
आपण एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेली मराठी माणसं.
आपण एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेली मराठी माणसं. मराठयांचं साम्राज्य होतं तेंव्हा पश्चिम बंगालमध्ये मराठी माणसांचा दरारा होता. पानिपतला आजही मराठ्यांचं नाव आदराने घेतलं जातं. दिल्लीचे तख्त राखतो अशी एकेकाळी मराठी माणसांची ख्याती होती. आणि आज तर मराठी माणूस जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवतोय. भले आपल्या देशात मराठी माणूस अजून पंतप्रधान झाला नसेल. पण कॅनडात मराठी माणूस पंतप्रधान झाला. एकेकाळी समुद्र ओलांडून जाणं पाप समजलं जात असेल या गोष्टीवर आता विश्वाससुद्धा बसणार नाही. समुद्र ओलांडून परदेशात जाणं पाप समजलं जाणं नंतरची गोष्ट. त्याआधीचा इतिहास बघितला तर व्यापारात आपण खूप प्रगती केली होती. जगातल्या कित्येक देशात आपले लोक व्यापारानिमित्त पोचले होते. वेगवेगळ्या देशात असलेली पुरातन मंदिरं, बुद्धाच्या मुर्त्या हेच सिध्द करतात की आपले लोक जगभर जात होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या पत्रातसुद्धा काही पुरावे सापडतात. एडमंड बर्क नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे हणमंत नावाचा एक मराठी माणूस गेला होता. १७८१ साली. सुरुवातीला इंग्लंडला जाऊन आलेल्या लोकांपैकी हणमंतराव एक नाव. १८४० साली छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे वकील म्हणून गेलेले रंगो बापू पण आपल्याला माहित आहेत. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने बरेच लोक इंग्लंड अमेरिकेत जाऊ लागले. या लोकांनी केलेलं प्रवासवर्णन एवढीच आपल्याला त्या देशाची ओळख असायची.
इंग्लंडमधील प्रवास अशा नावाचे एक जुने प्रवासवर्णन आहे.१८६३ साली इंग्लंडला गेलेल्या करसनदास मुलजी यांनी लिहिलेय. मेणाच्या पुतळ्याचं म्युझियम, उद्यानं, नाट्यगृह अशा सगळ्या गोष्टीवर त्यांनी खूप बारकाईने लिहिलंय. त्याकाळी हॉटेलमध्ये ‘ वेटर’ असा आवाज दिल्यावर माणूस कसा ‘यस सर’ म्हणत तुमच्यापाशी येतो या गोष्टीचं त्यांना वाटलेलं कौतुक. ऑपेरा पाहताना इंटरवल मध्ये उजेडात तिथले स्त्री पुरुष कसे खुशाल एकमेकांकडे बघत असतात याचं वाटलेलं आश्चर्यही त्यांनी सांगितलंय. त्याकाळीसुद्धा त्यांनी लंडनमध्ये राहणं किती महाग आहे याविषयी काय लिहिलंय बघा.
लंडनमध्ये ज्या गृहस्थाचे उत्पन्न ४००० रुपयेच असेल त्याने लग्नच करू नये, किंवा केलेच तर त्याचा निभाव लागणे कठीण आहे. त्याला एकेक शिलिंग मोजावा लागणार. आणि होणारे प्रत्येक मूल त्याच्या त्रासाचे आणि संतापाचे कारण असेल.
इंग्लंडचं अगदी बारीक सारीक वर्णन करसनदास यांनीकेलंय. उदाहरणार्थ तिथल्या लोकांच्या घराचे दरवाजे कसे कायम बंद असतात. तिथले लोक एकमेकांचं दार वाजवून घरात येतात. इंग्लंडमधले लोक टूथब्रशने दात घासतात. आणि विशेष म्हणजे ते आपल्यासारखे खिडकीत उभे राहून किंवा ओट्यावर दात घासत बसत नाहीत याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय. तिथला बॉल डान्स पाहून ते लिहितात, बॉलमध्ये नाचण्याच्या पद्धती पुष्कळ आहेत. तीनशे निरनिराळ्या पद्धतीने नाचता येते म्हणून सांगतात. मी ह्या चालीचा धिक्कार करतो असे नाही. पण स्त्रियांनी आणि पुरुषांनी परस्पर अंगास अंग लागेल अशा रीतीने नाचणे हे माझ्या मनाला काही ठीक वाटत नाही.
करसनदास यांना त्याकाळी कल्पनाही नसेल की हे नाचगाणे आपल्या देशात पण लोकप्रिय होणार आहेत. असो. १८६३ साली आपल्या देशातला माणूस इंग्लंड बघायला जातो. ते सगळं सविस्तर लिहून ठेवतो ही मोलाची गोष्ट आहे. या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी लिहिलंय की माझ्या प्रवासाबद्दल लोक काहीही म्हणोत. मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यांना तुमच्याकडून पाप झालं वगैरे ऐकावं लागलं असणार.
परदेशात जाण्याविषयी आपल्याकडे असलेले गैरसमज याला कारण होते. पण हे गैरसमज मोडीत काढून आपले लोक विदेशात फिरू लागले. जगभर जाऊन स्थायिक झाले. या माणसांमुळे जग आपल्या जवळ आलं. वालचंद हिराचंद नावाच्या सोलापूरमध्ये जन्मलेल्या माणसाने थेट मुंबईहून इंग्लंड ला जाणारी बोट सुरु केली. इंग्रजांच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय त्यांनी सुरु केला. पण इंग्रजांनी त्यांना प्रवासीच मिळू दिले नाहीत. इंग्लंडहून बोट रिकामी कशी आणायची? वालचंद यांनी लोखंड विकत घेतलं आणि बोट घेऊन आले. पण व्यवसायात माघार घेतली नाही. डॉक्टर कोटणीस यांच्यासारखे लोक विदेशात अजरा मर झाले. जगातल्या महत्वाच्या कंपन्या असोत किंवा इंग्लंड, अमेरिके सारख्या देशातल्या सरकारमधला भारतीय माणसाचा सहभाग असो. अगदी थोड्या काळात आपली माणसं जगाच्या नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली. आपला मराठी माणूस जगातल्या सगळ्या महत्वाच्या देशात दिसू लागला. दादासाहेब फाळके यांच्यासारखा माणूस एकदा परदेशात जातो आणि भारतात चित्रपटसृष्टीचा पाया रचतो. डॉक्टर रखमाबाई, डॉक्टर आनंदी जोशी, पंडिता रमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांनी त्याकाळी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं धाडस दाखवलं. या लोकांना खूप काही सोसावं लागलं. पण त्यांच्या कष्टांच फळ आज दिसतंय.
0 Comments