मित्राच्या मुलाने त्याला विचारलं, मोबाईल नव्हता तेंव्हा तुम्ही काय करायचे? आम्ही हसलो. पण विचार करायला लागल्यावर लक्षात आलं की मोबाईल नव्हता तेंव्हा आपण खूप काही करायचो. मोबाईल या पंचवीस वर्षात हातपाय पसरत गेला. आपण म्हणतो आम्ही मोबाईल वापरतो. पण खरतर मोबाईल आपल्याला वापरतो. आपलं लोकेशन, आपला फेस आयडी, आपला आवाज, आपली खरेदीची आवड. सगळं काही मोबाईल वापरतोय. पूर्वी या गोष्टी किती खाजगी होत्या. आपण कुठल्या हॉटेलमध्ये काय खातोय याची जगाला माहिती देण्याची गरज असते का? मोबाईल नव्हता तेंव्हा आपण खरच बिझी होतो. मोबाईल आल्यामुळे आपण एंगेज असतो. आऊट ऑफ रिच असतो. अनअव्हेलेबल असतो. पण खरच बिझी असतो? न चुकता वर्तमानपत्र वाचणारी माणसं आपण. पण सकाळी उठल्यावर आपण वर्तमानपत्राच्या आधी मोबाईल हाती घेऊ लागलो. वाटतो. आपल्याला जगाच्या बातमीपेक्षा आपल्या इनबॉक्सची, पोस्टची जास्त उत्सुकता. ग्लोबल व्हायच्या ऐवजी मोबाईलमुळे आपण खूप आत्मकेंद्रित झालोय. आधी आपण खूप निवांत होतो. शहरात पाउस पडला की लगेच गावी पाउस पडला का याची चौकशी करणारे, ज्वारीवर आपले गहू दळायला टाकू नये म्हणून स्वतः गिरणीत थांबणारे, पाहुण्यांना पोचवायला किंवा आणायला बसस्थानकावर जाणारे. अचानक आपण बिझी झालो का? नाही. मोबाईलने आपल्याला आळशी मात्र केलय. आपण किराणा दुकानात वस्तूचे भाव विचारायचं विसरून गेलोय. कॅल्क्युलेटर सगळे वापरायचे नाहीत. गणित तोंडपाठ होतं. घरातल्या लँडलाईन फोनचे असंख्य नंबर पाठ होते. आता मोबाईलने काही पाठ करायची सवयच ठेवली नाही. आरतीसुद्धा मोबाईलवर लावतात लोक. पूर्वी शेजाऱ्यांना कायम भेटायचो आपण. आता लोक whatsapp वरून एकमेकांच स्टेट्स बघतात. आता लोकांच्या घरी नाही सोशलमिडीयाच्या भिंतीला भेट देतो आपण.
मोबाईलच्या आधी पेजर आला होता. तो आला कधी आणि गेला कधी असं झालं. पेजर वर नंबर यायचा. मग त्या नंबरवर फोन करायला पीसीओचा लाल डबा. सुट्टे पैसे. जरा बोलणं रंगात आलं की टूं टूं सुरु. माणसं आपोआप कामापुरतं बोलायची. मोबाईल आला तेंव्हा इनकमिंग कॉललाही पैसे होते. पंचवीस पंचवीस रुपये एका कॉलला. खुप लोक फोनवर ‘ठेऊ का?’ हेच वाक्य जास्त बोलायचे. श्रीमंत लोकांच्या हातात मोबाईल दिसायचा. या जन्मात तरी आपण मोबाईल वापरू शकतो असं वाटायचं नाही. अचानक अंबानींनी ‘ कर लो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणत मोबाईल आवाक्यात आणला. म्हणजे ईएमआय वर एकप्रकारे. हळूहळू त्याची सवय लागली. आज मोबाईलवरचे गेम्स बघून पूर्वीचा तो एकमेव सापाचा गेम आठवतो. छोट्याशा स्क्रीनमधला. तो इवलासा साप अजूनही नजरेसमोर वळवळत असतो. मोबाईलवरचं टायपिंग केवढ किचकट होतं. आणि मेसेजलाही खूप पैसे लागायचे. त्यामुळे प्रियकर प्रेयसीसुद्धा वायफळ बडबड करायचे नाही त्याकाळी. कुठे? कधी? केंव्हा? असे कामाचे मेसेज पाठवायचे लोक एकमेकांना. सुरुवातीचे फोन एवढे जड होते की फेकून मारले तर माणूस जखमी होऊ शकला असता. रेंज मिळत नाही म्हणून दोन दोन किलोमीटर चालत जाणारे, डोंगरावर जाऊन बोलणारे लोक पाहिलेत. एका गावात विशिष्ट झाडावर रेंज यायची. हमखास चारपाच माणसं त्या झाडावर दिसायची. वैतागून त्या झाडावर पक्षी येणं बंद झालं. आणी कालांतराने रेंजही.
मोबाईलची सगळ्यात भारी गोष्ट होती मिसकॉल. असे असंख्य लोक होते जे मिसकॉल करण्यासाठी प्रसिद्ध होते. समोरच्याने पैसे खर्च करून आपल्याला फोन करावा ही अपेक्षा असायची त्यांची. ते एक दोन रिंग देऊन फोन कट करायचे. मग अशा लोकांना वैतागून पहिल्या रिंगला त्यांचा फोन उचलून धडा शिकवायला मजा यायची. नवीन मोबाईल घेतल्यावर फोनच यायचा नाही कुणाचा तेंव्हा खूप वाईट वाटायचं. कॉलसेंटरमधून फोन आला तरी जीवाला बरं वाटायचं. खिशात फोन व्हायब्रेट व्हायची सवय नसल्याने काही लोकांना आपल्याला हार्टअॅटॅक आलाय असंही वाटलं. रिंगटोन सेम असायच्या म्हणून एकाचा फोन वाजला की चार पाच जण खिशात हात घालायचे. एक मात्र नक्की की मोबाईलमुळे बायकांना खूप फायदा झाला. नवरा कुठे आहे? काय करतोय? याची खबरबात मिळू लागली. नाहीतर पूर्वी बाहेर गेलेला नवरा घरी येईपर्यंत काही विचारायची सोय नव्हती. आता दर दोन तासाला अपडेट घेता येतात. स्मार्टफोन नव्हते तोवर खूप नवरे मिटिंगमध्ये आहे असं सांगून बिअरबारमध्ये असायचे. आता व्हिडीओकॉल आला आणि पुरुषांचं ते स्वातंत्र्यही गेलं. मोबाईलने बायकांना बँकिंग सोपं झालं. पुरूषांवर अवलंबून राहणं खूपच कमी झालं. दुष्परिणामही आहेतच. विमानतळावर एकजण एका नटीला भेटायला गर्दीतून कसाबसा पोचला. तिच्या अगदी समोर गेला आणि तोंड फिरवलं. का? तर सेल्फी काढायचा होता. त्याने क्षणभरही तिला पाहिलं नाही. मोबाईलमुळे आपण खूप गोष्टींच्या जवळ जाऊन तोंड फिरवतो. हे देवळात जाणं होतय फक्त. अशाने देव कधीच भेटणार नाही.
"मोबाईलमुळे आत्मविश्वास किलोच्या भावात मिळू लागला. मेंदूपेक्षा मेमरी कार्ड किती जीबीचं आहे हे मोठेपणाचं लक्षण झालं."
मोबाईलमुळे आत्मविश्वास किलोच्या भावात मिळू लागला. मेंदूपेक्षा मेमरी कार्ड किती जीबीचं आहे हे मोठेपणाचं लक्षण झालं. मोबाईलवर मोबाईल ठेऊन ब्ल्यूटूथने घडवलेल्या प्रणयातून एकमेकांकडे असलेल्या क्लिपची देवानघेवाण हा एक सोहळा असायचा. तासनतास संयम ठेऊन पोरं एक एक मिनिटाचे व्हीडोओ डाऊनलोड करायचे. आजच्या फाईव जी पिढीत हा संयम येउच शकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे मोबाईलमुळे उगाचच काही लोकांच महत्व वाढू लागलं. फोटो काढण्यासाठी अनोळखी माणसाला बायका प्रेमाने विनंती करू लागल्या. गरजेच्यावेळी चार्जर देणारा माणूस मोठा दानशूर वाटू लागले. हॉटस्पॉट किंवा वायफायचा पासवर्ड देणारे साधूसंत वाटू लागले. मोबाईल बिघडला की देशभरात ‘ऑफ करून ऑन करा’ असा हुकुमी सल्ला मिळायचा. दुकानात गेलं तर तो पोरगा आपल्यासमोर battery काढून तिला जीभ लावायचा. त्याच्या तोंडातला गुटखा अडकून battery आणखी खराब होईल अशी भीती वाटायची. आता मोबाईल दुरुस्ती एवढी सोपी राहिली नाही. माणसं मोबाईल कुठला वापरतात यावर प्रतिष्ठा ठरू लागली. मोबाईलवर उष्ट्या सफरचंदाचा लोगो असलेली माणसं भारी समजली जातात हे किती विनोदी आहे. त्यापेक्षा मोठा विनोद मित्राचा झाला. मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवता येईल यावर चर्चा चालू होती. मित्र म्हणाला, मुलाचं जाउद्या. माझ्या आजोबाला मोबाईलचं वेड लागलय. दिवसभर येईल त्या गोष्टी फॉरवर्ड करत असतात लोकांना. त्याचे आजोबा एकेकाळी गावातल्या लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचे. आज ते अर्धावेळ मोबाईलवर अफवा पसरवत असतात नकळत. काही दिवसांपूर्वी मोबाईलसाठी गाय विकणाऱ्या मुलाबद्दल ऐकलं. तेहतीस कोटी देव जिच्या पोटात असतात असं आपल्या देशात मानलं जातं, त्या देशात मोबाईलसाठी गाय विकली गेली. लोक म्हणाले, मोबाईल काय दूध देणारय का? खरतर मोबाईल खूप काही देतो. वापर कळला पाहिजे. खूप लोक मोबाईल खिशात ठेवतात. हृदयाजवळ. पण मोबाईल हृदयाजवळ येऊनही आपण यंत्रासारखे का होत चाललोय? घरातसुद्धा माणसं एकमेकांकडे न बघता मोबाईलकडे बघतात. आपण एकमेकांच्या मनात डोकावण्याची गरज नाही. खिसे तपासूया. आपल्या कुठल्याही नात्यापेक्षा मोबाईल जास्त जवळचा झालाय. त्याला जास्त वेळ देतोय आपण सारे मोबाईलवेडे! फक्त आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईल वापरतो. पण प्रत्यक्षात मोबाईल आपल्याला वापरतोय.