शाळेसमोर खूप झाडं होती
शाळेसमोर खूप झाडं होती
रांगेत प्रार्थनेला उभी असतात मुलं तशी.
त्या झाडांची नावं आठवत नाहीत
फुलं सुद्धा येत होती की नाही ठाऊक नाही
कारण त्या झाडांमधून दिसायची मुलींची शाळा
बाकी माहीत नाही
कारण मुलींच्या शाळेला उंच भिंत होती.
स्वप्न तरंगत येतंय हवेत असं वाटायचं
मुली सायकलवर यायच्या तेंव्हा.
खुपदा रांगेत लावलेल्या सायकल पडायच्या रांगेतच
गणिताच्या तासाला एकामागोमाग एक पडणाऱ्या प्रश्नासारख्या.
बसच्या दारात रोज बाजीप्रभू सारखे
खिंड लढवायचो आपण.
भेटलेली जागा केवळ ती उभी आहे म्हणून सोडायचो
तिच्या मनात जागा मिळावी या आशेने.
ती मात्र खिडकी बाहेर बघायची घर येई पर्यंत.
एकदाच खिडकीबाहेर घरावर माकड बसलेलं दिसलं
म्हणून हसून पाहिलं होतं तिने.
केवढा पोपट!
आपण रात्रभर विचार करत राहिलो
आज तिने आपल्यामुळे माकड पाहिलं?
की माकडामुळे आपल्याला पाहिलं?
पण छान हसली होती.
खूप जुनी गोष्ट नाही
मुलींच्या डोक्यात फुलं असायची तेंव्हा.
समोरच्या सीटवर बसलेली मुलगी
आपल्या साठीच फुल घालून आलीय वेणीत असं वाटायचं.
एकदा सीटवर बसलेल्या एका मुलीने दप्तर घेतलं होतं
मी उभा होतो म्हणून
त्या दिवशी शिक्षणाचं सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं.
खूप जुनी गोष्ट नाही
मुली लाजायच्या बिजायच्या तेंव्हा बोलायची वेळ आली तर.
आणि तो एखाद दुसरा शब्द
लब्दू सारखा विरघळतोय असं वाटायचं.
चिंचेच्या गाडी समोर होणारी गर्दी
मुली चिंचांकडे आपण मुलींकडे बघत राहणं
सारख्याच हावरटपणे.
चिंच खाताना डोळा मारल्यासारखा होणारा तिचा चेहरा
असं काय एक एक भारी असायचं.
तिच्या चेहऱ्यावर प्रमेयं असती भूमितीची
तर आपणच वर्गात पहिले होतो असं वाटायचं.
बऱ्याचदा शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं करायचे सर्
तर बाहेर झाडांची रांग आणि समोर मुलींची शाळा
आणि त्या शाळेसमोर एक उंच भिंत.
दहावी पास झालो तेंव्हा
त्या भिंतीला नारळ फोडावा वाटला.
ती नसती तर वर्गात लक्ष गेलंच नसतं.
मित्र नाही पण गणित राहिलं असतं.
पुढे कॉलेजात मुली वर्गात होत्या
पण कुतूहल नव्हतं.
स्कूटीवर भुर्रकन उडून जाणाऱ्या बऱ्याच पोरी दिसल्या.
पण आपल्या मनात
सायकलवर तरंगत जाणारं स्वप्न तसच राहिलं.
त्या भिंतीसारखं.
एवढं काय आहे त्या भिंतीत?
भिंतीत नाही..पलीकडे.
आपण एवढा तरल, एवढा हळूवार आणि एवढा भाबडा
विचार केला त्या मुली आहेत पलीकडे…अजूनही…
पुन्हा कधी आपलं मन तेवढं निरागस झालं नाही..
त्या भिंतीच्या पलीकडे खूप भाबडी स्वप्न आहेत
राजपुत्राने राक्षस व्हायच्या आधी पाहिलेली.
– अरविंद जगताप.
0 Comments