गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

April 14, 2019

लेखन

arvind jagapat patra

ती – अहो काय चाललंय हे?

तीअहो काय चाललंय हे?

तो – जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं मतदान चालू आहे. गेले चार महिने बोंबा मारताहेत सगळे. तरी तुम्ही विचारताय काय चाललंय हे…

ती – तस नाही हो. पण माझं मतदार यादीत नावच नाही.

तो – काय सांगता? कमाल आहे.

ती – अहो जाताय कुठे? खरच नाव नाही माझं.

तो – अहो मी कुठे खोटं म्हणतोय. खरच नसेल नाव तुमचं.

ती – तुम्हाला काहीच वाटत नाही ? माझं मतदार यादीतून नाव काढलंय चक्क.

तो – मला सांगा आपल्या घरात मुलांनी  काही मोठी कामगिरी केली की आपण काय म्हणतो नाव काढलं पोराने. तसं तुम्ही पण समजा आज नाव काढलं. थोडा उशीर झाला एवढच.

ती – अहो हा काय गमतीचा विषय नाही. माझं नाव का नाही सांगा.

तो – मला सांगा काय नाव आहे तुमचं?

ती – शुभांगी अप्पलपोटे.

तो – अप्पलपोटे?

ती – तुम्ही माझ्या नावावर टोमणे मारू नका. उत्तर द्या.

तो – मला सांगा समजा मतदार यादीत तुमचं नाव असतं तर तुम्ही काय केलं असतं?

ती – मतदान केलं असतं.

तो – कुणाला?

ती – तुम्हाला का सांगू?

तो – बरं नका सांगू. पण ह्या उमेदवारां पैकी एकालाच केलं असतं ना?

ती – हो.

तो – मला सांगा एक तरी धड आहे का हो ह्याच्यात? एकावर बलात्काराचा गुन्हा आहे.एक जण अजून जेल मध्ये आहे. एकाने दहा कोटीचा भ्रष्टाचार केलाय सरकारी नौकरीत असतांना.

ती – पण आता निवडणूक  आहे म्हणजे मतदान केलं पाहिजे.

तो –मला सांगा दवाखाना जवळ आहे म्हणून कुणी आजारी पडत का? किंवा गरिबांना अन्न धान्य मोफत मिळणार म्हणून आपण गरीब व्हायचं का? किंवा पोलिओचा डोस फुकट असतो म्हणून मुला सोबत आपण पण पितो का?

ती – अहो पण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एका मताने फरक पडू शकतो.

तो – बरोबर आहे. अहो जर मत टाकल्यान फरक पडू शकतो तर न टाकल्याने पण पडणारच आहे. फरक पडण्याशी मतलब आहे ना.

ती – पण तुम्ही का माझ्याशी डोकं लावताय? माझं नाव मतदार यादीत का नाही ते सांगा. मी किती लांबून आलेय उन्हातान्हात माहितीय?

तो – पण का आलात? तुम्हाला काय वाटलं तुम्ही आला नसता तर निवडणूक झाली नसती? देशाला पंतप्रधान मिळाला नसता?

ती –माझ्या आई वडलांनी या बोटाला धरून वाढवलं मला. आज त्या बोटावर मतदान केल्याची शाई लावलेली बघून उर भरून येईल त्यांचा.

तो – बस. बस. रडू बिडू नका. फक्त एवढं सांगा तुम्ही मतदान करण्या आधी काय विचार केलाय? कोणत्या पक्षाची विचारधारा आवडते?

ती – मला काही पोलिटीक्स मध्ये इंटरेस्ट नाही. ते सगळे म्हातारे नेते बघायला मला जाम कंटाळा येतो. म्हणून मी नवरा सांगतो त्या पक्षाला मत देते.

तो –मला सांगा तुम्ही तुमच्या नवऱ्याने सांगितलेली भाजी घेता?

ती – नाही. त्यांना भाजीतल काही कळत नाही.

तो – ज्याला भाजीतल कळत नाही त्याला देश कुणी चालवायला पाहिजे हे कळत असं वाटतं का तुम्हाला?

ती – बर नसेल कळत. पण आम्ही ठरवलंय, बाकी कुठल्या बाबतीत आपलं एकमत होत नाही ना. मग निदान एकाच उमेदवाराला मत देऊ. एवढ्या बाबतीत एकमत.

तो – धन्य झाली असेल आज भारतमाता हे ऐकून.

ती – तुम्ही चेष्टा नाही ना करत?

तो – नाही. नाही. सिरीअसली बोलतोय. फक्त मला प्रश्न एवढाच आहे की खरच या देशाला मत गरजेच आहे तुमच्या सारख्या लोकांचं ?

तो – हे बघा माझी खूप लहानपणी पासून इच्छा होती की माझ्या बोटाला ती काळी शाई लागावी.

तो – बाजारात शाई घ्या आणि एका नाही दहाही बोटांना शाई लावा.

ती – तसं नाही हो. ही शाई स्पेशल आहे ना. खूप दिवस निघत नाही म्हणे. एकदा बघू तरी म्हंटल कशी असते ही शाई.

तो – अच्छा. म्हणजे शाई कशी आहे हे बघण्या साठी तुम्हाला मतदान करायचंय. धन्य झाली आज लोकशाही.

ती – तुम्ही मला लेक्चर देऊन माझा वेळ घालवू नका. तुम्हाला माहितीय माझ्या सगळ्या मैत्रीणीनी मतदान केलेल्या बोटाचे फोटो फेसबुकवर टाकले पण.

तो – अर्ध्या देशाला निवडणुकीत पोटाचा विचार पडलेला असतो आणि अर्ध्या देशाला बोटाचा. कधी एकदा बोटाचा फोटो टाकू.

ती – माझ्या मैत्रिणीच्या बोटावर तर इतक छान डिझाईन आलंय ना. तिनी रेड नेल पोलिश लावलं होतं. रेड वर ती काळी शाई इतकी सूट होते ना.

तो – उमेदवार सूट होतो का पण आपल्याला?

ती – तुम्ही काय नतद्रष्ट आहात हो? किती त्या उमेदवाराचा विचार करायचा? नवरा निवडताना तरी एवढा विचार करतात का बायका आपल्या देशात? दिसायला बरा असला आणि कमावणारा असला की बस.

तो – नवऱ्याच कसं तो वठणीवर आणू शकतात बायका. किंवा तो जाऊन जाऊन कुठे जाणार?मध्यरात्री का होईना घरीच येतो. पण हे उमेदवार एकदा निवडून आले की पुन्हा सापडत नाहीत.

ती – आपण तरी का जायचं त्यांना शोधायला? पेपर वाचत नाही का तुम्ही? बायकांच्या बाबतीत कसे आहेत हे राजकारणी.

तो – तरी तुम्हाला मतदान करायचंय?

ती – हो. कारण मी खास माझ्या नवऱ्याला पण सोबत आणलंय फोटो काढायला. माझ्या बोटाचा फोटो मी असा गालावर बोट ठेवून काढणार आहे. आणि आमच्या दोघांचा असा बोटात बोट अडकवून. अजून असा फोटो एकीने पण नाही टाकला.

तो – किती त्या बोटाच्या फोटोची चिंता आहे. मतदार बोटाभोवती फिरतात आणि उमेदवार बोटावर फिरवतात.

ती – तुम्ही पुन्हा सुरु झाले. अहो शोधा लवकर नाव. तुम्हाला माहितीय मतदाना साठी मी खास manicure पण करून आलेय.

तो – ते काय असतं?

ती –  अहो पार्लर मध्ये जाऊन नखांची treatment. फिनिशिंग. पोलिश.

तो  – एखाद्या उमेदवारा एवढाच खर्च केलेला दिसतोय तुम्ही.

ती  – नाही हो. पण पाच वर्षात एकदा निवडणूक येते म्हंटल्यावर एवढं तर केलंच पाहिजे ना.

तो  – खरय तुमचं. साडी पण नवीन दिसतेय.

ती – अहो ही खास वोटिंग साडी आहे. हिच्या मुळे बोटावरची शाई खूप उठून दिसते. आणि मी ऐकलं की या बूथवर खूप सेलिब्रिटी येतात ना वोटिंग करायला. म्हणून जरा मेकअप करून आले.

तो  – म्हणजे सेलिब्रिटी येतात म्हणून तुम्ही इकडे आलात?

ती  – हो.

तो – एरव्ही मतदान केंद्र कुठे असतं तुमचं?

ती – त्या प्राथमिक शाळेत. पण तिथे कुठे जाणार? सगळे झोपडपट्टीचे लोक येतात तिथे. म्हणून इकडे आले.आणि इकडे येऊन पाहते तर काय यादीत नावच नाही माझं. टू मच. किती होपलेस कारभार आहे. इरिटेटिंग.

तो – खरच इरिटेटिंग आहे. अहो झोपेत तुमच्या कानातले पडले तर तुम्ही कुठे शोधता? तुमच्या बेडरूम मध्ये ना. का शेजाऱ्यांच्या?

ती – काही पण काय बोलता?

तो – खरं तेच बोलतोय. अहो आपलं मतदान केंद्र जिथे आहे तिथेच मतदान करता येत. आणि फेसबुक वर फोटो टाकण्या साठी जेवढी मेहनत त्या बोटावर घेतलीय त्या पेक्षा दोन टक्के मेहनत दहा दिवस आधी यादीत आपलं नाव आहे की नाही ते तपासायला घेतली असती तर बरं झालं असतं. म्हणजे टेन्शन राहिलं नसतं. बोटा एवढाच उमेदवाराच्या चारित्र्याचा, त्याच्या कार्याचा विचार केला तर बरं झालं असतं. खरच बेंबीच्या देठा पासून सांगतो फक्त फेसबुक वर फोटो टाकण्यासाठी मतदान करणाऱ्यानो लोकशाही माफ करणार नाही.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *