
विष्णू नांगरेवाडीचा लाडका होता.
विष्णू नांगरेवाडीचा लाडका होता. सगळं गाव त्याला बाबू म्हणायचं. बाप वीज पडून मेला तेंव्हा विष्णू सात वर्षांचा होता. बापाची बॉडी दारात आणली आणि आईनी डोकं आपटून घेतलं रडून रडून. चार पाच दिवस अन्नाला शिवली नाही. त्याच महिन्यात वारली. विष्णूला आई बाप आठवतात ते असे. पण त्या दिवशी पासून गावानी त्याला खूप माया लावली. चुलत्यानी परिस्थिती नसताना त्याला लेकरासारखं सांभाळलं. गावानेसुद्धा विष्णूला कधीच पोरकं वाटू दिलं नाही. विष्णू फार शिकला नाही. काम करत राहिला. स्वतःच्या शेतात. लोकांच्या शेतात. कधी पाउस कमी यायचा. कधी पाउस खूप यायचा. पण विष्णू लढत राहिला. त्याने कधी तक्रार केली नाही. गावात असे खूप शेतकरी असतात जे कधीच कर्ज काढत नाहीत. विष्णू त्यातलाच एक. गावात असे खूप शेतकरी असतात जे कितीही संकट आलं तरी जीव द्यायचा विचार करत नाहीत. विष्णू त्यातला एक.
शेतीत संकट तर दरवर्षी होतं. पण काही वर्षापूर्वी हायवे होणार म्हणून सरकारने शेतकऱ्यांची जमीन घेतली. हायवेजवळ असल्याने विष्णूची जमीन पण गेली. मोबदला मिळाला. विष्णूने घर बांधलं. आता अगदी छोटा तुकडा राहिला होता शेताचा. त्यात विष्णू वेगवेगळे प्रयोग करत होता. पुन्हा यश कमी आणि अपयश जास्त अशीच परिस्थिती होती. हायवे झाल्यावर गाड्यांची गर्दी वाढली. विष्णू शेतात काम करून थकला की एकमेव बाभळीखाली बसायचा. हायवेवर सगळ्या गाड्या शंभरच्या वर स्पीडनी जायच्या. विष्णू विचार करायचा ह्यांच्या गाड्या एवढ्या वेगात जातात. आपलाच गाडा कुठं अडलाय. सरकार म्हणालं होतं हायवे झाला की दिवस बदलतील. हायवे झाला की एकदम विकास होईल. गाव शहराशी जोडलं जाईल. पण हायवे झाल्यापासून परिस्थिती एकदम बदलली होती. गाव शहरापासून तुटल्यासारख झालं होतं. गावाचा अडथळा नको म्हणून गावात उड्डाणपूल झाला होता. आता वेगात येणाऱ्या गाड्या गावाच्या डोक्यावरून निघून जायच्या. पूर्वी यातल्या काही गाड्या गावाच्या बाहेर रोड कडे असलेल्या हॉटेल पाशी थांबायच्या. लोक चहापाणी घ्यायचे. काही ना काही कमाई व्हायची. आता उड्डाणपूल झाल्यामुळे गाड्या थांबत नाहीत. गावाला चिडवल्यासारख्या निघून जातात. जोरजोरात आवाज करत. गावात ज्यांच्या हॉटेलवर बसायला जागा नसायची तिथे आज हॉटेलवर फक्त मालकच बसून असतात. गर्दी असते ती फक्त टेबलवर बसलेल्या माशांची.हॉटेलचा मालक आधी त्यांना हकलून लावायचा फडके मारून. टेबल साफ करून. टेबलवर मिठाचे पाणी टाकून. माशा हकलण्यासाठीचे कितीतरी उपाय त्याला माहित होते. पण आता तो माशा हकलत नाही. कारण ह्या हायवेने माशी हकलल्यासारखं आपल्याला हकलून दिलं याची त्याला जाणीव झाली. टेबलवरच्या माशांची त्याला अचानक कीव आली. आता तो माशा तशाच बसू देतो. तासतास त्यांच्याकडे बघत कसाबसा त्याचा वेळ जातो.
गावातले लोक शेजारच्या गावात एका मंत्र्याच्या सभेला गेले होते. प्रत्येकाला पन्नास रुपये मिळणार होते म्हणून झाडून पुसून सगळं गाव गेलं होतं. विष्णू आणि त्याची बायकोच होते गावात. बायको आजारी होती म्हणून विष्णू गेला नाही. अचानक रात्री तिला जास्त त्रास व्हायला लागला. विष्णू तिला घेऊन हायवेवर गेला. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडवू लागला. पण गाड्या त्याच्या बाजूने एवढ्या वेगात जायच्या की तो जवळपास उडून जातो की काय असं वाटायचं त्याला. पुन्हा तो हायवेच्या कडेला दूर बसवलेल्या बायकोजवळ जायचा. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकायचा. पुन्हा धाडस करून हायवेवरून वेगात जाणाऱ्या गाड्या अडवू लागायचा. हात दाखवायचा. पण हायवेवर गाडी चालवताना प्रत्येक गाडीवाला एकमेकाला एक सल्ला हमखास देतो. कुणी कितीही हात दाखवला तरी गाडी थांबवायची नाही. चोर असतात. दरोडेखोर असतात. बरं दरोडे पडतात असे. त्यात काही चूक आहे असं नाही. पण खूपवेळा विष्णू सारखे माणसं मात्र विनाकारण अडचणीत येतात. त्याची काय चूक होती?
आपल्या जमिनीत झालेल्या हायवेवर मोठ्या थाटात जाणाऱ्या शेकडो गाड्यापैकी एकही गाडी आज आपल्या अडचणीच्या काळात थांबत नाही याचं त्याला खूप दुखः झालं. मनात आलं एखादा मोठा दगड घेऊन टाकावा एखाद्या गाडीवर. पण एकीकडे बायको जीवाच्या आकांताने ओरडत असताना आपल्या मनात असा विचार कसा आला याचच वाईट वाटलं बिचाऱ्याला. बायकोला दिलासा देऊन विष्णू पुन्हा गाड्यांना हात दाखवू लागला. अचानक विष्णू जोरात ओरडला. एक कुठल्यातरी राजकीय पक्षाचा झेंडा लावलेली गाडी एवढ्या जोरात गेली त्याच्या बाजूने की आता आपण मेलो असंच वाटलं तायला क्षणभर. विष्णू रस्त्याच्या कडेला खालीच बसला काही वेळ. राजकीय पक्षांचा झपाटा किती असतो याची जाणीव झाली त्याला. आपण मदतीला जरी हात केला तरी या लोकांना आपण आडवे आलो असं वाटत असणार. पुन्हा कोणताही झेंडा असलेल्या गाडीला अडवायचं नाही असं त्याने मनाशी पक्कं ठरवलं. तो पुन्हा गाड्यांना हात दाखवू लागला.
हायवेवर एक गाडी वेगात चालली होती. जयंतने गाडी घेऊन एक महिना झाला होता. आज तो त्यांच्या कुलदैवताला निघाला होता. तिथे जाऊन उद्या गाडीची पूजा करायची होती त्याला. रात्री कुठल्यातरी हॉटेल मध्ये थांबायचं होतं. पण जाई पर्यंत उशीर होणार होता म्हणून मध्ये दारू शोधत होता. पार्सल घ्यायचं होतं. रस्त्यावर कुठे हॉटेल दिसत नव्हतं म्हणून तो निराश झाला होता. आपल्या डोक्यात कसं आलं नाही की आता हायवेवर दारू भेटत नाही? असा प्रश्न सारखा छळत होता त्याला. सारखी चीडचीड होत होती त्याची. हायवेला शिव्या देत होता जयंत. उगीच हायवेने आलो आपण. जुन्या रोडने गेलो असतो तर मध्ये किती तरी अड्डे होते. काहीतरी झोल करून दारू मिळवता आली असती असं त्याला सारखं सारखं वाटत होतं. त्याची गाडी विष्णूच्या जवळून गेली. हायवेला शिव्या देणारा विष्णू. हायवेला शिव्या देणारा जयंत.
जयंतने गाडी थांबवली. करकचून ब्रेक मारत. विष्णू गाडीच्या मागे धावला. गाडीतून एक माणूस डोकावला. विष्णू त्याला काही सांगणार याच्या आधीच त्या माणसाने खुण करून विचारलं की इकडे कुठे दारू मिळेल का? तो माणूस दारू शोधत होता. विष्णू त्याला म्हणाला माझी बायको खूप आजारी आहे. तुम्ही मला शहरापर्यंत सोडा. मी तुम्हाला दारू मिळवून देतो. तो माणूस जरा खजील झाला. आपण काय विचारलं असं झालं त्याला. तो लगेच विष्णू आणि त्याच्या बायकोला गाडीत घेऊन निघाला. गाडीनी अर्ध्या तासात शहर गाठलं. रस्त्यात गाडी चालवणारा जयंत मनातल्या मनात हायवेला शिव्या देत आला होता. हायवेचा नियम झाला आणि दारू मिळण्यात अडचण यायला लागली. आता एवढा वेळ हायवेला शिव्या देणारा विष्णू हायवेमूळ आपण अर्ध्या तासात दवाखान्यात पोचणार म्हणून हायवेचे आभार मानत होता. मनातल्या मनात. विकास कधीच सगळ्यांच्या सोयीचा नसतो. तो कधी कुणाच्या गैरसोयीचा असेल आणि कधी कुणाच्या सोयीचा ठरेल सांगता येत नाही. पण माणसं एकमेकांच्या मदतीला धावली तर निदान अन्याय झाल्याची भावना तरी नष्ट होईल.
पूर्वी लोक रस्त्याने जाताना गाव बघायचे. आजकाल हायवेमुळे त्यांचं गावाकडे लक्ष सुद्धा जात नाही एवढा वेग असतो त्यांच्या गाडीचा. म्हणून अंतर वाढत चाललय. खेड्याची खरी समस्या शहराला कळत नाही. शहराची खरी अडचण गावाला कळत नाही. सरकार हायवे अंतर कमी करायला बांधत असतं. पण माणसं मात्र हे अंतर जास्त वाढवत जातात.
– अरविंद जगताप.
0 Comments