लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी.
लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं हा विचार असतो. पण यात खूप गोष्टी राहून जातात. वकील आणी पोलिसांपासून सरसकट चार हात लांब राहण्याची मानसिकता खूप गोष्टी कळू देत नाही. कायदा, पोलिसांची मानसिकता, कुठल्या तणावात त्यांना काम करावं लागतं किंवा किती तोडक्या मोडक्या सुविधा असताना ते वेळ आल्यावर थेट अतिरेक्यांशी लढतात हे सहज लक्षात येत नाही.
डॉक्टरच्या बाबतीतही तेच आहे. वारंवार एकच एक प्रश्न विचारला जाऊनही डॉक्टर कसे संयमाने वागतात, त्यांच स्वतःचं आयुष्य कितीवेळा धोक्यात असतं या गोष्टी कळतही नाहीत. या कोरोनाच्या काळात सतत डॉक्टर्सचे फोटो बघतोय. बातम्या ऐकतोय. जीवावर उदार होऊन, पुरेशा सुरक्षेच्या वस्तू नसतानाही तुम्ही किती जवाबदारीने संकटाशी लढताय हे बघून तुमच्याबद्दलचा सामान्य माणसाचा आदर खूप वाढलाय. अर्थात दवाखाने बंद करून बसलेलेही काही डॉक्टर आहेत. पण तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. अर्थात इमर्जन्सी नसताना प्रत्येकाने विनाकारण दवाखाना उघडा ठेवायची काही गरज नाही. खरं सांगू डॉक्टर तुम्ही ज्या निष्ठेने काम करताय त्याबद्दल कौतुक केलच पाहिजे तुमचं. खरतर पांढरा रंग शरणागतीचा म्हणूनही ओळखला जातो. पण पांढरा अॅप्रन घातलेल्या डॉक्टरपुढे येताना भले भले शरण आलेले असतात. जग विकत घेऊ शकतो अशी गुर्मी असणारे लोक चहात चमचाभर साखरसुद्धा तुम्हाला विचारून घेतात. एखाद्या लहान मुलाने आईकडे बघावं तसं तुमच्याकडे बघतात माणसं.
तुमच्या डोळ्यातला किंचितसा विश्वास पण जगण्याचं बळ देणारा असतो. तुमच्या शब्दातला आश्वासक स्वर औषधाएवढाच प्रभावी असतो. पोटातच मुल अडून बसलय अशा वेदना होत असलेल्या बाईने केवळ तुम्ही सुटका केली म्हणून बाळाला तुमचच नाव ठेवलेलं पाहिलय. यशस्वी ऑपरेशननंतर आपलं पुढचं आयुष्य डॉक्टरने उधार दिलेलं आहे असं म्हणत कोरा चेक समोर करणारे पण पाहिलेत. पण डॉक्टरवर हल्ला करणारी माणसं कधी डोळ्यांनी पाहिली नाही. ही माणसं या जगात आहेत ती कुणामुळे आहेत? ते कधी दवाखान्यात गेले नव्हते का? त्यांचा जन्म गर्भात झालाय का गटारात ?
भाषा वाईट वाटेल. पण अशा माणसांसाठी चांगले शब्द शोधूनही सापडत नाहीत. थुंकणारी माणसं, नर्सला त्रास देणारी माणसं, आरोग्यसेवकांना एरियात आले म्हणून मारहाण करणारे लोक माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. मुळात आम्ही असे लोक आहेत यावर चर्चा करत बसलोय. या लोकांना किती आणि कशी शिक्षा झालीय हे सरकारने सगळ्या देशाला दाखवून दिलं पाहिजे. सगळा देश न सांगता टाळ्या वाजवेल.डॉक्टर खरतर कौतुक आणी द्वेष या गोष्टीच्या तुम्ही खूप पुढे निघून गेला आहात. लोक कोरोनाविरोधात उपाय म्हणून स्वतःच्याच मनाने गोमुत्र पार्टी करू लागले आणि आजारी पडले तेंव्हा तुम्ही वैतागला असाल. मागे तुमचं कौतुक करण्यासाठी थाळ्या वाजवता वाजवता लोक गरबा खेळायला लागले, रस्त्यावर मिरवणुका काढायला लागले तेंव्हा तुम्ही डोक्यावर हात मारून घेतला असेल.
पुन्हा कधी तुम्हाला अशा कौतुकाची इच्छा होईल असं वाटत नाही. तसेही या संचारबंदीत राजरोसपणे फिरता यावं म्हणून तुमच्याकडे आजारी असल्याचं खोटं प्रमाणपत्र मागणारे पण असतील. उगाच औषध द्या, बरं वाटत नाही म्हणून येणारे पण असतील. सहा महिन्याआधी डोळ्याचं ऑपरेशन करा म्हणून सांगितल असेल तर आता वेळ आहे म्हणून ऑपरेशन करा म्हणून मागे लागणारे असतील. एका पेशंट सोबत चार चार लोक असतील. असे उदाहरण कमी नाहीत. पण तरीही आम्ही या संकटात एक शिकलोय. जात पात देव धर्म सगळं एकीकडे राहतं. आरोग्याच्या संकटात मदतीला असतात फक्त डॉक्टर. लाईफलाईनचे त्रिकोण महत्वाचे असतात. ती रेषा सरळ होऊ नये हे महत्वाचं असतं.
कुठल्याच धर्माची प्रार्थना उपयोगी नसते. फक्त छातीत धडधड आवाज येत राहणं महत्वाचं वाटतं. जगातल्या कुठल्याही प्रार्थनेपेक्षा तो र्हुद्याच्या ठोक्यांचा आवाज जास्त प्रेरणा देणारा वाटू लागतो. श्रद्धा महत्वाची असते. पण ती मनात. बायपास किंवा मेंदूची शस्त्रक्रिया कुठल्याच धर्मग्रंथांत नसते. धर्म फक्त एकच शिकवतो. जे चांगलं आहे त्याचा मान राखायचा. कौतुक करायचं. त्याच्या पाठीशी उभं रहायचं. प्रत्येक संकटात तुम्ही तुमचा आरोग्यसेवेचा धर्म पाळता हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सामान्य माणसाच्या असतात तशा तुमच्याही स्वतःच्या श्रद्धा असतात. अगदी हिप्पोक्रॅटीसचा पण ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता म्हणे. माणसाची कशावर ना कशावर श्रद्धा असते. पण एकेकाळी ती एवढी टोकाची होती की आपल्याच देशात देवीचा आजार झालेल्या पेशंटच्या अंगात देवी आली म्हणून त्याच्या पाया पडायचे लोक. मुल जन्माला आलं की देवाला बोकड द्यायचे.
ज्युलियस सीझरच्या जन्माच्या वेळी त्याला थेट पोटातून काढायची वेळ आली आईच्या. म्हणून पुढे तशा ऑपरेशनला सीझर म्हणू लागले म्हणे. पण बाकी बायकांना परदेशात सीझर करायला खूप काळ बंदी होती. ऑपरेशनच्या वेळी बायकांना भूल द्यायला पाश्चात्य देशात विरोध होता. तिकडे ग्रीसमध्ये थेट देवाच्या पायाशी ठेऊन द्यायचे पेशंटला एकेकाळी. आपोआप बरा होईल म्हणून. अगदी इंग्लंडमध्ये अंगात सैतान आला म्हणून कित्येक मानसिक रुग्णांना मारलं जायचं. अशा भयंकर परिस्थितीत लोकांचा औषधावर आणी वैद्यकशास्त्रावर विश्वास निर्माण करत डॉक्टरांनी जग इथपर्यंत आणलय. स्वतः शिकत. इतरांना शिकवत. आज आश्चर्य वाटेल पण सुरुवातीला डॉक्टरांनाच हात धुवायला सांगावं लागलं. हात अस्वच्छ असल्यावर पेशंटला आजार होऊ शकतो हे माहीतच नव्हतं. नंतर स्वच्छता लोकांना सांगायला लागले.
पण आजही एवढ्या वर्षानंतर आपल्याला लोकांना रस्त्यात थुंकू नका हे सुद्धा सांगावं लागतय. हे अगदी कौटिल्याने पण सांगून ठेवलय. आणि घाण करणाऱ्या लोकांना दंड करा म्हणून पण सांगितलय. उत्खननात आपल्या देशात पूर्वी संडासची भांडी वापरायचे हे सिध्द होतं. मग मधल्या काळात लोक विसरून गेले का? रेल्वे फक्त रुळाच्या कडेला टमरेल घेऊन बसायला असते असं वाटतं काही लोकांना. मग नित्यनेमाने साथीचे आजार सुरु होतात. डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून पेशंट तपासत राहतात. साधे डॉक्टरचे आभार मानायचे पण कित्येकांच्या ध्यानात येत नाही. उलट लोक पावसाळ्यात डॉक्टरांची मजा असते म्हणतात. टेस्ट करायला लावल्या तर लुटतात असं म्हणतात. डॉक्टर टेस्ट न करता तुम्हाला काही झालं नाही म्हणाले तर डॉक्टर चांगला नाही म्हणतात. लक्ष देत नाही.
खूप लोकांना तर छान गप्पा मारणारे डॉक्टर चांगले वाटतात. कमी पैसे घेतले तर डॉक्टर मोठा वाटत नाही. जास्त पैसे घेतले तरी बोंब. डॉक्टर आणि पेशंटचं नातं शेजाऱ्यासारखं होत जातं. तुझ्यावाचून करमेनाच्या पुढची स्टेज असते या नात्यात खुपदा. पण डॉक्टर घरचा माणूस होऊन जातो नेहमीच. आपल्या देशात एकूणच आपण कौतुक करण्याच्या बाबतीत थोडे हात आखडताच घेतो. पण अशा संकटकाळात तुमच्यासारख्या लाखो डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय. मेडिकल दुकानदार आणि सगळे आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले पाहिजेत. कोरोना आज आहे. उद्या नसेल. नसेल हे फक्त तुमच्या भरवशावर सांगू शकतो. उद्या माणसं सुरक्षित असतील ती फक्त आम्ही स्वतः घेतलेल्या काळजीनेच नाही तर तुम्ही घेतलेल्या कष्टाचा पण त्यात खूप मोठा वाटा आहे.
देव देव करायला आयुष्य पाहिजे असेल तर डॉक्टर नावाचा देवदूत सुरक्षित आणि समाधानी असला पाहिजे. हे डोकं जागेवर असलेल्या प्रत्येकाला कळतय. तरी काही आहेतच. ज्यांना अजूनही कळत नाही. या अशा मोजक्याच फालतू लोकांसह तुम्ही सगळ्यांना समजून घेताय, काळजी घेताय त्याबद्दल आम्ही सगळेच मनापासून आभारी आहोत डॉक्टर!
कधी कारण नसताना तुम्हाला फोन केला किंवा भेटायला आलो तर दचकून जाऊ नकातुमचे आभार मानायचेत. आजारी नसताना डॉक्टरला भेटणारी माणसं असतात तो समाज जास्त निरोगी असतो. नेहमी नेहमी डॉक्टरच म्हणतात. आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर! स्वतःचीसुद्धा. धन्यवाद
0 Comments