माणसाने माणसाशी माणसासम वागणे…

July 8, 2020

लेखन

arvind jagapat patra

शेतकरी म्हणाला, साहेब, इथल्या इथं जायला गाडी ठीकय. पण शेवटच्या मुक्कामाला पोचायचं तर चार माणसं सोबत पायजेत.

खूप दिवसांपूर्वी एक गोष्ट वाचली होती. विदेशातली आहे. रेल्वेत काम करणारा एक माणूस काही कामाच्या निमित्ताने फ्रीझर कंपार्टमेंटमध्ये गेला होता. पण चुकून दरवाजा बंद झाला. तो माणूस डिजिटल लॉक असलेल्या त्या फ्रीझर विभागात अडकला. रात्रीची वेळ होती. त्याने मदतीसाठी खूप हाका मारल्या. पण तिथून कुणाला आवाज जाण शक्य नव्हतं. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे रात्री तिथे कुणी येण्याची पण शक्यता नव्हती. तो माणूस खूप घाबरून गेला. त्याने दारावर थापा मारल्या. धडका मारल्या. दार तोडायचाही प्रयत्न करून पाहिला. पण त्याला यश आलं नाही. तो निराश होऊन खाली बसला तेंव्हा त्याला थंडी जाणवायला लागली. हळू हळू अशक्तपणा जाणवू लागला. श्वास बंद पडू लागला. त्याने भिंतीवर लिहायला सुरुवात केली, ‘मला थंडी वाजतेय. माझी शक्ती संपत चाललीय.’ 

सकाळी लोकांनी भिंतीवर लिहिलेले त्याचे शब्द वाचले. सगळ्यांना धक्का बसला. तो बेशुद्ध होता त्याचा धक्का बसलाच होता. पण सगळ्यात मोठा धक्का या गोष्टीचा बसला की त्या रात्री ते फ्रीझर कंपार्टमेंट खराब झाल्याने जवळपास बंद होते. म्हणजे तो माणूस केवळ भीतीनेच बेशुध्द पडला होता

कोरोनाच्या काळात हे खूप लोकांसोबत होतय. खूप न्यूज channel ज्याप्रकारे बातम्या दाखवत आहेत ते बघून लोक जास्त घाबरत आहेत. अशा काळात धीर देणारी माणसं हवी असतात, उपाय सांगणारी माणसं गरजेची असतात. पण मीडियात खूप ठिकाणी उलटं चित्र दिसतय. कोरोनाचा एवढा बागुलबुवा उभा केला जातोय की माणसाची लढण्याची इच्छाच नष्ट व्हावी. संकट मोठं आहेच. पण लढायला बळ उपाय सुचवल्यावर मिळेल. 

संकटाचा बागुलबुवा मोठा करून नाही. कधी नाही ती आपल्या माणसांची गरज जास्त जाणवायला लागलीय. माणसांना माणसांच महत्व जाणवायला लागलय. कामवाल्या मावशी, ड्रायव्हर यांच्या भाऊक होऊन आठवणी काढताहेत लोक. आता माणसांची श्रीमंती महत्वाची वाटू लागलीय पैशापेक्षा

सोशल मिडीयावर वाचलेली एक गोष्ट आताच्या काळात वाचायला नवा अर्थ देऊन जाईल. 

एकदा एक उद्योगपती एका खेडेगावात त्याच्या नवीन कारखान्यासाठी जागा बघायला गेला. रस्ता नेहमीसारखा होता. म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच कळत नव्हतं. त्यात भरीस भर म्हणून खूप जागेवर पाणी साचून डबके झाले होते. चिखल झाला होता. खूप पाउस झाल्यामुळे रस्त्यात खूप लोक त्याला लिफ्ट मागत होते. पण उद्योगपतीने आपली गाडी खराब होईल ह्या भीतीने कुणाला लिफ्ट दिली नाही. पण पुढे नेमकी उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली. कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडीतून खाली उतरला. त्याला मागून एक शेतकरी येताना दिसलं. उद्योगपतीने शेतकऱ्याला गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले आणि मदत करण्याची विनंती केली. शेतकरी गाडीजवळ आला. नेमकं काय झालं पाहिलं आणि म्हणालालाल्याला बोलवाव लागल राव.’ 

मग बोलवाना तुमच्या लाल्याला. मी त्याला पाचशे रुपये देतो!’ तो उद्योगपती म्हणाला

शेतकरी म्हणाला, लाल्या पैसे घेत नाही

उद्योगपती म्हणाला, का

शेतकरी म्हणाला लाल्या माणूस नाही. बैल आहे आमचा. तो बघा तो झाडाखाली.  

उद्योगपती शांत झाला. पण थोड्यावेळाने म्हणाला, अहो ही कार आहे. बैलगाडी नाही. एकट्या बैलाला कशी ओढली जाणार एवढी मोठी गाडी

शेतकरी म्हणाला, एवढ्या मोठ्या गाडीत तुम्ही एकटेच फिरणार म्हणल्यावर माणसं कशे येणार मदतीला? बैलालाच हात जोडावे लागणार. 

उद्योगपती खजील झाला. तरीपण त्याला बैलाने आपली गाडी ओढावी हे काही पटत नव्हतं. आपली लाखो रुपयांची गाडी एक बैल ओढतोय हे बघून लोक हसतील ह्याची त्याला भीती वाटत होती. शेतकऱ्याने ते ओळखलं

शेतकरी म्हणाला, साहेब, इथल्या इथं जायला गाडी ठीकय. पण शेवटच्या मुक्कामाला पोचायचं तर चार माणसं सोबत पायजेत. 

उद्योगपती काय समजायचे ते समजला. त्याने मागून चालत येणाऱ्या माणसांना लिफ्ट द्यायचं कबूल केलं. मग सगळ्यांनी धक्का देऊन ती गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. 

आपल्या सगळ्यानाच आता माणसांच महत्व समजतय. कायम समजत राहो.

 

Photo © Sharad Patil

1 Comment

  1. Rani Thombare

    अगदी अचूक

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *