जीवाची मुंबई करणे हा वाकप्रचार एकेकाळी खूप वापरला जायचा. हळूहळू मुंबईचं कौतुक कमी झालं. अतिक्रमण आणि ट्रॅफिक हीच मुंबई झाली. पण मुंबई एकेकाळी एवढी भरभराटीला कशी आली? देशाची आर्थिक राजधानी कशी झाली? अशाच मे महिन्यातली गोष्ट. मे १६६२ साल होतं. पोर्तुगीज राजकन्या आणि इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांचं लग्न झालं या दिवशी. आणि हुंड्यात काय दिलं? मुंबई. हो. तोपर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्यांना मुंबईचं महत्व नीट कळलेलं नव्हतं. तसेही पोर्तुगीज लोक धर्मांध जास्त. चर्च उभारणे वगैरे पलिकडे त्यांची दृष्टी गेली नाही. तर मुंबई हुंड्यात दिली खरी पण ताबा मात्र दिला नाही. म्हणजे मुंबईत जे पोर्तुगीज अधिकारी होते त्यांना मुंबई सोडायची नव्हती. आता महापालिकेत जसा सगळ्या पक्षांचा जीव गुंतलेला असतो तसं. म्हणजे इंग्रज मुंबईचा ताबा घेण्यासाठी वर्षभर झटत होते. किनाऱ्यावर चकरा मारत होते. आणि पोर्तुगीज अधिकारी टाळाटाळ करत होते. त्यामुळे तिकडे दुसऱ्या छोट्या बेटावर मुक्काम करून राहिलेले इंग्रज शिपाई जीवाला मुकत होते. पण स्थानिक पोर्तुगीज काही ऐकायला तयार नव्हते. बरं हा काही मनापासून दिलेला हुंडा नव्हता. पोर्तुगीजांना डच आरमारापासून संरक्षण पाहिजे होतं . तेवढ्यासाठी तर त्यांनी इंग्रज राजाशी नातं जोडलं. राजकन्या दिली. एकप्रकारे तह केला. त्यात मुंबई भेट दिली. पण इथल्या पोर्तुगीज लोकांनी मुंबई ताब्यात द्यायला दोन तीन वर्ष लावली. शेवटी पोर्तुगीज राजाने इथल्या लोकांना दम देणारं पत्र पाठवलं. तेंव्हा कुठे मुंबई इंग्रजांच्या ताब्यात दिली गेली. त्यात गंमत अशी की पोर्तुगीज न्याय खात्याने निर्णय दिला की मुंबई इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा निर्णय चुकीचा आहे. पण हा निर्णय इकडे कळायच्या आत मुंबईचा ताबा इंग्रजांकडे गेला होता. मुंबईचा कारभार पहिल्यापासून असाच चालतो बघा.
इंग्रज राजाने ताबा घेतला. त्याची माणसं कारभार पाहू लागली. पण जेमतेम तीन वर्षात त्यांना वाटू लागलं की मुंबई काही आपल्याला परवडत नाही. मुंबईत खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी. त्याने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला दिली. भाड्याने. मुंबई चक्क भाड्याने दिली. आणि वार्षिक भाडं होतं दहा पाउंड. फक्त. कंपनीवाले पक्के व्यापारी. त्यांचा डोळाच होता. कंपनीच्या लोकांनीच कटकटी करून इंग्रज राजाच्या लोकांना जेरीस आणलं आणलं म्हणतात. व्यापारी पहिल्यापासून असतातच असे. एकतर तेंव्हा कंपनीचा व्यापार सुरतेहून चालायचा. तिथे जहांगीरची माणसं. लाचखोर. उर्मट. इंग्रज कंपनीवाले त्यांना वैतागले होते. त्यांना नवीन बेट पाहिजेच होतं. गुजरात सोडून ते मुंबईत आले आणि भरभराट सुरू झाली. आताही होतेच. पण हे एवढं सोपं नव्हतं. हजारो एकर जमिनीवर समुद्राच पाणी येई. भराव टाकत टाकत राहण्यायोग्य जमीन बनविली गेली. सिद्दी त्रास देतच होते. त्यांचा बंदोबस्त करावा लागायचा. एकतर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेंव्हाच इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की सुरतला राहून आपलं काही खरं नाही. मुघल स्वतःचं आणि आपलं संरक्षण करू शकत नाहीत. इंग्रज कंपनीने मुंबई व्यापारी बेट बनवली. सिद्दी नरमले . औरंगजेबानंतर मुघलांचा ताप उरला नाही.पुढे मराठ्यांचा पराभव झाला. एकूण सगळ्या गोष्टी कंपनीच्या मनासारख्या घडत गेल्या. नंतर कंपनीचे राज्य जाऊन इंग्रज सरकारने देशाचा कारभार आपल्या हाती घेतला.
1857 चा उठाव हे मुख्य कारण होतं. पण याकाळात काही चांगल्या गोष्टी घडत होत्या. तिकडे 1857 चा उठाव चालू होता त्याकाळात मुंबई विद्यापीठ स्थापन होत होतं. रेल्वे आली होती. या सगळ्या गोष्टी आपल्या देशाचा विकास करायला नव्हत्या. इंग्रजांचा व्यापार आणि कारभार सुरळीत करायला होत्या. पण त्यात आपला थोडा फायदा झाला. आजही कौतुक करावं अशा वास्तू त्याकाळी मुंबईत बनल्या.
इंग्रज गेल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी टर्मिनस सारखी वास्तू मुंबईत बनवू शकलो नाही. मुंबई विद्यापीठ किंवा महापालिके सारखी इमारत बनली नाही. असं भव्यदिव्य काही बनवाव असं आपल्या नेत्यांना वाटलं नाही. इंग्रज गेल्यानंतर भव्यदिव्य असं काही बनलं असेल तर ती मुकेश अंबानी यांच्या घराची इमारत. पण त्यात काय बघण्यासारखं आहे?
इंग्रजांकडून आपण फक्त इंग्रजी शिकलो असं वाटतं कधी कधी. एलफिन्स्टन सारखे अधिकारी आजही आठवले जातात. डफ सारख्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला. एवढी वर्ष खपून. त्याला तेंव्हा प्रकाशक मिळत नव्हता. जे पैसे द्यायला तयार होते त्यांना पुस्तकाच नाव वेगळं पाहिजे होतं. डफने ते मान्य केलं नाही. मुंबईत समुद्रात भराव टाकायला त्याकाळी खूप मोठा पैसा लागत होता. इथले अधिकारी तिकडे इंग्लंड सरकारशी भांडत होते. पैसे पाठवा. आज मुंबईच्या विकासासाठी पैसे पाहिजेत म्हणून कुणी आवाज उठवत नाही. मुंबईतून मात्र वाटेल तेवढा पैसा दिल्लीत नेला जातो. मुंबईत एकेकाळी रस्त्यावर फुलांची झाडं होती. मोठमोठ्या बागा होत्या. मुंबईतल्या कितीतरी भागांची नावं झाडावरून ठेवलेली आहेत. होती म्हणावं लागेल. कारण आता वाड्या जाऊन आपण इंग्रजी नावं ठेऊ लागलो. मोठमोठ्या इमारतीची नावं मराठीत ठेवणं हा आपल्या लोकांना अपमान वाटतो. एलफिन्स्टन स्टेशनच नाव बदलणं सोपं आहे. पण आपण आपल्या इमारतीच नाव काय ठेवतो ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून आपली अस्मिता कळते.
“इंग्रज गेल्यानंतर भव्यदिव्य असं काही बनलं असेल तर ती मुकेश अंबानी यांच्या घराची इमारत. पण त्यात काय बघण्यासारखं आहे?”
जाता जाता आणखी एक गोष्ट. १५२७मध्ये जेव्हा पोर्तुगालने मुंबईवर ताबा मिळवला, त्या वेळी मुंबईला त्यांनी ‘इल्हा द बोआ विदा’ (म्हणजे जिथे चांगले जीवन जगता येते) असे बेट म्हणून उल्लेख केला. हेच नाव दिलं. आज आपण असं म्हणू शकतो का? आपण मुंबईचं काय करून ठेवलं? जीवाची मुंबई करणे सारखा आणखी एक वाकप्रचार काही काळ प्रसिद्ध होता. मुंबई द्वेष्टे लोकांनी बनवलेला. जो करील पाप तो मुंबईला जाईल आपोआप. आपण खरोखर तीच वेळ आणणार आहोत का?