घेणंदेणं आणि देणंघेणं

30 July 2025

दिवस सुरू होतो तसे आपण काहीतरी मिळवायचा प्रवास सुरू करतो. सूर्याकडून आशीर्वाद. ऊर्जा. प्रकाश. सोशल मीडियावर येणारे सुविचार. प्रेरणा. आरती. पूजा. देवाचा प्रसाद आणि आशीर्वाद. मोठ्यांचा आशीर्वाद. दिवसभर हे चक्र चालूच राहतं. बस किंवा ट्रेनमध्ये जागा मिळवणे, तिकीट मिळवणे, कॅब मिळवणे, मिटिंगची वेळ मिळवणे. बॉसची शाबासकी मिळवणे, बॉसने आपल्यापांचट विनोदावर दाद मिळवणे, क्लार्कने कामातून सुटका मिळवणे, कंडक्टरने सुटेपैसे मिळवणे, बाईकवाल्याला ग्रीन सिग्नल आणि कारवाल्याला पार्किंग मिळवणे. हे सगळं आपण मिळवत राहतो. रात्र होईपर्यंत. झोप मिळवेपर्यंत. आणि झोपलागल्यावर आपल्याला विचारही येत नाही की आपण देतोय काय? देण्याचा विषयआला की सगळ्यांच्या तोंडी एक वाक्य हमखास येतं. आम्ही  कर देतो. अगदी कर न देणारेही या देशात सहज बोलून जातात की आम्ही कर देतो. बोलायला कायलागतं? पण कर देणं हे काही देणं नाही. आपल्याला पूर्वीपासून एक शिकवण आहे. दान सत्पात्री असायला पाहिजे. मदत असो किंवा वर्गणी. ती योग्य ठिकाणी, योग्यव्यक्तीला गेली पाहिजे. मग कर देताना हा विचार आपण करतो का? रस्त्यातकचऱ्याचे ढीग आणि उघड्या गटारी बनवणाऱ्या महापालिकेला कर देण्यात कायकौतुक? कोर्टाने डोळे वटारले की चक्क निविदेतले तीन हजार कोटी कमी करणाऱ्यासरकारला आपण कर देतो यात कसला अभिमान? कोणत्या हिशेबाने ते तीन हजारकोटी जास्त लावले होते? आणि आता कमी केले म्हणजे ते भलत्याच कुणाच्या तरीखिशात जाणार होते. आधीचे लोक भ्रष्ट होते म्हणून नवीन लोक आणले तर ते तसेच निघाले. मुळात नवीन लोक आले म्हणावं तर ही कालच्याच डाळीला दिलेली फोडणी आहे. काल डाळ होती आज ती डाळफ्राय आहे एवढच. पण डाळीत कालही काहीतरी काळं होतं. आजही आहे. बदल फक्त फोडणीचा आहे. तरीआपण कर देतो म्हणून खुश असतो. कर कुठे जातो याचं काही देणं घेणं नसतं.

कर देतो तसे आपण मत देतो. दोन्ही गोष्टीत आपण उद्याचा काय आजचाही विचार करत नाही. कर देताना बदल्यात काय मिळतं हे आपणतपासत नाही. मत देताना बदल्यात काय मिळतंय हे पण तपासत नाही. नंतर थेट दुष्परिणाम दिसतात. पण आपण शांत असतो. आपण ज्या गोष्टी स्वतःसाठी घेतो त्याची काळजी करतो. कपडे, मोबाईल, झाडू अगदी डस्टबिनपण आपण नीट बघून घेतो. पण जी गोष्ट आपला हक्क बजावल्यावर मिळणार आहे ती मात्र आहे तशी स्वीकारतो. आपण ज्या व्यक्तीला मत दिलं त्याची किंवा त्याच्या पक्षाची एक विचारसरणी असते. धोरण असतं. ते बासनात गुंडाळून तो भलत्याच कुणाच्या तरी मांडीला मांडी लावून बसतो. हे काहीवर्षापूर्वी व्हायचं. आता मांडीला मांडी लावून नाही तर थेट मांडीवर जाऊन बसतात. पूर्वी विचारसरणी सोडून सत्तेपुढे झुकणारे लोक होते. आता थेट लोटांगण घालणारे आहेत. तरीही आपण आपल्या मताचा विचार करत नाही.

आपण स्मिता पाटीलच्यासिनेमाचं तिकीट काढलं आणि तिथे सिल्क स्मिताचा सिनेमा सुरू झाला तर काय वाटेल? आपल्या मताबद्दल अशीच फसवणूक राजकीय लोक करत नाहीत का? ज्याप्रकारे सरकार बनवलं जातं तो प्रकार आंब्याच्या झाडाला लिंबोळ्या आल्यासारखा वाटत नाही का? मतदान पवित्र गोष्ट आहे असा प्रचार सरकार करतं. पण आपला आजवरचा अनुभव काय आहे? कायम  मंदिराच्या दानपेटीत टाकलेलेपैसे जुगार  खेळायला वापरल्यासारखा प्रकार होतो. यातला पहिला गंभीर प्रकार होता आणीबाणी. अचानक लोकशाहीचा आत्माच घालवला. पण त्यानंतर हा प्रकारचालूच राहिला. सीबीआय, न्यायालय यांच्या जोडीने. न्यायमूर्ती निवृत्त झाल्यावर खासदार होऊ लागले. सैन्य अधिकारी राजकारणात येऊ लागले. लोकपालसाठी बाहेर काढलेल्या मेणबत्त्या नंतर फक्त कँडल लाईट डिनर पुरत्याच उरल्या. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकावर आरोप करतात आणि आपल्याला काय मिळतं? मनोरंजन. आपण लोकशाहीमध्ये काय मिळवतोय? मनोरंजन. आपली जी कुठलीविचारसरणी आहे तिच्या विरोधात काही घडलं की आपलं मनोरंजन होतं. तेवढ्यावर आपण खुश आहोत. आपल्या मुलाला पन्नास रुपये दिले आणि दुकानात काहीखरेदी करायला पाठवलं तर आपण चोख हिशेब घेतो. पण हजारो कोटी ज्यांच्याहाती असतात त्या महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारला आपण कधी हिशेब विचारलाय? आपल्या मुलावर अविश्वास आणि सरकारवर अंधविश्वास? नवरा बायकोला विचारतो, बचत का होत नाही? बायको नवऱ्याला विचारते, पैसे कुठे खर्च होतात? पण सरकारला कुणीच विचारत नाही. घरात स्वच्छता नसेल तर बायकोवर चिडचिड करणारा शीघ्रकोपी नवरा रस्त्यात एवढे खड्डे का आहेत म्हणून आयुक्ताला जाब विचारत नाही. मुलाने ऐंशी टक्के मिळवले तरी त्याच्यावर रागावणारा बाप मंत्र्याच्या प्रगती पुस्तकाची चर्चा करत नाही.

आपण राहतो ती सोसायटी आपल्यासाठी खूप महत्वाचीअसते. तिथे आपलं घर असतं. तिथे आपल्याला सगळं नीट पाहिजे. तिथे गणपती वर्गणीत दिलेल्या हजार पाचशेचा सगळा हिशेब पाहिजे. पण आपण दिलेल्याकराचा हिशेब नको. आपण दिलेल्या मताचा हिशेब नको. आपल्या सोसायटीतअमक्या लोकांना घर देऊ नका म्हणून आग्रह करणारी मंडळी आपल्या राज्यात, देशात कोण मंत्री होतो याचा विचार करत नाहीत. ड्रायव्हर ठेवायचा तर शंभर वेळाविचार करणारी मंडळी राज्य कोण चालवणार ? या गोष्टीचा मात्र फार विचार करतनाहीत. हे विनोदी वाटतं पण खूप चिंताजनक आहे. मुघल आले तेव्हा त्यांनी एवढं सहज आपल्याला कसं पराभूत केलं याचा खूप विचार झाला. बहुतेक इतिहासतज्ज्ञ मानतात की देश ही भावना कमी पडली. शेजारी आक्रमण झालं, आपल्यावर नाहीया मानसिकतेत बरेच लोक राहिले. आता आपण देश आहोत. पण एक आहोत? आपण आपल्याला काय हवंय हाच विचार करतोय. देशाला काय हवंय? राज्याचीकाय गरज आहे? शहर कसं पाहिजे? गावात काय बदल पाहिजे? हा विचार करतोयका? किती लोक करतात? आपली हिशेबाची सवय किराणा दुकान, आपलाइएमआय, आपल्या सोसायटीचा मेंटेनन्स या पलिकडे गेली पाहिजे. महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार आपलं आहे. आपल्या गोष्टींचं देणंघेणं असायला पाहिजे. तसंही देण्याघेण्याच्या गोष्टीवर लक्ष असेल तरच ती आपली आहे असं आपणमानतो. कारण घेणंदेणं असेल तर देणंघेणं लक्षात राहतं.

Tags

तुम्हाला काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचण्यासारखे...