बोलायची हिंमत नाही…

February 26, 2021

लेखन

arvind jagapat patra

शेतकऱ्याला कायम स्वतःसाठी बोलायची हिंमत मिळो यासाठी बोललं पाहिजे. जातीसाठी बोलणारे खूप आहेत. शेतीसाठी बोललं पाहिजे.

आमचा एक मित्र सोबत फिरत असताना म्हणाला, कितीतरी शेतकरी हातात काठी घेऊन नुसते बसलेले दिसतात माळावर. काही काम का करत नाहीत? त्याला बिचाऱ्याला ते शेतकरी गुरं सांभाळताहेत हेच लक्षात आलं नव्हतं. असा प्रत्येकाचा एक चष्मा आहे. त्या चष्म्यातून तो शेतकऱ्याकडे बघत असतो. त्यात खूप सिनेमे आणि कविता खेड्यातल्या शेतीचं खूप romantic वर्णन करतात. हिरव्यागार  पिकातून फिरणारे नायक नायिका, तुडूंब भरलेल्या विहिरी, तलाव, नद्या आणि भले मोठे वाडे. हे सगळं पडद्यावर बघणे वेगळी गोष्ट आहे. पण जरा दोनचार गावातून चक्कर मारली तरी खरं चित्र डोळ्यासमोर येतं. पण खरी परिस्थिती माहित असूनही किती लोक बोलतात? मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण मधल्या शेतकऱ्याची व्यथा थोड्याफार फरकाने सारखीच आहे. त्यात आता शेतकरी आणि शेतकरी विरोधी असे दोन गट झालेत उघड उघड. आधी ज्याला आपण इंडिया आणि भारत म्हणायचो. सोशल मिडीयावर शेतकऱ्याच्या बाजूने काही लिहिलं तर आम्ही कर भरतो म्हणून उर बडवत लोक हजर होतात. शेतकरी पेट्रोल पासून गोडेतेला पर्यंत कुठल्या गोष्टीत कर देत नाही? साबण असो किंवा मीठ प्रत्येक गोष्टीत कर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बदल्यात धड दवाखाना नाही. शाळा नाहीत. रस्ते नाहीत. नियमित वीज नाही. रस्ते नाहीत. खरतर सरकार खेड्यांकडून कोणत्या तोंडाने कर मागत असेल याचं आश्चर्य वाटतं. शहराच्या तुलनेत खेड्यांची बकाल अवस्था बघितली तर आयकर या विषयावर कुणी चर्चा सुद्धा करणार नाही. पण आता हे बोलायचीच चोरी झालीय. शेतकरी कुठल्याही सरकारच्या काळात बोलू शकत नव्हता. आधी त्याला आपलं म्हणणं नीट मांडता येत नव्हतं. मग शेतकऱ्याला विरोधकांनी गोळा केलं. अन्याय समजवून सांगितला. बोलायला प्रवृत्त केलं. शेतकरी बोलायचं ठरवू लागला. आणी नेमके जे सत्तेत होते ते विरोधात गेले. जे विरोधात होते ते सत्तेत आले. आणि आपल्याला एकेकाळी बोला बोला म्हणणारे शांत बसा म्हणताहेत हे बघून शेतकरी हैराण झाला. एकेकाळी आपल्याला आपण कसे सुखात आहोत हे सांगणारे आज आपल्याला आपल्यावर अन्याय होतोय हे सांगताहेत हे बघून तो चक्रावून गेला. विरोधक बोलतात किंवा सत्ताधारी बोलतात. खरा शेतकरी कुठे बोलताना दिसतोय? आणि कोण त्याचं ऐकताना दिसतय ?

                     शेतकरी भोळा नसतो. असहाय नसतो. पण त्याची सगळी ताकद त्याच्या शेतात खर्च होत असते. त्यामुळे त्याला त्याचा माल विकण्याचं गणित सोडवता येत नाही. त्याला अंबानीच्या मोबाईल डाटासारखा वर्षभर माल मोफत देता येत नाही. कारण त्याला शेजारच्या शेतकऱ्याला संपवायचं नसतं. शेतकरी एकमेकांच्या शेतात जनावरं घुसले म्हणून भांडायचे. आता जनावरं राहिले नाहीत फार. पण म्हणून शेतात व्यापारी कसे शिरू द्यायचे? आणि त्याने फायदा होणार आहे का? आणी आपल्याला हजारो शेतकर्यांना त्यांचा फायदा होणार आहे हे समजावता का येत नाही? नेमकं काय चुकतय? शेतकर्यांचे कान भरण्याएवढा विरोधी पक्ष प्रभावी आहे का? कुठेतरी इगो या मुद्द्यावर हा प्रश्न अडकलाय का? मुळात विश्वास ही एक गोष्ट पण महत्वाची आहे. कुठलेही सरकार एखाद्या पिकात शेतकऱ्याचा फायदा होत असला की लगेच आयातबंदी हटवते. कांदा असो किंवा डाळी असोत. शेतकऱ्याला दोन पैसे मिळू लागले की परदेशातून निर्यात सुरु होते. तेंव्हा मेक इन इंडिया वगैरे आठवत नाही. फवारणीच्या औषधाने शेतकरी जीवाला मुकले. काय न्याय मिळाला? काय कारवाई झाली? दरवर्षी बोगस बियाणे विकले जातात. शेतात काही उगवतच नाही. शेतकरी उर बडवत राहतो. काय न्याय मिळतो? कुठल्या कंपनीवर कारवाई होते? पिकविम्यात सगळ्यात जास्त कमाई विमा कंपनीची होते. शेतकऱ्याला कर्ज द्यायला बँक तयार नसते. प्रत्येकवेळी विरोधात असणारा पक्ष कर्जमाफी आणी वीजमाफीचे आश्वासन देतो. मुळात या सवई राजकीय पक्षांनी लावलेल्या आहेत. कर्जमाफी शेतकरी मागत नसतो. ते राजकीय पक्षाचे जाहीरनामे आणि वचननामे यातले आश्वासन असते. शेतकरी हमीभाव मागतो. हमीभाव म्हणजे आकडेमोड आणि तज्ञांच्या भाषेतले घोळ नाही. साधी सरळ हमी. कांदे असो किंवा तूर असो…रस्त्यावर फेकायची वेळ आणू नका. ही हमी तरी देता येते का? या वर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी किती महिन्यांनी केली हे आपण बातम्यांमध्ये पाहिले. काय नुकसानीचा अंदाज येणार होता एवढ्या महिन्यांनी? आपल्याला पंजाब हरयाणाच्या शेतीचे प्रश्न कळत नसतील. पण आपल्या आसपासचे तर कळू शकतात. सोशल मिडीयावर आपल्या थिल्लर वागण्याने आपला भाउबंद असलेला शेतकरी बदनाम होतोय, दुखावतोय हे लक्षात घ्यायला नको का? उठसुठ आम्ही कर भरतो म्हणणाऱ्या लोकांनी या देशात किती टक्के लोक कर भरतात याची यादी तपासलीय का? विरोधात असताना पेट्रोलचे भाव वाढले म्हणून कपाळावरचं कुंकू पुसल्यागत आक्रोश करणारे, बांगड्या फोडणारे सत्तेत गेले की पेट्रोलचे भाव वाढले तरी हनिमूनला आल्यासारखे संसदेत येतात. सत्ताधारी आणि विरोधी बाकावर सारख्याच संख्येने असलेले हे नाटकी लोक इंडिया आणि भारत अशी उघड विभागणी व्हायला कारण होऊ नयेत. त्यांना जेवण, दवाखाना, प्रवास मोफत आहे. आपल्याला नाही. आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. हे एकमेकांना जवाबदार ठरवत राहतील. पण आपण स्वतःला जवाबदार बनवलं पाहिजे. जवाबदारीने वागलं, बोललं पाहिजे.

                शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा नसला तर नका देऊ. पण शेतकरी देशद्रोही आहे अशी मांडणी करायची गरज नाही. चार दोन लोकांमुळे शेतकरी बदनाम करायची गरज नाही. हरभऱ्याच्या शेतात गेल्यावर कशी खाज सुटते, उसातून फिरताना कसे पात्याचे वार होतात, कापूस वेचताना काय हाल होतात किंवा आंबा उतरवताना काय कष्ट असतात हे आपल्याला माहित नसेल तर त्या विषयावर शहाणपणा शिकवायची गरज नसते. शेतकरी कधी या देशात एवढे कमी लोक का कर भरतात म्हणून चर्चा करत नाही. मोठमोठे महामार्ग बनतात. प्रकल्प येतात. अचानक लक्षात येतं की त्या जमिनी एखाद दोन वर्षाआधी व्यापाऱ्यांनी, सत्तेतल्या लोकांच्या दलालांनी आधीच घेऊन ठेवल्यात. मोबदला त्यांना मिळतो. शेतकरी काही बोलू शकत नाही. एकेकाळी खुडूक म्हणून विकलेली कोंबडी सोन्याचं अंडे देणार होती याची जाणीव होते तेंव्हा आतल्या आत किती वेदना होत असतील त्याला. पण पिढ्या न पिढ्या हे सुरु आहे. या विषयावर सात आठ वर्षापूर्वी एक पत्र लिहिलं होतं. कवितेसारखं.

 पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
माफ कर पारू मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पीकाला नाही कवड्या भेटल्या
चार बुकं शिक” असं कसं सांगु पोरा
गहाण ठेवत्यात बापाला का?” विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जमीनीनं सारं पिक गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळ्यात धारा
कर्जापायी भटकून शिरपा गेला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही

आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी
नाही मला जमलं तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामाचं ते, जीव द्याया आलं कामी
माझ आन् सरकारचं वझं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकर्‍या किंमत न्हाई

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही….

बोलायची हिम्मत नाही हे सांगणारं हे गाणं. पण शेतकऱ्याला कायम स्वतःसाठी बोलायची हिंमत मिळो यासाठी बोललं पाहिजे. जातीसाठी बोलणारे खूप आहेत. शेतीसाठी बोललं पाहिजे.

 

Photo © Sharad Patil  

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *