माझी निश्चित खात्री आहे की तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. जर अभिमान वाटला असता तर तुम्ही उजळ माथ्याने फिरला असता. मला माहित आहे की तुमच्यामागे कुणी सच्चा भारतीय नाही. सच्चा भारतीय कधी निशस्त्र माणसावर वार करणार नाही. मला माहितीय तुमच्यासोबत कुणी चांगल्या मनाचा माणूस नाही. कारण माणुसकीवर श्रद्धा असलेल्या एका ज्येष्ठ माणसावर कुणी असं गोळ्या चालवणार नाही. मग तुमच्यासोबत कोण आहे?
भीती. दहशत. ज्या दहशतीच्या विरुद्ध, ज्या भीतीच्या विरुद्ध एक माणूस निडरपणे आयुष्यभर लढत राहिला त्या माणसाचा शेवट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पण एका दाभोळकरांचे आज हजारो दाभोळकर झाले. चळवळ दुप्पट वेगाने वाढली. विवेकाचा आवाज आणखी बुलंद होतोय. आणि तुमचं काय? तुमच्या स्वप्नात हजार दाभोळकर येत असतील ही गोष्ट किती थरकाप उडवत असेल तुमचा. हजारो निशस्त्र डॉक्टर दाभोळकर शांतपणे तुमच्याकडे बघत असतील ना? देवाच्या मूर्तीला घाम येतो वगैरे अंधश्रद्धेच्या विरुद्ध डॉक्टर लढले. पण आज तुम्हाला डॉक्टरांच्या विचाराने घाम फुटत असेल. आणि तुमच्या इलाजासाठी डॉक्टर आपल्यात नाहीत हे केवढं दुर्दैवी आहे. डॉक्टर असते तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं की अरे बाळानो, हे सगळे भास आहेत. तुमच्या मनाचे खेळ आहेत. पण आता तुम्हाला तुमच्या मनाच्या खेळात रोज पराभव स्वीकारावा लागेल. समाजात डॉक्टर नसले की नाईलाज होतो हे तुमच्या आधी लक्षात आलं असतं तर किती बरं झालं असतं.
दाभोळकरांना मारल्याने मी तुम्हाला जाब विचारणार आहे असं अजिबात नाही. मी फक्त त्या देवाला जाब विचारणार आहे ज्याच्यावर तुमची प्रचंड श्रद्धा आहे. देवा, तू या लोकांना सद्बुद्धी का दिली नाहीस? तू या लोकांना तूच निर्माण केलेला जीव संपवण्याची बुद्धी का दिलीस? आणि डॉक्टरांना मारून तुमचं काही भलं झालं असतं तरी मी समजू शकलो असतो. खरंच काय मिळालं तुम्हाला? दाभोळकरांच्या कामाने जीव वाचलेले, आयुष्य बदलून गेलेले हजारो लोक आहेत. तुमच्या कामाने कुणाचा फायदा झालाय असा एक तरी माणूस आहे का? आज हजारो लोक छातीवर दाभोळकरांचा फोटो अभिमानाने मिरवतात. तुमचा फोटो असा खुलेआम मिरवणार आहे का कुणी? तुम्ही नेमके कोण आहात हे माहित असणं माझ्यासाठी फार महत्वाचं नाही.
पण दाभोळकर नेमके काय आहेत हे तुम्हाला माहित असतं तर फार बरं झालं असतं. डॉक्टर कुठल्या देवाच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हते. उलट धर्माला जेंव्हा ग्लानी येते तेंव्हा अशी माणसं उभी राहतात. आणि कुठल्या एका धर्माला नाही सगळ्या धर्मांना. सगळ्या धर्मातल्या अंधश्रद्धेविरुद्ध लढले डॉक्टर. कारण त्यांची माणसावर श्रद्धा होती. ते निर्भीड होते. त्यामुळे ते कुणाच्या माघारी बोलत नव्हते. थेट जाऊन त्या त्या व्यक्तीचे दोष सांगत होते. तुम्ही वेगात आला आणि निघून गेला. तुम्ही डॉक्टरांशी दोन मिनिट बोलायला हवं होतं. खूप दिलखुलास बोलायचे डॉक्टर. अशा माणसांशी बोललं पाहिजे अधून मधून. मला खात्री आहे तुम्ही बंदुकीच्या गोळ्या विसरून डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या असत्या. फरक पडला असता तुमच्यात. पण तुम्ही बोलले नाही. माणसांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. तुम्ही हत्याराचा वापर केला. पण तुम्हीही कुणाचे तरी हत्यार होता. लोक काम होईपर्यंत हत्यार वापरतात आणि काम झालं की फेकून देतात. किंवा लपवून ठेवतात. हे तुम्हाला माहित असेलच. हे खूप वाईट असतं ना?
दाभोळकर कुठल्या देवाच्या विरोधात नव्हते. दाभोळकर कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते. दाभोळकर कुठल्या माणसाच्या विरोधात नव्हते. मग त्यांचा गुन्हा काय होता? तुम्ही त्यांचा खून करण्याचं कारण काय होतं? खरंतर तुम्हाला काय शिक्षा होईल यात मला रस नाही. तुम्ही कसे आणि कुठून आला याचाही मी विचार करत नाही. मला एकच प्रश्न पडतो हा विचार तुमच्या डोक्यात कसा आला? कुठून आला? मला एवढच उत्तर हवंय. फक्त तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणून नाही. अजुन खूप चांगली माणसं या जगात आहेत म्हणून. मॉर्निंग वॉक जगभर प्रसिध्द का आहे? माणसं चांगली जगण्यासाठी. पण आपल्याकडे माणसं मारण्यासाठी मॉर्निंग वॉक कुप्रसिध्द होतोय. तरीही चांगली माणसं अजूनही विवेकाच्या वाटेवर चालताहेत.
डास चावल्याने मलेरिया होतो. पण म्हणून डास मारत बसणं हा उपाय असतो का? नाही. ज्या डबक्यामुळे डास होतात त्यांचा शोध घ्यायचा असतो. ती डबकी स्वच्छ होतील याची काळजी घ्यायची असते. ही डबकी स्वच्छ करायची असतील तर ती नेमकी कुठे आहेत याचा शोध घ्यायचा असतो.
– अरविंद जगताप.
0 Comments