कॅफे. आज हा शब्द फक्त कॉफीपुरता ओळखीचा उरलाय. पण काही वर्षापूर्वी कॅफे म्हणजे सायबर कॅफे असं समीकरण होतं. खूप मुलांना विश्वास बसणार नाही पण मेल चेक करायला, मेल करायला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. एक तास किंवा अर्धा तास तिथल्या कॉम्प्युटरवर बसायचे पैसे द्यावे लागायचे. छोट्या छोट्या लाकडी केबिन. त्यात एखादा स्टूल किंवा खुर्ची. आणि कॉम्प्युटर. प्रेयसीपेक्षा जास्त भाव खाणारा कॉम्प्युटर. वाट पाहायला लावणारा. त्यात सर्व्हर डाऊन आहे हे वाक्य दिवसात चारदा तरी ऐकू यायचं. फाईल डाऊनलोड करायची असेल तर छळच. बरं ते सगळं आपल्या सीडीत घ्यायचं. पेन ड्राईव्ह वगैरे नंतर आले. कॅफेमध्ये येणारे वेगवेगळे वर्ग होते. प्रिंट घ्यायला येणारे, अभ्यास करायला येणारे, चॅटींग करायला येणारे आणि काही पॉर्न बघणारे. केबिन असली तरी आपल्या शेजारचा काय करतोय याचा केवळ की बोर्ड वरून अंदाज यायचा. घरात कॉम्प्युटर असण्याचे दिवस नव्हते ते. आपल्याला कॉम्प्युटर मिळावा म्हणून तासनतास वाट बघायचे लोक. हळूहळू धाडस करून मुलीही कॅफेत यायला लागल्या. आज हमखास मोबाईलवर युट्यूब बघत बसणारे ज्येष्ठ नागरिक मात्र फार दिसायचे नाहीत. खरतर सगळ्यांनाच ते नवीन जग होतं. कॉम्प्युटर हँग व्हायचं तेंव्हा काय करावं कळायचं नाही. हिरोइन्सचे वॉलपेपर बघणं हेच खूप भारी वाटण्याचा काळ. त्यात खुपदा एकावेळी पन्नास विंडो ओपन व्हायच्या तेंव्हा कॅफेतून पळून जावं वाटायचं. काहीही झालं तरी कॉम्प्युटर बंद करून चालू करणे एवढा एकच उपाय कॅफेवाला करायचा. ते पाच मिनिटाचं तरी काम होतं. त्यात काही कॅफेवाले हेडमास्तर असल्यासारखे प्रत्येक पीसीवर काय चालू आहे ते बघत हिंडायचे. ती छोटी केबिन हे खूप तरूणांच जग होतं. पहिल्यांदा एकाने कंट्रोल ए असं दाबल्यावर सगळं सिलेक्ट होतं हे दाखवलं तेंव्हा काय आनंद झाला होता. गुगलवर काय काय भारी वाचायला मिळायला लागलं. ऑर्कुट आलं आणि जगच बदलून गेलं. जुने मित्र सापडायला लागले. खूप वर्षांनी मित्रांचे फोटो बघून डोळे भरून यायला लागले. पण ते काही काळच टिकलं. शाळेत कधी न समजलेली किंवा न खटकलेली जात सोशल मिडीयावर ठळक होऊ लागली. असो.
सायबर कॅफेत सगळ्यात जास्त चालायचं ते चॅटींग. एकावेळी असंख्य लोकांशी गप्पा मारणारे लोक पण एका शब्दाचा आवाज नाही. फक्त किबोर्डची खटखट. पुढे हेडफोन आल्यावर तर कित्येक लव्हस्टोरी केबिनमधून ऐकायलाही येऊ लागल्या. कीबोर्डवर टाईप करताना एरव्ही चुका झाल्यावर चक चक असा आवाज यायचा. हेडफोन आल्यावर केबिनमधून पोरांनी चोरून ऑनलाईन दिलेली चुंबनं ऐकू लागली. एरव्ही दिवसभर आई बहिण काढत शिव्या देणारे चॅटींग करताना एवढे प्रेमळ व्हायचे की बस. मित्रांना मुंगी, गोट्या, कालू म्हणणारे पोरीशी बोलताना बेबी, शोना, पिल्लू असे गोड शब्द वापरायचे. मेलच्या नावाने कॅफेत गेलेली मुलं कधी चॅटींग करायला लागायची कळायचं नाही. याहू वगैरेवर चॅटींग लोकप्रिय होतं. त्यात एका वेळी आठ दहा मुलींशी गप्पा मारणारी पोरं हिरो वाटायची. मग नंतर लक्षात आलं की हे हिरो एकाच वेळी पाच पन्नास पोरीना हाय करायचे. जी उत्तर देईल तिच्याशी बोलणं सुरु. खूप पोरांचं असं जगभरातल्या पोरींशी बोलणं सुरु झाल्याने इंग्रजी सुधारलं. टायपिंगची स्पीड वाढली होती. तरी ते चॅटींगवालं बोलणं म्हणजे छळच. पोरांचे अधाशासारखे प्रश्न. पोरगी बिचारी कधीतरी उत्तर द्यायची. एखाद्या दोन शब्दात. त्यातही इंग्रजीत hmmmm असा काहीसा रिप्लाय फार लोकप्रिय झाला होता पोरींचा. पण तोही देवळातल्या प्रसादासारखा वाटायचा पोरांना. खरतर जगभरात कुठल्याही देशातल्या लोकांशी बोलता येणं ही चॅटींगची खूप मोठी उपलब्धी होती. पण अर्ध्या पुरुषांना इतर देशातल्या पुरुषांशी बोलण्याची इछाच नव्हती. हे इंटरनेट वाल्यांनी ओळखलं होतं. त्यांनी ‘ए एस एल’ नावाची एक सोय केली होती. एज सेक्स आणी लोकेशन. चॅटींग करणारी मंडळी पहिला प्रश्न विचारायची तो ‘ए एस एल?’ मग मुली समवयस्क वगैरे असेल तर बोलायच्या. मुलं समोरून स्त्रीने पंधरा, पंचवीस किंवा पन्नास असं वय सांगितले तरी बोलत रहायचे. पाण्यात गळ टाकून बसल्यासारखे. कुठल्यातरी विंडोवर रिप्लाय येईल याची वाट बघत. मग असं वाट बघता बघता काही पोरांनी आयडिया काढली. ते मुलींच्या नावाने प्रोफाईल बनवू लागले. आणि चमत्कार झाला. एंजल प्रिया, एंजल जिया झालेला पोरगा अचानक बिझी झाला. मुलगी होऊन का होईना कुणीतरी आपल्याशी बोलतय यात कित्येक पोरं आनंद मानू लागली. मुलगा व्हावा म्हणून दहा देवाना नवस केलेल्या आई बापाला माहितीही नव्हतं की आपला बंटी आता एंजल प्रिया बनून गप्पा मारतोय कॅफेत. खरतर सायबर कॅफेत बसून खूप मुलांनी नवे व्यवसाय सुरु केले, परदेशात नौकरीच्या संधी मिळवल्या. खूप जणांचे लग्न जमले. मोबाईल स्मार्ट होत गेला आणि सायबर कॅफे आउटडेटेड. आयुष्याची पंधरा वीस वर्ष गर्दीच गर्दी पाहिलेले कॅफे अचानक ओस पडू लागले. रेडीमेड कपड्यांची आवड वाढल्यावर अशीच टेलरच्या दुकानांची अवस्था झाली होती. काही काळापूर्वी अशा एका कॅफेत जायचा योग आला. एखाद्या जुन्या पडक्या वाड्यात शिरावं तसं वाटलं. त्या कॅफेतल्या कॉम्प्युटरवर अर्ज भरलेल्या शंभर एक तरी पोरांना नौकरी लागली होती. आठ दहा प्रेमप्रकरणं जुळली होती. त्या दिवशी तो कॅफेवाला त्याच्याच कॅफेत बसून नौकरीचे अर्ज भरत होता. बदल व्हावेत. पण पंधरा वीस वर्षात एखादा स्थिरस्थावर माणूस अचानक बेरोजगार व्हावा एवढे? याहू नावाची लोकप्रिय कंपनी मागे पडून जीमेल आलं. ऑर्कुट जाऊन फेसबुक आलं. डोळ्यासमोर बदल होत गेले. रांगेत उभे राहून मोबाईलचा रिचार्ज करणारे आपण मोबाईलवर लोकांना पैसे पाठवू लागलो. आता ए आय आल्यामुळे आणखी नौकऱ्या धोक्यात येताहेत. पण त्यापेक्षा जास्त आपलीच मुलंबाळ आपल्यासमोर आपल्याकडे न बघता कानात हेडफोन घालून पन्नास हजार किलोमीटरवरच्या माणसाचं संगीत ऐकत असतात तेंव्हा ते न ऐकतही बेसूर वाटू लागतं. हा बदल नको वाटतो. अर्थात हळूहळू सगळच बदलेल पण काही गोष्टी अजूनही बदलल्या नाहीत.
मुलींना ‘जेवलीस का?’ हा प्रश्न अजूनही विचारला जातो सोशल मिडीयावर. बेरोजगारी, शेतमालाला भाव, बदलणारे हवामान असे ज्वलंत प्रश्न असताना सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न काय? ‘जेवलीस का?’. आणि विचारणारा स्वतः घरात फुकट तुकडे मोडणारा. आता पोरींशी गप्पा मारताना एवढी वर्ष हाच प्रश्न विचारला जातोय याचा अर्थ आपल्याला प्रश्न विचारता येत नाहीत. किंवा आपल्याला मूळ प्रश्नच कळलेले नाहीत. मुलींना धड प्रश्न विचारता येत नसतील तर व्यवस्थेला काय प्रश्न विचारणार आपण?