आता हेच बघा. मराठी माणूस इतर प्रदेशात शिकायला गेला किंवा कामाला गेला तर त्याने तिथली भाषा शिकली पाहिजे. कारण स्थानिक भाषा नेहमीच माणसं जोडायला, व्यवहाराला आणि गोष्टी नीट समजून घ्यायला कामी येते. या गोष्टीला कुठल्या मराठी माणसाचा विरोध नसतो. मग हिंदी जनतेला मराठी शिकण्याची अडचण का असावी?
पहिली अडचण आपण बहुसंख्य आहोत या गोष्टीची. काही हिंदी भाषिक लोकांना आपण बहुसंख्य आहोत, सगळ्यात जास्त खासदार निवडून देतो वगैरे गोष्टींचा विनाकारण अभिमान असतो. देश म्हणून ही चुकीची गोष्ट. त्यामुळं दक्षिणेतली राज्य जास्त अस्वस्थ आहेत. दुसरी अडचण खूप हिंदी भाषिक लोक या भ्रमात आहेत की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. अजूनही खूप लोकांचा हा भ्रमाचा भोपळा फुटलेला नाही.
खरंतर घटना निर्मितीवेळी सगळ्या देशाने हिंदी स्वीकारावी यासाठी त्यात खूप विकास करावा लागेल, दर्जेदार साहित्याची निर्मिती करावी लागेल या गोष्टींची चर्चा झाली होती. त्या मुद्द्यावर चर्चा होताना दिसत नाही. मग अभ्यासक तुलनात्मक विचार करतात. तेंव्हा दिसून येतं की मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड किंवा बंगाली साहित्य तुलनेने खूप समृद्ध आहे.
हिंदीत खूप मोठे साहित्यिक होते, आहेत. पण राष्ट्रभाषा व्हायला त्यात खूप मोठी समृद्धी गरजेची आहे. राष्ट्रभाषा होण्यासाठी तेवढी दर्जेदार मासिकं , वर्तमानपत्र पण गरजेची असतात. हिंदी वृत्तवाहिन्यांच्या अवस्था तर आपण बघतोय. तर साहित्याची परंपरा दक्षिणेत हिंदी पेक्षा जुनी आहे.
पन्नास साठ वर्षापूर्वी जयचंद्र विद्यालंकार या अभ्यासकाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत. ती वाचा,
“बुद्धाच्या काळीं भारताचा जो मध्यदेश होता त्यांतच सध्यां लिहिण्यावाचण्याची भाषा हिन्दी चालू आहे. भाषाशास्त्रज्ञांच्या मतें यांत चार भाषा आहेत: हिन्दी, राजस्थानी, कोशली व बिहारी.
हिन्दीच्या पांच बोलभाषा आहेत : खडी बोली, ब्रजभाषा, कनोजी, बुंदेली व बांगरू.
कोशलीच्या तीन बोलभाषा आहेत : अवधी, बघेली आणि छत्तीसगढी.
बिहारीच्याहि तीन बोलभाषा आहेत : भोजपुरी, मगही व मैथिली.
राजस्थानीच्याहि सहा बोलभाषा आहेत. “
आता या बोलीभाषा हिंदीपेक्षा खूप वेगळ्या आहेत. भोजपुरी वगैरे भाषा तर हिंदीवाल्यांना समजायला अवघड. आणि भोजपुरीवाल्यांसाठी शुद्ध हिंदी अवघड. पण एकच भाषेच्या आग्रहाने भोजपुरी किंवा अवधी विसरून जायची का? तसं होत नाही. पाकिस्तानला ते जमलं नाही. धर्माच्या नावाने राष्ट्र बनवलं पण तेच राष्ट्र आधी भाषेच्या प्रश्नावर मनाने वेगळं झालं.मग तुकडे झाले. अजूनही पाकिस्तानात एक दोन राष्ट्र केवळ याच प्रश्नाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सक्ती हा उपाय होऊ शकत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे.
"आता हेच बघा. मराठी माणूस इतर प्रदेशात शिकायला गेला किंवा कामाला गेला तर त्याने तिथली भाषा शिकली पाहिजे. कारण स्थानिक भाषा नेहमीच माणसं जोडायला, व्यवहाराला आणि गोष्टी नीट समजून घ्यायला कामी येते. या गोष्टीला कुठल्या मराठी माणसाचा विरोध नसतो. मग हिंदी जनतेला मराठी शिकण्याची अडचण का असावी?"
चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांचे विचार या संदर्भात फार महत्वाचे आहेत. साठ वर्षापूर्वी त्यांनी हे विचार मांडलेत.
“हिन्दीला जी प्रतिष्ठा लाभली आहे तिच्या अनुसार हिन्दीची प्रगति लौकर होवो. साहित्य-संपदा, सुंदर व कोमल शैली वगैरे गुणांमुळे बुद्धिमान् व उत्साही भारतीयांना इंग्रजी भाषेविषयीं आकर्षण वाटतें. हे सर्व गुण हिन्दीमध्येहि आले पाहिजेत. हिन्दीप्रेमी (हिन्दी भाषी) लोकांना माझा एक नम्र इशारा आहे. भारताच्या असंघटित लोकांवर त्यांनी आपल्या बहुसंख्येच्या जोरावर कसलेहि दडपण आणतां कामा नये. त्यायोगे देशामध्ये एकतेऐवजीं दुद्दी व विरोध निर्माण होईल. हजारों वर्षापासून हिन्दीच्या बरो- बरीने इतर भाषाहि या देशांत चालू आहेत. केवळ संख्येच्या जोरावर हिन्दी या भाषांना नष्ट करूं शक- लेली नाहीं. या ऐतिहासिक घटनेकडून आपण घडा घेतला पाहिजे. घाई केल्यानें कांहीं फायदा होत नाहीं. हिन्दीच्या बाबतींतील घाई पाहून पूर्व- भारत आणि दक्षिण भारत येथील लोकांच्या मनांत हिन्दीभाषियांचे प्रभुत्व आणि जुलूम यांविषयीं भय निर्माण होईल कीं काय, अशी आशंका मला वाटते. “
हिंदीसक्ती हा विषय जुना आहे. तो अध्यादेश काढून पूर्ण होणार नाही. चोरून लपून कायदे करून जमणार नाही. लोकांना ती भाषा शिकावी वाटली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही काळ हिंदी सिनेमाने ती आशा निर्माण केली. पण आता अर्धाअधिक हिंदी सिनेमा हिंदी कमी आणि इंग्रजी जास्त झालाय. उरलेला दाक्षिणात्य सिनेमाची भ्रष्ट नक्कल झालाय.
हिंदी सिनेमाचे लेखक हिंदी पण इंग्रजीत लिहितात. आणि त्याला रोमन म्हणतात. केवळ हिंदी येते अशा लेखकाला हिंदी सिनेमा लिहिणं सोडा, त्याची मीटिंग पण करणं अवघड आहे. एवढं हे क्षेत्र इंग्रजाळलेल आहे. आणि सध्यातरी हिंदीच्या जीवावर रोजगार निर्माण होत असलेला हाच मोठा व्यवसाय.
बाकी हिंदी शिकल्याने कोणत्या नोकऱ्या मिळणार आहेत? भविष्यात किती नोकऱ्यात हिंदी गरजेची आहे? किती सरकारी नोकऱ्या उरल्या आहेत? आणि जिथे हिंदी महत्वाची असेल तिथे हिंदी भाषिक लोकच वरचढ ठरतील हे स्पष्ट आहे. इतर राज्यातल्या लोकांनी कोणत्या कारणासाठी हिंदी शिकायची? त्या कारणांचा विचार झाला पाहिजे. भारतीय लोक फ्रेंच शिकतात, जर्मन , स्पॅनिश शिकतात. त्यामागे दर्जेदार शिक्षण किंवा अर्थकारण ही दोन मुख्य कारणं असतात. हिंदी बाबतीत हा विचार राज्यकर्ते करतात का? कुठलं दर्जेदार तांत्रिक किंवा वैज्ञानिक शिक्षण हिंदीत उपलब्ध आहे? किती विज्ञानकथा किंवा ऐतिहासिक पुस्तकं हिंदीत लिहिली जाताहेत? फक्त अट्टाहास करून चालणार नाही.
साठ सत्तर वर्षापूर्वी हिंदीला दर्जेदार आणि अभ्यासाची भाषा बनवण्यासाठी जो विचार झाला त्यात काय प्रगती झाली? उलट हिंदीच्या हट्टापायी इंग्रजीचा विजय झाला. घटनानिर्मितीच्या काळात एकमत न झाल्याने इंग्रजी भाषेला पंधरा वर्ष कारभाराची भाषा करण्यात आली. आजही इंग्रजीच आहे.
हिंदी सक्ती न करता प्रेमाने हा प्रश्न सोडवला असता तर वेगळं चित्र असतं. पण ज्ञानभाषा म्हणून हिंदी समृद्ध करायला कष्ट केले नाही. आणि आता राष्ट्राची भाषा एक पाहिजे या नावाने सक्ती. राष्ट्राची भाषा एक पाहिजे. पण ती ज्ञानभाषा पाहिजे. त्यात अर्थकारण पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्या भाषेतल्या लोकांची दीर्घकाळ सत्ता पाहिजे. या देशात मुघल, इंग्रज, चोल, मराठ्यांची सत्ता होती. आज जी हिंदी बोलली जाते ती भाषा फार जुनी नाही. तिची सत्ताही नव्हती. तिला सक्तीने नाही ज्ञानभाषा होऊनच राष्ट्रभाषा होता येईल. गप्पा मारायला हिंदी शिकायची गरज नाही. ती तशीच शिकतो आपण. पण बाकी उपयोग कळला नाहीतर विद्यार्थी म्हणतील , या हिंदीचं काय करू?