आपल्या पिढीचे बाप …

June 21, 2020

लेखन

arvind jagapat patra

आपल्या तरुणपणी प्रेयसीसारखे वागायचे बाप. प्रेम आहे हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत. आपणच ओळखायचं नजरेत.

बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात आणि या सिनेमात प्रत्येक बापाचा रोल एकसारखाच लिहिलेला होता. पेपरात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे, तो पेपर सातबाऱ्यासारखा जपून ठेवणारे बाप. 

पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलंय याचा थांगपत्ता लागू देणारे बाप. आपल्या तरुणपणी प्रेयसीसारखे वागायचे बाप. प्रेम आहे हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत. आपणच ओळखायचं नजरेत. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा नाही अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची. आणि आपण बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानाने फुलून यायची. 

कणगीसारखे बाप. रांजणासारखे बाप. दुष्काळातसुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप. कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही. मनी ऑर्डरवाले बाप. पेपरात गुंडाळून जिलेबी आणि भजे आणणारे बाप. आईला आवडत नाही म्हणून गुपचूप ऑम्लेट करून खाऊ घालणारे, तव्याचा वास येऊ नये म्हणून त्यावर ज्वारीचं पीठ जाळणारे. तो धूर बाप लेकाचं वंगाळ खाण्याचं पाप नष्ट करण्यासाठी केलेल्या यज्ञासारखा वाटायचा. शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला पराक्रम किती थोर होता. बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना. मंत्री संत्री खिजगणतीतही नव्हते. बापच देश चालवायचा असं वाटायचं. कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून, हातातली bag घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचा. हा झाला आपल्या लहानपणीचा काळ. 

पण आपण मोठं झाल्यावर, पोटापाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपली भेट व्हावी म्हणून लहान मुलासारखी वाट पाहणारा बाप …त्याचं काय? लहानपणी घाबरून असायचो. लपून बसायचो चूक झाली की. पण आता पारावर, देवळात, गॅलरीत, गार्डनमध्ये बसलेले आपले वय झालेले बाप दिसतात. वय झाल्यावर हे बापलोक आईच होऊन जातात. जरब असलेले डोळे असे मायाळू कसे होतात? 

कित्येक पूर पाहिलेल्या खडकासारखे बाप अचानक पावसात भिजणाऱ्या ढेकळासारखे मऊ होतात. वाईट काही नाही. पण आपल्याला सवय नसते. प्रत्येक बाप काही बोलताही मुलाला ओळखून असतो. फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. कधी जमेल माहित नाही. पण जमलं पाहिजे. ते जमेल तेंव्हा. पण हा बाप शब्द आपण जपला पाहिजे. 

ज्ञानेश्वरांचा शब्द आहे. ‘ बाप रखमादेवीवरु ..’ बाप खूप छान शब्द आहे. वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं. बाप म्हणजे कम्प्लीट बाप वाटतं. आपण व्यक्त व्हायला लाजायला नको. बाप शब्दाच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष बापाच्या बाबतीत.

 

Photo © Click’r Sharad Patil 

1 Comment

  1. Trupti

    Khup mast lihle ahe.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *