मी आनंदीबाई जोशी.
सप्रेम नमस्कार!
मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खर सांगू? मला तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीत तर आवडेल मला. दीडशे वर्ष होत आली त्या घटनेला जेंव्हा मी मेडिकल प्रवेशासाठी संघर्ष करत होते. आज बघते तर देशात स्त्रियांच्या मंदिर प्रवेशावरून गोंधळ चालू आहे. अशावेळी वाटतं देश खरंच दीडशे वर्ष पुढे आलाय ना? आजही बायकांना या गोष्टीचं कुतूहल वाटतं की पोस्टमास्तर असलेल्या माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नामुळे मी डॉक्टर झाले. खरंतर महात्मा फुले – सावित्रीबाई फुले अशी उदाहरण असतानासुद्धा आजही एखादा नवरा बायकोच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो ही गोष्ट आश्चर्याची वाटते. कमाल आहे. आता ही गोष्ट खूप साधी वाटली पाहिजे. नाही का? आमचा काळ वेगळा होता. बायकांच्या शिक्षणाचा विषय सोडा, बायकांनी घरातही एखादं पुस्तक चाळायला घेतलं तर मार खावा लागायचा. नवऱ्याने बायकोला फिरायला नेणं हे तर खूप मोठं पाप असल्यासारखं वागायचे लोक. हे आपल्याच देशात होतं असं नाही. परदेशातही स्त्रियांवर खूप निर्बंध होते. तिकडे एक काळ असा होता की टेबलचे पायसुद्धा उघडे ठेवत नसत. ते सुद्धा झाकून ठेवायचे. बायकांची अवस्था काय असेल विचार करा. विदेशात भूल देण्याच्या औषधाचा खूप पुर्वीच शोध लागला होता. पण बायकांना भूल देण्याचं औषध द्यायला मात्र तिकडे धार्मिक लोक विरोध करायचे. प्रसूतीवेदना सहन करता याव्या म्हणून डॉक्टरने एका बाईला भूल येण्याचं औषध दिलं होतं. हे कळल्यावर तिकडच्या धर्मांध लोकांनी तिला जिवंत जाळल्याचा इतिहास आहे. अर्थात ही घटना सोळाव्या शतकातली. पण पुढे जग बदलत गेलं. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने बाळंतपणात स्वतःसाठी भूल द्यायचं औषध वापरलं आणि मग इतर बायकांना पण हळू हळू परवानगी मिळायला लागली. आपणच नाही जगच क्रूर आहे बायकांबद्दल. काही लोकांना ही सुद्धा समाधानाची गोष्ट वाटते हा भाग वेगळा.
आपल्याकडे देवीची लस टोचून घ्यायला लोक नकार द्यायचे. खरंच देवी अंगात आली असं समजायचे. एवढच नाहीतर काही लोक उपचार सोडून पेशंटचीच पूजा करायचे देवी आली असं समजून. प्लेगच्या काळातही पेशंटला घरात लपवून ठेवायचे. दवाखान्यात न्यायचे नाहीत. बाळंतपण म्हणजे तर स्त्रीचा दुसरा जन्मच समजला जायचा. बाई जगेल की नाही याची खात्री नसायची. त्यात बायकांनी आजारी असलं तरी दुखणं अंगावरच काढायचं. सांगणार कुणाला? आणि सांगितलं तरी पुरुष डॉक्टरकडे जाणार कसं? घरातल्या पुरुषाने डॉक्टरला घरातल्या बाईचा आजार सांगायचा. मग डॉक्टरने अंदाजे औषध सांगायचं. असा सगळा मामला. अगदी संस्थानिकांच्या बायकांना पण डॉक्टरने पडद्याआड बसून तपासायची पद्धत होती. बाईच्या जगण्याला काहीच किंमत नाही असं वाटायचं. खुपदा मानसिक आजारी असलेल्या बाईला चेटकीण ठरवून मोकळे व्हायचे लोक. कर रद्द करावा, स्वातंत्र्य द्यावं अशा आपल्या देशातल्या लोकांच्या इंग्रजांकडे मागण्या चालू होत्या. त्याच काळात आपल्याकडची एक स्त्री इंग्लंडच्या राणीला चिट्ठी लिहून सांगत होती आम्हाला महिला डॉक्टर पाहिजे. आमचे खूप हाल होतात. किती छोटी अपेक्षा होती बायकांची जी पूर्ण होत नव्हती. आज शंभर दीडशे वर्ष उलटून गेल्यावरही बायका जेंव्हा शौचालयाची मागणी करताना दिसतात तेंव्हा खूप वेदना होतात मनाला. अजूनही या छोट्या छोट्या गरजा पूर्ण होत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
आजही जागोजाग बेटी बचावच्या जाहिराती पाहते तेंव्हा खूप त्रास होतो. अजूनही काहीच बदललं नाही असं वाटतं. मी डॉक्टर झाले तेंव्हा माझ्या प्रबंधाचा विषय बाळंतपण होता. आपल्याकडच्या बायकांचं बाळंतपण जीवघेणं ठरू नये, सहज व्हावं ही तळमळ होती माझी. पण आजही सिझेरियनचं वाढतं प्रमाण ऐकून धक्का बसतो. कुठे कुपोषण होऊन मृत्यू आहे, कुठे लहान बाळांना दवाखान्यात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जीव जातोय. आरोग्यम धनसंपदा असं म्हणणारी माणसं आपण. आपल्याला बदलायला पाहिजे. शंभर वर्षापूर्वी माझं मुल जगू शकलं नाही तेंव्हा मी ठरवलं होतं. बदल घडवायचा. मी जिद्दीने डॉक्टर झाले. आज डॉक्टर खूप आहेत. बदलायचाय तो देश. या इंडिया नावाच्या देशातच एक भारत नावाचा देश आहे. जो मेळघाटमध्ये आहे. गडचिरोलीमध्ये आहे. कित्येक गावात आहे तसा शहरातल्या झोपड्यांमध्येही एक भारत आहे. जिथे आजही मुलांचं आणि आयांचं आरोग्य या गोष्टीत खूप काम करावं लागणार आहेबरं ही गावं फार दुर्गम आहेत असं म्हणून चालणार नाही. जिथे मतदानासाठी मतपेटी पोचू शकते तिथे आरोग्यसेवा पण पोचलीच पाहिजे. असो.
पत्र लिहिण्याचं कारण हेच की एका पत्रामुळे मी डॉक्टर होऊ शकले. माझ्या नवऱ्याने पत्र लिहून अमेरिकेत आवाहन केलं होतं की माझ्या शिक्षणाला मदत करा. त्याला अमेरिकेतून प्रतिसाद आला आणि माझी शिक्षणाची सोय झाली. नंतरही पत्रव्यवहार चालूच राहिला. पण आपल्या देशातून. कितीतरी निनावी पत्रं यायची. ज्यांना मी शिक्षण घेतेय हे मान्य नव्हतं, मी परदेशात गेले हे मान्य नव्हतं, मी धर्म बदलला असा संशय होता अशा लोकांनी खूप पत्रं पाठवून त्रास दिला. कधी कधी माझा नवराही निराश होऊन त्यांच्या सुरात सूर मिळवायचा. पण माझ्या नवऱ्यामुळे मी शिकू शकले. माझं आजही अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण करू शकले. माझ्या आयुष्यात माझे पती गोपाळराव होते. तुमच्या आयुष्यात पण तुमचे गोपाळराव आहेत ना? नवरा प्रोत्साहन देणारा असेल तर बायको लग्नानंतरही डॉक्टर होऊ शकते. पण प्रोत्साहन जाउद्या बायकोला किंमतच देणार नसेल तर बायको पेशंट सुद्धा होऊ शकते. अशावेळी तिने खंबीर असणं गरजेचं असतं. जिद्दी असणं गरजेचं असतं. तुम्हा सगळ्यांना ती जिद्द लाभावी यासाठी शुभेच्छा! लोक स्वर्गात जाण्यासाठी जेवढा कर्मकांड करण्यासाठी खर्च करतात तेवढा आरोग्यावर केला तर इथेच खराखुरा स्वर्ग भेटल्यासारखं वाटेल. कारण राहून राहून एकच वाटतं. मी डॉक्टर व्हायला अमेरिकेत गेले त्याला दीडशे वर्ष होत आली. पण आज दीड शतकानंतरही या देशातली मोठ मोठी माणसं उपचारासाठी परदेशातच जात असतील तर आपण नेमकी काय प्रगती केलीय? ज्या देशातल्या नेत्यांना उपचारासाठी परदेशात जावं लागत असेल त्या देशाच्या प्रजेचं आरोग्य किती चिंता करण्यासारखं असेल? काळजी घ्या सगळ्यांनी.
तुमचीच डॉक्टर आनंदीबाई जोशी.
0 Comments