
अंगाखांद्यावर सूरपारंब्या खेळणारे पोरं आता लंडन अमेरिकेत जाऊन बसलेत. कुणी दिल्लीत गेलय. कुणी विधानसभेत तर कुणी झेडपीत गेलय.
कसंय सगळं? काळजी घेताय ना? तोंडावर मास्क असणारच. पण ऑक्सिजन तर घ्यावाच लागणार. मी गेले तीन चारशे वर्षं खराब हवा घेतो आणी ऑक्सिजन देतोय. शुध्द हवा देतोय. मास्क न घालता. ओळखलं. अहो वडाचं झाड. दोनशे वर्षापेक्षा जास्त वय झालय. तुमच्या पणजोबाच्या पण आधीपासूनच्या पिढ्या पाहिल्या. माझ्याच फांदीवर झोळीत झोपणाऱ्या मुली मोठ्या होऊन नागपंचमीला माहेरी आल्या की पुन्हा माझ्याच फांदीवर झोके घ्यायच्या. माझ्या अंगाखांद्यावर सूरपारंब्या खेळणारे पोरं आता लंडन अमेरिकेत जाऊन बसलेत. कुणी दिल्लीत गेलय. कुणी विधानसभेत तर कुणी झेडपीत गेलय. माझ्या सावलीत खेळलेले खेळ तुम्हाला सगळ्यांना आठवत असणार नक्की. कुणी अभ्यासाला बसतात, कुणी पत्ते खेळायला बसतात. कुणी छोटं दुकान मांडून बसतात. कुणी पावसात भिजायचं नको म्हणून बाईक थांबवतात. कुणी लाखाची कार सावलीसाठी आणून लावतात. कुणी दीडशहाणे बदामात आपल्या प्रेयसीसोबत आपलं नाव खिळ्याने कोरून ठेवतात माझ्या खोडावर. वडाच्या झाडाला लागलेले असे कितीतरी बदाम तुम्ही पण पाहिले असतील.
एक एक गोष्ट डोळ्यासमोर येतेय. आदल्या दिवशीच नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी वडाला फेऱ्या मारायला आलेली नवी सूनबाई. घरात कुणी विचारत नाही म्हणून माझ्या सावलीत दिवसभर पेपर वाचत बसणारा म्हातारा. हायवेने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हातारा वाचन करतोय हे बघून खूप कौतुक वाटायचं. पण म्हातारा अंगठे बहाद्दर आहे हे फक्त मला आणि त्या म्हाताऱ्यालाच ठाऊक असायचं. तेच बरं होतं. घरात आधीच काय कमी कटकट होती बिचाऱ्याला? पुन्हा पेपर वाचून डोकेदुखी कशाला? दिवसभर पेपरमधले फोटो बघायचा बिचारा. फोटोमधली माणसं चांगली असतात. निदान ते तरी आपल्याकडे बघून हसतात असं वाटायचं म्हाताऱ्याला. अशी कितीतरी माणसं पाहिली या दोनशे वर्षात. इंग्रजांच्या विरोधात लढणारे सैनिक घोडा बांधून दोन घटका आराम करायचे माझ्या सावलीत. रात्ररात्रभर क्रांतिकारक लपून बसायचे माझ्या फांदीवर. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झपाटलेले स्वातंत्र्यसैनिक कट आखायचे माझ्या खोडापाशी बसून. धनेश, पोपट, चिमण्या, खारुताई, माकडं, बगळे, मैना, कोकीळ असे कितीतरी पक्षी पोटभर जेवायचे. घरटे करायचे. आजही सगळं काही तसच चालू आहे. नवी नवरी गावात यायची. माहेरच्या माणसाला निरोप द्यायला माझ्यापर्यंत यायची. मग माझ्या सावलीत आपली सासू कशी छळते हे गाऱ्हाण सांगायची. पुढे काही वर्षांनी तीच सून वय वाढून सासू व्हायची. मग तिची सून पुन्हा आपल्या माहेरच्या माणसाला बसमध्ये बसवायला माझ्यापाशी यायची. माझ्या सावलीत उभी राहून माहेरच्या माणसाला सासूबद्दल गाऱ्हाणे सांगायची. पिढ्या न पिढ्या हे चालू आहे. मी ऐकतो आहे. कुणाच्या प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा, कुणाचे भांडण. कुणाचा नवस. कुणाचा संताप. मी विचार केला माझ्याजागी कुणी माणूस असता तर याचं त्याला, त्याचं याला सांगत बसला असता दिवसभर. पण मी कधी कुणाचं गुपित कुणाला सांगितलं नाही. फक्त सावली देत राहिलो. पण ..
आता जायची वेळ आलीय. वय झालंय. पण मी ठणठणीत आहे अजूनही. सहज शंभर माणसं माझ्या सावलीत बसू शकतात अजूनही. चार पाचशे पक्षी जगू शकतात. जर्मनीत, अमेरिकेत बनलेल्या महागड्या कार माझ्या सावलीत उभ्या असतात. कारण त्या कारवाल्यांनी एअरbag बनवली, कार ऑटोmatic केली. पण कारसाठी सावली काही त्यांना बनवता येत नाही. तुम्ही विचार करत असाल तरीही माझी जायची वेळ का झालीय? कारण मी एक छोटीशी चूक केलीय. मी लोकांना ओळखीची खुण असलेलं झाड आहे. रस्त्यात विश्रांती घ्यायला हक्काचं ठिकाण आहे.
फक्त माझी चूक अशी झालीय की मी आता रस्त्यावर आलोय. तसा नाही. आधी मी रस्त्याच्या कडेला होतो. पण आता हा रस्ता एकस्र्पेस हायवे होतोय. चौपदरी. मी रस्त्याच्या मध्ये येतोय. माझ्याच फांदीवर खेळलेल्या काही पोरांनी रस्ता आखलाय. लोकांना शंभरच्या स्पीडने जाण्यासाठी मला तोडावच लागणार म्हणतात. आधी वाटलं रस्ता थोडा बाजूने जाईल. पण तसं होणार नाही. विकासकामात जुनी खोडं आडवी येतात म्हणे. ठीकय. माझी चूक झाली. आधी रस्ता नव्हता फक्त मीच होतो. आता मी तुमच्या रस्त्यात आलो. कुणाच्या वाटेत आडवं येणं हा माझा स्वभाव नाही. वाईट फक्त याचच वाटतं की तुमची लेकरं सावली कुठं शोधणार? एका फटक्यात दोन चारशे वर्षाची झाडं तोडण्याएवढा विकास केलाय तुम्ही. पण दोन चारशे वर्षाची ही झाडं पुन्हा जशीच्या तशी दुसऱ्या जागी लावायचा प्रयत्न अजूनही करता येत नाही तुम्हाला. माझ्या सावलीत शिकलेल्या लेकरांनासुद्धा हे जमत नाही..
राष्ट्राच्या झेंड्याचा अपमान झाला तर शिक्षा होते. राष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान झाला तर शिक्षा होते. पण या देशात राष्ट्रीय वृक्षासारखा दर्जा असलेला वड सर्रास कापला जातो. पण कुणाला शिक्षा सोडा साधी खंत सुद्धा वाटत नाही. ही गोष्ट सहन होत नाही. असो. तोडला गेलो तरी मी मुळापासून उखडला जाऊ शकत नाही. माझी मुळ या मातीत आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला मी सांगू शकतो. मी पुन्हा येईन. आणि मी नक्की येत असतो. तुम्ही मला जगवणार आहात म्हणून नाही. तुम्ही मला बिना सावलीचे बघवणार नाही म्हणून. तोपर्यंत काळजी घ्या लेकरांनो.
तुमचाच एक राष्ट्रीय वृक्ष
Photo © अभिजीत आप्पासाहेब देशमुख
0 Comments