्टी नव्या पिढीकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांचं कौतुक करण्यासारख्या आहेत.
आमच्या काळात दूध चांगलं होतं, तूप चांगलं होतं हे सांगत बसल्याने नवीन पिढीला काय फायदा होणार आहे? त्यांनाही माहीत आहे त्यांच्या वाट्याला ओसाड उजाड माळरान आहे. बकाल शहर आहे. आपण पाहिलेली आमराई नाही. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या नाहीत. तुडूंब विहिरी नाहीत. पण म्हणून आपण फक्त त्या रम्य दिवसांची वर्णनं ऐकवायची का? कोणती झाडं लावली पाहिजेत? कशी लावली पाहिजेत? हे कोण सांगणार? पाण्याची पातळी वाढवायला काय करावं लागेल हे कोण सांगणार? गुगलवर बघून मेडिकलवर गोळ्या घेण्यापेक्षा घरात असंख्य गोष्टीवर उपचार होऊ शकतात हे कोण सांगणार? खूप लोक म्हणतात पूर्वी आजीबाईचा बटवा असायचा. आजी औषध द्यायची घरच्या घरी. पण नवीन पिढी ऐकत नाही म्हणून बटवा काळाच्या पडद्याआड गेला. पण हे शंभर टक्के खरं नाही. बटवा काळाच्या पडद्याआड गेला कारण दुर्मिळ झाडं उरली नाही. आपण तोडली नाही. जपली नाही. शतावरी, सागरगोटे, ताम्हिणी, करवंद, काटेसावर अशी कितीतरी झाडं गायब झाली. बटव्यात औषध कुठे उरणार? आपण पुढच्या पिढीला नातेवाइकांबद्दल सांगतो. अमक्याने कार घेतली. तमका परदेशात गेला. पण आपण पुढच्या पिढीला किती पक्षांबद्दल सांगतो? माळढोक, धनेश, सुतार पक्षी कुणी दाखवायचा त्यांना? आपण अमक्याच्या मुलाने किती मजली घर बांधलं ते सांगतो पण सुगरणीच्या खोप्याबद्दल कधी सांगितलय का? दाखवलाय का? ज्या देशात निसर्गातल्या महत्वाच्या गोष्टी जपल्या जात नसतात त्या देशात निसर्गाच्या गोष्टी सांगितल्या जात नसतात. आपल्याही नकळत आपण केवळ पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारे, घोकंपट्टी करणारे मुलं आदर्श असा समज निर्माण करत गेलो. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी ऐकत आलो. सांगत आलो. ज्ञानेश्वर दोन मार्कांना आणि शिवाजी महाराज दहा मार्कांना. यापलीकडे आपण ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज सांगायला हवे होते. अजूनही सांगायला हवेत. आपल्याकडे जे सांगण्यासारखं आहे ते आपण सांगतच नाही. आपण नात्यातल्या कुणी कसं घर बांधलं ते जास्त सांगत आलो. महाराजानी किल्ले कसे बांधले? कसे जपले? हे सांगितलं नाही. तुकारामांनी किती महत्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्यात हे नवीन पिढीला रोज सांगता येऊ शकतं आणि तरीही पुरून उरू शकतं. आपल्या लोककथा आणी लोकगीतं पुढच्या पिढीला कोण सांगणार? जात्यावरच्या ओव्या कुणाला नाही ऐकायला आवडणार? रामदेवबाबा ज्या गोष्टीचा प्रचार करून देशभर गाजताहेत त्या गोष्टी आपल्याला पण माहित आहेत. फक्त आपण सांगत नाही.
आपल्याला जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुर्दैवाने बागेत बसून रहायला आपल्याकडे खूप लोक भेटतात. पण बागकाम करणारे कमी असतात. आपण बागकाम करणारे मित्र शोधले पाहिजेत. आपल्याला शेती करायची होती. ते राहून गेलय. आपण गच्चीत नाहीतर परसात घरच्यांपुरती शेती करायला पाहिजे. भाजीपाला उगवला पाहिजे. खूप कौतुक वाटतं घरातल्या माणसाना. तुम्ही फक्त घरातल्या लोकांसाठी रोज स्वतः विरजण लावून दही बनवा. तुम्ही कौतुकाचा विषय होऊन जाता. याचा अर्थ तुम्ही फक्त काहीतरी कामच करा असा नाही. तुम्ही फक्त घरातल्या माणसांच कौतुक करत रहा. बसल्या बसल्या. खूप खुश होतात माणसं. कौतुकाला भुकेली असतात. ऑफिसमधून आलेल्या सुनेला एवढा उशीर का झाला हे विचारण्यापेक्षा किती दमलीस. सगळ्या ऑफिसचं काम एकटीच करतेस का काय?. एवढच बोलून बघा. तिचा थकवा जाईल. दोन मिनिटात तुमच्यासाठी गरम चहा येईल. हे सगळं चहासाठी तुम्ही करत नसता. घरासाठी करता. नातवाला टीव्ही आवडतो. कारण तुम्ही त्याला गोष्टी सांगत नाही. त्याला शिनच्यान आवडतो. त्याला बिरबल आवडला पाहिजे. ज्या घरातल्या मुलाला शिनच्यान, doremon आवडतात त्या घरात एकतर आजोबा नसतात किंवा आजोबा असले तरी त्यांचं घरात लक्ष नसतं. माणसं वाईट नसतात. खलनायक मुळीच नसतात. प्रत्येक माणसाला आपलं कौतुक व्हावं असच वाटत असतं. पण नेमका तिथेच प्रॉब्लेम होतो. आपण आपल्या माणसांच कौतुक करायचं विसरून जातो. म्हणून साठी जोरात साजरी होते आजकाल. कारण साठ वर्ष त्या माणसाचं कौतुक करायचं राहून गेलेलं असतं. साठ वर्ष तो किंवा ती बिचारी घरासाठी राबत असते. त्याची साठी आल्यावर घरातले, नातेवाईक अचानक कंठ फुटल्यासारखे त्याच्याबद्दल भरभरून बोलू लागतात. खरतर हे आधीच बोलले असते तर, नेहमी बोलले असते तर साठीतही माणूस चाळीशीतला वाटला असता. असो. पण साठीत आपल्याला कळलेलं असतं की बोलणं किती गरजेचं आहे. कुणीतरी आपल्याबद्दल व्यक्त होणं, आपली आठवण ठेवणं, आपल्याला वेळ देणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग आता पुढची सगळी वर्षं या राहून गेलेल्या गोष्टी तर करायच्या आहेत. माझ्या एका इन्स्पेक्टर मित्राने रिटायर्ड झाल्यावर एक दिवस सुनेला कॉफी बनवून दिली होती. स्वतःच्या हाताने. तर अर्धा तास आनंदाने रडत होती बिचारी. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपला सासरा कॉफी बनवून देईल. एवढी साधी गोष्ट आयुष्यभराची आठवण होऊन जाते. आपल्याला आठवणी सांगण्यापेक्षा आठवणी बनवायच्या आहेत. आपण आपल्या आठवणीत रमण्यापेक्षा लोकांनी आपल्या आठवणीत रमलं पाहिजे. ज्याच्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखं खूप असतं तो सामान्य माणूस. ज्याच्याबद्दल लोकांकडे सांगण्यासारख खूप असतं तो चांगला माणूस. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना लिहावं वाटलं. तुमचे अनुभव, तुमचं ज्ञान भावी पिढीला आवश्यक आहे. वेळ काढून लिहा. सांगा. तुम्ही हे वाचलंय म्हणजे तुम्हाला अजूनही लोकांना काय वाटतं ते समजून घेताय. बाकी आपण जगाला सांगायला हवं, चष्म्याचा नंबर वाढला की फक्त काच बदलत नाही. दृष्टीकोण पण बदलतो. लोक म्हणतात धूसर दिसू लागतं. पण खरी गोष्ट ही आहे की इतरांचे दोष कमी दिसू लागतात. गुण दिसतात फक्त. ते दिसले तरी पुरे असतं जगायला. हो ना?
चूक भूल द्यावी घ्यावी.
तुमचाच एक ज्येष्ठ नागरिक.
दृष्टीकोन बदलतो 👌🏼👌🏼