एक पोलिसाचा मुलगा म्हणून आज पुन्हा एकदा लिहावं वाटलं. सोशल मिडीयावर काही नीच लोकांचे पोलिसांवर हात उचलतानाचे फोटो पाहिले. व्हिडीओ बघतोय. खूप संताप येतोय. पण तुम्हालाच लोकांना कंट्रोल करताना एवढ्या अडचणी आहेत तर आमच्यासारख्याने काय करायचं? गेले कित्येक दिवस पाहतोय.
एक पोलिसाचा मुलगा म्हणून आज पुन्हा एकदा लिहावं वाटलं. सोशल मिडीयावर काही नीच लोकांचे पोलिसांवर हात उचलतानाचे फोटो पाहिले. व्हिडीओ बघतोय. खूप संताप येतोय. पण तुम्हालाच लोकांना कंट्रोल करताना एवढ्या अडचणी आहेत तर आमच्यासारख्याने काय करायचं? गेले कित्येक दिवस पाहतोय.
कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून तुम्ही वेळी अवेळी घरी येता. आधी किमान काही घेऊन येऊ का असं विचारायचा तरी. पण आता लोकांच्या आरोग्यासाठी राबणारे माझे बाबा एखाद्या पेशंटसारखे घरी येतात. बाहेरच गरम पाण्याने आंघोळ. कपडे बाहेरच भिजवत ठेवलेले. आमच्यापासून शक्य तेवढे लांब लांब राहताय.
आपल्यात हे अंतर आणखी किती दिवस राहणारय माहित नाही. पण बापाच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपायची सवय असलेली मुलं, ड्युटीवरून आल्या आल्या बापाच्या कडेवर बसणारी मुलं, आईच्या मांडीवर झोपी जाणारी मुलं डोळ्यासमोर येतात. आपला बाप असा का वागतोय त्यांच्या लक्षातही येत नसेल. आणि तुमच्यासारखे कित्येक पोलीस निरुत्तर होत असतील.
बाहेर वाटेल त्या लोकांसाठी धावून जायचं, दिसेल त्या माणसाच्या मदतीला जायचं, गरजूंना उचलून न्यायचं पण घरी आल्यावर आपल्याच लोकांपासून लांब लांब रहायचं. बाबा हा किती भयंकर रोग आहे.
आपल्या माणसाच्या काळजीने आपण त्याच्या जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. जग हेच करतय. मग आपल्याच घरात उलट का? तुम्ही म्हणता डॉक्टर, नर्स, फायर ब्रिगेड असे कितीतरी लोक आहेत ज्यांची हीच परिस्थिती आहे. पण का?
बाबा, खरतर तुम्हाला पत्र लिहायची खुपदा इच्छा व्हायची. ड्युटीच्या निमित्ताने तुम्ही बरेचदा दोन दोन, तीन तीन दिवस बाहेर असायचा. मी आईला विचारायचो. सगळ्यांचे बाबा वेळेवर घरी येतात. आई म्हणायची पोलिसांची ड्युटी अशीच असते. मला वाटायचं सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे व्हाव्यात याची जे काळजी घेतात त्यांच्या ड्युटीला काही नियम नको का?
त्यांनी रस्त्यावर कुठेही बाकडे टाकून का बसायचं? त्यांनी जिथे गरमीने दोन मिनिट कुणी उभ राहू शकत नाही अशा ठिकाणी दिवसभर का थांबायचं? आता हेच बघा ना, सगळ्यांना प्रश्न पडतो मुख्यमंत्री कोण होणार? सत्तेत कोण येणार? पण मला मुख्य प्रश्न असतो ड्युटीला गेलेले माझे बाबा घरी कधी येणार? सत्ता कुणाचीही आली तरी बंदोबस्त पोलिसांनाच करायचा असतो.
बाबा लहानपणी माझे वडील पोलीस आहेत म्हणून मित्रांमध्ये माझा खूप रुबाब होता. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की काही लोकांना पोलिसांविषयी खूप राग आहे. कारण पोलीस नियम पाळायला लावतात. मोठ मोठ्याने लावलेले गाणे बंद करायला लावतात. शांतता राखायला सांगतात. भर रस्त्यावर, चौपाटीवर खुलेआम रोमान्स करू देत नाहीत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याचा खूप लोकांना राग येतो बाबा.
माझा एक मित्र नापास झाला होता म्हणून शिक्षणव्यवस्था वाईट आहे असं म्हणायचा.. एक दिवस त्याला दारू पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी पकडलं. दंड केला. आता तो पोलीस पण वाईट आहेत अस म्हणतो. एक दिवस मी वैतागून तुम्हाला विचारलं होतं बाबा की खरच काही लोक म्हणतात तसे पोलीस डेंजर असतात का? तेंव्हा आई म्हणाली होती ते खूप पटलं मला.
एका झाडाचे सगळे आंबे चांगले असतील असं होत नाही. दोन चार नासके आंबे असतात. पण ते प्रत्येक झाडाला असतात. म्हणून आपण आंब्याला नाव ठेवायचं नसतं. चार दोन वाईट माणसं गावोगाव असतात. म्हणून आपण देशाला नाव ठेवत नाही. मी खरं सांगतो बाबा, आधी मला कुणी पोलिसांना नाव ठेवलं की खूप राग यायचा. पण हळू हळू लक्षात आलं की माणसाला सवयच असते नाव ठेवण्याची. आणि काम करणाऱ्या माणसाला तर जास्त टीका सहन करावी लागते. म्हणजे लोक कॉमेंट्री करणाऱ्या माणसाला बोलत नाहीत. मैदानात असलेल्या तेंडुलकरबद्दल जास्त बोलतात.
कारण जवाबदारी त्याच्या खांद्यावर असते. बाबा तुमच्यावरही खूप जवाबदारी आहे. मागे एकदा वाचलं होतं की पोलीस खाते इंग्रजांनी सुरु केलं. पण आपल्याकडे पोलीसयंत्रणा अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. म्हणूनच इंग्रजांनी लिहून ठेवलय की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली पोलीस पद्धती एवढी उत्तम आणि कार्यक्षम होती की त्याकाळात आमच्या युरोप मध्ये देखील एवढी चांगली पोलीस पद्धती प्रचलित नव्हती.
बाबा तुम्ही सगळे पोलीस या समृध्द परंपरेचे तुम्ही वारस आहात. सद्रक्षणाय खलनिग्रहनाय असं पोलिसांचं बोधवाक्य आहे. पण मग पोलिसांवर हात उचलणाऱ्या लोकांचं काय? त्या लोकांना खरतर आई बापांनीच मारायला पाहिजे त्यांच्या. त्या लोकांना पोलिसांनी फटके दिल्याचे व्हिडीओ आले पाहिजेत. लोकांना लक्षात आलं पाहिजे की आपल्यासाठी जीवाचा धोका पत्करणाऱ्या माणसावर हात उचलण्याचा परिणाम काय असतो ते.
पोलीस स्टेशनवर हल्ला करण्यापर्यंत मजल जाते. अशावेळी पोलिसांची काळजी किती लोक करतात? मला कधी कधी आश्चर्य वाटतं की जेवढ्या वेळा गुन्हेगारांना कसं वागवलं जावं, त्यांना काय सुविधा दिल्या जाव्यात या विषयी बोललं जातं त्याच्या अर्ध्या वेळा तरी पोलिसांशी कसं वागायला पाहिजे, त्यांना काय सुविधा दिल्या पाहिजेत याविषयी बोलायला पाहिजे की नाही? पोलिसांची गाडी, पोलीस स्टेशनमधल्या सुविधा या गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही? पोलिसांची शस्त्र त्यांचे कपडे या गोष्टींचा पण विचार केला गेला पाहिजे.
पोलिसांना किती ताण असतो याचाही विचार व्हायला पाहिजे. स्वतःच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेण्यापर्यंत पोलीस का जात असतील याचा विचार कुणी करायचा? मला माहितीय या सगळ्या गोष्टी तुम्ही माझे बाबा आहात म्हणून मला सुचताहेत. आपल्या घरातला माणूस सैन्यात असला की युध्द वाईट गोष्ट आहे हे पटतं. एरव्ही सोशल मिडीयावर युद्धाविषयी छाती फुगवून बोलणाऱ्या लोकांना गमवण्यासारखं काही नसतं. म्हणून ते तोंडाची वाफ दवडत असतात. पण पोलिसांचा आपल्या जवळच्या माणसासारखा विचार केला पाहिजे. सगळ्यांनी.
एरव्ही आपली छाती किती इंचाची आहे हे सांगत अभिमानाने मिरवणारे अभिनेते पोलीस सोबत नसतील तर लोकांमध्ये मिसळत नाहीत. पेटवा पेटवीची भाषा करणारे दारात पोलीस नसतील तर घराबाहेर पडत नाहीत. एवढ असूनही सामान्य माणूस पोलिसांपासून फटकूनच राहतो. लोक अभिमानाने सांगतात की पोलीस स्टेशनची पायरी चढायची वेळ येऊ नये. पण खरतर अशी वेळ यावी की पोलिसांना पोलीस स्टेशनची पायरी उतरून बाहेर यायची वेळ येऊ नये. ही गोष्ट नक्कीच सामान्य माणसाच्या हातात आहे. त्या दिवसासाठी प्रयत्न करूया. आणि एक सांगायचं राहिलं…मला तुमचाच नाही प्रत्येक पोलिसाचा अभिमान वाटतो. तुम्हाला मनापासून SALUTE!
ताजा कलम पुन्हा एकदा सांगतो, पोलीस, डॉक्टर, नर्स अशा लोकांना या संकटात त्रास देणाऱ्या नीच लोकांना शिक्षा झालेली आम्हाला पहायचीय. खरच. फक्त तुम्हा लोकांसाठी टाळ्या वाजवून देशाचं समाधान होणार नाही. सरकारने त्या फालतू लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे. तेंव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या कामाला सलाम केल्याची भावना होईल. तुम्ही तुमचं काम प्रमाणिकपणे करताय. करालच.
0 Comments