राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे
राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे. राधेने कायम कृष्णाच्या सोबत असावं म्हणून प्रार्थना केली. कृष्णालाच विनवणी केली. कृष्णाने तिला वर दिला तू कायम माझ्या सोबत राहशील. राधा तुळस झाली आणि त्या तुळशीची माळ कृष्णाच्या गळ्यात दिसू लागली. पण तुळशीचं नातं विठ्ठलाशी जास्त आहे. तुळशीमाळ गळा म्हणालं की आधी विठ्ठल आठवतो.
कुठल्याही झाडाची गोष्ट देवाशी जोडलेली आहे. वडाची गोष्ट सावित्रीशी. शंकराची बेलाशी. सुपारीच्या झाडाचीसुद्धा अशीच एक गोष्ट आहे. महाभारत लिहून संपत आलं होतं. महाभारत सांगणारे व्यासमुनी आणी लिहून घेणारा गणपती. गणपती जरा निराश झाला होता.
एवढ महाकाव्य झालं पण याचा जर पृथ्वीवर काही पुरावाच नसला तर लोक काय म्हणतील? एवढ मोठं युद्ध झालं आणि त्यातली कुठलीच जागा दिसत नाही असं कसं? व्यासाना गणपतीची ही गोष्ट पटली. कलीयुगाला सुरुवात झाल्यावर अर्जुन महाप्र्स्थानाला निघाला होता. तेंव्हा ज्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य दिलं होतं तो समोर आला.
अर्जुनाला म्हणाला आता तुला धनुष्याचा काय उपयोग? धनुष्य मला परत दे. धनुष्य परत द्यायच्या आधी अर्जुनाने ते एकदा चालवायचं ठरवलं. अर्जुनाने पाताळात बाण मारला. तो बाण थेट हिमालयात शंकराच्या पावलापाशी गेला. शंकराच्या पावलाला स्पर्श करून पुन्हा परत आला. दरम्याने एवढा काळ गेला होता की त्या ताठ बाणाला टोकाला पालवी फुटली होती. बाण जेंव्हा परत आला तेंव्हा त्याचं पृथ्वीवर झाड झालं. सुपारीचं झाड. जे पूजेत महत्वाचं मानलं गेलं. पण सुपारीचं झाड पाहिलं की खरोखरच गोष्टीतल्या बाणासारखं वाटतं.
प्रत्येक झाडाची अशी गोष्ट आपल्याला माहित असावी असं वाटतं. माणसांच्या आठवणी असतात तशा झाडांच्या असतात. झाड आपल्याच घराचा, शेताचा, बालपणाचा, तरुणपणीचा भाग असतं. पंचायतीच्या ओट्यावर बसलेले लोक उगीच अस्वस्थ वाटतात. झाडाखाली बसलेले लोक निवांत वाटतात. खुपदा शेतातल्या झाडाखाली फेटा घालून बसलेला माणूस पांडुरंग वाटू लागतो. आपल्या खूप आठवणीत पांडुरंग सोबत असतो.
गावाकडचे दर आषाढीला आपल्या पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुरला जाणारे लोक. कुणी वारीत सामील होतात. कुणी वारकऱ्यांची सेवा करतात. पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी जो तो आपल्या आपल्या मनाने काही ना काही करत असतो. आणि हे सगळं करण्याचा उत्साह येतो कुठून? कारण आपला पांडुरंग काही मागत नाही. त्याला भक्ताकडून काहीच नको असतं. चंद्रभागेत आंघोळ करा. भेटा. आणि पुन्हा आपल्या गावी जा. पण ती एक भेट वर्षभर कष्ट करायची उर्जा देते. जरी पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा दिसत असला तरी दिवस रात्र कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना बळ पुरवतो. हे सगळं झाडासारखं आहे.
झाड पांडूरंगासारखच उभं असतं. पण रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुरासाठी, शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी, छोट्या दुकानासाठी, पिकनिकसाठी, पूजेसाठी, झोपण्यासाठी, सावलीसाठी तेच तर कामी येतं. यावर्षी पहिल्यांदा आपल्या पांडूरंगाला भेटायला जमणार नाही कोरोनामुळे. म्हणून ठरवलय की झाडांना भेटायचं. पांडुरंगानंतर सगळ्या जास्त जग पाहिलेलं कोण आहे? झाडं? शंभर दोनशे तीनशे वर्षांची झाडं आहेत आपल्या प्रत्येक जिल्ह्यात. त्यांना शोधायचंय या निमित्ताने. आणि शांतपणे आषाढी एकादशीला झाडावर प्रेम करणाऱ्या पाच दहा लोकांनी जाऊन भजन करायचं.
आपल्या तुकोबांचे अभंग आहेत झाडावर. सगळ्याच संतांनी लिहून ठेवलय. ही आषाढी अशी आपल्या गावोगाव असलेल्या झाडरुपी पांडूरंगाच्या सहवासात साजरी करायची. आपल्या परिसरातल्या सगळ्यात जुन्या झाडांचा इतिहास या निमित्ताने गोळा होणार आहे. हळू हळू आपल्याला आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या राज्यातलं सगळ्यात जुनं झाड शोधता येईल. हे सगळं कशासाठी? कारण जुनं ते सोनं असतं. हे सुद्धा जुने लोक सांगून गेलेत. आणि भोवताली मोठी म्हणावी अशी माणसंसुद्धा दुर्मिळ होत चाललीत. निदान मोठी झाडं तरी जपूया.
जय हरी विठ्ठल!
0 Comments