वडाच्या नावाने…

June 5, 2020

लेखन

arvind jagapat patra

वडाच्या फांद्या तोडणाऱ्या बायका बघून नेहमी प्रश्न पडतो, वडाची काय चूक असेल?

वडाच्या फांद्या तोडणाऱ्या बायका बघून नेहमी प्रश्न पडतो, वडाची काय चूक असेल? खरतर वटसावित्री पौर्णिमेसारखे सण आजच्या काळात आपण निसर्गाची काळजी घेणारे म्हणून ओळखले पाहिजेत. सावित्रीची गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ती हीच की सावित्रीला वडाच्या झाडावर विश्वास होता. तिला नक्की वडाच्या झाडाचे गुण माहित असणार.

                    निदान तिच्यामुळे गावात एकतरी वडाचं झाड असलं पाहिजे असं बायकांना वाटायचं. वडाच्या औषधी गुणामुळे, सावलीमुळे ते झाड पूर्वीपासून महत्वाचं होतं. रस्त्याच्या कडेला असंख्य वडाची झाडं होती आपल्याकडे. पण हायवे बनवताना त्यांची क्रूर कत्तल झाली. आपले पूर्वीचे रस्ते पायी चालणार्या माणसांना डोक्यात ठेवून बनवले होते. पण नवे हायवे बनवताना पायी चालणारा माणूस गृहीत सुद्धा धरलेला नाही. त्याने रस्त्याच्या लांब लांब पर्यंत फिरकायचं नाही.

                    पण बाईक चालवणारे आहेतच की. त्यांनी सुद्धा हॉटेल दिसली की थांबायचं. पण मग हॉटेलच्या नावाखाली ढाबे किंवा एकदम फूड मॉल. सामान्य माणसाने पत्रे असलेल्या हॉटेलमध्ये उकडून निघायचं. सावलीची सोय नाही. रस्त्यात शोकेसची झाडं लावलेली हॉटेल्स दिसतात. त्यांना गेल्या गेल्या विचारावं वाटतं, चहा पाणी जाऊ द्या. तुमच्याकडे थोडी सावली मिळेल का? दुर्दैवाने सावली पैसे देऊन सुद्धा मिळत नाहीं. आपल्याला रस्ते बनवताना तोडलेल्या झाडांचा खूप पश्चाताप होणार आहे अजून.

                    वडाची आपल्याकडे किती महती होती हे कितीतरी शब्द वडावरून बनलेत या गोष्टीतून लक्षात येईल. मुंबईतल्या एका भागाला वडाळा नाव का पडले याविषयी असं सांगतात की तिथं पूर्वी खूप वडाची झाडं होती. आणी दुरून येणारे वाटसरू विश्रांती घ्यायचं हक्काचं ठिकाण म्हणून या झाडांना ओळखायचे. वडाचं झाड आलं की वडा आला अशी आपल्या लोकांना हाक मारायचे. त्यातून पुढे वडाळा नाव पडले असंही मानतात. वडगाव, वडपिंपरी अशी वडावरुन कितीतरी गावांची नावं आहेत.

                    इंग्रजीत वडाला बनियान ट्री म्हणतात. हा शब्द इंग्रजांनी कुठून आणला? तर इंग्रज सगळ्यात आधी आले कलकत्त्याला. कलकत्त्यात म्हणे त्यांना आल्या आल्या वडाच्या झाडाखाली व्यापार करणारे बनिये दिसले. या लोकांशी त्यांची ओळख पाळख वाढली. कारण इंग्रज आपल्याकडे आले ते व्यापाराच्या निमित्ताने. नंतर त्यांनी राज्य केल वगैरे भाग वेगळा. तर बनिये ज्या झाडाखाली बसतात त्या झाडाला इंग्रज बनियान ट्री म्हणायला लागले. आणि एक नवा इंग्रजी शब्द तयार झाला.

                    वडाच झाड एखाद्या मैदानाएवढ वाढतं. ते एक स्वतंत्र जंगलच म्हणूया. वडाचा असा एक पण भाग नाही ज्याच्यापासून औषध बनत नाही. आयुर्वेदाच्या दुर्ष्टीने सगळ्यात महत्वाचं झाड आहे ते. आणि आपल्या पारंब्या पुन्हा जमिनीत घुसवून आपला आपण भक्कम आधार तयार करण्याची वडाची कला तर अफाट आहे. स्वतःच स्वतःचा मांडव बनवतो वड. आणि असा पारंबीच्या पायाने चालत चालत आपला विस्तार वाढवतो. एखादा छोटा बाजार भरू शकतो वडाखाली. बैठका होतात. दवाखाने असायचे आधी झाडाखाली. कित्येक साथीच्या काळात वडाला सलाईन लावून पेशंट झोपवलेले असायचे खाली. पक्षांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळ्यांना भक्कम आधार असणारा वड.

                    सावित्रीला हक्काचा वाटता तर नवल. पण आजकाल बायकांना या वडाच्या फांद्या तोडून वटसावित्री पौर्णिमा का साजरी करावी वाटत असेल? एकतर वर्षातून एखादवेळीच होते भेट झाडाची. ती यानिमित्ताने व्हावी. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट फांदी तोडायची गरज काय? बायकांनी एकदा नवरा आणि वड अशा दोन किराणा मालाच्या याद्या करतात तशा कराव्यात. एका यादीत वडाचे फायदे लिहावेत. एका यादीत नवऱ्याचे फायदे लिहावेत. वडाचे फायदे शेकडो पटीने जास्त आहेत. मग नवऱ्यासाठी वडाची फांदी तोडायची काय गरज आहे? अडी अडचण म्हणून, वेळ नाही म्हणून बायकांना असं वाटत असेल.

                    पण मग निदान बायकांनी एक संकल्प तरी करावा. भलत्या कुणीतरी लावलेल्या वडाला दोऱ्या बांधून आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य कसं भेटेल? तो जन्मोजन्मी सोबत हवा असं वाटत असेल तर नवऱ्यालाच एखादं वडाचं झाड लावायला सांगायला पाहिजे. बायकांनी जर नवऱ्याने लावलेल्याच झाडाला फेऱ्या मारेन, नाहीतर नाहीच मारणार असा नियम केला तर देशात पुन्हा सरकारला झाडे लावा म्हणायची गरज पडणार नाही एवढी झाडं होतील. करोडो रुपये वाचतील त्या वृक्षारोपण मोहिमेच्या नावे खर्च होणारे.

                    आपल्या नवऱ्याने लावलेल्या वडाला फेऱ्या मारताना खरच मनातून नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागतील बायका. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणायला एक चांगलं कारण मिळेल. बायका एवढ्या फेऱ्या मारतात आपल्यासाठी. आपण एखादी फेरी मारून एखाद्या चांगल्या ठिकाणी वडाचं झाड लावायला पाहिजे. पौर्णिमेला चंद्र जास्त छान दिसेल जर आपण लावलेल्या वडाच्या आड पाहता आला तर. आपण हे करून बघूया. बोला वडाच्या नावाने चांगभलं.

Photo © Appa Chanda Chougule

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *