तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे
संत तुकाराम म्हणतात पाहिजे जातीचे. जातीचं काही आलं की माणसं सावध होतात. प्रत्येक जातीचा माणूस जातीचे माणसं जमले की म्हणतो आपण आपल्या लोकांना मदत केली पाहिजे. माघारी फिरला की बोट मोडणं सुरु. मालक इथं बांधाला बांध असलेल्याचं पटत नाही, दाराला दार असलेल्या शेजाऱ्याचं पटत नाही, सख्ख्या भावा बहिणीचं पटत नाही.. मग जातीतल्या लोकांच कसं पटणार. पण गप्पा मारायला चांगलं वाटतं. आपल्या जातीच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मला सांगा आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं असतं की आपल्या जातीच्या माणसांना मदत करायची. त्यांचा विकास करायचा. तर कुणीच गरीब राहिलं नसतं. पण असं होतं का? अजिबात नाही.
चाळीत राहणाऱ्या माणसाला अपार्टमेंट मध्ये जायचंय. अपार्टमेंट वाल्याला बंगल्यात जायचंय. बंगल्यावाल्याला फॉरेनला जायचंय. मायचान सांगा, किती आई बापाला वाटतं आपलं पोरगं फॉरेनला जाऊ नये म्हणून? खूप जणांना वाटतं. पण का? राहू द्या ना इथच. जातीतल्या लोकात राहील. तर नको म्हणतात. म्हणून संत तुकाराम ह्या असल्या जातीपाती बद्दल बोलत नाहीत. ते म्हणतात तेथे पाहिजे जातीचे म्हणजे माणूस काहीतरी खास पाहिजे. खास म्हणजे कसा? सिनेमाच्या हिरोसारखा? आजीबात नाही. खास म्हणजे रिअल हिरो सारखा. आता तुम्ही म्हणतान रिअल हिरो कसा आसतो? रिअल हिरो असतो मयूर शेळके सारखा. मयूर शेळके आठवतोय का? आठवा. आठवा. हिरो नाव ऐकल्याबरोबर डोळ्यापुढ आला पाहिजे. तोपर्यंत एक ऐकलेली गोष्ट सांगतो.
एका गावात एक गरीब माणूस असतो. आता गरीब कशामुळ तर कामधंदाच करीत नसतो. रोज लोकाला ज्वारी माग. तांदूळ माग. असं करून जगत असतो. लोकं कधी मूड असला पुण्य कमवायचा त धान्य देतेत नाही त शिव्या देतेत. पण शंभरातून एक दोन तरी काही ना काही देतेत. आस माणूस जगत असतो. रोजच्यासारखा आजपण त्यो माणूस धान्य मागायला निघालेला आसतो. घराबाहेर पडून दोन लोकांच्या शिव्या खातो. एक जण मूठभर ज्वारी देतो. ती घेऊन पुढच्या घराकड निघालेल्या त्या माणसाला अचानक त्यांचा राजा समोरून येताना दिसतो. माणूस एकदम बावचळून जातो. साक्षात राजा. त्याला ह्याच्या आधी राजा एवढ्या जवळून बघायला मिळाला नव्हता कधी. आन राजा घोड्यावर हळू हळू येताना दिसतोय. बरं माणूस आता डोळे मोठे करून बघतोय. त्याचा त्याचा डोळ्यावर विश्वास बसना झालाय. कारण राजा चक्क त्याच्याच दिशेनी येताना दिसतोय. माणसाला काय कराव कळत नाही. आधी त वाटतं आपुन काही भानगड त नाही केली? राजा आपल्याला शिक्षा द्यायला त नाही येत? परवाच्या दिवशी आपुन पिऊन बायकोला शिव्या दिल्या ते त नाही कळल राजाला? का मागच्या हप्त्यात एकाचे आंबे चोरले ते कळल? माणूस विचार करत राहिला तोपर्यंत राजाचा घोडा त्याच्या जवळ थांबला. राजा घोड्यावरून उतरला. राजा एकदम प्रसन्न होता. माणसाच्या जीवात जीव आला. राजा काही रागात नव्हता. माणसाला आता वाटल की राजाची स्वारी खुश दिसतीय. राजा नक्कीच काहीतरी भेट देणार. दान देणार दिसतोय. पण राजा त्या माणसाला म्हणला, आज मी राजा असलो तरी दान मागायचं ठरवलं होतं. माझ्या ज्योतिषानी मला सांगितलय की रस्त्यात तुला पहिल्यांदा जो माणूस दिसल त्याला दान माग. तो जे काही देईल ते घे.
माणूस नाराज झाला. त्याला फक्त घेण्याची सवय होती. साध्या साध्या माणसाकडून भिक मागायचा. हा त राजाय. माणसं ज्वारी देतेत. गहू देतेत. राजानी सोन्याच्या मोहरा दिल्या पाहिजेत. पण ह्यो कसला राजाय? ह्यो त स्वतःच भिक मागतोय. काहीतरी द्या म्हणतोय. पहिला जो माणूस दिसल त्याच्याकडून काहीतरी दान घेणार म्हणे? आयला ही भिक मागायची आयडिया लई भारीय राजाची. पण आता बोलून चालून राजा तो. त्याला नाही कसं म्हणणार? आन माणसाच्या झोळीत त फक्त मूठभर ज्वारी. सगळी राजाला दिऊन टाकली त आपुन काय खाणार? फार फार त घरी जाऊन बायकोच्या शिव्या खाणार. पण दुसर कुणी असत त नाही म्हणलो असतो. राजाला कसा नाही म्हणणार? खूप विचार करून त्या माणसानी झोळीत हात घातला. झोळीतून ज्वारीचा एक दाणा काढला आणि राजाला दिला. म्हणला राजा मी गरीब माणूसय. माझ्याकड फक्त एक दानाय ज्वारीचा. बाकी काही नाही. राजा हसला. म्हणला तुझ्याकड ज्वारीचा एक दाणाय तरी तू मला दिला. तुझं कल्याण होईल. राजा त्या माणसानी दिलेलं दान घेऊन निघून गेला.
माणूस चालत राहिला. पण त्याच्या मनात सारखे विचार येत राहिले. काय नालायक राजाय. स्वतः प्रजेला द्यायचं सोडून प्रजेकडूनच दान मागतो. असला राजा काय कामाचा? त्याची चिडचिड झाली. त्या नादात कुठ भिक मागायची इच्छा राहिली नाही. माणूस तसाच घरी गेला. बायकोला हकीकत सांगितली. बायकोला पण राग आला. तिनी झोळीतून ते मूठभर दाणे बाहेर काढले. आणी तिचे डोळे चमकले. त्या मूठभर ज्वारीत एक दाणा सोन्याचा झाला होता. दोघं डोळे मोठे करून बघत राहिले. त्यांच्या लक्षात आलं आपण एकच दाना दिला ज्वारीचा. आणि बरोबर एकच दाणा सोन्याचा झाला. आपण जेवढ देतो ते आपल्याला मिळत. उलट सोन्यासारखं मिळत. आता त्या माणसाची बायको त्याला शिव्या द्यायला लागली. सगळी ज्वारी का नाही दिली. आता त्या माणसाला पश्चाताप झाला आजून थोडी ज्वारी द्यायला पाहिजे होती. दहा दाणे दिले असते तर? पन्नास दिले असते तर? पण वेळ निघून गेली होती. साधी वेळ नाही. सोन्यासारखी वेळ निघून गेली होती. मन मोठ केलं असत तर?
मन असं मोठं होत नाही अचानक. माणूस अचानक दिलदार होत नाही. उदार होत नाही. त्याला पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे ? ही एक वेगळीच जातय. चांगल्या मनाच्या माणसांची जात. जे आपल्याकड दहा रुपये असले तर त्यातले पाच रुपये लोकांच्या कामी कशे येतील याचा विचार करतात. बिल गेट्स सारखा माणूस जगात एक नंबरला होता. श्रीमंतीच्या बाबतीत. त्यानी आपली संपत्ती गरीबांसाठी, जगातल्या लोकांच्या आरोग्यासाठी दान केली. श्रीमंतीच्या बाबतीत त्याचा नंबर घसरला. पण माणुसकीच्या बाबतीत एक नंबरला गेला. आज आपण बघतो लोकांची पिळवणूक करणारे मोठ मोठे बिझनेसमन आहेत. काय मिळत ? फक्त पैसे नाही लोकांचे शिव्याशाप पण मिळतात. बिल गेट्स सारखे थोडे माणसं असतात ज्यांना लोकांचे आशीर्वाद भेटतात. जसे आपले रतन टाटा. आता रतन टाटा, बिल गेट्स काय एका जातीचेयत का? नाही. पण माणुसकीची जी एक जात असते ना त्या जातीचे हे लोकयत. अझीम प्रेमजी, वॉरेन बफेसारखे गरीबांसाठी मदतीला धाऊन येणारे लोकं एका जातीचे. ह्यांनाच तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे
ह्याच जातीचा एक तरुण मयूर शेळके. नेरळचा राहणारा. रेल्वे कर्मचारी. रेल्वे स्टेशनवर एक बाई जी अंध होती, अचानक तिचा मुलगा निसटून रुळावर पडला. त्याला platform वर चढता येत नव्हतं. मयूर शेळकेने ते बघितलं. त्याने त्या मुलाच्या दिशेनी धाव घेतली. खरतर त्यानी विचार केला असता माझ पण कुटुंबय. खरतर त्यानी विचार केला असता दुसर कुणी वाचवायला जाईल. मी कशाला? पण त्यानी असा कुठलाच विचार केला नाही. थेट त्या मुलाच्या दिशेने धाव घेतली. काही सेकंदाची लढाई होती. विचार करायला वेळच नव्हता. समोरून शंभरच्या वर वेगानी येणारी अजस्त्र रेल्वे. आणि रुळावर आपल्या आईकडे जाण्यासाठी धडपड करणारे ते लेकरू. platform वर काहीही दिसत नसलेली, आयुष्यभर डोळ्यासमोर अंधार असलेली आई. आज तिच्या डोळ्यासमोर नाही आयुष्यातच अंधार व्हायची वेळ आली होती. जीवाचा तुकडा असलेल लेकरू रुळावर होतं. रेल्वेचा आवाज वाढत होता. तिच्या हे लक्षात येत होतं की रेल्वे एकदम जवळ आलीय. काळजाचा तुकडा काढून नेल्यासारखी भावना. आणि त्या काही सेकंदात खरा देव धावून आला. मयूर शेळके. त्याने त्या मुलाला रुळावरून उचलून सुरक्षित platform वर नेलं. काही सेकंदाचा खेळ. पण एक जीव वाचला. खरतर दोन तीन जीव वाचले. त्या आईचा. मयूरचा. आणि त्या बाळाचा. मुलाचं चुकून काही झालं असतं तर काय केलं असत आईनी? आणी मयूर? त्याच्या घरी कुटुंब आहे. आई वडील, बायको आणी लहान मुलगा. पण मयूर विचार करत बसला नाही. वेळच नव्हता. अशावेळी विचार करत बसणारी माणसं काही करू शकत नाहीत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही घटना घडून गेल्यावर मयूरनी कुणाला सांगितली सुद्धा नव्हती. आपल्या घरच्यांना पण नाही. दोन दिवसांनी व्हिडीओ आला. व्हायरल झाला. लोकांना मयूर व्हिडीओत दिसला तेंव्हा आपला हा खरा हिरो लोकांना कळला.
अशा माणसांना तुकोबाराय म्हणतात
तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे
पण मयूर सारख्या माणुसकीच्या जातीचे लोक कमी होत चाललेत. असे माणसं वाढले पाहिजेत. येरे गबाळे खूप आहेत. पण करोडो मयूर शेळके पाहिजेत. मग जग सुंदर होईल. नक्की.
Photo © Mumbai Mirror
0 Comments