पंतप्रधान म्हनले
पंतप्रधान म्हनले
सैनिकाला संदेश लिवा
मोबाईल घेऊन बसले तू दिलेला
पर काय लिहू र सोन्या?
फटाक्याचा आवाज आला तरी
जीव खालीवर व्हतो.
ल्हान व्हतास तवा तू कुणाला चिमटा काढला
तरी लोकं घरी यायचे शिव्या देत.
आता मुडदे पाडतोस लोकाचे
त छाती बडवून सांगतेत
आमच्या गावचाय!
लोकाचंबी काही कळत नाही
मांजर मारली की सोन्याची करा म्हनतेत
माणूस मारला की मेडल देतेत.
कुणाचा जीव घ्यायची येळ येऊ नाही बाबा
लई वंगाळ.
तुझा बाप म्हणतो काही व्हत नाही
डाक्टर झाला आसता तरी काय झालं आसतं?
शंभरातले धा मेलेच आसते हातून.
काय आसल ते आसू
पर व्हता व्हईल तवर जीव घेऊ नकू कुनाचा
त्यालाबी आई आसल ना रं.
दोन लाथा घाल
मुकाट्यानी ऱ्हा म्हनाव.
पाकिस्तानवाल्यालाबी लई मरायची हाउस
अंगात नाही बळ आन चिमटा घिऊन पळ
तसली गतय मेल्यायची.
खरं त सरकारलाच लिवनार होते
सैनिक लेकरा सारखे आसतेत म्हणून
आन सरकार मायबाप.
लेकराचे भांडनं होऊ नाही म्हणून
मायबापानी काळजी घ्याय पायजे का नको?
पर नाही लिवलं
तुझा बाप म्हनला सरकारला बाकीबी लई कामं आसतेत.
मी म्हनते तुमच्या तुमच्यातच घ्या ना रे मिटून
किती भांडत बसता तरी?
काश्मीरपाई भांडा, कारगिलपाई भांडा
पुन्हा पगारासाठीबी भांडा
जरा शांती नाही जीवाला.
फोन आला तरी जीव घाबरा घुबरा
आमच्याबी डोक्यात चोवीस तास लढाईच.
सस्ती दारू भेटती मिलिटरीची
म्हणून लोकं सारखे इचारतेत
लेक कवा येनार?
ह्यांच्या मढ्याव बाटल्या आनून घालाय गेलास जनू तिकडं.
संदेशबी आसाच लिवतेन बघ काही
दोन बाटल्या घिऊन ये.
लढाई मिटाव आस कुनालाच वाटत नाही
पेटाव आसच वाटतं घरबसल्या
तोंडावरची माशी मारनं व्हत नाही
पर आज त्यांचे बारा मारले म्हनतेत.
तू जरा जीवाला जप बाबा
ल्हानपनापासून मारामाऱ्या करू नाई म्हनून शिकविलं
आता मार कसं म्हनाव कुनाला?
तसं तू बापाची शिकवन इसरायचा न्हाई
कुनाचा मार खाऊन यायचा न्हाई.
पर आईचं काळीजय माझं
दिवाळी आली की करमत न्हाई
हे माकडतोंडे फटाके वाजवीतेत रातभर
गोळीबार चालू आसल्यासारखं वाटत राहतं.
सुतळीबॉम्ब फोडनाऱ्या लेकराला माय
शंभरयेळा काळजी घ्याय सांगती.
मी तुला काय सांगू आन किती सांगू?
भारतमातासाठी लढ पोरा
पर आपल्या मायसाठी काळजी घे सोताची.
– अरविंद जगताप.
0 Comments