विनायक. सगळे विन्या म्हणायचे
विनायक. सगळे विन्या म्हणायचे. घरचे लाडाने विनू म्हणायचे. विनायक गाव सोडून मुंबईत आला त्याला चार वर्ष झाली. गावाकडे म्हातारे वडील आहेत. आजारी असतात. विनायक त्यांना भेटायला गेला नाही. चार वर्षात कधीच नाही. हे सगळं त्याचं त्यालाच आठवलं आज. खरंतर खुपदा आठवतं. मुंबईतल्या त्या श्रीमंत लोकांची वर्दळ असलेल्या गार्डनमध्ये गेलं की हमखास आठवतं. विनायक तिथे कुत्र्याला खेळायला नेतो. गार्डनच्या एका भागात कुत्र्यांना खेळवायला जागा आहे. आसपास माणसं चालत असतात. म्हातारी माणसं उन्हात बसलेली असतात. कुणी बळेच हातपाय हलवत असतात. विनायक खुपदा बघत बसतो त्यांच्याकडे. एका म्हाताऱ्याला आपला हात खांद्याला टेकवता येतो याचच खूप कौतुक तर दुसऱ्या म्हाताऱ्याला आपल्या लेकाने परदेशांतून आणलेल्या बुटाचं कौतुक. एक म्हातारा खूप दिवसापासून योगासनं करण्याचा प्रयत्न करतोय. पण दरवेळी जोरात श्वास बाहेर सोडताना त्याला रडूच येतं. आधी विनायकला वाटायचं त्याला त्रास होत असणार. पण नंतर कळलं की त्याची बायको वारलीय मागच्या महिन्यात. एकटेपण सहन होत नाही त्याला. नवरा बायको रोज यायचे गार्डनमध्ये. बायको खूप हळू चालते म्हणून म्हातारा चिडचिड करायचा. तू नेहमीच मागे राहतेस म्हणायचा. असच चालत राहिल तर एक दिवस मी खूप पुढे निघून जाईन. कायमचा. मग एकटी काय करशील? हे बोलणं ऐकून म्हातारी रुसून बसायची. खुपदा समजूत काढताना म्हातारा म्हणायचा वर सुद्धा आपण सोबत जाऊ. बस. मी थांबेन तुझ्यासाठी. नाही जाणार एकटाच पुढे. मग दोघे हळू हळू चालत रहायचे. आणि एक दिवस म्हातारी काही न सांगता एकटीच पुढे निघून गेली. म्हातारा आता एकटाच हळू हळू चालतो. मागे कुणीच नाही आवाज द्यायला. थोड्याच वेळात म्हातारा थकून जातो. चालण्याने नाही. आठवणीच्या ओझ्याने.
विनायक सगळ्या म्हातारया माणसाना बघत बसतो तासनतास. त्याला प्रत्येकात आपला बाप दिसतो. लाफ्टर क्लब मधले लोक जोरजोरात हसताना बघून तर त्याला बापाची खूप आठवण येते. त्याचा बाप असाच हसतो. दिलखुलास. मोठ्याने. विनायक गावाकडे असताना बापाला जरा हळू हसत जा म्हणायचा. पण बापाला हळू हसणं माहीतच नव्हतं. हसू आलं तर आवरणार कसं? आणि हळूच हसण्यापेक्षा न हसलेलच बरं असं म्हणायचा बाप. विनायकचं बापापुढे काही चालायचं नाही. बाप सैन्यात होता. निवृत्त झाला. शेती करू लागला. विनायकची आई अपघातात वारली. आई बाप दोघे मोटर सायकलवर एका लग्नाला गेले होते शेजारच्या गावात. कुत्रा आडवा आला. गाडी स्लीप झाली. आई पडली ती डोक्यावरच. बापालाही मार लागला. बापाचा हात मोडला. आई सोडूनच गेली कायमची. त्या दिवशी विनायकने बापाला नाही नाही त्या शिव्या दिल्या. बापाची काही चूक नव्हती. बघणारे लोक सांगत होते. पण विनायक आई गेल्याच्या दुखात होता. बापाने नीट गाडी चालवायला पाहिजे होती म्हणून ओरडत होता. एक दोन नाही चांगले दहा पंधरा दिवस विनायक बापाला बोलत राहिला. बाप डोळ्यात पाणी आणून ऐकायचा. कधी उलट शब्द बोलला नाही. एकीकडे बायको गेल्याचं दुखः दुसरीकडे पोरगं असं वागतय ह्याच दुखः. तेरावा झाला. विनायक गाव सोडून पळून गेला. बापाला एकटाच सोडून गेला. बापाच्याने शेती होत नाही. जी काही पेन्शन येते तोडकी मोडकी त्यात बाप घर भागवत असणार. विनायक मात्र आता परत न जाण्यासाठी आला होता. चार वर्ष झाले गावाचं तोंड पाहिलं नव्हतं. पण नदीम भेटल्यापासून त्याला मुंबईत एक मिनिट थांबायची इच्छा उरली नव्हती.
नदीम ड्रायव्हर होता. विनायक एका श्रीमंत माणसाच्या घरी हरकाम्या होता. कधी मालकाच्या बायकोची गाडी चालवायचा. कधी घरकाम करायचा. कधी मालकाच्या कुत्र्याला फिरवून आणायचा. नदीम मालकाचा ड्रायव्हर. नवीनच आलेला. सुट्टी असली की तो पण विनायकसोबत गार्डनला यायचा. विनायकच्या सोबत कुत्रा असायचा. एक दिवस बोलता बोलता विनायकने नदीमकडे मन मोकळं केलं. आईवर एवढ प्रेम होतं की तिचा मृत्यू सहनच करू शकलो नाही. ती गेली आणि गावाचा तिटकारा वाटू लागला. घराचा पण. बापाचा पण. बापाला चार वर्ष झाले भेटलो नाही म्हणाला. नदीम म्हणाला, तेरे जैसा बेकुफ तूच हुंगा दुनियामें. तेरे बापका एकसिडेंट कैसे हुआ? कुत्तेकी वजहसे. लेकीन तू बापकू गाली देता. और यहां क्या करता? लोगोंके कुत्तेकु संभालता. अरे बाप मिलता नहीं रे. कुत्ते भोत है बंबईमें. बाप नहीं है. बाप एकीच हैं तेरा गांवमें. उसकू मिल. जित्ता इस कुत्तेके लाड प्यार करता ना उत्तीबी जरुरत नहीं. बस एक बार गले मिल बापके. भोत हो गया.’
कुत्रा दोरी ओढत होता. विनायक कसाबसा दोरी धरून होता. विनायकला कळत नव्हतं कोण कुणाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतय. विनायकचा हात हळू हळू सैल होत होता. एका क्षणाला कुत्रा हिसका देऊन निघून गेला. एका लहान मुलाच्या चेंडूकडे धावू लागला. विनायक त्याच्याकडे बघत नव्हता. त्याचं लक्ष म्हाताऱ्या माणसांकडे होतं. लाफ्टर क्लबचे म्हातारे आज जोरजोरात हसताना दिसत होते. विनायकच्या बापासारखे. विनायकही एकदा जोरात हसला. बापासारखाच. विनायकला आपल्या हातातली बेडी सुटल्याचा आनंद झाला होता. तो आज धावत गावी जायला तयार होता.
– अरविंद जगताप .
खूप सुंदर 👌🏼👌🏼