नाम फाउंडेशन

August 22, 2016

लेखन

arvind jagapat patra

सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे.

सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे. कारण ते शेतकरी आहेत. सत्तावीस नक्षत्रं आहेत. त्यातले पावसाचे नऊ गेले तर त्यांच्या दृष्टीने शून्यच उरतं. आणि या नऊ नक्षत्रावर आयुष्याचा जुगार खेळण्याचा वेडेपणा ते वर्षानुवर्ष करतात. खरंतर आपलंही आयुष्य अवलंबून असत त्यांच्यावरच. 
                      पण गेली काही वर्ष शून्यच उरतंय. नक्षत्र कोरडी जाताहेत. उजाड माळ आणि पांढरी कपाळ वाढत चालली. पेपरमध्ये रोज एक तरी बातमी शेतकऱ्याच्या आत्महत्येची. पाखरांसाठी हटकून आपल्या दारात धान्याची कणसं टांगून ठेवणारा शेतकरी आज लेकरं बाळ उघड्यावर टाकून जग सोडण्याएवढा निष्ठुर का झाला? वर्तमानपत्रात माहिती मिळते. टीव्हीवर प्रश्न कळतो. पण उत्तर घरबसल्या मिळत नाही. तसे आपण सगळे पांढरपेशी. आता पांढरपेशी म्हणजे अगदी इंग्रजीतलं व्हाईट कॉलर नाही. हा आपलाच शब्द आहे. आपल्या मातीतला. गावाकडे काळी आणि पांढरी असे दोन भाग असतात. काळीत म्हणजे शेतात राहणारा, शेती करणारा शेतकरी. आणि पांढरीत म्हणजे गावात राहणारा, शेती न करता दुसरा काही उद्योग करणारा पांढरपेशी. असे आपण. पण शेतकरी आपल्यावर अवलंबून नसला तरी आपण शेतकर्यावर अवलंबून असतो बारा महिने. त्यांचा विचार केलाच पाहिजे आपण. 
                      ही आपली जिवाभावाची माणसं अचानक जीव का देताहेत म्हणून मकरंद आणि नानासोबत जाऊन धडकलो त्यांच्या भेटीला. राजाभाऊ शेळके, विलास चामे, रवींद्र बनसोड, राजू शिंदे असे मित्र सोबत होते. जिल्हा बीड. ऑगस्ट २०१५. 
                      समोर मुली सारख्या, बहिणी सारख्या तरुण पोरी सौभाग्य हरवलेल्या. मांडीवर लेकरू आणि कपाळावर कुंकवाच्या जागी भलं मोठं प्रश्नचिन्ह. पुढ काय? त्यांच्याकडेही उत्तर नव्हतं आणि आमच्या कडेही. प्रत्येकीला पंधरा हजार रुपयांची मदत द्यायला गेलो होतो तेंव्हा वाटलं होतं की आपण सामाजिक भान जपतोय. पण नंतर लक्षात आलं आपल्याला तर अजून भानच नाही या गोष्टीचं. काय करणार या तरुण पोरी? आयुष्य कसं काढणार? आणि ती तान्ही पोरं त्यांचा काय दोष? एका क्षणात आशावाद एखाद्या मेलेल्या जनावरासारखा पडला निपचित. आणि हजारो गिधाडं गोळा व्हायला लागले प्रश्नांचे. आपल्यातल्या पांढरपेशी माणसाचे लचके तोडणारे प्रश्न. यातून मार्ग काढायचा होता. त्याशिवाय शांतता नव्हती. ती तरुण बहिणींची पांढरी कपाळ स्वस्थ बसू देणार नव्हती. 
                      लातूरला गेलो. खरंतर मनात सारखे विचार यायचे. आता नाही बघायची ती पांढरी कपाळ. आणि मग ठरवलं आता खरच नाही बघायची. हा प्रश्न मिटला पाहिजे. एकही शेतकऱ्याने आत्महत्या करायला नको. पण काय करायचं त्यासाठी? फिरायचं. प्रश्न समजून घ्यायचा. 
                       आधी नांदेड मग औरंगाबाद. मग विदर्भ. खानदेश. विश्वासाने मन मोकळ्या करणाऱ्या बहिणी. रडायच्या बोलता बोलता. ऐकलं. आधार द्यायला बोललो काहीबाही. पण लक्षात आलं आपले शब्द पुरेसे नाहीत. खरतर शब्द काहीच कामाचे नाहीत. आजवर किती लोकांनी किती वेळा शब्द दिलाय त्यांना. आपण तेच करायचं का? मग ठरलं काम करायचं. जे जे समोर येईल ते काम करायचं. लोक भेटत गेले. काय काय करता येईल सांगत गेले. काना कोपर्यात खूप माणसं आपापल्या परीने मोठं काम करताहेत. शांतपणे. त्यांना भेटलो. असं माझ्या डोळ्यासमोर नाना, मकरंद, शुभा महाजन, राजाभाऊ, केशव आघाव, शाम पेठकर, हरीश इथापे, कांतराव देशमुख , राजू शिंदे यांच्या कष्टाने तुमचं आमचं नाम उभं राहिलं. आता ऑगस्ट २०१६ . एक वर्ष पूर्ण झालं. पण या एक वर्षात खूप काही घडलं. बरंच काही बदललं. यापुढेही बदलणार आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *