करुणानिधींचं आजचं राजकारण वेगळं आहे
करुणानिधींचं आजचं राजकारण वेगळं आहे. पण तमिळ भाषा आणि तमिळ अस्मिता याबाबतीत त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात एकट्या करुणानिधी यांची कामगिरी पण खूप मोलाची आहे. हिंदी भाषेच्या विरोधात चिन्नास्वामी नावाच्या तमिळ नागरिकाने स्वतःला जाळून घेतलं त्याकाळी. एवढा टोकाचा हिंदी विरोध होता तिकडे. अजूनही आहे. पण आपल्या भाषेवर प्रेम काय असतं ते करुणानिधी यांच्यासारख्या राजकीय लोकांकडून शिकण्यासारखं आहे. करुणानिधी यांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता. वय बारा वगैरे असेल. त्यांनी थेट मुख्याध्यापकाला धमकी दिली होती की मी समोरच्या तलावात उडी मारून जीव देईन. त्यांची धमकी एवढी परिणामकारक ठरली की त्यांना लगेच प्रवेश मिळाला. तर बालपणापासूनच आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचं तंत्र उमगलेला हा गडी.
जयललिता मुख्यमंत्री असताना भारतीय सिनेमाला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून समारंभ होता. त्यात बोलताना त्यांनी करुणानिधींचा उल्लेख सुद्धा केला नाही. केवळ राजकीय शत्रुत्व. पण करुणानिधींची चित्रपट कारकीर्द खूप मोठी आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या काळात म्हणजे १९४७ ला त्यांची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. करुणानिधी यशस्वी चित्रपट लेखक. त्याकाळातले तमिळ सिनेमातले संवाद संस्कृतप्रचुर तमिळ भाषेत असायचे. सामान्य माणसांना ती भाषा फार रुचायची नाही. करुणानिधी यांच्या संवादांमध्ये सोपी सरळ तमिळ भाषा होती. पूर्वी तमिळ सिनेमे देवावरच असायचे जास्त. करुणानिधी यांच्या काळात ते सामान्य माणसांच्या गोष्टी सांगणारे झाले. त्यांच्या लिखाणाचं महत्व एवढ होतं की खुपसे सिनेमे त्यांच्या संवादासाठी पाहिले जायचे. मुख्यमंत्री झाल्यावर पण निर्माते दिग्दर्शक सिनेमा लिहा म्हणून मागे लागायचे. त्यांच्या सिनेमाला सेन्सॉरचा खूप विरोध झाला. त्याकाळात सामाजिक विषयांची मांडणी करणारे लेखक म्हणून ते गाजले. पण मुख्य विषय होता द्रविडी संस्कृतीचं समर्थन. सिनेमातून अतिशय ताकदीने त्यांनी या विचारधारेबद्दल मांडणी केली. गेली काही वर्ष त्यांच्याबद्दल लिहिलं जातं ते घराणेशाही बद्दल. स्थानिक भाषा आणि प्रश्न मांडणारे पक्ष घराणेशाहीच्या मोहातून सुटू शकत नाहीत.
गेली काही वर्षं मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल चर्चा चालू आहे. रंगनाथ पठारे, हरी नरके यांच्यासारख्या लेखकांचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. अर्थात राजकीय नेतृत्व उदासीन आहे.असो. आपलं ठेवू झाकून. जरी आपले मुख्यमंत्री फडणवीस सहकुटुंब हिंदी गाण्यात दिसले. असं हिंदी गाणं आजही तामिळनाडू किंवा दक्षिणेत कुठल्याच राज्यात खपवून घेतलं गेलं नसतं. जाणार नाही. पण आपण मराठी माणसं काही कुठल्या भाषेचे विरोधक नाही. म्हणून भाषेवरून मुख्यमंत्री महोदयांना फार विरोध झाला नाही. तो भलत्याच कारणाने होता. त्यांचे अभिनयगुण आणि चित्रीकरण. किंवा त्यातले सगळेच मारून मुटकून उभे कलावंत. खरंतर फडणवीस तरुण होते तेंव्हा त्यांनी मॉडेलिंग केलीय. त्यामुळे त्यांना थोडाफार अनुभव आहे. फक्त बोलताना हात बांधून ठेवल्यावर त्यांची अडचण होते हे जाणवलं. होईल सराव. अर्थात अजूनही काही गाणी येणार असतील तर. पण विरोधाभास बघा. दक्षिणेत चित्रपटातले लोक राजकारणात आले. एम जी रामचंद्र, जयललिता किंवा आता रजनीकांत, कमल हसन. पण आपल्याकडे राजकीय लोक किंवा त्याचे नातलग चित्रपटाकडे वळतात. उलटा प्रवास. आधी दादा कोंडके किंवा अशात काही अभिनेते नंतर राजकारणात आले. पण दुर्दैवाने त्यांना अजूनतरी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलं नाही. रामदास आठवले, छगन भुजबळ यांच्यासारखे बरेच लोक नंतर चित्रपटात दिसले. चित्रपटाची पार्श्वभूमी असताना राजकारणात आलेलं घराणं म्हणजे ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे यांनी श्यामची आई सारख्या काही सिनेमात अभिनय केला. काही सिनेमा आणि नाटकं पण लिहिली.
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा विषय महत्वाचा आहे. त्यांची मातृभाषा असलेल्या तमिळ भाषेवर त्यांचं किती प्रेम होतं बघा. त्यांचा एक किस्सा सांगायलाच पाहिजे. ही खरतर त्यांच्या स्वतःच्या लग्नाची गोष्ट. लग्नाच्या मंडपात लग्न लागायच्या तयारीत सगळे होते. त्याचवेळी नेमका बाहेरून एक तमिळ भाषेच्या समर्थनासाठी मोर्चा चाललेला होता. करुणानिधी प्रत्येक मोर्चात असायचेच. कितीतरी वेळा त्यांना अटक झाली. तर ऐन लग्नाच्या वेळी ते मंडपामधून गायब झाले. बाहेर आपल्या भाषेसाठी मोर्चा चाललाय आणि आपण इथे कुठे? तर करुणानिधी थेट मोर्चात सामील होऊन हिंदी विरोधी घोषणा देऊ लागले. त्यांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून त्यांना अटक झाली नाही. नाहीतर लग्नाचं काय झालं असतं काय माहित?आणि कौतुक याचं वाटतं की त्यावेळी मुख्यमंत्री नसलेल्या करुणानिधी यांची बायकोसुद्धा वाट बघत उभी राहिली नवऱ्याच्या गळ्यात हार घालायला. स्वतःच्या लग्नात पण भाषेच्या चळवळीसाठी एवढा जागृत असणारा करुणानिधी यांच्यासारखा माणूसच स्वतःच्या मातृभाषेला अभिजात दर्जा देऊ शकतो. बाकी आपण मराठी वाचवा वगैरे भाषणं ऐकत राहू. किंवा नेत्यांनी अभिनय केलेली हिंदी गाणी बघत राहू. हेच जास्त अभिजात आहे सध्या.
0 Comments