प्रिय रसिक प्रेक्षक,
गेल्या काही दिवसात पुन्हा तुम्हाला चित्रपटगृहात बघून खूप आनंद होतोय. तुम्हाला माहित नाही गेला एक वर्षाहून जास्त काळ मी तुम्हाला बघण्यासाठी किती वेडा झालो होतो. मी एक सतत हाउसफुलचे बोर्ड मिरवायची सवय लागलेलं चित्रपटगृह.
कुणाच्या भाषेत talkies, कुणाच्या भाषेत थियेटर, तर कुणासाठी सिनेमा हॉल. पण एकदा का पडद्यासमोर खुर्चीवर बसले की सगळ्यांची भाषा, जात, धर्म एक होऊन जातो. सिनेमा हाच धर्म होतो. सिनेमा हीच भाषा होते. व्यक्त व्हायचं मध्यम फक्त शिट्ट्या आणि टाळ्या. किंवा कधी डोळ्यातले अश्रू. चित्रपट हेच जग होऊन जातं दोन तास. तुमच्या सगळ्यांची रोजच्या जगण्यातली दुखः विसरून तुम्ही दोन तास माझ्या सहवासात रमून गेलेलं बघणं हा माझा आनंद.
गेलं वर्षभर कोरोनाने हा आनंद हिरावून घेतला होता. मी एकटा पडलो होतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढे दिवस माझ्या खुर्च्या रिकाम्या पाहिल्या. पडदा बंद पाहिला. चित्रपटगृहाचं दार दिवस रात्र बंद असलेलं पाहिलं. मला आठवतं चित्रपट पाहताना कुणी चुकून दाराची फटसुद्धा उघडी ठेवली तरी तुम्ही आरडा ओरडा करायचा. एकच गोंधळ घालायचा. आणि गेलं वर्षभर मी मनातल्या मनात ओरडत होतो, अरे कुणीतरी दाराची फट तरी उघडा. मला बाहेरचा लाईट बघू द्या. कुणीतरी पिटातल्या खुर्चीत येऊन बसा आणि एक जोरदार शिट्टी वाजवा. तुमचा आवाज ऐकायला कानात प्राण आणून वाट बघत होतो. चित्रपट सुरु व्हायच्या आधी तुम्ही सावरून बसताना होणारे खुर्च्यांचे आवाज ऐकायला तळमळत होतो. आता पुन्हा ते आवाज सुरु झालेत.
एक खुर्ची सोडून का होईना लोक सिनेमा बघू लागलेत. खरतर ती मधली खुर्ची फार दिवस रिकामी राहणार नाही. प्रेयसीच्या गळ्यात हात टाकून सिनेमा बघता आला नाही तर काय अर्थ? सिनेमा सुरु झाल्यावर तुम्हीच नकळत कधी हिरो हिरोईन होऊन जाता तुम्हालाच कळत नाही. फायटिंगच्या दृश्यात प्रेयसीने नकळत हात घट्ट धरल्यावर प्रियकराला आपणच अमिताभ बच्चन असल्याचा फील येतो. मी पाहिलंय. बायकोने स्वतःची अर्धी कॉफी नवऱ्याला दिली की तो स्वतः शाहरुख खान असल्याचा त्याला भास होतो. आधी अंकुश चौधरी सारखा गालात हसणारा पण सिनेमा सुरु झाला की सिद्धार्थ जाधव सारखा मोठमोठ्याने दिलखुलास हसू लागतो हे मी डोळ्यांनी पाहिलंय. सिनेमा चालू झाला की दोन तास माणसं आतोनात बदलून गेलेली पाहिलीत मी. दोन तास गडद अंधारात स्वतःच स्वतःला सापडत जातात कित्येक माणसं.
पैलवानासारखे दिसणारे पुरुष घळाघळा रडत असतात. ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नसेल असं वाटतं ते गाणं सुरु झालं की बिनधास्त नाचू लागतात. चित्रपटगृहात माणसं नेहमीपेक्षा वेगळी असतात म्हणता येईल. किंवा चित्रपटगृहात माणसं जास्त खरी असतात म्हणता येईल. पण आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट या गोष्टी धर्म आहेत. खेळाडू आणि अभिनेते देव आहेत. चित्रपटगृहं मंदिरासारखी आहेत. न चुकता दर शुक्रवारी पहिल्या शो ला हजर होणारे लाखो भक्त आहेत.
चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा इतिहास जुना आहे. पण असं म्हणतात की जगातला पहिला सिनेमा बघायला जेंव्हा लोक जमले होते तेंव्हा चित्रपट सुरु झाल्यावर खूप लोक घाबरून गेले होते. पडद्यावर दिसणारी रेल्वे अंगावर येईल असं वाटून काही लोक पळून गेले होते. पडद्यावर असं काही दिसू शकत ही गोष्टच थक्क करणारी होती. हळूहळू लोक आवडीने सिनेमे बघायला येऊ लागले. आज सांगून विश्वास बसणार नाही पण पूर्वी सिनेमाला संगीत देणारे पडद्यासमोर बसून असायचे.
सिनेमात जसा प्रसंग सुरु असेल तशी वाद्य समोर बसून वाजवायचे. सैन्यातला सीन असेल तर स्वतः पायात जाड बूट घालून आवाज करायचे. वेळ प्रसंगी ओरडायचे. हे सगळं पडद्यासमोर चालू असायचं आणि लोक पडद्यावरच्या चित्रात लहान मुलासारखे रमलेले असायचे. हळूहळू चित्रपट बोलू लागले.
भारतात चित्रपटांची सुरुवात मराठी माणसाने केली या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. पण आजवर एकच मराठी सिनेमा शंभर कोटीच्या घरात गेला याची खंतही वाटली पाहिजे. खूप संघर्ष करून सिनेमे बनायला लागले हे मात्र खरं. त्याकाळी स्त्रिया चित्रपटात काम करायच्या नाहीत. ते वाईट मानलं जायचं. मग दादासाहेब फाळके यांनी अण्णा साळुंके नावाच्या अभिनेत्याला आपल्या सिनेमात डबल रोल करायला लावला. खूप लोकांना आश्चर्य वाटेल पण लंका दहन नावाच्या या सिनेमात राम आणि सीता अशा दोन्ही भूमिका अण्णा साळुंके यांनी केलेल्या आहेत. मग हळू हळू दुर्गाबाई कामत यांच्यासारख्या अभिनेत्री पडद्यावर यायला सुरुवात झाली.
चित्रपटगृहात बायकांनी यायला सुरुवातही खूप उशिरा झाली. खूप काळ परुष वेगळे आणि स्त्रिया वेगळ्या बसायच्या. आजच्या पिढीला हे धक्कादायक वाटेल. पण गणपती किंवा अशा काही खास प्रसंगी रात्री मैदानात किंवा रस्त्यावर पडदा लाऊन सिनेमा दाखवला जायचा. तेंव्हा पडद्याच्या एका बाजूला पुरुष बसलेले असायचे आणि दुसर्या बाजूला स्त्रिया. बऱ्याच वेळा स्त्रिया ज्या बाजूला बसलेल्या असायच्या त्या बाजूला सिनेमा उलटा दिसायचा. डावखुरा अमिताभ बच्चन उजवा आहे असच बायकांना वाटत असणार.
आजकाल लोक मोबाईलमध्ये सिनेमे पाहतात. आधी कॉम्पुटर वर पहायचे. पण चित्रपटगृहात सिनेमा पाहणारा माणूस काहीही झालं तरी सिनेमा बघायला चित्रपटगृहातच येतो. कारण सिनेमाची आवड असणारी माणसं सहसा मोठी स्वप्न बघणारी माणसं असतात. त्यांची स्वप्नं छोट्या स्क्रीनवर मावत नाहीत. ७० एम एम किंवा सिनेमास्कोप गरजेचा असतो. सिंगल स्क्रीनचा सिनेमा ही तर अफलातून गोष्ट. ते ठराविक आकाराचे आणि भन्नाट चव असणारे समोसे, popcorn खाल्ल्यावर हळू हळू वेगवेगळ्या रांगेतून त्या प्लास्टिकच्या पिशवीचा फुगा करून फोडण्याचे आवाज यायला लागले की समजायचं सिनेमा बकवास आहे.
एका सिनेमाशी पापडवाले, खारेमुरे, भेळ, कुल्फी, पन्नास पैशात थंड पाण्याचा ग्लास देणारे, तिकिटे black करणारे असे कितीतरी जण जोडलेले असायचे. मिथुन चक्रवर्ती किती मोठा स्टार आहे ते वर्तमानपत्रात येणाऱ्या समीक्षेवरून लक्षात घ्यायचं नाही कुणी. जवळपास सगळ्या कटिंग सलूनवर त्याचं चित्र असायचं त्यावरून लक्षात यायचं मिथुन काय चीज आहे. मिथुन आणि गोविंदाकडे बघून पोरं डान्स शिकले. श्रीदेवीला नीट हिदी बोलता येत नाही या गोष्टीकडे पब्लिकचं लक्ष सुद्धा गेलं नाही. भाषेच्या चुका काढायला दहा वीस रुपयाचं तिकीट काढून कोण जाणार?
मल्टीप्लेक्समुळे खूप गोष्टी बदलत गेल्या. पण अजूनही सिंगल स्क्रीनच आवडणारे लोकसुद्धा आहेत. सिंगल स्क्रीन हे पहिलं प्रेम आहे. सिंगल स्क्रीन आवडणाऱ्या लोकांना मल्टीप्लेक्स म्हणजे अति डाएट करून कुपोषित झालेल्या आणी भडक मेकअप केलेल्या नट्यांसारखे वाटतात. सिंगलस्क्रीन म्हणजे रजनीकांत. स्वतंत्र स्टाईल. स्वतंत्र swag. मल्टीप्लेक्समध्ये बरेच लोक सोफ्यावर झोपून सिनेमे बघतात. सिनेमा असा बघायचा नसतो. सिनेमा खुर्चीच्या काठावर बसून कधी शेजारच्याला टाळी देऊन बघायचा असतो.
सिनेमाची तिकीट आता पूर्वीसारखी रंगीत राहिली नाहीत. ती तिकीट जपून ठेवणारे खूप लोक आहेत. टॉकीजमध्ये शिरल्यावर एक माणूस torch धरून उभा असायचा. लोकांना त्यांच्या सीटवर बसायला मदत करण्यासाठी. त्याची torch सिनेमाच्या त्या मायावी गुहेत घेऊन जायची. खूप निष्पाप लोक व्हिलनला शिव्या देताना बघितलेत मी. खूप बायकांना माहेरची साडीच्या अलका कुबल साठी पदर ओलाचिंब होईपर्यंत रडताना पाहिलंय. डोक्यावरचं कर्जाचं ओझं दोन तास विसरून जायला दादा कोंडकेंच्या सिनेमाला येणारी मंडळी बघितलीत.
अमिताभचे सिनेमे पाहून अन्यायाचा बदला घेण्याची शपथ घेतलेले लोक बघितलेत. हे सगळं गेलं वर्षभर बघायलाच मिळत नव्हतं. आता पुन्हा बघतोय. कोरोनामुळे माणसा माणसातल अंतर वाढलय. माणसं एकत्र आली की फक्त विषाणूचा प्रसार होतो असं वाटायला लागलं होतं. पण माणसं एकत्र आली की सिनेमा नावाचा सोहळा सुरु होतो.
सिनेमा हा कुठल्याही कॅलेंडरमध्ये नसलेला पण दर शुक्रवारी साजरा होणारा सण आहे. या सणाचा दिवसातून चार वेळा मुहूर्त असतो. या सणाला घरचीच नाही तर कुठल्याही जाती धर्माची मंडळी ओळख पाळख नसताना एकत्र येतात. या सणाला हजार डोळे मिळून एकच स्वप्न बघत असतात.
सिनेमा नावाच्या या सणाला गोडधोड नसतं. समोसे आणि popcorn एवढा नैवेद्य पुरेसा असतो. हा सण दर शुक्रवारी साजरा होवो एवढीच प्रार्थना. तुमचं स्वागत करायला मी कायम सज्ज आहे.
तुमची
सिनेमाची टॉकीज
गाड्यांचे सर्व्हिसिंग असते तशी सर्व्हिसिंग करून घ्यायला ठेतरात सिनेमा पहावा… किती छान लिहिलय अरविंद!
भारी