सीताराम एकदम कष्टाळू शेतकरी.
सीताराम एकदम कष्टाळू शेतकरी. मन लावून शेतात काम करणारा. पाणी जरा बरं असत तर लाखो रुपये कमवले असते वर्षाला. पण पाणी कमी असून चांगलं पिक घेतो. नात्यातले लोक जरा नाराज असतात. कारण सीताराम सहसा शेतातलं काम सोडून कुठे कुणाकडे जात नाही. कुणाच्या लग्नाला सुद्धा जायला नको म्हणतो. जत्रा बित्रा तर लांबच. बघावं तेंव्हा सीताराम शेतात. त्याचा पोरगा प्रकाश अकरावीत आहे. एक दिवस शेतात हरणांचा कळप आला. पोराने दगड मारायला सुरुवात केली. हकलून द्यायला. सीतारामने लांबून बघितलं. शिव्या घालत धावत आला. पोराला जोरदार फटका दिला. पोराला जन्माची अद्दल घडवली पाहिजे असं वाटलं त्याला. खूप रागावला होता. हरणाचा कळप नेहमीच यायचा शेतात. खुराने सगळ्या पिकाची वाट लावायचे. पण सीतारामच्या आजोबाने कधी तक्रार केली नाही. बापाने तक्रार केली नाही. सीताराम पण तसाच. कितीही नुकसान झालं तरी वाईट वाटून घेतलं नाही. काट्या लावल्या बांधावर. बाकी उपाय केले. पण हरणाला कधी मारलं नाही. पोराला पण डोक्यावर हात ठेवून शप्पथ घ्यायला लावली. एवढा हळवा सीताराम.
कष्ट करणाऱ्या माणसाला यश मिळतच. मोसंबीची बाग लावली. कष्ट केले. हळू हळू उत्पन्न सुरु झालं. सरकारी योजनेच्या नादाला लागून शेततळ घ्यायचा नाद काही वर्षाआधीच सोडून दिला होता त्याने.आता स्वतः पैसे साठवून शेततळ बनवलं. पाच सहा लाख रुपये घातले. सुदैवाने भरपूर पाउस झाला होता. मोसंबीची बाग उभी राहिली होती. लोक घर सुद्धा एवढ टापटीप ठेवत नसतील तेवढी सीतारामची बाग मस्त होती. खोडाला औषध होतं. पाहिजे त्या झाडाला काठी होती. पोरांवर लक्ष ठेवावं तसं सीताराम झाडावर लक्ष ठेवून असायचा. शेततळ झाल्यापासून तर सीताराम एकदमच खुश होता. रोज साठलेलं पाणी बघून यायचा एकदातरी.पाणी बघून शेतकरी वेडाच होतो. सीतारामला कधी वाटायचं या तळ्यात आपण मासे पाळू. कधी वाटायचं शेळ्या पाळू. रोज नवीन स्वप्न बघायचा सीताराम. कारण तसंच होतं. लोक यायचे. पाणी बघून खुश व्हायचे. एका व्यापाऱ्याने चार महिने आधीच आगाऊ पैसे देऊन बाग विकत घ्यायची तयारी दाखवली. पण आता सीतारामच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आणि चूक काहीच नव्हती. थोडं थांबल्यावर पैसे जास्त मिळणार होते. शेवटी चार पैसे जास्त मिळालेले कुणाला नको असतात?
सीतारामची पोरगी मोठी होती. भारती आता लग्नाला आली होती. बागेचे नाही म्हणालं तरी चार पाच लाख यायला हरकत नव्हती. आधी बहिणीच्या हातपाया पडून झालं होतं. पण बहिण काही सीतारामच्या पोरीला सून करून घ्यायला तयार होत नव्हती. बहिणीच्या नवऱ्याला दोन एक लाखाची तरी अपेक्षा होती. पुन्हा पोरगा एकुलता एक होता. लग्न थाटात पाहिजे होतं. एवढी काही सीतारामची ऐपत नव्हती. म्हणून विषय काही पुढ जात नव्हता. आता शेततळ झाल्यापासून सीतारामच्या स्वप्नात फरक पडला. बहिणीच्या मागं गाऱ्हाणं लावायचं नाही हे ठरवून टाकलं त्याने. शेजारच्या गावात नात्यातला एक पोरगा पोलीस होता. त्याला सीतारामची मुलगी आवडली होती. थेट दहा लाखावरून तीन लाखावर आला होता हुंडा. तीन लाखात सरकारी नौकरीवाला जावई. सीतारामने विचार केला पैसा जाईल पण पोरीचं भलं होईल. सुपारी फोडली. अर्धे पैसे देऊन टाकले. तळ्याच्या शेजारी मांडव बांधून जेवू घातलं लोकांना. लोक तळ्याच आणि नवरा नवरीच तोंड भरून कौतुक करून गेले. सीताराम रात्रभर स्वप्न बघत होता. बायको काय बोलतेय त्याला कळत पण नव्हतं. दुसऱ्या खोलीत भारतीच्या डोळ्यात संसाराचं चित्र सुरु झालं होतं. भारतीने बापाला शिलाई मशीन घेऊन द्यायला सांगितली होती. शेवटी सीतारामची पोरगी. नवऱ्याच्या घरात बसून राहणार नव्हती. शहरात शेतातलं काम नव्हत. मग घरात बसून शिवण काम करायचं ठरवलं होतं तिने.
सीतारामच्या बायकोला सारख वाटायचं घरात पूजा ठेऊ एखादी. सीताराम म्हणायचा कशासाठी? तर म्हणायची सारख मनात येतं. पण सीताराम तिचं हसण्यावारी न्यायचा. एका तळयाने सगळे एकदम स्वप्नाळू झाले होते. सीतारामच्या पोराला शहरात ट्युशन लावायची होती. सायन्सला होता पोरगा. काल परवा पर्यंत बारावी झाली की कॉम्प्यूटरचा क्लास करून एखादी नौकरी करायचा विचार करणारा पोरगा आता अचानक डॉक्टर व्हायचं स्वप्न बघत होता. पाणी किती बदल घडवत माणसात. विचारात. आशावादी करून टाकतं. सीतारामने पोराची एवढी इच्छा आहे म्हणून शहरातल्या कोचिंग क्लासची फीस भरून टाकली. पंचवीस हजार दिले. पंचवीस पुढच्या वर्षी द्यायचे ठरले. पोरगा मन लावून अभ्यास करताना दिसायला लागला. त्याला बघून सीतारामच्या अंगात दहा हत्तीचं बळ यायचं. अजून राबायचा शेतात. लोक लांबून बाग बघायला यायचे. कौतुक करायचे. सीतारामच्या कष्टाची सगळ्या गावाला जाणीव होती. त्याच्याविषयी चुकुनही कुणी वाईट बोलायचं नाही. कुणाच्या अध्यात मध्यात नसायचा बिचारा. आलेल्या माणसाला हाताने मोसंबी सोलून द्यायचा. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर मोसंबीचा गोडवा बघून तृप्त व्हायचा. आवर्जून शेततळ दाखवायचा. एकदा पाण्याकडे एकदा समोरच्या माणसाकडे बघायचा. आनंद त्याच्या डोळ्यात मावायचा नाही.
एक दिवस सीतारामच्या शेजारच्या शेतातला एकनाथ धावत आला. सीतारामच्या घरी. सीताराम घरात जेवण करत होता. एकनाथ सीतारामला बोलू शकला नाही. फक्त शेताकडे घेऊन गेला. सीताराम सारखा विचारायचा काय झालं? पण एकनाथ काही सांगत नव्हता. असं रस्ताभर चालू होतं. शेत आलं. एकनाथ सीतारामला त्याच्या शेततळ्याकडे घेऊन गेला. शेततळ्यातल पाणी अर्ध सुद्धा उरलं नव्हतं. सीताराम ते दृश्य बघून जागच्या जागीच बसला. तळ्यात एक हरीण मरून पडलेलं दिसत होतं. निपचित. सीताराम पण तसाच बसला काठावर. एकनाथच्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. सीतारामला कसं समजून सांगावं त्याला कळत नव्हतं. आणि सांगणार काय?
आदल्या दिवशी शेततळ्यात हरीण आलं होतं पाणी प्यायला. प्लास्टिकच्या पन्नी वरून घसरून थेट पाण्यात पडलं. हरणाची पाण्यातून बाहेर पडायची धडपड सुरु झाली. पण पाण्यात हातपाय मारता आले तरी प्लास्टिकच्या पन्नीवर काही त्याला सरकता येत नव्हतं. प्लास्टिक जागोजाग फाटत होतं त्याच्या खुरांनी. चहुबाजूनी हरणाची वर जायला धडपड सुरु होती,. जागोजाग प्लास्टिक फाटत होतं. बाहेर पडण्यात मात्र हरणाला यश येत नव्हतं. शेवटी प्लास्टिकच्या चिंध्या करून हरीण थकलं. बुडून गेलं. तरंगायला लागलं. प्लास्टिक फाटल्याने पाणी सगळं मातीत झिरपायला लागलं. जागोजाग मुरायला लागलं. सीताराम शून्यात बघितल्यासारखा हरणाकडे बघत होता. त्याचा पोरगा पण आला होता. ह्या हरणामुळे बापाने मारलं होतं आपल्याला याची त्याला राहून राहून आठवण होत होती. किती लाखांचं नुकसान केलं होतं हरणाने. आता मोसंबीला पाणी कसं देणार? सगळी बाग जळून जाणार ह्या हरणामुळे. आपण बरोबर होतो. आपला बाप मूर्ख आहे असं पहिल्यांदा वाटलं त्याला. सीतारामच्या बायकोला पूजा करायची होती. तिला मनात सारखी धाकधूक होती. एवढ सगळं चांगलं होतंय हे काही खरं नाही. शेतकऱ्याच्या नशिबात एवढा आनंद नसतो याची तिला खात्री होती. काही ना काहीतरी वाईट घडणार, द्रिष्ट लागणार याची भीती होती. तसंच झालं. पूजा केली असती तर हे टळणार होतं असं नाही. पण तिला बिचारीला वाटलं होतं. सीतारामची मुलगी शेतात आली. मेलेल्या हरणा सारखं आपलं सुखी संसाराचं स्वप्न तरंगताना दिसू लागलं तिला. आपला बाप उरलेला हुंडा देऊच शकणार नाही ही खात्री होती आता तिला.
एकनाथला मात्र वेगळीच घाई होती. तो सारखा सीतारामला सांगत होता लवकर आवरा. हरणाला नेऊन कुठं तरी पुरून टाकू. फॉरेस्ट वाले आले तर अजून भलतंच लफडं व्हायचं. खरं होतं त्याचं. सरकारने हरीण कसं मेल म्हणून चौकशी करायला नेमलेत लोक. शेतकरी काय रोजच मरतो. एकनाथ हरणाची विल्हेवाट लावू म्हणत होता. पण सीताराम आटत चाललेल्या तळ्याकडे आणि हरणाकडे एकटक बघत होता. मेलेल्या हरणाचे डोळे आणि सीतारामचे डोळे सारखेच दिसत होते. त्यात आता काहीच आशा उरली नव्हती. स्वप्न उरलं नव्हतं.
–अरविंद जगताप
0 Comments