लेखकांसाठी…

May 18, 2020

लेखन

arvind jagapat patra

एकदा आपल्यावर लेखक असल्याचा आरोप लागला की मग आपली सुटका नसते 

एकदा आपल्यावर लेखक असल्याचा आरोप लागला की मग आपली सुटका नसते. लेखक म्हणून शिक्का बसण्यासाठी फक्त काहीतरी लिहित राहिलात तरी पुरे आहे लोकांना. ते तुम्हाला लेखक म्हणू लागतात. पण चांगला लेखक असा आरोप नाही करत कुणी. ते सहज नाही. ते लोक ठरवतात. त्यासाठी तुम्ही स्वतः काही करू शकत नाही. फार फार तर चांगल्या लोकांच्या काही गोष्टी समजून घेऊ शकता. लेखनाच्या बाबतीत खूप लोकांना समजून घ्यायचं असतं. त्यातले बरेच लोक मलाच विचारतात. शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्यालाही विचारतात ना परीक्षेत. कारण आपल्या नशिबी शेवटच्या बाकावरचाच असेल विचारायला तर पर्याय नसतो. पण लिखाण ही काही परीक्षा नाही. तो प्रवास आहे. आयुष्यभर चालणारा. आणि अशा प्रवासात काही माणसं खरच खूप मोलाचे विचार मांडत असतात. मराठीत जे लेखक लिखाणाविषयी खूप मनापासून आणि अभ्यासपूर्ण सांगतात त्यातले भालचंद्र नेमाडे फार महत्वाचे. लिखाणाविषयी त्यांनी खूप ठिकाणी खूप छान लिहून ठेवलय. भाषणात आणि लेखात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी. नेमाडे ज्या प्रकारे आपल्या कादंबरीसाठी कष्ट घेतात ते खरच थोर आहेत. जेवढा मोठा समाजाचा पट त्यांच्या कादंबरीत दिसतो तो क्वचितच बघायला भेटतो. मराठीविषयी ते एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतात. ग्रेट जर्मन डिक्शनरी किंवा ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी म्हणतात त्या दर्जाची एकही मराठी डिक्शनरी नाही. खरतर या क्षेत्रात खूप काम होण्याची गरज आहे. मराठी शब्दांच्या बाबतीत आपल्याकडे खूप उदासीनता आहे. आपली अस्सल भाषा, म्हणी, जुने वजनदार शब्द आपण विसरत चाललोय. दुर्द्वाने आपल्याला आपले आजी आजोबा बोलायचे ती भाषा सुद्धा आता गावंढळ वाटू लागलीय. मग ते शब्द कधी लक्षात ठेवणार? कोण जपणार? पण भाषेसाठी हे खूप महत्वाचं आहे. नेमाडे लेखकांसाठी गालिबचा एक शेर सांगतात.गालिबचा एक शेर आहे, जमिनीच्या पोटात गुप्त धन असतं. एक प्रकारचा ताईत वापरला की ते दिसतं. माझ्या कवितांमध्ये असेच शब्द यावेत.निर्मिती प्रक्रिया अशी असली पाहिजे. अगदी थोडक्यात लेखनप्रक्रीयेसाठी खूप महत्वाच्या ओळी आहेत या. खूप काहीतरी दडलेलं असलं की वाचणारे वारंवार वाचत राहतात. शोधत राहतात. आसपास घुटमळत राहतात. हे काही लोकांना साध्य होतं. पण त्यानिमित्ताने रियाझ करायला हरकत नाही. प्रत्येक गायक रफी किंवा किशोर कुमार नसतो. पण सुरात असणं किंवा तालात असणं ही काही छोटी गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्न करण्यात आनंदच आहे. आणि या प्रयत्नात शब्दांच्या गमती सापडत जातात. इतिहास नव्याने कळत जातो. भूगोल पालथा घालता येतो. फक्त काहीतरी शोधायची सुरुवात झाली पाहिजे. लेखक होणं म्हणजे काहीतरी शोधायची सुरुवात होणे. आणि शोधण्यात पण खूप आनंद आहे. आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही खुपदा. अगदी कुरड्या शोधायला जातो डब्यांमध्ये आणि बाजरीच्या खारोड्या सापडतात. तो आनंदही वेगळाच असतो. काही ना काहीतरी हाती लागतच. शोधायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या आत. हे काम खूप कष्टाचं आहे. खुपदा आपण हे का करतो हा प्रश्न पडतो. या अनुभवाविषयी नेमाडेंच्या शब्दात वाचा. आजचे सगळेच लेखक हल्ली माझ्यासारखा विचार करतात की, लिहायचं तर ह्याच्यातून मला काय मिळतं? पण साने गुरुजींच्या लेखनाकडे पाहिलं तर आपल्याला लाज वाटते. “ह्याच्यातून काय मिळतं’ असा विचार न करता सारखं लिहित राहणं, वाचकाला काहीतरी सारखं देत राहणं. आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक आठवण, प्रत्येक संघर्ष, एवढंच नाही, तर अत्यंत लज्जास्पदसुद्धा प्रसंग स्वत:च्या घरातले जे वाभाडे निघालेले श्यामची आईतले आपण वाचले असतील हे सगळं त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये लिहिलं. श्यामची आई हे असं पहिलं पुस्तक आहे की, जिथे लेखक स्वत:च्या जातीबद्दल, स्वत:च्या वडिलांबद्दल, स्वत:च्या घराबद्दल, प्रदेशाबद्दल अतिशय वाईट गोष्टीही सांगतो. परखडपणे वाईट उदगार काढतो. नाहीतर, आपली जात फार मोठी, आमचे आई-वडील फार मोठे, आमचे वाडवडील तर फारच पराक्रमी होते-अशा गोष्टी सांगणारे साहित्यिक आपल्याकडे अनेक होत आले. पण साने गुरुजींनी या सगळ्या गोष्टींना काट देऊन मोठ्या प्रमाणावर आपल्या परिस्थितीची, आपल्या प्रदेशातल्या सगळ्या गोष्टींची नैतिक छाननी सुरू केली. गालिब नेमाडेंचा आवडता कवी. कवी कसला. नेमाडे त्याला बहुतेकवेळा कवीकुलगुरू म्हणतात. गालिबच्या शेरचं उदाहरण देऊन त्यांनी लिहिण्याचा प्रवास खूप वेळा उलगडून सांगितलाय. मिर्जा ग़ालिब यांनीही आपल्या प्रेयसीबद्दल सूफी शैलीत म्हटलं आहे, त्यातला जो संबंध आहे, तोच मान्यतेचा आणि लेखकाचा असतो, असं मला वाटतं.ते म्हणतात ‘नुक्ताची है ग़म-ए-दिल’ या गझलाद्वारे : मैं बुलाता हूँ उसको मगर ऐ जज्ब-ए-दिल म्हणजे मी तर बोलावतो आहे, ती तर माझी भावनाच आहे, तिला उद्देशून मी म्हणतोच आहे, पण खरी गोष्ट पुढे आहे की उस पे बन जाये कुछ ऐसी के बिन आये न बने पण असाच तिच्यावर काही प्रसंग यावा की तिनं स्वत:च येऊन मला भेटावं.हे सगळ्यात चांगलं असतं. मान्यतेच्या बाबतीतही मला असंच वाटतं. आपल्याला ती मिळावी असं आपल्याला सारखं वाटतच असतं. पण तिच्यावरच असा काही कठीण प्रसंग यावा की ती आपल्याला आपोआपच मिळेल. लेखकाचा अभ्यास किंवा चौफेर वाचन याबाबतीत नेमाडे आदर्श आहेत. गालिब, तुकाराम तर अगदी सहज येतात त्यांच्या बोलण्या, लिहिण्यात. आपल्या संस्कृतीचं, देशाचं वैशिष्ट्य त्यांच्या लिखाणात खूप ठळकपणे येतं. आणि ते एरव्ही लोक जी भम्पक आणि खोटी उदाहरण देऊन सांगतात त्या पद्धतीने नाही. कविकुलगुरू मिर्ज़ा ग़ालिब जेव्हा म्हणतो, परतव-ए-खूर से है शबनम को फ़ना की तालिम मैं भी हूं यक इनायत की नज़र होने तक उगवत्या सूर्याच्या किरणांकडून दवबिंदूंना नाहीसं होण्याचा धडा मिळतो. ती कृपादृष्टी माझ्यावर पडेपर्यंत मीही एक आहे. हे मरणाचं असं उदार स्वागत ह्या देशातलाच कवी करू शकतो. तुकाराम जसं मरणाबद्दल ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता’ म्हणतो त्याच जातीचं हे मरणावर प्रेम करणं आहे. मृत्यूला उगवता सूर्य म्हणजे आता मृत्यूनंतरचं नवं जीवन सुरू करणारा म्हणणं, स्वत:ला दवबिंदू आणि मरणाला एक इनायत की नज़र’ म्हणणं ही सूफी दृष्टी सर्व संस्कृतीमध्ये सापडत नाही. टी.एस. एलियटचं कालाचे आयाम लावून मृत्यूची भीती कमी करणं हिंदू प्रभावाखाली असलं तरी ते ग़ालिबच्या जातीचं नक्कीच नाही.नेमाडेंची मांडणी वारंवार वाचायला कंटाळा येत नाही. लेखक म्हणून एकाचवेळी प्रेरणा देणारे आणी आव्हान देणारे आहेत त्यांचे विचार. आव्हान लिहिण्याचं नाही. वाचनाचं. अभ्यासाचं. कष्टाचं. लेखनप्रक्रिया खूप कष्टाची आहे, खूप वेळ घेणारी आहे हे नीट समजवून सांगणारे नेमाडे लेखकाविषयी आणखी मोठ भाष्य करताना पुन्हा गालिबच्याच शेरचा आधार घेतात.दैर नहीं हम नहीं दर नहीं आस्तां नहीं[मंदिर नाही, मशीद नाही, दरवाजा नही, कोणाचा उंबरठा नाही.]बैठे है रहगुज़र पे हम गैर हमें उठाये क्यों?[ आम्ही बसलो आहोत भर रस्त्यावर, भलत्यांनी आम्हाला का उठवावं? ]तशी एक जागा, गालिबला सापडलेली. दुर्दैवाने आपण साहित्यिक कुठल्या तरी भलत्या बंधनात सापडून आयुष्यभर कशाचे तरी ओलीस म्हणून जगत राहतो. त्यामुळे आपल्याला अशी जागा सापडत नाही. काही लेखक कुठल्यातरी राजकीय पक्षाचे ओलीस झालेले असतात. कुठल्यातरी विचारसरणीचे गुलाम झालेले असता. त्या पक्षाचं काम करत राहतात. त्यांना सत्य सापडणं शक्यच नसतं.नेमाडे आणि गालिब वाचता वाचता लिहिण्याबद्दल खूप काही कळत जातं. आपण स्वतः विसरत असू तर ते पुस्तक उत्तम. एरव्हीही चांगले लेखक वाचताना आपण स्वतःला मध्ये आणू नये. आपला पक्ष, आपली वैचारिक बांधिलकी लांब ठेवावी. चांगलं लिखाण वाचताना मंदिरात चपला काढून जातो तशी स्वतःची वैचारिक भूमिका बाहेर ठेवायची असते. ताजमहाल किंवा अजिंठा बघताना आपलं घर आठवत नाही. आठवत असेल तर आपल्याला बघायचीच practice नाही. ती आधी केली पाहिजे. वाचता वाचता आपल्यालाही सापडेल एक दिवस आपली गोष्ट. आपली शैली. आपण वाचत राहूया.अरविंद जगताप

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *