ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरातल्या मुलांना खरच एक मोठा आधार असतो.
शाळेत शिकणाऱ्या एका मुलाची गोष्ट. सातवी आठवीतच त्याला मातीतून किल्ले, बाहुल्या, पुतळे बनवायचा नाद लागला. जेंव्हा बघावं तेंव्हा आपला मुलगा मातीत खेळतो हे बघून आई वडील वैतागून गेले होते. त्याचे मातीने भरलेले हात वही पुस्तक घेण्यासाठी कसे उत्सुक होतील हा त्यांचा प्रयत्न. पण मुलात बदल होत नव्हता. आई वडील त्याला नेहमी रागवायचे. टाकून बोलायचे. अपमान करायचे. मुलाला मातीतच करिअर दिसत होतं. पण आई वडील म्हणायचे, सारखा मातीत खेळत बसतो तुझ्या करीअरची माती होईल वगैरे. एक दिवस वैतागून मुलाने आत्महत्या केली. एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात लिहिलं होतं मी आजोबाकडे चाललोय. स्वर्गात. फक्त त्यांनाच माझ्या मातीच्या खेळण्याचं कौतुक होतं. तिकडेच जातो. निदान ते तरी शाबासकी देतील. आजोबांची शाबासकी मिळवण्यासाठी त्याने किती टोकाचं पाउल उचललं होतं. अशावेळी वाटतं देवाला हे दिसत नसेल का? त्यालाही दूरचा चष्मा आहे का? पण कधी कधी वाटतं खरे देव तर आजी आजोबा असतात घरात. ज्या घरात आजी आजोबा असतात त्या घरातल्या मुलांना खरच एक मोठा आधार असतो. हमखास कौतुक करणारं माणूस असतं. आजी आजोबा आणि नातवांचं नातं सगळ्यात खास आणि मजेशीर असतं. साठी ओलांडल्यावर माणूस पुन्हा मनाने लहान होत असतो. आणि त्याची नातवांशी छान ट्युनिंग जुळू लागते.
आजी आजोबा नातवाला खास वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं गोष्टी. आजी आजोबाकडे असणाऱ्या भन्नाट गोष्टी. आणि त्या रंगवून सांगायची ताकद. आजकाल लेखकांसाठी खूप शिबीरं होतात. कोर्स असतात. पण माझ्या मते लिहायची आवड असणाऱ्या माणसाने आधी आपल्या आजी आजोबांनी संगीतेल्या गोष्टी आठवून बघायला पाहिजेत. सगळ्यात मोठे पटकथा लेखक असतात आजी आजोबा,. नातवाच्या मूड प्रमाणे गोष्टी सांगत असतात. म्हणजे नातवाला झोप येत नसेल तर त्यांची गोष्ट लांबत जाते. त्याला झोप येत असेल तर ती अगदी चटकन क्लायमॅक्सकडे येते. राक्षसाची एन्ट्री कधी असणार, देव कधी येणार, परी कधी येणार हे सगळं नातवांच्या मूडवर अवलंबून. आणि गोष्टीत त्या त्या क्षणी बदल करणारे आजी आजोबा. आपण पूर्वीपासून गोष्ट सांगणारे लोक आहोत. कागदावर लिहिणारे फार टिकले नाहीत लोकांच्या मनात. पण ज्ञानेश्वर तुकाराम आजही पाठ आहेत लोकांना. आजोबा असेच असतात. आठवणीत घट्ट. गोष्टीच्या रुपात. त्यांच्याकडून पुढच्या पिढीला कळणाऱ्या कितीतरी गोष्टी होत्या.
मिरगाचा पाउस म्हणायचे आधी. तो मिरगाचा किडा आजोबा लोक दाखवायचे. ठराविक काळात दिसणारा तो किडा लहानपणी किती भुरळ घालायचा. पण तो दिसला की पाउस येणार हे आजोबांनी सांगितलं. ते पुस्तकात नव्हतं. चातक पक्षी आजोबांमुळे कळत गेला आपल्याला. कितीतरी आजोबा पक्षी कुठे घरटे बांधतो ते बघून किती पाउस होणार हे सांगायचे. हे सगळे अंदाज होते. पण मनाला उभारी देणारे. कष्ट करायला प्रेरणा देणारे. हे ज्ञान आता गायब होतय. वेगवेगळे राहताना कुटुंबातून आजोबा गायब होत गेले तसतसे आपण अज्ञानी होत गेलो. डिजिटल ज्ञान खूप असेल पण निसर्गाचं ज्ञान कमी होत गेलं. मुलांना पोकेमॉनची नावं जास्त माहिती आहेत आणी पक्षांची कमी. मुलांना कार्टून जास्त माहिती आहेत आणि झाडं कमी. आजीचा बटवा गायब होऊन साध्या सर्दी खोक्ल्याला पण दवाखाना आणि औषध सुरु झालं. निरगुडीचा पाला, लिंबाचा पाला, सागरगोटे, बिबवे, रिठे यांचा संबंध संपला. खरतर हे आपलं अस्सल निसर्गभान होतं. ज्ञान होतं. आजी आजोबा तळमळीने सांगायचे ते कळत नव्हतं. पण डॉक्टरने सांगितल्यावर लोकांना ज्वारीची, नाचणीची भाकरी किती महत्वाची आहे हे कळतं.
लहानपणी मात्र आपला आजी आजोबावर विश्वास असतो. ते सांगतील तो आपला देव असतो. ते सांगतील तो आपला आदर्श असतो. त्यांनी विचारलेली कोडी आज कुणी विचारत नाही. आजकाल कितीतरी लोक म्हणतात व्हिडीओ गेम खेळल्याने मुलांचे मेंदू शार्प होतात. पण आपल्याला अजूनही आजोबांनी विचारलेल्या कोड्यांची उत्तरं शोधल्यावर मेंदू शार्प असल्यासारखा वाटायचा. कुणाचे आजोबा विचारायचे,
तीन पायांची तिपाई, वर वसला शिपाई. सांगा कोण? त्यावर डोकं खाजवून ‘तवा’ असे उत्तर देताना नातवांना केवढा आनंद व्हायचा.
किंवा
वाजते पण ऐकू येत नाही .. असा साधा प्रश्न. पण त्यावर खूप वेळ केलेला विचार. आणी मग आजोबांनी उत्तर सांगितल्यावर आपल्या लक्षात यायचं की उत्तर थंडी आहे. वाजते पण ऐकू येत नाही. अशा कितीतरी आठवणी. लोणच्याची फोड [ त्याला खार म्हणायचो आम्ही ] तास तासभर तोंडात ठेऊन तिचा आनंद घ्यायचा हे आजोबांनी तर शिकवलेलं होतं. आजोबा जगात भारी असायचे कारण आंब्याची कोय ते फेकू द्यायचे नाहीत. ती भाजून त्यातलं बी सुद्धा किती टेस्टी असत ते खायला घालून शिकवायचे. ते सगळं आता किती लोकांना समजत असणार? म्हणून dambis सिनेमासाठी जगात नसलेल्या आजोबांवर गाणं लिहिताना ओळी सुचत गेल्या….
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय ?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
देवाघरी त्यांना तिथे कोण भेटत असेल?
देव बोलत नाही म्हणून एकट वाटत असेल.
त्यांच्यासारखं फनी देवा तुला सुचतं काय?
मला म्हणतात डँबीस पण आजोबाही सेम आहेत.
बसले असतील लपून नक्की त्यांचे फेवरेट गेम आहेत.
पण लाडक्या नातवावर असं कुणी रुसतं काय?
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय ?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय ?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
देवालाही चष्मा आहे का सांगा मला कुणी.
मग का दिसेना त्याला माझ्या डोळ्यामधलं पाणी.
मी एवढ रडल्यावर त्याला ऐकू गेलं नसेल काय?
नाहीतर जाउद्या आजोबा येता येता थकाल तुम्ही.
अंधारात कुठेतरी उगीच वाट चुकाल तुम्ही.
मीच येतो देवाघरी बघतो तुम्ही भेटताय काय.
आजोबांनी जाण्यासारखं देवाघरी असतं काय ?
एवढ्या लांबून त्यांना आमचं घर तरी दिसतं काय?
Photo © Sharad Patil
0 Comments