मी तुमचा तिरंगा झेंडा. पहिल्यांदाच तुम्हाला पत्र लिहितोय. प्रत्येक पंधरा ऑगस्ट आणि सव्हीस जानेवारीला मी जिथे तिथे दिसत असतो. अभिमानाने माझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाला बघून कौतुकाने हसत असतो. खांब असो किंवा काठी डौलाने फडकत असतो. पण फक्त जय हिंद म्हणताना माझ्याकडे पाहून तुम्हाला माझ्या भावना कळत नाहीत. पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीशिवाय कधीतरी तुम्ही माझ्याकडे थोडं टक लाऊन पहा. माझ्या मनात काय चालू आहे तुम्हाला नक्की कळेल. आजपर्यंत लाच घेताना पकडल्या गेलेल्या हजारो सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीवर मी होतो याची मला किती लाज वाटते याची तुम्हाला जाणीव नसेल. तहसील कार्यालयात खेटे घालून दरवेळी निराश मनाने घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला बघताना मी किती हताश होतो हे तुमच्या गावीही नसेल. मुलांना खेळायला मैदान नसलेल्या शाळेत खांबावर फडकताना मी अंग चोरून घेतल्यासारखा फडकत राहतो हे तुमच्या ध्यानीही येत नाही. पेशंटला जमिनीवर झोपवणाऱ्या सरकारी दवाखान्यात माझ्यातला रुबाब नाहीसा होतो. तुम्ही पाहता तेंव्हा मी फक्त फडकत नसतो. मी खरतर तुमच्यातला माणूस हुडकत असतो. माझी चलबिचल चालू असते. देशभक्तांच्या गर्दीत माणूस शोधण्याची. डिग्री असल्याशिवाय जसा डॉक्टर असू शकत नाही, तसा आधी माणूसकी असल्याशिवाय कुणी देशभक्त असू शकत नाही.
राष्ट्रगीताच्या वेळी माझ्यासमोर दोन मिनिट शांत आणि स्तब्ध उभं रहायचं असतं तुम्हाला. त्याचं एक महत्वाचं कारण हे ही आहे की तुम्ही आपण राष्ट्रासाठी काय करतोय याचा शांतपणे विचार करावा. पण तुम्ही काय करता? आपल्या शेजारचे शांत उभे आहेत की नाहीत ते बघत बसता. कोण राष्ट्रगीत म्हणत नाही, कोण चुकतय याचा विचार करत बसता. ते दोन मौल्यवान मिनिट राष्ट्राचा विचार करण्यासाठी असतात. राष्ट्रासाठी आपण काय करतो याचा विचार करण्यासाठी असतात. ते खुपदा तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांची तुलना करण्यात घालवता. त्या दोन मिनिटात तुम्ही विचार करायला पाहिजे. आपण जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरतोय आजकाल. पक्षाचे झेंडे लावतोय चौकाचौकात. तिरंगा दोन दिवसांचा पाहुणा करून टाकलाय. तुम्ही एकदा ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांची गोष्ट आठवा. ते भारतीय सैन्यात होते. नुकतीच फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला होता. मोहम्मद अली जीना यांनी ब्रिगेडियर उस्मान यांना पाकिस्तानी सैन्यात मोठे पद देतो अशी ऑफर दिली. पण उस्मान यांनी ती ऑफर धुडकावून लावली. मी हिंदुस्तानसाठी प्राण देईन पण पाकिस्तानात येणार नाही असं ठणकावून सांगितलं. उस्मान यांनी काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याला हकलून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. म्हणून त्यांना नौशेरा का शेर म्हणायचे. याच उस्मान यांच्या नेतृत्वाखाली सैन्य ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत लढलं आणि कोट ताब्यात घेतला. उस्मान युद्धात लढता लढता हुतात्मा झाले.
मेजर जनरल कारडोजो यांची आठवण झाली पाहिजे. ७१ च्या युद्धात आपल्या सैन्याच्या पराक्रमामुळे पाकिस्तान शरण आला. तीन पाकिस्तानी ब्रिगेडियर्स, १७३ अधिकारी, २९० जे सी ओ आणि आठ हजार पाकिस्तानी सैनिकांना असं वाटत होतं की भारताचं खूप मोठं सैन्य सीमेवर तैनात आहे. सत्य परिस्थिती ही होती की आपली फक्त अर्धी बटालियन त्या भागात लढत होती. पाकिस्तानी सैनिक आपल्या सैन्याच्या पराक्रमाने एवढी घाबरली होती की जखमी सैनिकांना न्यायला आलेल्या हेलिकॉप्टरला सुद्धा ते घाबरत होते. त्याच युद्धात मेजर जनरल कारडोजो यांचा पाय बॉम्बमुळे निकामी झाला. वैद्यकीय पथकाकडे भूल देणारे औषध सुद्धा नव्हते. कारडोजो यांनी आपल्या सैनिकाला कुकरीने आपला पाय कापायचा आदेश दिला. पण सैनिक ती हिम्मत करू शकला नाही. शेवटी कारडोजो यांनी स्वतःच्या हाताने भूल दिलेली नसताना स्वतःचा पाय कापून टाकला. सैनिकाला तो तिथेच पुरायला सांगितला. नंतर ते गमतीत सांगायचे की आजही माझ्या शरीराचा अंश बांगलादेशमध्ये पुरलेला आहे.
माझ्यात झेंडा म्हणून जी सळसळ दिसते ती अशा आठवणींनी. मी अभिमानाने फडकतो तो अशा वीरांच्या गोष्टींनी. मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतो जेंव्हा या देशाचा खेळाडू जिंकला म्हणून तिरंगा फडकवला जातो. पण मला सगळ्यात जास्त त्रास होतो जेंव्हा एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याच्या, अधिकाऱ्याच्या हस्ते तिरंगा फडकवला जातो. त्यावेळी मला होणाऱ्या वेदना तुम्ही समजून घ्यायला हव्यात. गुन्हेगाराने मलाही स्पर्शही करू नये. मला सलामही करू नये. पण तुम्ही थेट त्यांना निवडून देता. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करता. मला त्या गुन्हेगारांएवढीच तुमचीही लाज वाटते. असंख्य अपराध असलेले आरोपी खुलेआम या देशाचा झेंडा फडकवताना तुमची मान शरमेने खाली जात नसेल तर तुम्हाला देशभक्त म्हणवून घायचा अधिकार नाही. मला आशा आहे की यापुढे तरी तुम्ही गुन्हेगारांना निवडून देणार नाही. मी फडकतोय म्हणजे प्रत्येकवेळी उत्साह आणि उर्जाच असेल असं नाही. कधी कधी मी अस्वस्थही असेल. मला समजून घ्या. राकेश शर्मा अंतराळात गेला होता तेंव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला विचारलं होतं, तिथून भारत कसा दिसतो? राकेश शर्मा एका क्षणात म्हणाला, सारे जहांसे अच्छा. या सारे जहांसे अच्छा राष्ट्राच्या झेंड्याचा विचार करा. या तिरंग्यासाठी लोकानी प्राणाची आहुती दिलीय. जीवाची पर्वा केलेली नाही. या तिरंग्याच्या जीवाची घुसमट होऊ देऊ नका. माझ्या दोरीला लागणारा प्रत्येक हात निरपराध, लाच न घेणारा आणि प्रामाणिक पाहिजे. एवढी माफक अपेक्षा आहे. इथून पुढे ती पूर्ण होईल ही अपेक्षा.
जय हिंद.
तुमचाच तिरंगा.
Photo © Sharad Patil