मला त्याचं नाव सांगा..

June 30, 2020

लेखन

arvind jagapat patra

कांतरावच्या चिंता वाढल्या होत्या. पण सोयाबीनचा भाव काही वाढत नव्हता. एक दिवस कांतरावनी सगळ्यांचे अंदाज खरे ठरवले.

कांतरावचं बायकोपेक्षा शेतावर जास्त प्रेम आहे असं गावात सगळे म्हणतात. शेतातल्या जांभळाच्या झाडापेक्षा कांतराव जास्त टाईम शेतात असतो असं त्यांच्या आईला वाटतं. कांतरावला लहानपणापासून शेतीची आवड. आवड नाही वेड. एक भाऊ सरकारी दवाखान्यात होता. त्याचे काही पैसे यायचे. तोपर्यंत कधी काही नड जाणवली नाही. पण भाऊ अपघातात वारला आणि कांतराव खचून गेले. त्यात चार पाच वर्षं पावसानी दुश्मनी केली. प्यायला पाणी भेटत नव्हतं. शेताला कुठून भेटणार? दरवर्षी फक्त नुकसान. यावर्षी काही पेरायचं नाही. गाव सोडून जायचं असं गावात खूप लोकांनी ठरवलं होतं. कांतरावचा पोरगा अकरावीत. दीपक नाव त्याचं. दीपकचं शिक्षण कसं करायचं ?

                                   शहरात कुठं रोजानी काम करावं असं आता कांतरावला पण वाटू लागलं. पण शेती सोडायचं मन नव्हतं. नेमका ह्यावर्षी पाउस चांगला सुरु झाला. पुन्हा नव्या उमेदीनी कांतराव कामाला लागला. पैसे उधार घेतले. सोयाबीन पेरलं. मेहनतीला फळ आलं. पिक चांगलं आलं. पण नोटाबंदी जाहीर झाली. जुन्या नोटा घ्या म्हणून व्यापारी मागं लागले. कांतराव नसत्या भानगडीत पडणारा माणूस. थोडं थांबायचं ठरवलं. पण परिस्थिती सुधारायच नाव घेत नव्हती. साठ सत्तर हजाराचं कर्ज होतं. सगळी आकडेवारी कोलमडून पडली. सोयाबीन पडूनच होतं. कर्ज फिटणार नाही हे स्पष्ट झालं. पोराच्या बारावी साठी पैसे लागणार होते. त्याला शहरात ट्युशन लावायची होती. पण ते आता शक्य नव्हतं. बायको आजारी होती. एकदा दवाखान्यत नेलं. पुन्हा न्यायला जमलं नाही. अंगावर काढत होती बिचारी. काय करणार? कांतराव पिक चांगलं येऊन पण खचला. पुन्हा पुढच्या वर्षी पाउस पडल ह्याची काय खात्री?  शेवटचा जुगार होता त्याचा. पण आता भाव मिळणार नाही हे लक्षात आल्यावर कांतराव जरा विचित्र वागायला लागला.

                                   तासंतास एकाच जागी बसून राहू लागला. उठसुठ शेतात जाणारा कांतराव चार पाच दिवसापासून शेतात फिरकला नाही. पंचायतसमिती सदस्य येऊन भेटला. कांतरावला बरं वाटलं. एवढा मोठा माणूस भेटायला आला. पण सदस्य म्हणाला थोड्याफार नोटा बदलून देता का जुन्या? कांतराव हसला कसनुस. सदस्य पुन्हा म्हणाला पन्नास हजार द्या बदलून. कांतराव जोरजोरात हसायला लागला. पन्नास हजार? एवढच म्हणायला लागला. सदस्य घाबरून गेला. कांतराव म्हणाला साल्या दहा वर्षात कधी शेतात गेला नाहीस. पन्नास हजार आले कुठून तुझ्याकड? सदस्य घाईत निघून गेला. पुन्हा मागं बघता. हळू हळू लोकं कांतरावपासून लांबच राहायला लागले. कांतराव शिव्या द्यायला लागला होता. सगळ्यांना.

                                   दीपकचं पण आता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. त्याला वाटलं बाप जीव बिव देतो का काय? पण खरंतर कांतरावला आता पुन्हा शेताकड बघायचं नव्हतं. सोयाबीनच्या पोत्यासारखं बसून राहायचा दिवसभर. एक दिवस काय हुक्की आली काय माहित देवळात गेला. एक फाईल घेऊन. देवाला कागद दाखवायला लागला. नवलेचं म्हातारं बाहेरून बघत होतं चोरून. कांतराव देवाला कागद दाखवत होता फाईलमधले. ओरडत होता. रडत होता. नवलेच्या म्हाताऱ्याला काही नीट ऐकू येत नव्हतं. पण कांतराव देवाला सांगत होता त्याच्या बायकोची तपासणी केली. तिला पोटाचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनी. आता कुठून पैसे आणू? सोयाबीनला चांगला भाव भेटणार असं वाटत होतं. खात्री होती. अचानक सगळं बदलून गेलं. दिवस बदलायच्या ऐवजी पैसे बदलायचे कामं सुरु झाले. ज्यांच्याकड पैसेच नव्हते त्यांच्या आयुष्यात काहीच बदल नव्हता.

                                   कांतरावच्या चिंता वाढल्या होत्या. पण सोयाबीनचा भाव काही वाढत नव्हता. एक दिवस कांतरावनी सगळ्यांचे अंदाज खरे ठरवले. झाडाला जाऊन लटकला. पण तिथंसुद्धा नशीब आडवं आलं. पोरानी धावत जाऊन उडी मारली. फांदीला लटकला. फांदी तुटली. दोघं खाली पडले. कांतराव बेशुद्ध होता. धावत पळत त्याला दवाखान्यात नेलं. सरकारी दवाखान्यात जायला टाईम नव्हता. रस्त्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं. खाजगी. तिथं भरती केलं दीपकनी बापाला. आधी भरती करून घ्यायलाच खूप वेळ घेतला डॉक्टरनी. कसाबसा उपचार सुरु झाला. छोट्या छोट्या गोष्टीत डॉक्टर चिट्ठी द्यायचा आणि मेडिकलला पाठवायचा. औषध आणा, सलाईन आणा, इंजेक्शन आणा. दीपक पैसे गोळा तरी कुठुन करणार. हातापाया पडून सगळे एकदाच देऊ म्हणाला. पडल्यामूळ पाठीच्या हाडाला लागल होतं. एकस रे मध्ये नीट कळत नव्हतं. एम आर आय झाला. पुन्हा डोक्याला मार लागलाय त्याचं वेगळं.

                                   दीपकला सगळं ऐकून रडूच यायचं सारखं. कांतरावच्या बायकोला आपलं ऑपरेशन करायला सांगितलं हे सुद्धा माहित नव्हतं. बिचारी नवऱ्यानी असं कसं केलं म्हणून परेशान. दीपक डॉक्टरला हात जोडायचा दिवसभर आणि आई देवाला. शेतकऱ्याला आधी शेतात राबून पाठ मोडायची सवय होती. पण या काही वर्षात जगाला हात जोडायची पण सवय करून घ्यायची वेळ आलीय. दोन दिवस झाले. कांतराव शुद्धीवर आला. पण कळत काही नव्हतं. माणूस ओळखत नव्हता. डॉक्टर म्हणाला पुन्हा मेंदूची तपासणी करू. पुन्हा दोनतीन दिवस तेच चालू होतं. सिटी स्कॅन, इंजेक्शन, सलाईन तर चालूच होती. असे एकूण पाच सात दिवस झाले. कांतराव पुन्हा पहिल्यासारखे शिव्या द्यायला लागले. काहीका असेना नवरा बोलायला लागला ह्यातच बायको खुश. दीपकला पण बरं वाटलं. बाप पहिल्यासारखा झाला. आता घरी घेऊन जायचं. काहीच काम करू द्यायचं नाही. सगळं काम आपण करायचं. बापाला आरामात ठेवायचं असं काय काय त्याने ठरवून ठेवलं होतं. आपण आपल्या बापाचा जीव वाचवू शकलो याचं त्याला कौतुक होतं. गावातले लोक पण शाबासकी देत होते. कांतरावच्या बायकोनी पण ३३ कोटी पैकी आठवतील तेवढ्या देवांना काही नं काही वचन दिलं होतं. ती यादी खूप मोठी होती. सगळीकड जाऊन नवस फेडायला लाखभर रुपये तरी लागणार होते. पण जेवढी जास्त लालच देऊ तेवढा लवकर देव ऐकणार असं वाटलं बिचारीला.

                                   कांतरावला घरी जायची घाई झाली होती. त्याला किती दिवस आपण दवाखान्यात होतो तेच माहित नव्हतं. सकाळी आणल होतं आणि दुपारी परत नेणार असं वाटत होतं. सारखं मला घरी घेऊन चला म्हणून ओरडत होता. बायको हो हो म्हणत होती. पण हालचाल काहीच नाही. कांतराव उठून चालायला लागला. नर्सनी पुन्हा बेडवर झोपायला सांगितलं बळजबरी. पण कांतराव ऐकत नव्हता. वार्डबॉय आले दोन. त्यांनी बळजबरी कांतरावला झोपवला. मला इथं का ठेवलंय? कांतराव विचारत होता. बायको उत्तर देत नव्हती. फक्त रडत होती.

                                   कांतरावचा पोरगा दीपक सगळ्या नात्यातल्या लोकांना हात जोडत फिरत होता. दवाखान्याचं बिल लाखाच्या घरात गेलं होतं. जास्तच. पैसे दिल्याशिवाय बापाला नेता येणार नव्हतं. नातेवाईक पैशाच ऐकून स्वतःच आजारी पडल्यासारखा चेहरा करायचे. ते तरी काय करणार? आधीच सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती थोडीफार सारखीच. त्यात नोटाबंदीमूळ गरीब श्रीमंत भेदच राहिला नव्हता. पैसे कुणाकडच नव्हते. दवाखान्यात जुन्या नोटा चालत होत्या. पण द्यायच्या कुठून हा दीपकला प्रश्न पडला होता. जिथं जाव तिथं आधी लोक शाबासकी द्यायचे. पोरगा असावा तर असा असं म्हणायचे. बापाचा जीव वाचवला. पांग फेडले. पुण्य भेटणार. पण दीपकला माहित होतं साठ हजारासाठी जीव द्यायला निघालेल्या बापाला वाचवणं लाखाच्या घरात पडलं होतं. आणि आता एकूण देणं एक लाख साठ हजारच्या वर जाणार होतं. काय कराव काही कळत नव्हतं.

                                    खूप गोंधळ घातल्यामूळ वार्डबॉय वैतागला. त्यानी कांतरावला स्पष्ट सांगितलं. एक लाख सात हजार देणं आहे डॉक्टरचं. ते दिलं की घरी जा. कांतरावचं हे ऐकून डोकंच खराब झालं. दीपक निराश होऊन बाहेरून बघत होता. डॉक्टरला काय सांगायचं विचार करत होता. कांतराव ओरडत होता. मला कुणी भाड्खाऊनी वाचवीलं? मला त्याचं नाव सांगा. मला त्याचं नाव सांगा. आता बाहेरून हे ऐकणाऱ्या दीपकच्या डोळ्यात पाणी थांबायला तयार नव्हतं. खरंच चुकलं का काय असं वाटलं त्याला पण एक क्षण. आत कांतराव ओरडतच होता. मला त्याचं नाव सांगा.   

Photo © Click’r Sharad Patil

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *