वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?
वृक्षसंमेलन नेमकं कशासाठी?वृक्षसंमेलन जाहीर झाल्यापासून खूप लोकांना प्रश्न पडलाय. वृक्षसंमेलनात नेमकं काय असणार आहे? नेमकं काय घडणार आहे? नेमकं कोण येणार आहे? प्रश्न पडणे साहजिक आहे. कारण अशा प्रकारचं वृक्षसंमेलन पहिल्यांदाच होतय. हे संमेलन साहित्य संमेलनासारखं होईल का? परीसंवाद असतील का? असे प्रश्नही विचारले लोकांनी. प्रश्न अध्यक्षाचा होता. तर आपण खूप आधीच एकमताने वडाच्या झाडाची अध्यक्षपदी निवड केलीय. खरतर आपण निवड करणारे कोण? वड तेवढा महत्वाचा आहे. वडाचं दिर्घ आयुष्य, त्याचे औषधी उपयोग, त्याची भव्यता आपण सगळे जाणतो. वडाची खूप झाडं बीडला जिथे संमेलन होणार आहे त्या देवराईत आधीच स्थानापन्न झाली आहेत. आणि एक वर्षासाठी नाही. शंभर दोनशे वर्षांसाठी.वड अध्यक्ष आहे हे लक्षात आलं. पण का? तर हायवे बनवताना आपण सगळ्यात जास्त कत्तल वडाच्या मोठमोठ्या झाडांची केली. रस्त्याच्या कडेला असलेली वडाची झाडं पावसापाण्यात गाडी थांबवून उभं रहायला, पायी जाणार्या लोकांना सावलीसाठी किती उपयोगाची होती. पक्षी आणि गुरांसाठीसुद्धा आधार होते वड. पण आता रस्ते मोठे झालेत पण बोडखे झालेत.
औरंगाबादहून बीडला दोन तासाच्या आत जातो माणूस गाडीने. पण पूर्वी आजूबाजूला बघायला खूप झाडं होती. आता बघण्यासारखं काही नाही. वेगात जायचं फक्त. आपण वडाची झाडं तोडली गेली तेंव्हा काहीच करू शकलो नाही. पण आता करू शकतो. झाड लावू शकतो. वडाची माफी मागण्यासाठी, वडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वड अध्यक्ष असणं गरजेचं आहे.आता संमेलनात काय असणार आहे? खुपदा आपण पिकनिकच्या दृष्टीने विचार करतो बाहेर जाताना. आणि बीडच्या देवराईत राज्यभरातून लोकांनी पिकनिकला यावं ही इच्छा आहेच. पण सध्या लोकांना हे दाखवायचय की हे सेलिब्रेशन नाही. हा जागरूकतेचा प्रयत्न आहे. बीडसारख्या ठिकाणी डोंगरात झाडं जगवताना किती संघर्ष करावा लागतो हे लोकांनी स्वतः बघावं. पाण्याची किती अडचण आहे तरीही तिथे देवराई उभी करायचं आव्हान पेललेलं आहे. लोकांना वन विभाग काय काम करू शकतो हे बीडला दिसेल. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय तळमळीने काम करताहेत म्हणून तिथे देवराई उभी राहतेय हे मान्य करायला पाहिजे. खरतर सयाजी शिंदे स्वतः येतात, लक्ष घालतात म्हणून खूप मित्रांना आपणही यायला हवं असं वाटायला लागलं. वेगवेगळ्या जिल्ह्यातून माणसं येतात. येत राहतील. पण संमेलनाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना एक विनंती. बीडमध्ये उन असणार आहे. आज सावली देणारी झाडं नाहीत. त्यांच्यासाठी आपण सगळे झटतोय. येत्या चार पाच वर्षात हजारो झाडं असतील सावली द्यायला. सावलीसाठीच आपण उन्हात जमतोय. झाडं छोटी आहेत. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून जपतोय. या झाडांना नियमित पाणी देता यावं, लोकांचा झाडं जगवण्यासाठी सहभाग वाढावा या हेतूने आपण जमतोय. संमेलन हळू हळू सगळ्या जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे बीड पासून खूप दूरच्या लोकांनी फार त्रास करून यायला हवं असं नाही. तुमच्या शुभेच्छा आणी सहकार्य महत्वाचं आहे. बीडमधल्या मुलांनी आणि तरुणांनी मात्र हे संमेलन मुळीच चुकवू नये. कारण या संमेलनाला महाराष्ट्रातून महत्वाचे पर्यावरण प्रेमी आणी अभ्यासक येणार आहेत. कुणी गवत या विषयाचा अभ्यासक आहे. कुणी आयुष्यभर फुलपाखरांचा अभ्यास केलेला आहे. कुणी कमी पाण्यात येणारी झाडं घेऊन येणार आहे. कुणी मातीबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देणार आहे. कुणी बियांच्या वेगवेगळ्या जाती सांगणार आहे. या सगळ्या माणसांना लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. त्यांनी सांगितलेली माहिती लिहून घेतली पाहिजे.
संमेलनाचा उद्देश राज्यभरातून झाडावर प्रेम करणाऱ्या, पर्यावरणाचा अभ्यास असणार्या माणसांना ऐकता यावं, भेटता यावं. नव्या गोष्टी शिकता याव्यात हा आहे. झाडांच्या पण खूप जाती आहेत. आणि झाडावर प्रेम करणे हा आपला धर्म आहे. म्हणून १३ आणि १४ फेब्रुवारीला संमेलन आहे. १४ फेब्रुवारी म्हणजे valentine day. या दिवशी आपण झाडावर प्रेम करणाऱ्या लोकांनी जोडीने यायला हवं. लोक महाबळेश्वरला जातात सुट्टी घेऊन. तुम्हाला आमच्या बीडला यायचंय. यावेळी उन असेल, डोंगर असेल फक्त…पण एक खात्री आहे येत्या दोन चार वर्षात बीडमधलं पालवण तुम्हाला महाबळेश्वर वाटेल. हे सगळं तुमच्यासोबत करायचंय. तुमच्या मदतीने. हिल स्टेशनला सगळे जमतात. आपण बीडच्या डोंगरावर जमू आणि त्याचं आपल्या कष्टांनी हिल स्टेशन करू. प्रयत्न करायला काय हरकत आहे? झाडाचं वेड असणारे, झाडांची आवड असणारे, झाडाचं महत्व ओळखणारे लोक ही गोष्ट चांगली समजू शकतात की शंभर टक्के झाडं जगवण किती अवघड आहे. त्यात यश अपयश आहे. पण निराशा नाही. कारण झाड जिवंत असतानाही आणि सुकून गेल्यावरही, कापलं गेल्यावरही पर्यावरणाच्या कामी येण्याचा आपला वसा सोडत नाही. झाड नेहमी आशावादी असण्याची प्रेरणा देतं. झाड लावणारी माणसं प्रचंड आशावादी असतात. कारण ती आजचा, उद्याचा नाही तर पुढच्या पिढ्यांचा विचार करत असतात. अशा आशावादी माणसाना भेटायला वृक्षसंमेलन आहे. जातीवर चर्चा होणार आहे पण गवताच्या, झाडांच्या. वनस्पतीची, बियाण्यांची प्रत्येक जात जगाला काही ना काही देणारी असते. अशा चांगल्या माणसांच्या आणि गवत, बिया, वेली, फुलांच्या अभ्यासात रमायचं आहे. १३ आणि १४ फेब्रुवारीला. बीडहून पाच सहा किलोमीटर असलेल्या पालवणमध्ये.
0 Comments