
प्रिय मम्मी पप्पा
प्रिय मम्मी पप्पा
आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या मुलांना मराठी नीट येत नाही. माझी मिस्टेक काय हेच मला कळत नाही. तुम्ही जे शिकवलं तेच शिकतोय मी. लहानपणापासून तुम्ही बिझी असला की माझ्या हातात मोबाईल देता. मला मोबाईलमधले गेम्स खूप आवडतात. पण आता अचानक तुम्ही मोबाईल वाईट आहे असं रीझन देता. मी दोन वर्षांचा असताना मोबाईल चांगला होता. आता मी दहा वर्षांचा झालो की वाईट कसा झाला? मी खूप किरकिर करतो अशी पप्पा कम्प्लेंट करतात. पण रडल्याशिवाय आपल्याला पाहिजे ते भेटत नाही हे मला माहितीय. आपल्या सोसायटीतला शंतनू सारखा रडायचा. मग त्याच्या मम्मी पप्पानी त्याला एक छोटीशी बहिण आणून दिली. केवढी क्युट आहे. शंतनू रडायचा थांबला पण आता बहिण दिवसभर रडत असते. रडल्यामुळे असे भारी गिफ्ट भेटतात. मी लहानपणी जेवण करायचो नाही म्हणून तुम्ही टीव्ही चालू करून ठेवायचा. कार्टून बघत बघत मी जेवायचो. तुम्ही पण बातम्या बघत बघत जेवता तसं. पण आता मी कार्टून लावलं की तुम्हाला राग येतो. मला एक कळत नाही कार्टून आणि न्यूज मध्ये काय फरक आहे? दोन्हीकडे कॉमेडीच तर चालू असते.
मी खेळून उशिरा घरी आलो की तुम्ही दोघंही मला किती बोलता. पण खूपवेळा तुम्ही दोघंही लेट येता. पप्पा तर नेहमीच. मी कधी काही बोललोय? पप्पा नेहमी मला म्हणतात की आमच्या लहानपणी saturday ला पण शाळेला सुट्टी नव्हती. स्कूल बस नव्हती. पायी जावं लागायचं. खरंतर स्कूलला पायी जायचं म्हणजे सॉलिड मजा येत असणार. पण पप्पा असं सांगतात जसं काही खूप मोठी tragedy होती. आम्हाला van मध्ये पिंजऱ्यात कोंडून नेल्यासारख वाटतं. पप्पा सांगतात तुझ्या एका वर्षाच्या फीसमध्ये माझं सगळं शिक्षण झालं. आम्ही कधीच पिझ्झा खाल्ला नाही. आता त्याकाळात पिझ्झा नव्हता हा काय माझा दोष आहे का? त्याकाळात स्कूलची फीस कमी होती याला मी काय करू शकतो? मी एकदा आजोबाना विचारलं तुम्ही खूप गरीब होता का? पप्पाला खेळणी आणून द्यायचा नाही का? तर आजोबा म्हणाले तुझा बाप पण तुझ्यासारखाच होता. खूप पैसे उडवायचा. रोज चॉकलेट खायला पैसे न्यायचा. ते ऐकल्यावर मी जरा relax झालो. नाहीतर जाम गिल्टी वाटायचं मला. एकदा आजोबांनी पप्पांच्या शाळेतल्या मार्कशीट दाखवल्या आणि माझं टेन्शनच गेलं.
ममा – पप्पा, मला सायन्समध्ये कमी मार्क्स मिळतात. मला सायन्स आवडत नाही असं नाही. पण मला सायन्सचे टीचर आवडत नाहीत. सारखे इंसल्ट करतात कुणाचा ना कुणाचा. सगळा वर्ग हसतो. म्हणून त्यांच्या पिरियडला कुणी आन्सर देत नाही. सगळे कायम घाबरून असतात आपल्याला काही बोलतील का काय म्हणून. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आमच्या काळात तर शिक्षक मारायचे आम्हाला असं म्हणालात. तुमच्या काळात जे चुकीचं होतं ते सुद्धा तुम्हाला सहन करावं लागलं. कारण तुम्ही लहान होता. पण आता तुम्ही मोठे आहात. तुम्ही स्कूलची एवढी फीस भरता म्हणून तुम्हाला कौतुक वाटतं. पण आमच्या शाळेत toilet खूप घाण असतात. दिवसभर तिकडे फिरकावं पण वाटत नाही. आमची शाळा पाच मजली आहे पण आमच्या शाळेला प्ले ग्राउंड नाही. खेळाच्या तासात आम्ही किती बोअर होतो तुम्हाला माहित नाही. मला छोटी शाळा असली तरी चालेल पण ग्राउंड पाहिजे. झाडं पाहिजेत. तुम्ही माझी बेडरूम तुमच्या मनाने सजवली. आर्किटेक्टला खूप पैसे दिले. पण मला माझ्या बेडरूममध्ये कोंडल्यासारखं होतं. एसी चालू असतो म्हणून खिडकी उघडायची नाही. स्कूल, ट्युशन आणि घर. बेडरूममध्ये भिंतीवर काढलेले कार्टून्स आणि मी. म्हणून मला कार्टूनची नावं जास्त माहित आहेत. फ्रेंड्सची कमी.
मागच्या वर्षी आपण गावी गेलो होतो. मी आजोबासोबत शेतात गेलो. आजोबाने विचारलेल्या एकाही झाडाचं नाव मला सांगता आलं नाही. वडाचं झाड पण मला ओळखता आलं नाही. पक्षी पण ओळखू आले नाही. उत्तर दिशा कुठे आहे ते पण सांगता आलं नाही. आजोबा आकाशात चांदण्या दाखवत होते ते सुद्धा काही कळत नव्हतं. आजोबा मला मिठी मारून रडायला लागले. म्हणाले काहीच शिकवत नाहीत का रे तुम्हाला शाळेत? खूप लाज वाटली. मी नेमकं काय शिकतोय? मला ह्या गोष्टी का माहित नाहीत? आजोबा म्हणाले टीव्ही बघण्यापेक्षा खिडकीत बसून झाडाकडे बघ, रात्री आकाशाकडे बघ. फिरायला जा. पक्षी बघ. फुलं ओळख. झाडं पाठ कर. फक्त पाढे पाठ करून हिशोब करता येईल. पण जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्या हिशोबाच्या पुढच्या आहेत. आजोबांची एक गोष्ट मला खूप आवडली. आजोबा म्हणाले ज्या गोष्टी मोजता येतात त्या टेन्शन देतात. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत त्या आनंद देतात. आपण वहीचे पानं मोजू शकतो पण परीक्षेत टेन्शन येतं. आपण झाडाचे पानं मोजू शकत नाही म्हणून झाड बघून आनंद होतो. आकाशातल्या चांदण्या मोजताना मिळणारा आनंद पैसे मोजताना मिळूच शकत नाही.
ममी पपा, एकदा आपण मिळून या चांदण्या मोजुया. करिअर, मार्क्स हे विषय सोडून वेगळं काहीतरी बोलूया. तुम्ही मला असं काहीतरी शिकवा की पुन्हा आजोबांनी कधीच म्हणू नये, ‘काहीच शिकवत नाहीत का रे तुम्हाला शाळेत?’ मला शिकायचंय.
तुमचाच …
0 Comments