लग्नाची गोष्ट

28 November 2023

हिवाळी, पावसाळी किंवा उन्हाळी अधिवेशनात सगळे ज्वलंत विषय येतात. पण लग्न या विषयावर फार बोललं जात नाही. गेल्या पंचवीस वर्षात लग्न न जमणं ही खूप मोठी समस्या बनलीय. बारकाईने बघितल्यास लग्न या गोष्टीच्या एकूणच समस्या वाढल्यात. एकतर लग्न टिकण्याची टक्केवारी कमी झालीय. अर्थात एकमेकांचा छळ करत एकत्र राहण्यापेक्षा ते ठीकच. पण पंचवीस तीस वर्ष होत असतील हम आपके हैं कौन नावाचा सिनेमा येऊन. लग्नाची पद्धतच बदलून गेली. लग्न इव्हेंट व्हायला लागलं. संगीत किंवा नवरदेवाचे बूट चोरण्यासारख्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात सुरु झाल्या. वेडींग फोटोग्राफी क्रिएटिव्ह कमी विनोदी जास्त होतेय. लग्नसोहळा ही गोष्ट गेल्या काही वर्षात सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसतेय. ‘ आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ अशी प्रेमळ विनंती करणारी पत्रिका पण दुर्मिळ झालीय. पत्रिकेवरच भरमसाठ खर्च सुरु आहे. ती अख्ख्या खानदानाची नावं ठोसून ठोसून कोंबलेली पत्रिका दिसत नाही. त्यात आवर्जून असलेली मुन्नी,गुड्डी, पिंट्या, बबली ही नावं गायब झालीत. आता नवकवितेच्या ओळी दिसतात पत्रिकेत ज्या हिंग जास्त झालेल्या पिवळ्या वरणासारख्या वाटतात. वऱ्हाड गावात आलं की हमखास पिठलं भाकरी असायची. ती कुठे मिळतच नाही आता. शहरात ज्याला केळवण म्हणतात त्याला आमच्याकडे गडंगनेर म्हणतात. तेही फार राहिलं नाही. उन्हाळ्यात शेवयाचा भात आणि आमरस खात नवरदेवासोबत घरोघर फिरण्यात धमाल होती. आता लग्नघर किंवा लगीनघर ही गोष्टच बाद होत चाललीय. सगळं काही मंगलकार्यालयात. मंगलकार्यलय पण किती बदललेत. आता लॉन्सशिवाय लग्न म्हणजे गरिबी. शहराच्या बाहेर हायवेच्या काठाला जिथे शेतात धान्य पिकवलं जायचं तिथे लॉन्स झालेत आणी अक्षता म्हणून धान्य उधळलं जातं. दुर्दैव एवढच की तिथे आसपास असणारा शेतकरी त्या लॉन्समध्ये लग्न लावू शकत नाही. लांब शहरातून लोक येतात.

लग्नाच्या पद्धती बदलल्या आणि किती रोजगार नष्ट होत गेले याचाही फार गंभीर विचार केला पाहिजे. डीजेमुळे छोटे बँड वाले बेरोजगार झाले. थोड्या पैशात स्क्रीन प्रिंटींगवर पत्रिका छापणारे हरवून गेले. एसटी महामंडळ लग्नाच्या सिझनमध्ये उत्तम पैसा कमवायचं. पण आता एसटी फार बुक केली जात नाही कारण खाजगी बसला पसंती. आम्ही लहानपणी ट्रकमध्ये बसून लग्नाला जायचो. त्यातही सगळ्या मुलांना ट्रकच्या टपावर बसायचं असायचं. खाली वर उन्हाचे चटके बसत असले तरी ट्रकच्या टपावर बसण्यात खूपच मोठेपणा होता. वऱ्हाडाचं जाउद्या खुद्द नवरदेवाची वरात सायकलवर पाहिलीय. नंतर बाईक. राजदूत वगैरे. नवरदेव घोड्यावर असला तर थाटच. मला खूप आधीपासून प्रश्न पडतो वरातीत घोड्याला काय वाटत असेल? का नाचताहेत हे लोक? यांनी तोंडात पैसे का धरले? पैसे मला द्यायचे नसतील तर माझ्यावर का ओवाळतात? घोड्यासोबत महागड्या गाड्या पण वापरल्या जाऊ लागल्या. वरातीत काही ठिकाणी एखादी बाई नाचायला बोलवली जायची. ती काहीवेळ नाचायची पण त्यावेळी ओळखीची एरव्ही संस्कारी वाटणारी पुरुषमंडळी अचानक रासवट झालेली बघायला मिळायची. त्याला ‘डखाळल्यासारखे’ हा शब्द योग्य. पूर्वी ती पारावर नवरदेवाने ऐनवेळी रुसून बसायची पद्धत बंद झाली. ती एक लग्नातली परंपरा झाली होती. ऐनवेळी नवरदेव रुसून बसायचा. मग घड्याळ, बाईक किंवा काहीतरी दिल्यावर त्याची समजूत निघायची. तो लग्नातला अत्यंत वाईट प्रकार. बरं झालं बंद झाला.

लग्नात धमाल असायची हळदीच्यावेळी. आता गूळणा गुळणी नावाचा प्रकार कुणाला माहित नसेल. पण नवरदेव नवरी एकमेकांच्या अंगावर गुळण्या टाकायचे. खेळच होता. पण तो बघणाऱ्या मुलामुलींना त्यात खूप धमाल वाटायची. नवरी हातात सुपारी घट्ट धरून ठेवायची. नवरदेवाने ती मूठ सोडवायची. काही नवऱ्या नवरदेवाचा अंत बघायच्या अशावेळी. त्याच तर आयुष्यभराच्या आठवणी असायच्या. नाव घेणं हा प्रकार पण आता उपचार म्हणून थोडाफार उरलाय. त्यातली गंमत किंवा कविता हरवलीय.मुलं मुली लग्न ठरवल्यावर भन्नाट नाव घेण्याची कविता पाठ करून ठेवायचे. लग्नातली वांगे बटाट्याची भाजी आता त्या चवीची मिळत नाही ही सगळ्यात वेदनादायक गोष्ट. बुंदी स्वतःला टिकवून आहे. घरावर असतात तशा स्टीलच्या पत्र्यावर पसरून ठेवली जायची बुंदी. लग्नाच्या पंगतीत पटकन जागा मिळवणे आजही टिकून आहे. पण जमिनीवरच्या पंगती, प्लास्टिकचे हिरवे, लाल ग्लास गेले. पत्रावळी गेल्या. ते भाजी टाकली की हमखास गळणारे द्रोण, मग भाताचा ढीग करून द्रोण त्यावर ठेवणं, मध्येच वारं आणि उडणाऱ्या पत्रावळी, भाजीत उडालेला फुफाटा. भात असं ओरडत फिरणारे उत्साही वाढपी. आपल्याला बुंदी हवी असायची आणि चार वेळा वाढपी पाणी असं ओरडत जायचा. पंगतीत गावातल्या लोकांना चुलबंद आमंत्रण असायचं. फक्त गावातले लोक स्वतःची ताटवाटी घेऊन यायचे.

रुखवतातला लोखंडी पलंग जाऊन लाकडी दिवाण आला. स्टीलचं कपाट जाऊन शोकेस आले. ग्लास आणि वाटीवर पण नावं टाकली जायची. कितीतरी वर्ष जेवताना ताटावर टाकलेल्या नावावरून त्या नातलगाची आठवण व्हायची. रुखवतात फ्रीज, वॉशिंग मशीन आलं आणी गरिबांनी धसकाच घेतला. लग्न लागताना मंगलाष्टकं म्हणण्यात एक वेगळीच स्पर्धा असते. खूप लोकांना माईक घेऊन मंगलाष्टकं म्हणायची हौस. एखादी आत्या किंवा मावशी त्यात फेमस. तिला ऑस्करच्या स्टेजवर गेल्याचा आनंद असायचा मंगलाष्टकं म्हणण्यात. त्यात नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा यांना लवकर यायला काय होतं कळत नाही. सतत माईकवर पुकारावं लागतं. त्यात लग्नात डेंजर प्रकार वाढला तो म्हणजे आलेल्या व्हीआयपी लोकांचे सत्कार. कित्येक लग्नात पुढारी आला नाही म्हणून उशीर झालेला पाहिलाय. शंभर शंभर लोकांचे सत्कार होईपर्यंत खोळंबलेले नवरा नवरी. ताराबलं चंद्रबलम होईपर्यंत अक्षता फेकण्याचा वाढलेला वेग. आम्ही मुलं एक एक टार्गेट ठरवून घ्यायचो आणि त्याच्याच डोक्यात अक्षता फेकून मारायचो. मग यायचा सगळ्यात भारी आयटम. आहेर पुकारायचा. कुणी किती आहेर दिला ते माईकवर ओरडून सांगणे. आजही अमक्याकडून नवरीला पाच रुपये आहेर, तमक्याकडून नवरदेवाला दहा रुपये आहेर ही वाक्य कानात घुमतात. नवरदेवाकडचा एक आणि नवरीकडचा एक आपापले आहेर गोळा करायला बसलेला. त्यात थोडीफार चूक झाली की होणारा गोंधळ ठरलेला. आठवणी असंख्य असतात. बदल अपरिहार्य असतात. पण लग्नच जमण्याची अडचण व्हावी एवढा बदल? शेतीची बिकट अवस्था, बेरोजगारी, गावांच्या विकासाकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, शहरातल्या मॉल्सप्रमाणे चकाकणाऱ्या पण टोटल हायब्रीड गोष्टीला विकास समजणं अशी असंख्य कारणं आहेत लग्न न जमण्याची. ग्रीन टी पिणारे, गावरान ज्वारी ऑनलाईन शोधणारे, शुद्ध हवेसाठी महिन्यात चारदा ट्रीपला जाणारे तरुण तरुणी गावी रहायला तयार नाहीत. राहण्याएवढ्या संधी किंवा परिस्थिती नाही. आता मुलगा नात्यातला नाही पण पुण्यातला पाहिजे. मग पुण्या मुंबईत नसलेल्यांच्या लग्नमुहूर्ताला मुहूर्त कसा मिळणार?

Tags

तुम्हाला काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचण्यासारखे...