
खरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतं
खरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतं. अजूनही वर्तमानपत्रात काही छापून आलं की भारी वाटतं. पाहिळ्यापासून पत्रकार व्हायचं स्वप्न होतं. ते काही होता आलं नाही. पण पत्रकारासारखं जगायची सवय लागली. फिरायचं, लोकांशी बोलायचं, वेगळा angle शोधायचा प्रयत्न करायचा. ही सवय तशी खूप कामी आली. सुरुवातीला मराठवाडा नावाच्या दैनिकासाठी लिहायचो औरंगाबादला असताना. जयदेव डोळे सरांनी लिहायला लावलं. त्यांना वाटलं मला शिस्त लागेल. पण मी त्याकाळात एकदा सिल्क स्मिताच्या सिनेमाचं परीक्षण लिहिलं होतं. एकूण त्यांच्या लक्षात आलं की ही केस सुधारणार नाही. पुढे नाटक, सिनेमावर लिहिलेलं वाचून डॉक्टर दिलीप घारे आणि यशवंत देशमुख यांनी नाटकात नेलं. त्यांच्या डोक्यालाही खूप ताप झाला होता माझ्यामुळे. माझ्या एकांकिकेवर एकदा कोर्टात केस झाली. एका एकाकिकेमुळे मोर्चा निघाला. एक एकांकिका लोकांनी संतापून बंद पाडली. असं सगळं प्रक्षोभक वगैरे म्हणतात तसं काही काळ झालं. नेमक्या त्याचं काळात मकरंद अनासपुरेनी माझी एक एकांकिका बघितली. त्याने मांजरेकरांचा एक सिनेमा लिहायला बोलवलं थेट. पण ते जमलं नाही. मुंबईत थांबायला जी चिकाटी लागते ती नव्हती. औरंगाबादमध्ये एकांकिका चालू असायच्या. तिथूनच ये जा करून निशिगंधा वाडच्या ओळखीने मालिका लिहू लागलो. मकरंदची भेट व्हायची. सिनेमाचा विषय निघायचा. पण आपल्याला जमणार नाही असं वाटायचं. त्यासंदर्भात काही ज्ञान नव्हतं. पटकथा कशाशी खातात काही माहित नव्हतं. असा बराच काळ गेला. काही कळत नसताना एक दोन सिनेमे लिहिले. आणि एक दिवस मकरंदचा फोन आला. मी आता सिनेमाची निर्मिती करणार आहे म्हणाला. तो सयाजी शिंदे, नागेश भोसले मिळून सिनेमा करणार होते. गोष्ट छोटी डोंगराएवढीचा विषय त्यांच्या डोक्यात होता. पण सोबत आणखी एक विनोदी सिनेमा करायचा होता. मकरंदने मला काहीतरी चांगला विनोदी विषय घेऊन पुण्याला ये असं सांगितलं. सयाजी शिंदे हैद्राबादहून येणार होते. मी ठीक आहे म्हणालो. पण मिटिंगच्या दिवसापर्यंत काहीच लिहून झालं नाही.
पुण्यातल्या एका हॉटेलात सयाजी शिंदे, मकरंद आणि नागेश भोसले मी गोष्ट ऐकवणार म्हणून बसले. मी लिहिलं काहीच नव्हतं. उगीच कागदाकडे बघत बळेच काहीतरी वाचू लागलो. मकरंदने सयाजी शिंदे आणि नागेश भोसलेंना सांगितलं होतं की अरविंद खूप चांगलं लिहितो. विनोदीपण. आणि मी जे वाचतोय ते ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलत नव्हती. आपली चक्कर वाया गेली म्हणून सयाजीराव वैतागले होते. पण ही गोष्ट माझ्यापेक्षा मकरंदच्याच जिव्हारी लागली. रात्री आम्ही मकरंद थांबला होता त्या स्वरूप हॉटेलला गेलो. मकरंदने तिथल्या एका मित्राला सांगितलं की ह्याच्याकडे बघा. ह्याला हॉटेलमध्ये काय पाहिजे ते द्या. पण इथून बाहेर पडू द्यायचं नाही. स्वरूपच्या खोलीत मला कैद करून टाकलं होतं. लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. मकरंद दिवसभर शूटिंगला जाणार आणि रात्री आल्यावर दिवसभर काय लिहिलं ते वाचणार असं ठरलं. खरंतर गल्लीत गोंधळची गल्ली सुद्धा तोपर्यंत डोक्यात नव्हती. फक्त राजकीय डावपेचांची गोष्ट असली पाहिजे असं आम्ही बोलत होतो. माझा आजही विश्वास बसत नाही पण दोन दिवसात या सिनेमाचा पहिला ड्राफ्ट मी लिहून पूर्ण केला होता. तोपर्यंत ऐकलेल्या राजकीय गोष्टी, कॉलेजपासून असलेली गप्पांची सवय, पेपर मन लावून वाचणे या गोष्टी खूप कामी येतात हे त्यावेळी लक्षात आलं.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा गोष्ट छोटी डोंगराएवढी सिनेमासोबत एक विनोदी सिनेमा करूया असं म्हणून सुरु झाला. पण पहिला ड्राफ्ट वाचल्यावर सगळे एकदम चार्ज झाले. सयाजी शिंदे पण तेंव्हापासून मला लेखक समजायला लागले. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा लहानपणापासून पाहिलेल्या, ऐकलेल्या राजकीय चढाओढीचा कोलाज होता. आमच्याकडे एका उमेदवाराने एक आणि दोन रुपयांच्या नोटा नेल्या होत्या अर्ज भरायला. चिल्लरचाही किस्सा ऐकला होता. सोन्याची टोपीचा विनोद आधीच होता. तो योग्य प्रसंगात वापरात आला. गल्लीत गोंधळ मधल्या नारायण वाघसारखे कित्येक कार्यकर्ते गावोगाव आहेत. मागे एकजण भेटला तो म्हणाला मी गल्लीत गोंधळमधला नारायण जसा भेटायला जायचं त्या नेत्याचे फोटो खिशात ठेवतो तसा मी मोबाईलचं कव्हर वापरतो. ज्या नेत्याला भेटायला जायचं त्या नेत्यांच्या फोटोचं कव्हर मोबाईलला लावतो. आणखी एकजण माहित आहे. तो ज्याला भेटायचंय त्याचा फोटो मोबाईलवर स्क्रीनसेव्हर म्हणून ठेवतो. स्टेजवर जाऊन नेत्यांच्या कानात चहा आणू का साहेब? असं विचारणारे नंतर तोच फोटो साहेबांशी चर्चा करताना असं लिहून फेसबुकवर टाकतात. असे असंख्य कार्यकर्ते पाहिलेले आहेत जे आयुष्यभर गुलालाला महाग असतात. गुलालाला महाग म्हणजे ज्यांच्या अंगाला कधीच गुलाल लागला नाही. जे विजयी झाले नाही. अशा कार्यकर्त्यांना ते अडगळीत पडले की काय म्हणतात माहितीय? ते कवाच बाद झालं. त्याचं खत झालं आसल आता. म्हणजे पुरल्या गेलेल्या वस्तूचं कुजून काही काळाने खत होतं तसं. आणखी एक वाक्य अशा स्पर्धेतून बाद झालेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत वापरतात. त्याचं काय राहिलंय आता? त्याच्यावर पार हारळी उगवली आसल.
राजकारणात मला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचं नेहमी उतुह्ल वाटत आलंय. कित्येक कार्यकर्ते नेत्यासाठी अंगावर केस घेऊन तुरुंगात गेलेले पाहिले. कित्येक कार्यकर्ते कायम सतरंजी उचलायलाच राहिले. घराणेशाहीमुळे कार्यकर्त्याला फारशी संधी मिळत नाही. बापाच्या पण पाया पडायचं. मग पोराच्या पण पाया पडायचं हेच त्याच्या नशिबी येतं. नेत्याने पक्षांतर केलं की सगळ्यात जास्त हाल होतात ते कार्यकर्त्याचे. झेंडे बदलणे सोपं असतं. पण माणसाला बदलावं लागणं खूप त्रासदायक असतं. जिभेला सवय पडलेली असते. कित्येक कार्यकर्ते घोषणा देताना चुकतात. आधीच्या पक्षाचे नाव घेतात. गावोगावच्या लोकांनी प्रचाराला पैसे देऊन आमदार निवडून दिलेला मी पाहिलाय. दुर्दैवाने त्या आमदाराने लोकांचे पैसे परत देणं सोडा लोकांचेच पैसे खायला सुरुवात केली. मागे त्याला रस्त्यात एकटाच पायी चालताना पाहिलं. बरं वाटलं. एक कार्यकर्ता एकदम भारी आठवतो. त्याच्या साहेबांची एक खास सवय आहे. त्यांना गाडी रस्त्यात बंद पडली की अजिबात आवडत नाही. एकदा साहेबांनी गाडी बंद पडल्यावर रस्त्यातच स्वतःच्या गाडीला लाथा घातल्या. गाडीला काही झालं नव्हतं. पण नेत्याला हेअरलाईन fracture झालं. तर साहेबांचा स्वभाव माहित असलेल्या कार्यकर्त्याने एकदा ठरवून त्यांची गाडी रस्त्यात तीनदा बंद पडायला लावली. साहेब एवढे भडकले की त्यानी गाडीची चावी काढून घेतली आणि त्या कार्यकर्त्याच्या अंगावर फेकली. म्हणाले तू दुरुस्त कर आणि वापर. माझ्यासमोर आणू नको ही गाडी. कार्यकर्ता आजही ती गाडी थाटात वापरतो.
कार्यकर्ते एकापेक्षा एक नमुने असतात. साहेबांनी ठेवलेल्या बाई बद्दल पण त्यांची अस्मिता जागृत असते. साहेबांचा वाढदिवस असला की काय करू आणि काय नाही असं होतं त्यांना. साहेबाच्या वाढदिवसाला एका कार्यकर्त्याने रक्तदान शिबिर भरवलं. हजार बाटल्या रक्त जमवायचा संकल्प केला. दिवसभर हजार लोक मंडपातल्या पलंगावर झोपून गेले. पण रक्त पंधराच लोकांनी दिलं होतं. बाकीचे फोटो काढून गेले. एक कार्यकर्ता एवढा भारी आहे की त्याने साहेब मंत्री असताना एका महत्वाच्या चौकाला स्वतःच्या वडलांचं नाव दिलं. अजूनही लोकांना प्रश्न पडतो की चौकाला ज्याचं नाव आहे तो माणूस नेमका आहे कोण? एका गावातल्या पोराने आमदाराला पेपरमध्ये जाहिरात देऊन शुभेच्छा देण्यासाठी बापाची सोन्याची साखळी विकली. सत्कारासाठी साहेबांची गाडी गावच्या रस्त्यावर अडवायच्या नादात एकजण साहेबाच्याच गाडीखाली आला. साहेब कुणाला काही देत नसतात. कार्यकर्त्याला मान देणारे, काम देणारे फार कमी नेते उरलेत. एका ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत पडलेल्या उमेदवाराने चार भाडोत्री गुंड सोबत घेऊन गावातल्या सगळ्या लोकांकडून वाटलेले पैसे परत घेतले होते. नेते ह्या थराला जातात. कार्यकर्ते प्रामाणिक असले की कायम बेकार राहतात. या कार्यकर्त्यापैकी कुणी आपल्या नेत्याला धडा का शिकवत नाही? उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार पाहतो तरी शांत का बसतो हा प्रश्न पडायचा. आपल्या साहेबाला इंगा दाखवणारा कार्यकर्ता असला पाहिजे असं राहून राहून वाटायचं. तसा स्मार्ट कार्यकर्ता सगळीकडे असतो. पण फार यशस्वी झालेला बघण्यात आला नाही. पण मनात होता. तोच गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरात नारायण वाघच्या रुपात उभा केला. मनात एक कार्यकर्त्याने नेत्याला धडा शिकवावा ही इच्छा होती ती या गोष्टीत पूर्ण झाली. अजूनही कार्यकर्त्याचं जग पूर्ण मांडता आलं असं वाटत नाही. पुन्हा नव्याने लिहितोय या विषयावर. बघू. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारासह्याद्री म्हणायचं आणि मुख्यमंत्री पण दिल्लीच्या आदेशाने निवडायचा हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सारखे विषय सुचत राहणार.
0 Comments