ज्या वयात मुलांनी शास्त्रज्ञ होऊन शोध लावण्याचं स्वप्न बघावं त्या वयात मुलं वायफाय hack करण्याचे फंडे शोधताहेत.
मोबाईल नव्हता तो काळ आठवला की खुपदा छान वेळ जातो. मोबाईलमुळे माहितीचा खजिना हाती आला असेल पण खूप छोट्या छोट्या गोष्टी गायबसुद्धा झाल्या. खरतर किती साध्या आणि छोट्या गोष्टीत आपण रमायचो. आकाशात दिसणाऱ्या बगळ्यांना बघून हवेत हात करायचो आणि म्हणायचो, बगळ्या बगळ्या कवड्या दे. आणि काही वेळानंतर नखांकडे बघायचो. नखावर पांढरे ठिपके दिसायचे कधी छोटे. छोटे. त्या बगळ्यांनी दिलेल्या कवड्या वाटायच्या. छोट्या छोट्या फुलपाखरांच्या मागे फिरायचो. झाडावर चढायचो. आता शहरात किती मुलांना झाडावर चढता येतं?
एक मित्र कौतुकाने सांगत होता माझ्या मुलाला डायनिंग टेबल शिवाय जेवताच येत नाही. त्याला मांडी घालायला जमतच नाही. धक्का बसला होता ऐकून. हा कौतुकाचा विषय कसा काय असू शकतो? आज कुठलाही खेळ खेळायचा तर खेळाचं साहित्य विकत आणायला लागतं. आपण स्ट्म्प, bat स्वतःच बनवायचो. विट्टी दांडू सारख्या कितीतरी गोष्टी बनवता यायच्या. क्रिकेटची पीच स्वतः बनवण्यात केवढी मजा होती. मुलींचे खेळसुद्धा अगदी घराच्या आसपास असणाऱ्या गोष्टीत होते. चिंचोके, सागरगोटे, फरशीचे किंवा मडक्याचे तुकडे. झाडाला बांधलेला झोका. त्या सगळ्या गोष्टी आजच्या मुलांनी खेळाव्यात असं नाही. पण आपलं खेळाचं साहित्य आपण बनवण्यात जो आनंद होता तो मुलांना मिळत नाही याची खंत वाटते.
आजी सांगते तशा भन्नाट गोष्टी गुगलला पण माहित नसतात. गावाकडून आजोबा आणतात तसा हुरडा कधीच ऑनलाईन भेटत नाही. खूप गोष्टी आहेत. आजकाल आपले मित्र फोटोवर खूप वेगवेगळे स्टीकर पाठवतात. पण काकूने किंवा मावशीने पाठीवर धपाटा मारून दिलेली शाबासकी जेवढी भारी असते त्याची सर कशाला नाही. पण आपण हे सगळं मिस करतोय आता. का?
मुलांना मोबाईलवर गेम खेळण्यात आनंद वाटतो. मुलं तरी स्वतःच्या आनंदासाठी ऑनलाईन गेम खेळत असतात. पण बरीचशी मोठी माणसं सोशल मिडीयावर फक्त इतरांच्या भावनेशी खेळत असतात. मोबाईलवर घालवलेल्या वेळाचा नंतर खूप त्रास होतो. सेल्फीसाठी रोज दहावेळा फोन हातात घेतात लोक. त्याच्या अर्ध्यावेळा जरी पुस्तक हातात घेतलं असतं तर लोकच कदाचित फोटो काढतील आपल्यासोबत.
पण मोबाईलचं व्यसन भयंकर असतं. आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट ही आहे की मोबाईल हे व्यसन आहे हेच कुणी सांगत नाही आपल्याला. आणि खूप घरात परिस्थिती अशी असते की स्वतःच मोबाईलवर पडीक असलेले आई बाप कोणत्या तोंडाने सांगणार मुलांना की मोबाईल दूर ठेव. आणि गेम खेळताना मुलंही एवढे गुंतून जातात की ठरवूनही मोबाईल हातून सुटत नाही. पण जरा शांतपणे विचार करा.
ज्या वयात हातात टेनिसचं racket पाहिजे, क्रिकेटची bat पाहिजे त्या वयात ऑनलाईन गेम खेळताना नकळत त्यांच्या हातात बंदुक आलीय. मारधाड, गोळीबार, बॉम्बस्फोट या गोष्टीचं आपल्याला काही वाटत नाही. खेळताना मारो, खतम करो असं बोलता बोलता मुलं समोरच्याचं ऐकत कधी शिव्या द्यायला लागतात कळत नाही. मोबाईल आधी आपली भाषा बिघडवतो. लहानपणापासून घरच्यांच्या संस्कारातून आलेली भाषा एकदा बिघडवली की मोबाईलचं काम सोपं होतं.
मग थोडे मोठे होत गेले की मुलं सोशल मिडीयाच्या नादी लागतो. त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांच्या अकाऊन्टवरून फोटो टाकत असतात. लाईक मिळवत असतात. मुलांना मोह होतो आपला फोटो भारी दिसावा म्हणून. मग महागडा फोन, गोरं दिसण्याच्या नावाने पांढरे फटक चेहरे करून देणारे app आपण शोधू लागतो. खरतर मुलाचा चेहरा आई बाबांच्या चेहऱ्यासारखा असतो. त्याच चेहऱ्याची त्याला लाज वाटत असेल तर त्यासारख दुर्दैव नाही. आपण चांगलं दिसण्यासाठी प्रयत्न करतो असा प्रत्येकाचा गैरसमज आहे. नकळत आपण खोटं दिसण्यासाठी प्रयत्न करतो. आपण जसे नाही तसे जगाला दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. सगळेच असे इफेक्टवाले फोटो वापरू लागलेत आजकाल. यामुळे आपल्या सच्चेपणावर केवढा मोठा इफेक्ट झालाय याचा विचारही कुणी करत नाही.
खरतर तरुण पिढीने मोबाईलवरच्या गेममुळे आपण आळशी झालोय का याचा विचार केला पाहिजे.. मोबाईलवर खेळताना तो जिंकत असतो. पण तो आयुष्याच्या मैदानातला पराभव असतो. पण मुलं वेड्यासारखे ऑनलाईन गेम खेळणाऱ्या काही लोकांना आदर्श मानू लागतात. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण या ऑनलाईन गेम खेळणाऱ्या लोकांनी त्यांच्या व्हिडीओत आपलं नाव घ्यावं म्हणून कित्येक मुलं घरात चोर्या करून त्यांना पैसे पाठवतात. ज्या वयात सैन्यात जाऊन देशासाठी पराक्रम करावा असं वाटायला हवं त्या वयात मुलं गेमिंग मध्ये जीवाची बाजी लावण्याचा विचार करताहेत.
ज्या वयात मुलांनी शास्त्रज्ञ होऊन शोध लावण्याचं स्वप्न बघावं त्या वयात मुलं वायफाय hack करण्याचे फंडे शोधताहेत. आणि पालक मोठ्या कौतुकाने नवी पिढी खूप स्मार्ट आहे असं सांगत फिरतात. वायफायचा पासवर्ड चोरणे म्हणजे स्मार्टनेस नसतो. खूप लोकांना तर असं वाटतं की मोबाईलमधली हिस्ट्री डिलीट करता येणं म्हणजे स्मार्टनेस. पण हिस्ट्री डिलीट करता करता आपण आपलं फ्युचर पण डिलीट करतोय याची जाणीव सुद्धा व्हायला पाहिजे.
हे सगळं सांगायचं कारण या मोबाईलमुळे आपण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हरवून बसलोय. मोठेही आणि मुलंही. आपण तरी काही काळ जगलोय या कृत्रिम यंत्राशिवाय. पण मुलांनी हे का मिस करायचं? त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी आपणच शिकवायच्या आहेत. दाखवायच्या आहेत. डँबीस चित्रपटासाठी मुलांचं गाणं लिहिताना हेच विचार डोक्यात घोळत होते. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रुपकुमार राठोड यांनी गायलंय.
आभाळाशी नेते
इवल्या झोक्याची दोरी
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
गंमत असते भारी
वारा गातो गाणं
तू सोबत गाऊन बघ
फुल सुद्धा कसं लाजतय
तू हात लावून बघ
हिरव्यागार गवतामध्ये
बेडकासारख्या मार उड्या
झुळझुळ वाहत्या पाण्यामध्ये
सोड कागदाच्या होड्या
चिखलामध्ये लडबडलास
तरी डोंट वरी
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गंमत असते भारी
दगडातही दिसतो देव
फक्त हात जोडल्यावर
पाण्याची ओली माया
कळेल पाण्यात शिरल्यावर
पेरू लागेल अजून टेस्टी
झाडावरती चढलास जर
वाटणार नाही कधी भीती
एकदा खाली पडलास तर
आज धडपडलास तर
आला मंतर कोला मंतर
पण आजचं बालपण
येणार नाही पुन्हा नंतर
मारून घे उड्या बिड्या
कर धमाल सारी
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गंमत असते भारी
0 Comments