प्रेमात पडणारे खूप असतात..पण सावरणारे स्पेशल असतात.
संत्याची आई गरोदर राहिली त्या टायमाला लई दिवस तिला आपल्याला पित्त झालय आसच वाटायचं. पण नऊ महिन्यांनी पोट्ट झालं तवा जवळच्या लोकाच्या लक्षात आलं ते पित्त नव्हतं. आई गरोदर असली तरी पोट कवा उठून दिसलच नाही. संत्या जन्मायच्या आधीपासून आसा दुर्लक्षितच होता. खायला कहार आन भुईला भार ही संत्याची अक्ख्या गावात ओळख होती. पण संत्या मीनलच्या प्रेमात पडला आन संत्याचा पाय जमिनीवर ठरना झाला. अजिंक्य राहणेसारखा शांत असलेला संत्या अर्नब गोस्वामीपेक्षा जास्त मोठ्यानी बोलाय लागला. मीनलच्या बापाचा ढाबा होता. संत्यासहित गावातले सगळे पोरं तिथच चिकन कंटकी खायला शिकले होते. घरात वाळलेल्या भाकरीला तोंड न लावणारे पोरं ढाब्यावर तंदुरी रोटी कडक करून मागायचे. तंदुरी रोटी बिस्कीट कर म्हणायचे. पण मीनलनी एकदा बसstand वर स्माईल दिलं आन संत्यानी ढाब्यावर जायचं सोडून दिलं. नाहीतं आधी ढाब्याची लाईट आन संत्या दोघं एकाच टायमाला जायचे. एवढा टाईम बसायचा संत्या. पण आता मीनल येता जाता त्याच्याकड बघून लाजायला लागली होती. संत्याच्या आयुष्यात संत्यामूळ ह्याच्या आधी फक्त त्याचे आई बाप लाजायचे. तेबी दर वर्षी संत्याचं प्रगतीपुस्तक बघून. पण पयल्यांदा संत्याचं प्रगतीपुस्तक न बघता कुणीतरी लाजल होतं. ते म्हणजे मीनल. तिला पाहिल्यापासून म्हशीच्या शेपटीसारखं संत्या सारखा इकडून तिकडं हिंडाय लागला. कधी मीनलच्या दारापुढ असलेल्या किराणा दुकानात. कधी तिच्या शेतापाशी असलेल्या निल्याच्या मळ्यात. शेवटच्या एसटीची लोकं डोळ्यात प्राण आणून वाट पाहतेत तशी मीनल आता संत्याची वाट पाहायला लागली. एक दिवस संत्या थेट तिच्या घरी गेला. मीनल आन तिच्या भावाचे मोबाईल नंबर मागितले. मीनलच्या आईला प्रश्न पडला. संत्यानी सांगितलं शेतकऱ्याच्या खात्यात सरकार पैशे टाकतं तशे आता शिकलेल्या पोरा पोरीच्या खात्यात पण टाकणारय. आईनी मीनलला नंबर द्यायला सांगितले. मीनलनी अनुष्का शर्मा ग्राउंडमधी batting करणाऱ्या विराट कोहलीकड बघती तसं संत्याकड बघितलं. दोघांचं chat सुरु झालं आन त्यादिवशी पासून दोघांच्या झोपेचं खोबरं झालं. रातच्याला दीड दोन वाजले तरी भायेर गावातले कुत्रे आन मीनल संत्या आपापल्या घरात जागे असायचे.
आधी कोंबडा आरवला की मीनल झोपीतून उठायची. आता आई वरडल्याशिवाय उठना झाली. पण कितीबी लपविलं तरी प्रेम लपत नाही. चांगल्या चांगल्या मंत्र्याला लपविता आलं नाही. मीनल संत्याला काय जमणार? एक दिवस भांडं फुटलंच. chatting करता करता रातच्याला मीनल कवा झोपी गेली तिचं तिलाच कळल नाही. सकाळी तिच्या भावानी फोन घेतला. त्याचं balance संपल होतं. फोन घेतल्याव सगळी भानगड त्याच्या लक्षात आली. दोघाच्या घरची खानदानी दुष्मनी होती. संत्याची आई आन मीनलची आई ग्रामपंचायतीत एकमेकीच्या विरोधात लढल्या. निवडून तिसरीच बाई आली. पण दुष्मनी चालू राहिली. जिला वाटीभर साखर दिली नसती तिला पोटची पोरगी द्यायचा विषयच नव्हता. मीनलचा भाऊ थेट संत्याच्या घरी गेला. एका बुक्कीत त्याचा दात पाडला. मीनलचा भाऊ संत्याला कुत्र्यासारखा मारीत होता आन लोकं मजा बघत होते. कुणी आडवायला आलं नाही. फक्त एवढच इचारायचे. काय झालं? दहा बारा लोकानी इचारल्यावर मीनलच्या भावानी कारण सांगितलं. संत्या मीनलची भानगड गावभर झाली. दोघाची chatting बंद झाली. पाण्यातून भायेर काढलेल्या सुरमई आन पापलेटसारखी दोन जीवाची तडफड झाली. पण सांगतेन कुणाला? मीनलच्या आईनी तिला दहा येळा डोक्याव हात ठीवायला लावला. शप्पथ घ्यायला लावली की संत्याला भेटणार नाही. खरत मीनल संत्याला एकट्यात भेटलीच नव्हती आजून. आन आता त्यो चान्स येनारबी नव्हता. हळूहळू मामला शांत झाला. संत्या तालुक्यात एका पतसंस्थेत कामाला लागला. दिवसभर लोकाचे पैशे मोजीत बसायचा. मीनलच्या मावशीचा तालुक्यात बचतगट होता. मीनल तिथं छोटे मोठे कामं करायची. दोघं प्रेमी जीव कशेबशे कामाला लागले. एकमेकाला इसरायचा प्रयत्न कराय लागले. पण ते सुद्धा नशिबात नव्हतं.
आजपर्यंत गावात फक्त चायनीज आलं होतं. चायनाचा मोबाईल आला होता. पण आता आसपासच्या गावात कोरोना आला. भीतीनी लॉकडाऊन सुरु झालं. पेशंट नसल्यानी गावात कुणी मनाव घेतलं नाही. पण मनातून सगळे घाबरले होते. कितीतरी लोकं महिना झाला तरी शेतात गेले नव्हते. मजुराचे हाल होत होते. कुणी सरपंचाला भेट, कुणी आमदाराला भेट आस चालू होतं. त्यात आमदारानी मदत करायची सोडून गावात शिबीर लावलं. लोकाची कोरोना तपासणी झाली. आन तुम्ही इश्वास ठेवणार नाही बघा, पण नेम धरून फक्त मीनल आन संत्या कोरोना positive आले. गावात थेट ambulance आली तवा लोकाला गुपित कळलं. ambulance दोघाला घेऊन गेली. एरव्ही दोघं पाचशे मीटरवरूनबी एकत्र दिसले आस्ते त घरच्यांनी दंगल केली आस्ती. तंगड तोडून ठेवलं आसतं. पण आता दोघाच्याच काय आख्या गावाच्या डोळ्यादेखत दोघं एकाच ambulance मधून गेले. गेले दोन तीन महिने टीव्हीवरसुद्धा पेशंट दिसला त जीवाची घालमेल व्हायची लोकाच्या. पण आपल्या गावातले दोन पेशंट नेताना बघून वाईट वाटायचं सोडून काही लोक फिदीफिदी हासत होते. त काही लोक तोंडात बोट घालून बसले होते. दोघालाच कोरोना झाला म्हणजे दोघं चोरून एकमेकाला भेटत होते ह्यात त काही डाऊटच नव्हता गावाला. दोघाच्या घरच्यानला कोरोनापेक्षा ह्या भानगडीमुळ तोंड लपवायची येळ आली. दोन महिने कोरोना गीरोना काही नसतो म्हणून मास्क न लावता हिंडणारा मीनलचा बाप आता भला मोठा रुमाल तोंडाला लावून हिंडायला लागला. कितीबी मनाची समजूत काढली तरी गावात दोघालाच कोरोना झाला म्हणजे आपली पोरगी संत्याला भेटत असणार हे बापाला नाकारता येत नव्हतं. इथून पुढ तिला स्थळ बघायचं कसं हा प्रश्न होता. कारण ही बातमी पेपरवाल्यांनी पण छापली होती. जिल्ह्यात पैज लावून चर्चा चालू होती. पंधरा दिवसात दोघं पुन्हा एका ambulance मधी घरी आले. दोघाच्या मनात धाकधूक होती. आता काय होईल? कोरोनातून त वाचलो पण आई बाप जीत्ते सोडणार नाहीत. पण ambulance मधून उतरल्यावर इपरीतच पाहिलं दोघानी. दोघाच्या घरचे ओवाळायला थांबले व्हते. आता नाहीतरी गावात बोभाटा झालाचय म्हणून दोघाच्या घरच्यानी त्याच दिवशी साखरपुडा उरकून टाकला. आठवड्यात लग्नबी झालं. मुंडावळ्यापेक्षा दोघाच्या तोंडावरचा मास्क उठून दिसत होता. मास्क घालूनच दोघानी एकमेकाचं नाव घेतलं.
मीनल म्हणली,
कोरोना आलाय म्हनतेत चीनवरून
मी संतोषरावचं नाव घेते मनभरून
कोरोना आजुनबी गेला नाही. आजूनबी मीनल आन संतोष मास्क लावून फिरतेत. दोघं मास्कच्या आडून बारीक हसतेत आन मनात म्हणतेत आमच्यासाठी तर कोरोनाच कामी आला. कुणाचं काय तर कुणाचं काय. गोष्ट संपली गुडबाय.
पण अशा गोष्टी सुचतात कारण त्या आसपास घडतात. गाणीही अशीच सुचतात. श्रेयस तळपदेच्या सनई चौघडे चित्रपटात एक गाणं लिहिलं होतं, अवधूत गुप्तेचं संगीत आणि आवाज. प्रेमात पडणारे खूप असतात..पण सावरणारे स्पेशल असतात.
प्रेमात पडतो जो तो येता जाता
पण सावरलो तुझा होता होता
हे वेड आहे ना
पण गोड आहे ना..
0 Comments