कोरोनामुळे आपल्याला खूप गोष्टी कळताहेत
कोरोनामुळे आपल्याला खूप गोष्टी कळताहेत. त्यातल्या खूप अफवा आहेत. खूप खऱ्या आहेत. खूप वाईट आहेत. खूप बऱ्या आहेत. हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेले आपल्या देशात. ही खूप भयंकर गोष्ट आहे. त्याहून भयंकर लोक स्वतःच उपाय सुचवतात ते. गोमुत्र पार्टी झाली चक्क. हा अतिरेक विनाकारण गाईला बदनाम करणारा आहे. परदेशातून आलेल्या एका संशयित रुग्णाने दिल्लीत त्याला ज्या दवाखान्यात ठेवलं तिथला व्हिडीओ टाकला. मला किती वाईट स्थितीत ठेवलय हे जगाला दाखवायला. पण त्या व्हिडीओमध्ये वाईट वाटावं असं काही नव्हतं. उलट वाईट अवस्थेतल्या द्वाखान्यांचा आपल्याला खूप अनुभव आहे. आपल्या देशातल्या लोकांनी त्या माणसाला सडेतोड उत्तर दिलं. जर दवाखान्यात फाईव्ह स्टार सुविधा पाहिजे असतील तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा. तिथेही सोय आहे. दवाखाना लाड करून घ्यायला नसतो. उपचार करायला असतो. पण काही लोक एवढ्या संकटात पण आपली प्रतिष्ठा, श्रीमंती विसरायला तयार नसतात हे दिसून आलं.
मन्दिर, मशीद, चर्च बंद होऊ लागले. आरोग्याच्या संकटात दवाखाना हेच देऊळ आणि डॉक्टर हाच देव हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. अशा संकटात माणसाने माणसाला मदत करावी हीच देवाचीसुद्धा अपेक्षा असणार. अर्थात त्यात चूक काहीच नाही. आजार बरा झाल्यावर बरेच लोक देवाचे आभार मानतात. काही लोक आपलीच प्रतिकारशक्ती खूप भारी होती म्हणतात. पण अशावेळी डॉक्टरचं महत्व जास्त लक्षात येतं. मशीद किंवा देऊळ बंद करता येतं. पण दवाखाने नाही. डॉक्टर, नर्स, वार्डबॉय यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. कारण अशा संकटाच्या काळात सगळे आपापल्या घरात बसून राहणं पसंत करताहेत. अशावेळी हे लोक रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी काम करताहेत. खरच आपण या सगळ्या डॉक्टर, नर्स, वार्डबॉयचे वैयक्तिक आभार मानले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली पाहिजे. खूपवेळा कौतुक होत नाही किंवा लोक दखल घेत नाहीत म्हणून पण काम करायचा उत्साह येत नाही. आपण एकमेकांच कौतुक करण्यात कंजूषपणा करू नये. निदान अशा महत्वाच्या कामाबाबतीत. यापेक्षा देशसेवा वेगळी काय असते? हे सुचलं कारण आजच वाचलं. नेदरलँड्स मधल्या लोकांनी रस्त्यावर येऊन आरोग्यसेवेतल्या लोकांसाठी टाळ्या वाजवल्या. त्यांचं मनोबल वाढवायला, त्यांच्याबद्दल आपल्याला किती अभिमान आहे हे सांगायला.
खूप वाईट बातम्या सहजपणे पोचताहेत. लोक पण खूप उत्सुक असतात बातम्या पोचवायला. पण तुमच्या लक्षात येतय का की फार कमी लोक आपल्याला कोरोनाचे किती रुग्ण बरे होताहेत हे सांगतात. बरे होणारे लोक पण खूप आहेत. त्यांच्या बातम्या पण आपण एकमेकांना सांगायला पाहिजेत. खरतर अशा खूप चांगल्या गोष्टी घडताहेत. आपण अशा संकटात खूप नवे शब्द शिकत असतो. pandemic, social distansing, quarantine असे कितीतरी शब्द आपल्या ओळखीचे झाले. हे सोशल distansing आपल्या सारख्या लोकांना अवघड आहे. आपण लोकांना न भेटता, आपापल्या घरात राहण पसंत करणारे लोक नाही. पण अशा काळात त्याला पर्याय नाही. जगातल्या खूप देशात लोक आपल्या घरात अडकून पडलेत. हे वाईट आहे. पण यात काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडताहेत. खूप लोक वाचायला लागलेत. चांगली पुस्तकं कोणती हे एकमेकांना विचारायला लागलेत. त्याचे ट्रेंड्स सुरु आहेत. खूप काळाने कुटुंब एकत्र येऊन घरातल्या घरात बैठे खेळ खेळतय.
नॉर्वेच्या पंतप्रधान बाईनी फक्त मुलांसाठी पत्रकार परिषद घेतली. अर्धा तास त्या मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या. कारण अशा काळात नेहमी प्रश्न पडणारी मुलं जास्त अस्वस्थ असतात. त्यांच्या शंकांना योग्य उत्तर देणं खूप महत्वाचं आहे. इटलीमध्ये एक जण रोज आपल्या उंच इमारतीच्या बाल्कनीत येऊन गावासाठी प्रेमगीत म्हणतो. गेले काही दिवस घरात अडकून पडलेले लोक वाट बघतात त्याची. त्याच्या गाण्याची. स्पेनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या लोकांना एक फिटनेस एक्स्पर्ट छतावर उभा राहून फिटनेसचे धडे देतो. लोक आपल्या बाल्कनीत उभे राहून त्याच्यासारखा व्यायाम करतात. हे सगळे व्हिडीओ जगभरचे न्यूजवाले दाखवत असतात. ही फार आशावादी पत्रकारिता आहे. याच छोट्या गोष्टी आणखी लोकांना प्रेरणा देत असतात. कुणासाठी काहीतरी करण्याची. ऑस्ट्रेलियामध्ये हॉटेल बंद आहेत. तिथल्या हॉटेलमध्ये काम करणारी बरीच माणसं कामावर येतातच तरीही. हॉटेलवाल्याच्या लक्षात आलं की दिवसाच्या कमाईवर पोट असणारे कामगार आहेत हे. एरव्ही आपण आपलं काम असलं की त्यांना कित्येक तास थांबवून घेतोच. आज काम नाही म्हणून येऊ नका म्हणायचं हे बरोबर नाही. त्या हॉटेलने बंदच्या काळातही त्यांना दिवसाचा पगार सुरु केला. कामावर न येता. जगभर हॉटेलचं कौतुक होतय. आपल्यालाही अशी पावलं उचलावी लागतील. फक्त हे बंद, ते बंद करून चालणार नाही. लोक जगणार कसे. हातावर पोट असणारे करोडो लोक आहेत आपल्या देशात. आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल.
कोरोना सारखे रोग माणसाची परीक्षा असतात. कुठल्या देवाची किंवा धर्माची नाही. ही माणुसकी नावाच्या धर्माची परीक्षा असते. आणि या माणुसकीच्या धर्मामुळेच जगातला प्रत्येक धर्म सुरक्षित आहे. आपल्या देशात सुद्धा अशा खूप चांगल्या गोष्टी घडताहेत. पुण्यात ग्रुप बनलेत सोशल मिडीयावर. अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना, मजुरांना जेवण देण्यासाठी. तुमच्या आसपास घडत असलेल्या चांगल्या गोष्टी नक्की सांगा. जग सुंदर आहे. फक्त आपण त्याची चांगली बाजू पण तेवढीच सातत्याने उजेडात आणली पाहिजे. एकमेकांना सांगत राहील पाहिजे
0 Comments