तरुणाई काय करतेय? … उत्तरार्ध

January 30, 2020

लेखन

arvind jagapat patra

तरुण पिढी आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होते.

तरुण पिढी आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होते. सोशल मिडीयावर कितीतरी प्रकार बघता येतात. पण खूप कमी लोक आपल्या गावातल्या समस्या लिहितात. शहराच्या वाढत चाललेल्या गर्दीवर लिहितात. आर्थिक प्रश्नावर अभ्यासपूर्ण लिहिणारे, लोकसंख्येच्या प्रश्नावर लिहिणारे, रोजगाराच्या प्रश्नावर लिहिणारे हात खूप कमी आहेत. संख्या जास्त आहे ती राजकारणावर लिहिणारी. बरं हे राजकारणावर लिखाण समज असलेलं आहे का? नाही. त्यात प्रतिक्रिया जास्त आहेत. शिव्या जास्त आहेत. टीका जास्त आहे. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे की तरुण स्वतःबद्दल लिहित नाहीत. स्वतःच्या प्रश्नाबद्दल लिहित नाहीत. व्यक्त होत नाहीत. उजवे आणि डावे, सनातनी आणी पुरोगामी असले वाद खेळत बसण्यात जास्त वेळ जातोय. शहरात काय आणि गावात काय, शिक्षणाच्या खूप समस्या आहेत. नौकरी मिळत नाही. साध्या पदव्या मिळवायला प्रचंड खर्च आहे. खाजगी क्लासेसचा बाजार आहे. कॉलेजमध्ये फक्त प्रवेश घ्यायचा असतो. क्लास कम्पल्सरी असतो अशी मानसिकता आहे. त्यात लाखो रुपये खर्च आहे. विचार करू शकत नाही एवढा लग्नाचा प्रश्न भयंकर आहे. दुष्काळग्रस्त भागात जाऊन मुली शोधल्या जाताहेत. लग्न जमवणार्या लोकांना डिमांड आहे. शहरात लग्न जमवणाऱ्या वेबसाईटचा धंदा जोरात आहे. जाती पातीच्या संघटना हेच काम करताहेत. पण तरुणाई काय करतेय?

                        सोशल मिडीयावर तरुण सक्रीय आहेत. विनोद, मिम, विनोदी व्हिडीओ पाहणे आणी शेअर करणे हा मोठा उद्योग आहे. एकीकडे छोट्या गावातला एक शेतकरी तरुण शेतकर्यांना सगळ्या योजना कळाव्यात, बाजारभाव कळावेत म्हणून app काढतो. दुसरीकडे गावातले हजारो मुलं अयोध्या प्रश्नावर, काश्मीर प्रश्नावर एकमेकांना शिव्या देतात. भांडत बसतात. दहापैकी आठ मंदिराची अवस्था वाईट असते. चांगल्या दगडी बांधकामाला फालतू रंग देऊन पार रया घालवलेली असते. गावात झाडं उरलेली नाहीत. वड पिंपळ जाऊन गुलमोहर, शतपर्णीची संख्या वाढलीय. पक्षी येत नाहीत. फक्त पक्ष येतात गावाकडे. लोकशाही आहे. पक्ष असलेच पाहिजेत. पण पक्ष असतात तशा योजना पण पाहिजेत. विकास पण पाहिजे. नवीन नेतृत्व पण पाहिजे. पण किती ठिकाणी नवीन आणि तरून नेतृत्व आहे? घराणेशाही संपत का नाही? तीच तीच माणसं राज्य करणार असतील, त्यांचेच वारस राज्य करणार असतील तर तरुणांनी काय करायचं? फक्त घोषणा द्यायच्या? यांच्यासाठी भांडायचं? प्रचार करायचा? अर्थात हे प्रश्न तरुणांना पडले पाहिजेत. पण एकूणच याबाबतीत जागरूकता असली तरी बदल घडताना दिसत नाही. कारण सत्तांतर घराणेशाहीच्या विरोधात झालं तरी पुन्हा जुने घराणे नव्या पक्षात सामील झाले. आपले गड शाबूत केले. तरुणांच्या दृष्टीने बदल घडलाच नाही. पण याची जाणीव  असलेले तरून किती आहेत?

                      शेतकरी नेत्यांच्या मागे फिरणारे एकेकाळचे तरुण आता म्हातारे झालेत. त्यांना काहीच मिळालं नाही. पंधरा पंधरा वर्ष शेतकरी आत्महत्येवर बोलताहेत लोक. एवढ्या काळात चित्र बदलायला पाहिजे. बदलत नाही. कुठे पाणी मूरतय? सगळ्यांना माहित आहे. जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव दांडगा आहे. पण त्यांनी आपला अनुभव तरुणांसोबत शेअर केलाच नाही. किती जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या लिखाणातून सच्चाई मांडलीय? लक्तरं मांडलीत राजकीय व्यवस्थेची? नेत्यांची खरी बाजू समोर आणलीय? फक्त कौतुक सोहळे. आपापल्या साहेबांवर पुस्तकं, पोस्ट, ब्लॉग आणि भाषणं. नव्या पिढीला आपल्या साहेबांनी काय माती खाल्लीय हे सांगण्याची जवाबदारी किती कार्यकर्त्यांनी घेतलीय? पक्ष बदलून टीका करणाऱ्या लोकांच्या शब्दाला बेवड्या माणसाच्या शब्दाएवढी पण किंमत नसते. एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी तरुणाच्या डोळ्यात अंजन घालणारं लिखाण केलं पाहिजे. बोललं पाहिजे. मुख्य म्हणजे स्वतःची तेवढी विश्वासार्हता ठेवली पाहिजे. पण दिसेल ती फांदी धरण्याच्या नादात असे कार्यकर्ते पण खूप कमी राहिलेत. नेते तर फारच दुर्मिळ. लोक साठी गाठून सुद्धा नेमका कुठला पक्ष देशाचं भलं करू शकतो हे सांगू शकत नाहीत. तरुणांनी कसं ठरवायचं? साधी बेरोजगारी आहे की नाही देशात या गोष्टीवर ठाम बोलत नाहीत लोक. आकडेवारी लपवली जाते. वाढवून दाखवली जाते. किंवा थेट खोटी सांगितली जाते. खरं चित्र जर डोळ्यासमोर येत नसेल तर काय उपयोग आहे लोकशाहीचा?                    

 हायवेने जाताना खूप तरुण मंडळ पायी जाताना दिसतात. कित्येक देवाला तरुण कित्येक किलोमीटर पायी जातात. कित्येक तरुण तरुणी चप्पल वापरत नाहीत देवाच्या नावाने काही दिवस. या सगळ्या गोष्टीना लोक नाव ठेवतात किंवा कौतुक करतात. संस्कार परंपरा म्हणून. पण ही तरुणांची उर्जा, व्यक्त होण्याची उर्मी, काहीतरी करून दाखवण्याची तळमळ अजूनही खूप चांगल्या गोष्टींसाठी वापरता येऊ शकते. प्रामाणिकपणे मेक इन इंडिया तरुणांपर्यंत पोचलंय का? किती तरुण उद्योग करताहेत? आपण ज्या प्रमाणात विदेशी brand वापरतो त्या प्रमाणात देशात काहीतरी नवीन निर्माण करण्याचा विचार करतो का? आपल्या देशात किती शोध लागलेत नजीकच्या काळात? आपल्या देशात जेवढे इंजिनियर, डॉक्टर निर्माण होतात त्या प्रमाणात आपल्या देशातली आरोग्यव्यवस्था आणि तंत्रज्ञान प्रगत आहे का? हे फक्त तरूणांच अपयश नाही. योग्य वयात चांगले आदर्श मिळायला हवेत. आपल्याकडे असे आदर्श किती आहेत? अंबानी आणि अदानी पैसे कमवतात. माणसाना विकत घेता येतं. तंत्रज्ञान विकत घेता येतं. हीच मानसिकता झालीय. खरतर अब्दुल कलाम होऊन मोठं होता येतं हे देशाला माहीत आहे. ते सगळ्यात मोठे आदर्श आहेत. पण शास्त्रज्ञ होणे ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे असं वाटतं तरुणांना. नवे शोध लावण्यासाठी फार प्रोत्साहन नाही. आपल्या पोराने एखाद्या विषयाच्या शोधासाठी आयुष्य किंवा आयुष्यातली काही वर्ष द्यायची ठरवली तर किती पालक तयार होतील? कोण लग्न करायला तयार होईल? रिस्क घेणाऱ्या तरुणांना आपल्याकडे फार किंमत नाही. पडद्यावरच्या हिरोपेक्षा खर्या आयुष्यातल्या हिरोंना किंमत आली पाहिजे. मराठी भाषेवर काम करतोय, किल्ल्यांच्या स्वच्छतेचं काम करतोय, कुणी जुने नाणे गोळा करतोय, कुणी मोडी शिकतोय, कुणी देशी बियाणे जपतोय, कुणी जुन्या ओव्या गोळा करतोय, कुणी संस्कृत शिकतोय. असे कित्येक तरुण माझ्या ओळखीचे आहेत. पण अस्वस्थ आहेत. त्यांना फार प्रोत्साहन नाही. पाठिंबा नाही. त्यांच्या कामात त्यांनी पूर्ण फोकस करावा अशी कुठली पूरक परिस्थिती नाही. पण ते करताहेत. लढताहेत. अशा लोकांना आपण प्रोत्साहन द्यायला नको का? त्यांचं कौतुक करायला नको का? तरुण व्यक्त होताहेत. गड किल्ले फिरताहेत. स्वच्छता करताहेत. सामाजिक काम करताहेत. थोडे आहेत. पण या थोड्या लोकांना प्रोत्साहन देण्यात आपण एवढा कंजूषपणा करतोय की त्यांची संख्या वाढण्याची गोष्ट सोडा. पुन्हा कुणी अशा अनवट वाटेने जाणार नाही. मेक इन इंडिया ही जाहिरात असून फायदा नाही. शेती करणाऱ्या मुलांची लग्न होणार नसतील तर आपण मेक इन इंडिया या घोषणेचा नीट विचार केला पाहिजे. कारण मेक इन इंडिया शेती पासून सुरु होते. प्लास्टिकच्या बाटल्या बनवणे म्हणजे मेक इन इंडिया नाही. काहीतरी कसदार, अस्सल, देशी आणी लोकांना जगवणार निर्माण करणे म्हणजे मेक इन इंडिया. तरुणांना समजून घेतल्याशिवाय मेक इन इंडिया शक्य नाही. नाहीतर सोशल मिडीयावर मुलींचे फोटो लावून, मुली बनून chatting करणाऱ्या मुलांची संख्याच वाढत जाईल फक्त. आणि ते फेक इन इंडिया असेल.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *