त्याचं नाव संदीप. पण त्याला कुणी संदीप म्हणायचं नाही. सगळे सॅंडी म्हणायचे. संदीपला पण सगळ्यांनी आपल्याला सॅंडी म्हणावं असंच वाटायचं. त्याचे आई वडील पण त्याला लाडाने सॅंडीच म्हणायचे. त्यांचं गाव सांगायचं राहिलं. धूळवडी. तर धुळवडीपासून पाच किलोमीटर अंतरावर एक इंग्रजी शाळा सुरु झाली होती. चौथीत असलेला संदीप त्या शाळेचा विद्यार्थी होता. अंगावर कोट होता. संदीप शाळेला जाताना कुणीतरी कलेक्टर चाललाय असच त्याच्या आई बापाला वाटायचं. सॅंडीला जायला एक काळी पिवळी जीप होती. त्या जीपमध्ये दहा बारा पोरं पाच किलोमीटरवर असलेल्या झोटिंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जायचे. जीपला मागून जाळी असलेला दरवाजा होता. कैदी तुरुंगात नेतात तसेच पोरं जीपमध्ये शाळेत जाताना दिसायचे. गावातले अर्ध्याच्यावर पोरं झोटिंग इंग्रजी मिडीयमला जाऊ लागले होते. आपला पोरगा इंग्रजी शाळेत शिकतो या गोष्टीने पालक सुखावले होते. पोराचा मेडिकल इंजिनियरिंगला नंबर लागल्यासारखे आनंदी होते. सॅंडीची आई लता त्याला डब्यात कधी भाकरी द्यायची नाही. एकतर तिला डबा म्हणालेलं आवडायचं नाही. ती सासूला सांगायची, डबा नाही टिफिन असतो तो. दप्तर नाही स्कूल bag असते.
संदीपचे गुरुजी विलास सर. त्यांचं एका मुलीशी अफेअर होतं. थोडक्यात लफडं. ती कॉलेज बुडवून विलास सरांना भेटायची. गावापासून दूर एका पडक्या घरापाशी दोघं भेटायचे. आज पण विलास सर तिला भेटायला आले होते. पण बघतात काय तर तिथे सॅंडी आधीच येऊन बसलेला. बरं एरव्ही शाळा बुडवून आलेला कुठलाही पोरगा मास्तरला बघून पळून जातो. पण सॅंडी काही तिथून हलायला तयार नव्हता. उलट त्याने मास्तरकडे बघितलंसुद्धा नाही. मास्तर त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले. बोलायचा प्रयत्न करू लागले. पण सॅंडी शांतपणे बसला होता. मास्तरला कसाही करून त्याला तिथून घालवायचा होता. पण सॅंडी बोलायलाच तयार नव्हता तर जाणार कसा? खूप वेळ इकडचे तिकडचे प्रश्न विचारल्यावर सॅंडी अचानक रडायला लागला. मास्तरचा खूप वेळ त्याला शांत करण्यात गेला. प्रेयसीसाठी आणलेली कॅडबरी शेवटी त्यांनी काळजावर दगड ठेऊन सॅंडीला देऊन टाकली. कसाबसा सॅंडी शांत झाला. बोलू लागला.
सॅंडी घरच्यांवर नाराज होता. काल त्याला त्याच्या आईने भर रस्त्यात थोबाडीत मारली होती. काही महिन्यापूर्वी बापाने असाच एक धपाटा घातला होता. त्यावेळी त्याच्या वडीलाना मोबाईलवर एक मेसेज आला होता. वडील बिचारे जेमतेम शिकलेले. मराठी पेपर वाचणे एवढच त्यांचं वाचन. इंग्रजी त्यांच्या वाटेला आली नाही आणि ते कधी इंग्रजीच्या वाटेला गेले नाही. पण त्या दिवसात मोदी शेतकऱ्यांना पैसे पाठवतात असा सगळीकडे बोलबाला होता. बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो अशी चर्चा होती. सॅंडीच्या वडिलांनी बँकेत जाऊन मोबाईलवर मेसेज यायची व्यवस्था केली. आणि ते रोज मेसेजची वाट पहायला लागले. एक दिवस सॅंडीच्या वडलाना मोबाईलवर तसाच काहीतरी मेसेज आला. पण त्यांना तो नीट कळत नव्हता. म्हणून महिन्याला हजार रुपये फीस भरून इंग्लिश मिडीयमला टाकलेल्या आपल्या पोराला त्यांनी मोबाईल दिला. मेसेज वाचायला सांगितला. पण त्या मेसेजची भाषा आणि त्यातले short फॉर्म सॅंडीच्या डोक्यावरून गेले. त्यालाही त्या मेसेजचा काही अर्थ लागत नव्हता. वडील वैतागले होते. त्यांना मोदींनी पैसे पाठवले की नाही याची जशी उत्सुकता होती तशीच आपल्या पोराला इंग्रजी येते की नाही याची पण उत्सुकता होती. पण आता सॅंडीचे निर्विकार हावभाव बघून आपली मोदीजीनी निराशा केलीय की पोराने हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. चिडचिड होत होती. त्यात सॅंडी म्हणाला की ह्यात मोदींच नाव कुठं दिसत नाही. मोदींच स्पेलिंग आता मुलांना पाठ झालं होतं. कारण ते नाव वरचेवर शाळेत येत असतं. तर सॅंडीच्या एवढच लक्षात आलं होतं की मोदींच नाव मेसेजमध्ये नाही. तरी बापाला वाटलं की मोदीजीनी पैसे शेतकऱ्याला पैसे पाठवले असं म्हणायची पद्धत आहे. पैसे तर केंद्राचे असतात. बँक वाटप करते. म्हणून एखाद वेळेस मोदींच नाव लिहायला विसरले असतील बँकेवाले. पण पैसे आले का नाही ते मुलाला का कळत नाही? चूक नेमकी कुणाची आहे? बँकेची का सॅंडीची? कारण मोदी तर चुकीचे असूच शकत नाहीत याची त्यांना खात्री होती. कारण आजपर्यंत पेपरमध्ये तसं कधीच आलं नव्हतं. तर सॅंडीने खूप प्रयत्न चालवला. पण त्याला काही त्या मेसेजचा अर्थ कळत नव्हता. शेवटी वडिलांचा संयम संपला आणि त्याने दरडावून विचारलं. तेंव्हा सॅंडीने पैसे आले असं ठोकून दिलं. वडील आनंदात बँकेत गेले. तेंव्हा त्यांना सत्य कळालं. बँकेने त्यांना मेसेज पाठवायचा चार्ज लावला होता. पैसे आले नव्हते. गेले होते. घरी आल्यावर रागात वडीलांनी सॅंडीला एक धपाटा ठेऊन दिला. सॅंडी ती गोष्ट विसरून गेला. पण काल जे झालं ते त्याला विसरता येणार नव्हतं. आलं नव्हतं.
सॅंडी काल आई बरोबर मामाच्या गावी निघाला होता. फाट्यावरून गाडी पकडायची असते. फाट्यावर बरेच लोक बसलेले असतात. म्हणून आई जवळच असलेल्या वर्षामावशीच्या शेतात झाडाखाली बसली होती. गप्पा मारत. गावाकडे जाणारी गाडी आली की सॅंडीने आवाज द्यायचा हे ठरलं होतं. सॅंडी उभा होता. दोन तीन गाड्या येऊन गेल्या तरी सॅंडी काही आवाज देत नव्हता. अस्वस्थ होऊन आई रोडपाशी आली. अजून पासलगावची गाडी आली नाही? असा प्रश्न विचारला वैतागून. बाजूला बसलेल्या आजोबाने सांगितलं की आता तीच गाडी गेली ना. आई संतापली. कारण दिवसात दोनच गाड्या होत्या तिकडे जाणाऱ्या. तिने सॅंडीकडे बघितलं. तुझे काय डोळे फुटले का? वगैरे खूप बोलून झालं. पण सगळ्यात मोठा धक्का नंतर होता. आईला पहिल्यांदा लक्षात आलं की सॅंडीला मराठी वाचताच येत नाही. तिने जोरात थोबाडीत मारली. एवढे पैसे खर्च करून तुला इंग्रजी शाळेत पाठवला आणि तुला साधं मराठी वाचता येत नाही. तिला बिचारीला वाटत होतं की इंग्रजी शाळेत पाठवलं की मराठी काय आपोआप वाचता येईल. मराठी आहे काय आणि नाही काय.
सॅंडी रडून रडून मास्तरला सांगत होता. मास्तरला हसावं का रडावं कळत नव्हतं. मास्तर सॅंडीला समजवून घरी पाठवायचा प्रयत्न करत होता. कारण त्याची प्रेयसी आता जवळ येताना दिसत होती. पण सॅंडी ऐकायलाच तयार नव्हता. त्याला आई वडलांची तक्रार करायची होती. त्याने एका चाईल्ड हेल्पलाईन बद्दल टीव्हीवर ऐकलं होतं. तिथे आई बापांची तक्रार करायची त्याने पक्कं ठरवलं होतं. मास्तर त्याला लवकर कटवायचं म्हणून तयार झाला. त्याने हेल्पलाईनला फोन लावला. समोरून एक बाई फाड फाड इंग्रजीत बोलू लागली. मास्तरने तिला विनंती केली की मराठीत बोला. समोरच्या बाईने, तुम्ही कोण बोलताय हे विचारलं. मास्तर म्हणाला, मी झोटिंग इंग्लिश मिडीयममध्ये इंग्रजी शिकवतो. ज्याची तक्रार आहे तो मुलगा माझा विद्यार्थी आहे. बाई निमूटपणे ऐकत राहिली. चूक कुणाची? मुलाची? आई बापाची? का डी. एड. पण नसलेल्या आणी पाच हजारावर नौकरी करणाऱ्या मास्तरची?
झोटिंग इंग्लिश मिडीयमचे संचालक झोटिंगसाहेब मात्र जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती असल्याने झेडपीत त्यादिवशी त्यांचं भाषण ठेवलं होतं. मराठी भाषा दिनानिमित्ताने. झोटिंगसाहेब स्टेजवरूनच पिएला फोन करून विचारत होते, आज नेमका कुणाचा वाढदिवस असतो? कुसुमाग्रज का वि. वा. शिरवाडकर? पीएने तात्काळ चौकशी करून सांगतो म्हणून फोन ठेऊन दिला. व्यासपीठावर निवेदन करत असलेला कुणीतरी मराठी शिक्षक कुसुमाग्रजांच्या फोटोकडे बघून तात्यासाहेब म्हणाला आणि झोटिंग आणखी गोंधळले. पीएने फोन केला की शिरवाडकर आणि कुसुमाग्रज एकच आहेत. त्यावर झोटिंग म्हणाले पण आता हे तात्यासाहेब कोण ? पीए पुन्हा म्हणाला, चौकशी करून सांगतो.
0 Comments